मचाडोंनी ट्रम्पना समर्पित केला 'नोबेल'; तर ट्रम्प म्हणाले, 'लाखोंचे जीव वाचवल्याचा आनंद'

नोबेल विजेत्या मारिया कोरिना मचाडो आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, नोबेल विजेत्या मारिया कोरिना मचाडो आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

2025 चा शांततेचा नोबेल पुरस्कार व्हेनेझ्युएलाच्या राजकारणी मारिया कोरिना मचाडो यांना देण्यात आला आहे.

नोबेल पुरस्कार समितीनं एक्स या सोशल मीडियावर यासंदर्भातील माहिती दिली आहे.

त्यात म्हटलं आहे कीमारिया कोरिना मचाडो यांना "व्हेनेझ्युएलाच्या लोकांच्या लोकशाही हक्कांसाठी, तसंच न्यायिक आणि शांततामय मार्गानं हुकुमशाहीविरोधात लोकशाहीसाठी संघर्ष करण्यासाठी" शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे.

यंदाच्या शांततेचा नोबेल पुरस्कार नेमका कोणाला दिला जाणार याची मोठ्या औत्सुक्यानं वाट पाहिली जात होती.

कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आधीच या पुरस्कारासाठी स्वत:ला दावेदार म्हणून घोषित केलं होतं.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आधीच या पुरस्कारासाठी स्वत:ला दावेदार म्हणून घोषित केलं होतं.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अनेक प्रसंगी म्हणाले होते की, त्यांनी जगातील अनेक भागातील लष्करी संघर्ष थांबवत शांतता निर्माण केली आहे.

अलीकडेच गाझामध्ये हमास आणि इस्रायलमध्ये पहिल्या टप्प्यातील शस्त्रसंधीदेखील त्यांनी जाहीर केली आहे.

आता एका बाजूला नोबेल विजेत्या मारिया कोरिना मचाडो यांनी हा पुरस्कार डोनाल्ड ट्रम्प यांना समर्पित केला आहे तर दुसऱ्या बाजूला "मी असं कधीच म्हणालो नव्हतो की हा पुरस्कार मला द्या," असं विधान डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांना पुरस्कार केला समर्पित

मारिया कोरिना मचाडो यांनी सोशल मीडिया वेबसाइट 'एक्स'वर एका पोस्ट करत हा पुरस्कार व्हेनेझुएलाच्या लोकांना आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना समर्पित केला आहे.

"व्हेनेझुएलाच्या सर्व लोकांच्या संघर्षाला मिळालेली ही मान्यता आपल्याला स्वातंत्र्य मिळवण्याचं आपलं स्वप्न पूर्ण करण्यास नक्कीच प्रोत्साहित करेल," असंही त्यांनी लिहिलं आहे.

"आज, आपण विजयाच्या उंबरठ्यावर पूर्वीपेक्षा जास्त आहोत. स्वातंत्र्य आणि लोकशाही साध्य करण्यासाठी आपले प्रमुख सहयोगी म्हणून आपण राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, अमेरिकेतील लोक, लॅटिन अमेरिकेतील लोक आणि जगातील लोकशाही राष्ट्रांवर आम्ही विश्वास ठेवतो."

यासोबतच मारियाने लिहिलं आहे की, "मी हा पुरस्कार व्हेनेझुएलाच्या पीडित लोकांना तसेच आमच्या कार्याला निर्णायक पाठिंबा दिल्याबद्दल राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना समर्पित करते."

मारिया कोरिना मचाडो यांची ही पोस्ट 'व्हाईट हाऊस'ने रिपोस्ट केली आहे.

"मी असं कधीच म्हणालो नव्हतो की 'हा पुरस्कार मला द्या'"

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या पुरस्काराबाबत व्हाईट हाऊसमध्ये बोलताना असं म्हटलंय की, "ज्या व्यक्तीला नोबेल पुरस्कार प्राप्त झाला आहे, त्यांनी मला फोन केला आणि म्हटलं की, 'मी तुमच्या सन्मानार्थ हा पुरस्कार स्वीकारत आहे कारण तुम्ही खरोखरच त्याला पात्र आहात.' मी असं कधीच म्हणालो नव्हतो की 'हा पुरस्कार मला द्या.'

