You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
थेय्यम: आग, धूर, बाहेर येणं, पुन्हा एकदा आगीत उडी... हे अग्निदिव्य तो पुन्हा पुन्हा करत राहिला
- Author, टीम बर्ड
- Role, बीबीसी प्रतिनिधी
पहाटे साडेचारची वेळ... पक्ष्यांची किलबिल नुकतीच सुरू झालेली. हा किलबिलाट छेदत गर्द झाडीतून तालवाद्यांचा नाद घुमत असलेला मी ऐकला.
मंदिराच्या पायऱ्या झरझर उतरून अनवाणी पायांनी मी तिथे जमलेल्या स्त्रियांच्या घोळक्याकडे गेलो. ठेवणीतल्या साड्या नेसून, नटून सजून त्या जमल्या होत्या. पुढच्या काही क्षणांत तिथे गडद लाल कपडे घातलेला, केशरी पिवळ्या किरमिजी रंगात नजाकतीने रंगवलेल्या चेहऱ्याचा असा एक जण देवळामागून अवतरला.
त्याच्या डोक्यावर एक किरमिजी रंगाचा मोठासा रुपेरी मुकुट चढवलेला होता. या मुकुटाला 'मुडी' असं म्हणतात. लहान मुलासारखी जवळ-जवळ पावलं टाकत तो संथ लयीत डौलत पुढे आला आणि ढोल-नगाऱ्याच्या संगीताच्या तालावर हळूहळू नाचू लागला.
त्याच्या नृत्याची गती संगीताच्या लयीबरोबर टिपेला पोहोचली तेव्हा माणसाला देवत्व बहाल करणारी ती अवस्था आली. त्याचं रुपांतर इहलोकातल्या मर्त्य माणसातून स्वर्गीय ईश्वरात होत होतं.
150 कोटी लोकसंख्येच्या भारतात 33 कोटी देव असल्याचं हिंदू मानतात. त्यामुळे या देशात धार्मिक सण-उत्सव आणि त्यानिमित्ताने होणारे विधी, कार्यक्रम, प्रथा साजऱ्या करणं हे काही कमी नाही. पण या सगळ्या उत्सवांमध्ये सर्वांत जुना आणि मंत्रमुग्ध करणारा अनुभव देणारा कार्यक्रम असतो तो थेय्यम.
दक्षिण भारतात विशेषतः केरळमध्ये आणि कर्नाटकच्या काही भागांत थेय्याम साजरा केला जातो.
थेय्यामचा शब्दशः अर्थ आहे देव किंवा देवाचा अवतार. थेय्याम हा एक प्रकारे लोककला आणि संस्कृतीचा आविष्कार आहे. कदाचित हिंदू धर्माच्याही पूर्वीचा पण हिंदूंच्या पौराणिक कथांचा समावेश असलेला एक नाट्य, मूकाभिनय आणि त्यामार्गाने केलेल्या उपासनेचा हा आविष्कार आहे.
ज्या काळात आदिवासी आणि त्यांच्या निसर्गदेवतांचं राज्य होतं त्या काळापासून चालत आलेली ही परंपरा. कोलाम म्हणजे कलाकार. त्याचा चेहरा रंगवून, माणूसपण झाकलं जाईल असे दैवी पोषाख करून संगीताच्या तालावर नाचत नाचत तल्लीन होऊन तो गिरक्या घेत इतका मग्न होतो की, तो ज्या देवाची भूमिका करून नाचत असतो त्याचं देवत्वच त्या कलाकारात संचारतं.
उत्तर केरळ आणि कर्नाटकात मिळून जवळपास 400 प्रकारचे थेय्याम सध्या प्रचलित आहेत. त्यांचे कार्यक्रम हे स्थानिक मल्याळम दिनदर्शिकेत उल्लेखलेले शुभ दिवस निवडून त्यावर ज्योतिषांनी शिक्कामोर्तब करून ठरवलेले असतात.
साधारण ऑक्टोबर ते एप्रिल दरम्यान सूर्यास्तानंतर अंधार पडला की कार्यक्रम सुरू होतो तो अगदी पहाटे पहाटेपर्यंत चालतो.
