You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कांतारा सिनेमात दाखवलेला भूत कोला काय आहे? त्यावरून वाद का सुरू आहे?
- Author, वेरुकुटी रामकृष्ण
- Role, बीबीसी प्रतिनिधी
'कांतारा' सिनेमा सध्या सिनेरसिकांच्या चर्चेचा विषय आहे. अनेकजण उत्साहानं सोशल मीडियावर या सिनेमाबद्दल लिहितायेत. मूळचा कन्नड भाषेतील हा सिनेमा हिंदीसह इतर काही भाषांमध्येही प्रदर्शित झालाय. त्यामुळे देशभर सिनेमा पाहिला जातोय.
एकीकडे कांतारा सिनेमाबद्दल कौतुकाच्या प्रतिक्रिया बोलल्या-लिहिल्या जात असताना, दुसरीकडे सिनेमावरून वादालाही सुरुवात झालीय. सिनेमावरून म्हणण्यापेक्षा यातील 'भूत कोला' या प्रथेवरून.
कांतारा सिनेमात 'भूत कोला' नामक प्रथेचा उल्लेख करण्यात आलाय. किंबहुना, सिनेमाच्या कथेच्या केंद्रस्थानी ही भूत कोला प्रथा आहे.
या 'भूत कोला' प्रथेवर मत नोंदवणाऱ्या कन्नड अभिनेता चेतन कुमार याच्याविरोधात कर्नाटक पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. भूतकोला हा हिंदू संस्कृतीचा भाग नाही, असं अभिनेता चेतन कुमारनं म्हटलं होतं.
त्यानंतर बंगळुरू पोलिसांनी चेतन कुमारविरोधात द्वेष पसरवण्याच्या आरोपाखाली आयपीसी कलम 505 (2) अन्वये गुन्हा दाखल केला.
काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीदरम्यान 'कांतारा' सिनेमाचा दिग्दर्शक ऋषभ शेट्टीने म्हटलं होतं की, भूत कोला प्रथा हिंदू संस्कृताचा भाग आहे.
दिग्दर्शक ऋषभ शेट्टीनेच या सिनेमात मुख्य पात्राची भूमिका साकारलीय.
ऋषभच्या या मुलाखतीनंतर अभिनेता चेतन कुमारनं म्हटलं की, भूत कोला हिंदू संस्कृतीचा भाग नाहीय.
दुसरीकडे, कर्नाटक सरकारनं या महिन्याच्या 20 तारखेला भूत कोला प्रथेतल्या वयाची साठी पार केलेल्या कलाकारांना दरमाह दोन हजार रूपये पेन्शन देण्याचे जाहीर केले.
बंगळुरू मध्यचे खासदार आणि भाजपचे नेते पीसी मोहन म्हणाले की, भूत कोला हिंदू संस्कृतीचाच भाग आहे.
या सगळ्यावरून आता कंतारा सिनेमातील 'भूत कोला' वादाचं केंद्र बनलंय.
ऋषभ शेट्टी काय म्हणाला होता?
कांताराच्या प्रदर्शनानिमित्त अभिनेता, दिग्दर्शक ऋषभ शेट्टीनं सिनेमासंबंधीचं तमीळ वाहिनी 'विकतन'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला 'पंजुर्ली'बाबत प्रश्न विचारण्यात आला. कांतारा सिनेमात पंजुर्ली देव दाखविण्यात आला आहे.
या प्रश्नाला उत्तर देताना ऋषभनं म्हटलं की, "हे देव नक्कीच आपल्या संस्कृतीचा भाग आहे. हिंदू संस्कृती आणि परंपरेचा भाग आहे. मी हिंदी आहे आणि माझा त्यावर विश्वास आहे. मला माझ्या धर्माचा आदर आहे."
"इतर लोक चुकीचे बोलतायेत असे नाही, पण मी जे सिनेमात दाखवलंय ते हिंदुत्त्ववादी आहे," असं ऋषभ शेट्टी म्हणाला.
चेतन कुमार काय म्हणाला?
कन्नड अभिनेता चेतन कुमारनं ऋषभ शेट्टीच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला.