पुढे ते असंही म्हणाले की, "कदाचित पुरस्कार प्राप्त विजेत्या व्यक्तीला तो पुरस्कार मला द्यायचा होता. मी बऱ्याच काळापासून तिला मदत करत होतो. मी आज आनंदी आहे कारण मी लाखो लोकांचे जीव वाचवले आहेत."

मी आश्चर्यचकित आहे - मचाडो

एएफपीला पाठविलेल्या एका व्हीडिओमध्ये, मचाडो त्यांचे उत्तराधिकारी एडमंडो गोन्झालेझ यांना "मी आश्चर्यचकित आहे", असं सांगताना दिसत आहेत.

गोन्झालेझ उत्तर देतात, "आम्ही आनंदाने आश्चर्यचकित झालो आहोत."

58 वर्षीय मचाडो सध्या व्हेनेझुएलामध्ये भूमिगत आहेत.

नोबेल समितीने नुकताच एक व्हीडिओ प्रसिद्ध केला. त्यामध्ये मचाडो यांना हा पुरस्कार मिळाल्याची माहिती देण्यात आली आहे.

ही बातमी सार्वजनिक होण्याच्या काही मिनिटे आधी मचाडो यांना याबद्दल माहिती देण्यात आली होती.

नोबेल संस्थेचे संचालक क्रिस्टियन बर्ग हार्पविकेन ही बातमी देताना भावूक झाले होते. मचाडो यांना ही बातमी देताना त्यांचा आवाज भरून आला होता.

एएफपीला पाठविलेल्या एका व्हिडिओमध्ये मचाडो

फोटो स्रोत, AFP VIDEOGRAPHICS/AFP via Getty Images

फोटो कॅप्शन, व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या मारिया कोरिना मचाडो

मचाडो यांनी यावर प्रतिक्रिया दिली, "ओह माय गॉड."

असं 5 वेळा म्हटल्यानंतर, त्या म्हणाल्या, "माझ्याकडे शब्द नाहीत".

मचाडो यांनी समितीचे आभार मानले आणि भावूक होत म्हणाल्या, "याचं श्रेय संपूर्ण समाजाचं आहे".

त्या म्हणतात, "मी फक्त एक व्यक्ती आहे, मी या सन्मानासाठी नक्कीच पात्र नाही."

मचाडो म्हणाल्या की, त्यांना या बातमीवर विश्वास ठेवण्यास थोडा वेळ लागेल आणि भावनिक आवाजात पुन्हा एकदा त्यांनी या "सन्माना"बद्दल आभार मानले.

नोबेल पुरस्कार समिती काय म्हणाली?

नोबेल पुरस्कार समितीनं त्यांच्या वक्तव्यात म्हटलं आहे की, 2025 चा शांततेचा नोबेल पुरस्कार अशा "महिलेला देण्यात येतो आहे, ज्यांनी अंधार वाढत असताना लोकशाहीची मशाल पेटती ठेवली आहे."

समितीच्या वक्तव्यात म्हटलं आहे की, शांततेचा नोबेल पुरस्कार मिळणाऱ्या मारिया कोरिना मचाडो अलीकडच्या काळातील लॅटिन अमेरिकेतील हिंमत दाखवणाऱ्या सर्वात 'असामान्य उदाहरणां'पैकी एक आहेत.

नोबल पुरस्कार जाहीर करतानाचा क्षण
फोटो कॅप्शन, नोबल पुरस्कार जाहीर करतानाचा क्षण

समितीचे अध्यक्ष म्हणाले की, मचाडो एक महत्त्वाच्या व्यक्तिमत्व राहिल्या आहेत.

वक्तव्यात पुढे म्हटलं, "भलेही आपल्यात मतभेद असतील. मात्र, लोकप्रिय शासन व्यवस्थेच्या तत्त्वांचं रक्षण करण्यासाठीची आपली इच्छा हाच लोकशाहीचा पाया आहे."