उत्तरोत्तर रंगतो आणि मंत्रमुग्ध अवस्थेत येऊन संपतो. थेय्याम हा लोककलेचा प्रकार आहे आणि तो सगळ्यांसाठी मोफत उपलब्ध आहे, असं म्हटलं तरी तो काही प्रेक्षक जमवून करण्याचा कार्यक्रम किंवा खेळ नव्हे.
तो एक धार्मिक विधी म्हणूनच श्रद्धेने मांडला जातो आणि वठवला जातो. इतिहास, परंपरा, प्रथा आणि कला यांची अत्यंत भावपूर्वक श्रद्धेने केलेली ती मांडणी असते.
थेय्यामचा चेहरा रंगवणं ही मोठी कला
कन्नूर या बंदराच्या शहरापासून 20 किलोमीटर आत असलेल्या पंचीक्कवू नावाच्या छोट्याशा खेड्यातल्या मंदिरात मी पहिल्यांदा थेय्यम अनुभवला. मी कार्यक्रमाच्या ठिकाणी मुद्दामच लवकर पोहोचलो. थेय्यामच्या कलाकारांचं फेस पेंटिंग सुरू होतं.
अगदी बारीक ब्रश वापरून कलाकारांचे चेहरे नजाकतीने रंगवण्यात येत होते. रेखीव भौमितिक आकार आणि रंगसंगती जाणीवपूर्वक केली जात होती. हे रंगकाम कित्येक तास चालतं.
कुठलाही थेय्यामचा विधी हा एकासारखा दुसरा नसतो. कलाकार किंवा भूमिका वठवणारे कोलाम वेगवेगळ्या देवतांच्या प्रमाणे वेगवेगळे पोषाख आणि दागिने घालतात. प्रत्येकाची वेषभूषा, रंगभूषा वेगवेगळी असली तरी ते करण्याची काही मार्गदर्शक तत्त्वं असतात.
पी.एस. कुरियन या थेय्यम तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, फक्त आणि फक्त नैसर्गिक पदार्थांपासून पारंपरिक पद्धतीने तयार केलेले पूर्णपणे नैसर्गिक रंगच चेहरा रंगवण्यासाठी वापरले जातात.
म्हणजे पांढऱ्या रंगासाठी भाताची पेज वापरली जाते, पिवळ्या रंगासाठी हळद आणि असेच इतर. थेय्यमच्या कार्यक्रमात लाल रंगाचा वापर प्रकर्षाने केलेला दिसतो. हा रंग उर्जेचा निदर्शक. तसंच राग, संताप दर्शवण्यासाठीही या रंगाचा वापर केला जातो. हळद आणि चुनखडीपासून हा रंग तयार करतात.
भाताच्या साळी किंवा भुस्सा जाळून त्यात खोबरेल तेल मिसळून काळा रंग तयार केला जातो.
थेय्यम विधीची वेशभूषा
थेय्याममध्ये सहभागी होणाऱ्या कलाकारांची वेशभूषासुद्धा बारकाईने ठरवली जाते. मुख्य विधी ज्या देवळात होणार आहे त्यापासून थोडं दूर एका खासगी जागेत किंवा स्वतंत्र तंबूत कलाकारांची वेशभूषा करतात. वेशभूषेत मुकुटाचं स्थान सगळ्यांत महत्त्वाचं. याला मुडी म्हणतात.
नारळ, सुपारीची टरफलं, करवंट्या, मोरपीस अशा वजनाला फार जड नसलेल्या गोष्टींपासून भडक रंगाचा लखलखीत मुकुट तयार केला जातो.
थेय्यम कलाकार आपल्या कार्यक्रमाची तयारी फक्त शरीराने नाही, मनानेही करत असतो. प्रत्येक प्रवेशापूर्वी ते संयम, उपवास, ध्यानधारणा, प्रार्थना आणि एकांतात चिंतन-मनन या गोष्टी करत असतात.
कारण फक्त रंगभूषा, वेशभूषेतून ते वठवत असलेल्या देवाची भूमिका प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं हाच त्यांचा उद्देश नसतो, तर जमलेल्या सश्रद्ध प्रेक्षकांना त्यांच्या या भूमिकेच्या माध्यमातून देवाच्या जवळ घेऊन जाणं... थोडक्यात मानवता आणि देवत्व यांच्यातली सीमारेषा धूसर करत जाणं हादेखील उद्देश असतो.
