बाळाला सांभाळण्यासाठी वडिलांनी थेट नोकरी सोडली, संगमनेरच्या बापमाणसाची प्रेरणादायी गोष्ट

प्रवीण शिंदे आणि प्रियांका सोनवणे

फोटो स्रोत, Pravin Sindhu Bhima Shinde/FACEBOOK

    • Author, आशय येडगे
    • Role, बीबीसी मराठी

स्त्री-पुरुष समानतेच्या गप्पा ट्रेंडिंग असण्याच्या हा काळ आहे. आजकाल या विषयावर अनेक भाषणं केली जातात, वर्तमानपत्रांमध्ये, नियतकालिकांमध्ये मोठमोठे लेख लिहिले जातात पण या गप्पा कृतीत उतरवताना मात्र अनेकांची अडचण होते.

महिलांनी शिकलं पाहिजे, महिलांनी वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवलं पाहिजे, महिलांनी हे केलं पाहिजे, महिलांनी ते केलं पाहिजे असे सल्ले अनेकदा दिले जातात.

पण या समतेसाठी आपण स्वतः आपल्या घरात काय करत आहोत? ज्याप्रमाणे अनेक महिला कुटुंबासाठी, मुलांसाठी त्यांच्या स्वप्नांना मुरड घालून अनेक गोष्टींचा त्याग करतात अगदी तसंच करायला पुरूष तयार आहेत का? आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे महिलांच्या खांद्यावर असणारं जबाबदारीचं ओझं उतरवायला आपली व्यवस्था तयार आहे का? या प्रश्नांची उत्तर शोधणं खूपच गरजेचं आहे.

पुण्यात राहणाऱ्या प्रवीण सिंधू भीमा शिंदे आणि प्रियांका सोनवणे या दांपत्याने मात्र स्त्री-पुरुष समानतेचं हे तत्व स्वतः जगण्याचा निर्णय घेतलाय.

बाळाला जन्म देणं आणि जन्मानंतर काही महिने त्या बाळाचा सांभाळ करणं हे जरी प्रामुख्याने आईचं काम असलं तरी त्यानंतर मात्र त्या बाळाचा सांभाळ त्याचे वडीलही करू शकतात आणि मग प्रसूतीसाठी करिअर ब्रेक घेतलेल्या आईला परत कामावर पाठवून बाबाने त्याच्या करियरमध्ये ब्रेक घेतला तर काय हरकत आहे?

हाच विचार करून पत्रकार प्रवीण शिंदे यांनी बाळाचा सांभाळ करण्यासाठी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला.

महिलांना ज्याप्रमाणे प्रसूतीरजा मिळते अगदी तशीच सुट्टी वडिलांना मिळते का? हेही तपासण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण त्यांना ती सुट्टी मंजूर झाली नाही आणि म्हणूनच प्रवीण यांनी त्यांच्या नोकरीचा राजीनामा दिलाय.

बाळाला सांभाळण्यासाठी नोकरी सोडलेल्या या बाबाचं सोशल मीडियावर अनेकजण कौतुकही करत आहेत.

पण हा निर्णय घेण्यासाठी लागणारं धाडस, मनात रुजवावा लागणारा समतेचा विचार आणि मुळात प्रचंड वेगाने धावणाऱ्या या जगात, ऐन उमेदीच्या काळात अशा पद्धतीने नोकरी सोडणाऱ्या या बापाच्या मनात नेमकं काय आहे? हेच जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही केलाय.

बाळाला सांभाळण्याची जबाबदारी कुणाची असते?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

खरंतर मूल जन्माला घालणं आणि बाळाला दूध पाजणं या दोन जबाबदाऱ्या सोडल्या तर प्रत्येक गोष्ट पुरुषही करू शकतात. पण मुळातच बाळाच्या संगोपनाची, त्याला वाढवण्याची जबाबदारी ही प्रामुख्याने आईवर टाकली जाते.