"जेव्हा लोकशाही धोक्यात आहे, अशा काळात इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा लोकशाहीचं रक्षण करणं सर्वात महत्त्वाचं ठरतं."

ट्रम्प यांच्याबद्दलच्या प्रश्नावर नोबेल समिती काय म्हणाली?

नोबेल समितीचे अध्यक्ष योर्गेन वाटने फ्रीडनेस यांना डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल देखील प्रश्न विचारण्यात आला.

त्यांना विचारण्यात आलं की, ट्रम्प यांना शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यासाठी स्वत: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि इतर आंतरराष्ट्रीय समुदायांचा दबाव होता का? तसंच या दबावाचा समितीच्या निवड प्रक्रियेवर परिणाम झाला का?

या प्रश्नावर फ्रीडनेस म्हणाले की, शांततेच्या नोबेल पुरस्काराच्या 'प्रदीर्घ इतिहासात' समितीनं मोहिमा आणि 'प्रसारमाध्यमांचा दबाव' पाहिला आहे.

समितीला लोकांकडून दरवर्षी हजारो पत्रे पाठवली जातात. त्यामधून माहिती दिली जाते की "शांततेसाठी त्यांनी काय केलं."

फ्रीडनेस म्हणाले, "आम्ही त्या व्यक्तीच्या कामाच्या आधारे आणि अल्फ्रेड नोबेल यांच्या मृत्यूपत्रानुसार निर्णय घेतो."

व्हेनेझ्युएलाच्या राजकारणी मरिया कोरीना मचाडो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 2025 चा शांततेचा नोबेल पुरस्कार व्हेनेझ्युएलाच्या राजकारणी मरिया कोरीना मचाडो यांना देण्यात आला आहे.

मरिया कोण आहेत?

मारिया कोरिना मचाडो या व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या आहेत.

गेल्या वर्षी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत उभं राहण्यासाठी त्यांच्यावर बंदी घालण्यात आली होती.

यावर जगभरातून टीका झाली होती आणि म्हटलं गेलं होतं की, ही निवडणूक निष्पक्ष स्वरुपाची नाही.

बीबीसीचे दक्षिण अमेरिकेतील प्रतिनिधी इयोन वेल्स यांनी गेल्या वर्षी काराकासमधील निवडणुकीत पाहिलं होतं की, त्यांचे उमेदवार एडमुंडो गोंजालिज यांच्या प्रचारसभेत रस्त्यावर प्रचंड गर्दी जमली होती.

यामुळे निकोलस मादूरो यांचं सरकार सावध झालं होतं. मारिया देशातील विरोधी पक्षाच्या अशा नेत्या आहेत, ज्यांच्यात रस्त्यावर आणि मतदान केंद्रांवर हजारो लोक गोळा करण्याची क्षमता आहे.

गेल्या वर्षी निवडणुकीच्या सर्व्हेतून दिसत होतं की, त्या निवडणूक जिंकतील.

मारिया कोरिना मचाडो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मारिया कोरिना मचाडो या व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या आहेत.

मात्र निकोलस मादूरो हे तिसऱ्यांदा निवडणूक जिंकले. अर्थात अनेक निरीक्षकांना निवडणुकीत अनियमितता, गैरप्रकार आढळले होते.

बीबीसीचे दक्षिण अमेरिकेतील प्रतिनिधी इयोन वेल्स यांना स्वत:ला देखील आढळलं होतं की, एका मतदान केंद्राबाहेर लोकांना मुद्दाम तासनतास उभं करण्यात आलं होतं.

निवडणुकीच्या निकालानंतर देशाच्या अनेक भागात आंदोलनं झाली. मात्र प्रशासनानं ती दडपून टाकली.

मचाडो सध्या कुठे आहेत, याबद्दल कोणालाही माहीत नाही. जानेवारी महिन्यात मादूरो यांच्या शपथविधी समारंभाला विरोध करण्यासाठी झालेल्या निदर्शनांमध्ये त्या दिसल्या होत्या.

त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती आणि नंतर त्यांची सुटका करण्यात आली होती.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)