भूत कोला हिंदू धर्माचा भाग असल्याचा ऋषभ शेट्टीचा दावा खोटा असल्याचं चेतन कुमार म्हणाला.
पंबदा, नलिके, पारवा ही बहुजन संप्रदाय वैदिक-ब्राह्णनिकल हिंदुत्त्वापेक्षा जुने आहेत, असं चेतन कुमार म्हणाला.
आदिवासी संस्कृती दाखवण्याची विनंती करतो, असंही चेतन कुमार म्हणाला.
सोशल मीडियावर काय चर्चा आहे?
भूत कोला प्रथा हिंदू संस्कृतीचा भाग आहे की नाही, यावरून सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू आहे.
काहीजण भूत कोला हिंदू संस्कृतीचा भाग आहे असं म्हणतायेत, तर काहीजण तेच खोडून काढतायेत.
कॅप्टन ब्रिजेशन चौता यांनी भूत कोला हिंदू संस्कृतीचा भाग असल्याचं स्पष्ट करताना सत्य आणि धर्म हे सूर्य आणि चंद्रासारखे या परंपरेत उच्चस्थानी असल्याचं म्हटलंय. हे सर्व हिंदूच आहेत, असंही ते म्हणालेत.
त्याचवेळी, ग्रीष्मा कुथर यांनी मात्र भूत कोला हिंदू संस्कृतीतलं असल्याचं नाकारलंय. त्या म्हणतात की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा या भागातील प्रभाव वाढल्यानंतर त्यांनी आदिवासी परंपरांना हिंदू ओळख चिकटवण्याचा प्रयत्न केला.
'भूत कोला' आहे तरी काय?
भूत कोला हा पूजेचा भाग आहे. कर्नाटकातील दक्षिण कर्नाटक, उडुपी आणि केरळमधील कासरगोड या भागात हा प्रकार आढळतो. तुळू समाजातील लोक त्यांच्या देवतांची भूत कोलाच्या माध्यमातून पूजा करतात.
नृत्याद्वारे दैवीशक्तींची पूजा करणं हे भूत कोलाचे प्रमुख रूप आहे.
भूत म्हणजे शक्ती आणि कोला म्हणजे साजरा करणं किंवा सादर करणं.
रानडुकरांनी पिकांची नासधूस केल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आणि त्यानंतर ते वाघ (पिलीचंडी) आणि रानडुकरांची (पांजुर्ली) पूजा करू लागले. स्वत:च्या आणि पिकांच्या रक्षणासाठी या माध्यमातून आर्जव केले जातात.
भूत कोलामध्ये नृत्य करणारे अभिलाष यांनी इंडिका टुडेशी बोलताना सांगितलं की, "आम्ही शक्तीची पूजा करतो. यात अनेक आर्जव केले जातात. गाई-गुरांचं रक्षण व्हावं म्हणून, नाना आजारांपासून आम्हाला वाचवावं म्हणून, अशा अनेक गोष्टींसाठी ही पूजा असते."
या प्रथेत चार शक्ती मानल्या गेल्यात -
अभिलाश चौता यांच्या मते, भूत कोलाच्या पूजेत चार प्रकारच्या मुख्य शक्ती आहेत.
1) मानवकेंद्रित शक्ती - जमीनदारांच्या दडपशाहीविरोधातल्या संघर्षातून आलेला हा प्रकार आहे. जमीनदारांविरोधात ज्यांनी बंड पुकारला त्यांना देवता मानून पूजण्यास सुरुवात झाली. कोटी-चेन्नय्या हे त्यांचं उदाहरण.
अन्यायाविरोधात लढलेल्यांची पूजा केली जाते. कलकत्ता-कल्लुर्थी हे त्याचं उदाहरण.
2) प्राणीकेंद्रित शक्ती - मानवासाठी आणि पिकांसाठी धोकादायक असलेल्या प्राण्यांची पूजा केली जाते. रानडुक्कर (पांजुर्ली) किंवा वाघ (पिलीचंडी) अशा प्रकारचे प्राणी.
3) निसर्गाची शक्ती - हवा, पाणी, पृथ्वी, आकाश आणि आग यांची पूजा केली जाते.
4) पुराण - विरभद्र आणि गुलिगा
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)