पारंपरिक जातीची उतरंड उलटी होते तेव्हा...
मी पाहिलेल्या थेय्यमच्या सुरुवातीलाच कोलाम ढोलकीच्या तालावर नाचत असतो, झुलत असतो. नगारा आणि ढोल यांच्या तालावर डुलत डुलत हळूहळू लय वाढते. संगीताची तालगती वाढते तशी पावलांची लय वाढत जाते, चेहऱ्यावरच्या हालचालींची गतीही वाढते आणि त्याच तालावर एक पाय उंचावत ताल धरत लयबद्ध नृत्य सुरू होतं.
कुरियन थेय्याम प्रथेबद्दल आणि सहभागी कलाकारांबद्दल विस्ताराने सांगतात. थेय्यमची प्रथा आदिकाळापासून चालत आलेली असली आणि हिंदू धर्माआधीपासून अस्तित्वात असली तरी हिंदू धर्मातील जातीव्यवस्थेचे घटक अधोरेखित केले जातात. कुरियन सांगतात, "दलित वर्गातल्या ठराविक 15 जमातींचे लोकच थेय्यमममध्ये काम करू शकतात.
(भारतात शेकडो दलित जमाती आहेत.)
पुरुष कलाकारच यात भाग घेतात. आणि ही जी ढोल किंवा नगारा वाजवणारी मंडळी आहेत ती समाजव्यवस्थेच्या जातीय उतरंडीत सगळ्यांत खालच्या स्तरातली मंडळी आहेत. दलितांमधलीही सर्वांत खालची जात असते त्या समाजातले लोक वाद्य वाजवतात.
"सामाजिक रचनेच्या बरोबर उलट थेय्यामचा मान असतो. म्हणजे दलित समाज देवाची भूमिका वठवतो. अर्थातच प्रेक्षकांमधले उच्चभ्रू जातीतले लोक दलित कलाकारांना अभावानेच मिळणारा मान देतात आणि नितांत आदराने वागवतात.
स्त्री-पुरुषांसाठी पवित्र प्रथा
काही थेय्यम हे प्रचंड मोठे असतात. म्हणजे संध्याकाळी सुरू होणारा कार्यक्रम थेट पहाटेपर्यंत चालतो. एका सकाळी अगदी झुंजुमुंजू होण्याच्या वेळीच मला कन्नूरजवळच्या दुसऱ्या एका मंदिरात दोन पांढऱ्या रंगाने रंगवलेले चेहरे दिसले.
हिंदू धर्मात मृत्यूदेवता म्हणून उल्लेख असतो त्या यमराजाचे जुळे अवतार होते ते. न्याय आणि मृत्यूची देवता. नृत्य आणि गिरक्या घेत ते त्यांच्या भूमिकेशी एकरूप झालेले मी पाहिले.
थेय्याममध्ये फक्त पुरुष कलावंतच सहभागी होण्याची प्रथा असल्याने स्त्री देवतासुद्धा पुरुषच साकारतात. तरीही या प्रथेला एक अपवाद असल्याचं मला कुरियन यांनी सांगितलं. केरळच्या अलेप्पी शहराजवळचं एक नागमंदिर आहे. तिथे दर दोन वर्षांनी स्त्रिया थेय्याम साकारतात. पण एरवी स्त्रिया या प्रेक्षक आणि भक्त म्हणून श्रद्धेने या कार्यक्रमात उपस्थित असतात.
कार्यक्रमानंतर आशीर्वाद घेण्यासाठी आणि कोलामकडून पुटपटत सांगितले जाणारे सल्ले ऐकण्यासाठी त्या उत्सुक असतात. त्यासाठी आपले ठेवणीतले कपडे घालून नटून सजून त्या कार्यक्रमात येतात. शेकडो वर्षांची परंपरा असलेली ही प्रथा पिढीजात चालत येते. या प्रथेचा भाग असलेले कोलाम आपापल्या वडील-आजोबा अशा आधीच्या पिढीकडूनच ही कला विधीवत समजून घेतात. त्यांच्या घराण्यात शेकडो वर्षं चालत आलेली ही परंपरा कायम ठेवतात.
थेय्यम सुरू असण्याच्या काळात मी कल्लिक्कोडन नावाच्या कुटुंबाला भेटलो. कन्नूरमध्ये कावूजवळच्या एका छोट्या देवळात त्यांचं मातृकुळातून मिळालेलं जुनं घर आहे.
"थेय्यामचा कार्यक्रम असतो तेव्हा त्याची सगळी बारीक सारीक तयारी स्त्रिया मोठ्या श्रद्धेने करतात", असं नंदना राजेश सांगतात. त्यांची आई संध्या आणि आजी सुजना पूजेची तयारी निगुतीने करतात. पुजाऱ्याला आणि त्याच्या साथिदारांना लागणारं सारं साहित्य पुरवतात. "थेय्याम हा परंपरेप्रममाणे पुरुषांनी करण्याचा कार्यक्रम आहे, हे आम्हाला माहीत आहे आणि मान्यही आहे. तशीच प्रथा आहे", त्या सांगतात.
"थय्याम ही आमच्यासाठी केवळ प्रथेप्रमाणे करण्याचा एक विधी नव्हे. ती एक ताकदवान कला आहे. आम्हाला यातून प्रचंड उर्जा मिळते आणि देवतांचा आशीर्वादही लाभतो", केरळची रहिवासी असलेली व्ही एस सिमी सांगते.
"थेय्याम आणि इतर कलांच्या माध्यमातून अनेक वेळा केरळच्या महान कथा सांगितल्या जातात. आमचे पूर्वजच प्रत्यक्षात उतरून आमच्या आयुष्यात आलेत, अशी ती भावना असते", असं लक्ष्मी विजयन सांगतात.
भव्य किरमिजी देव दिसे मज
वेगवेगळ्य देवता आणि भूमिकांसाठी प्रत्येक देवळात ठराविक थेयाम परंपरेने चालत आलेले असतात. एक मध्यवर्ती कोलाम मुख्य देवाच्या भूमिकेत असतो. आदिवासी परंपरेतेचे निसर्गदेवतेच्या वेगवेगळ्या रूपांबरोबर हिंदू धर्मातल्या रुपकांचं मिश्रण करत कार्यक्रम पुढे जात असला तरी प्रामुख्याने हिंदू पुराणातली कथानकं केंद्रस्थानी असतात.
हनुमान, शिवशंकर यांचे अवतार पुढे येत राहतात. प्रजनन आणि विनाशाची देवता म्हणून पांढरा मुखवटाधारी येतो. त्याच्या डोक्यावर पोफळीच्या पानांचा मुकुट असतो. त्याला शिवअवतार म्हणून मान्यता आहे.
पण सर्वांत नाट्यमय आणि वैशिष्ट्यपूर्ण भूमिकेत असते त्या थेय्यमची मुख्य देवता. तिची भूमिका वठवणारा कोलाम साधारणतः गडद नारिंगी किंवा किरमिजी कपड्यांत अवतरतो. झग्यासारखा घेरदार अंगरखा त्याने चढवलेला असतो आणि भव्य मुडी किंवा मुकुट डोक्यावर असतो.
यज्ञातील आहुती
थेय्यममध्ये अग्नी महत्त्वाची भूमिका बजावतो. देवत्वाकडे जाण्याचा किंवा शुद्धीचा तो मार्ग असल्याचं मानतात. अग्नीवरून चालणं किंवा ज्वाळांवरून उडी घेणं म्हणजे हिंदू पुराणातलं अग्निदिव्य समजलं जातं.
एके दिवशी मी कुरियन यांच्या समवेत शैजूला भेटायला त्याच्या कन्नूरच्या घरी गेलो. शैजू हा एक थेय्यम कलावंत आहे. त्याने दार उघडलं तेव्हाच मला त्याच्या नाकावर आणि हनुवटीजवळ जळल्याच्या खुणा दिसल्या. चामुंडी(Thee Chamundi)नावाच्या थेय्यममध्ये काम करतानाच्या या खुणा असल्याचं तो सांगतो. नारळाच्या झावळ्यांपासून तयार केलेल्या घेरदार अंगरख्यात नटलेला कोलाम पुन्हा पुन्हा जळत्या निखाऱ्यावरून चेहरा खाली ठेवून उडी घेतो तेव्हा झालेल्या त्या जखमा.
भगवान विष्णूचा परमभक्त प्रल्हाद याचा राक्षसी छळ होतो तेव्हा त्याला वारंवार आगीत लोटलं जातं या पुराणकथेचा भाग चामुंडी थेय्यममध्ये घेतला जातो. त्यामुळे शैजूच्या चेहऱ्यावर या खुणा उमटल्या होत्या.
"मी थेय्याम करायला लागलो वयाच्या पाचव्या वर्षापासून..." शैजू सांगत होता. त्याला त्याच्या वडिलांकडूनच कोलाम व्हायचं प्रशिक्षण मिळालं. शैजू मला त्याचं घर दाखवत सांगत होता. एखादा विजेता खेळाडू ज्या आत्मीयतेने आणि अभिमानाने त्याची सन्मानचिन्हं दाखवेल त्याच थाटात तो मला त्याच्या थेयमच्या ट्रॉफी आणि ढाली दाखवत होता.
"आदिवेदन हा माझा पहिला कार्यक्रम. ओणम दरम्यानच्या उत्सवात लहान मुलं हा कार्यक्रम करतात. केरळच्या ओणममध्ये सगळ्या जाती-धर्माचे लोक सहभागी होत असतात. त्या वेळी मी सुरुवात केली होती. आता मी वेगवेगळ्या प्रकारच्या १२ भूमिका करू शकतो. मी चामुंडा करायला लागलो तेव्हा अळ्ळीकोड जेझूर मंदिराकडून माझा सत्कार करण्यात आला. मला त्यांनी सोन्याची बांगडी आणि उंची रेशमाचं लाल वस्त्र दिलं. ते मी माझ्या घरच्या देवात ठेवलं आहे. त्याची पूजा करतो मी. माझ्याकडे असलेला हा अमूल्य आणि पवित्र ठेवा आहे."
आग्निदिव्य - थेट आगीत झेप
शैजूला भेटल्यानंतर काही दिवसांनी मी दुसऱ्या एका देवळात चामुंडी बघायला गेलो. मंदिराबाहेर निखारे पेटवून आग केलेली होती. ज्वाळा भडकलेल्या दिसल्या. पुजारी आणि त्याचे साथीदार आग रिंगणाबाहेर पडून भडकू नये म्हणून भोवती पाणी शिंपडत होते आणि त्याच वेळी निखारे विझू नयेत म्हणून त्याला वारा घालत आग भडकत ठेवत होते. तेवढ्यात नारळाच्या हिरव्या झावळ्या बांधून कोलाम रिंगणात आला. त्याला आगीजवळ नेण्यात आलं. आगीकडे तोंड करून त्याने थेट झेप घेतली त्या वेळी ठिणग्या उडाल्या. धूर झाला आणि लोकांनी एकच गलका केला.
त्याला प्रोत्साहन देण्यासाठी चित्कार सुरू झाले. साथीदारांनी कोलामला बाहेर काढलं त्या वेळी त्याच्या अंगावरच्या झावळ्या पेटल्या होत्या. त्यातून धूर निघत होता. त्यांनी त्या साफ केल्या. प्रेक्षकांचा आवाज सुरूच होता. एका मिनिटाच्या आत त्याने पुन्हा आगीकडे झेप घेतली.
पुन्हा चर्रचर्र पेटल्याचा आवाज, धूर, बाहेर येणं. पुन्हा एकदा आगीत उडी.... हे अग्निदिव्य तो पुन्हा पुन्हा करत राहिला.
नारिंगी रंगभूषा केलेल्या त्या कोलामचं सगळं शरीरच एक आगीचा गोळा वाटू लागला. थक्क होऊन मी समोरचं किरमिजी दृश्य पाहात होतो. तेव्हा मी माझ्यातच हरवून गेलो. माझ्या गेस्टहाउच्या दिशेने निघालो तेव्हा पूर्वेचं आकाश किरमिजी झालं होतं. ढोल-नगाऱ्यांचे आवाज दूर दूर जात होते आणि तो अंगार माझ्या अंगात फुललाय असं वाटू लागलं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)