आईच्या त्यागाचं, आईच्या कर्तव्यांचं गुणगान करणाऱ्या असंख्य कविता आजवर लिहिलेल्या आहेत. पण मुळात मुलींचा जन्म हा फक्त आई होण्यासाठी झालाय हा विचारच तकलादू आहे.

याबाबत बोलताना प्रवीण शिंदे म्हणतात की, "आम्ही महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या सहजीवनाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सत्यशोधक पद्धतीने लग्न केलं. त्यानंतर आमच्या मुलाचा जन्म हा आम्हा दोघांच्याही आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा होता.

त्यामुळे बाळाला जन्म देण्याचा हा निर्णय घेतानाही स्त्री-पुरुष विषमतेच्या अंगाने आमचं निरीक्षण असं होतं की, एखाद्या महिलेसाठी तिच्या वैयक्तिक आयुष्यातले दोन टप्पे खूप महत्त्वाचे ठरतात.

यातला पहिला टप्पा म्हणजे लग्न झाल्यानंतर महिलेची नोकरी गमावण्याची शक्यता खूप वाढते. आम्ही हा धोका ओळखला होता. त्यामुळे एका ठराविक टप्प्यानंतर आम्ही आमच्या भूमिकांची अदलाबदल करण्याचा निर्णय आधीच घेतला होता.

महिलेच्या वैवाहिक आयुष्यातला दुसरा टप्पा म्हणजे एकदा का मूल झालं की त्याची सगळी जबाबदारी ही आईवर ढकलून दिली जाते.

हे करताना अनेकदा तिला इमोशनल ब्लॅकमेल करून त्यागासाठी राजी केलं जातं. 'तुला तुझी नोकरी महत्त्वाची की तुझ्या पोटी जन्मलेलं मूल महत्त्वाचं?' असे भावनिक प्रश्न विचारून महिलांना त्यांच्या करिअरपासून दूर केलं जातं.

हा अवघड प्रश्न समोर आला की बहुतांश स्त्रिया करिअर सोडून मुलांची निवड करतात. पण हे एक प्रकारचं ब्लॅकमेलच आहे."

प्रवीण शिंदे आणि प्रियांका सोनवणे

फोटो स्रोत, Pravin Sindhu Bhima Shinde/FACEBOOK

"त्यामुळे मी आणि प्रियंकाने जेंव्हा याबाबत विचार केला तेंव्हा असं लक्षात आलं की बाळाला जन्म देण्याच्या आणि संगोपनाच्या प्रक्रियेत काही गोष्टी अनिवार्य आहेत.

जसं की बाळाला पोटात वाढवण्याची जबाबदारी ही निसर्गाने फक्त महिलेलाच दिलेली आहे, शारीरिक रचनाच तशी आहे त्यामुळे पुरुष हा भार त्यांच्या खांद्यावर घेऊ शकत नाहीत.

बाळाच्या जन्मानंतर सहा महिने बाळाला स्तनपान करण्याची जबाबदारी सुद्धा महिलांनाच घ्यावी लागते त्यामुळे तिथेही पुरुष काही करू शकत नाहीत.

पुरुष बाळाला पोटात वाढवू शकत नसला किंवा पहिले सहा महिने बाळाला स्तनपान करू शकत नसला तरी त्यानंतरच्या टप्प्यात मात्र पुरुष बाळाची जबाबदारी घेऊ शकतो. कारण त्यानंतर बाळ सहा महिन्यानंतर बाहेरचं खायला लागतं.

थोडं दूध थोडं बाहेरचं खाऊन बाळ स्वतंत्रपणे जगू शकतं, त्या टप्प्यात आईवर असलेलं बाळाचं अवलंबित्व कमी होतं.

त्यामुळे मग बाळाच्या आयुष्यातला पहिला टप्पा आईने सांभाळला असेल तर त्या पुढच्या टप्प्यात बाळाची संपूर्ण जबाबदारी वडिलांनी घ्यायला हवी अशी आम्ही भूमिका घेतली ."

भारतीय कुटुंबांमध्ये हे शक्य आहे का?

समाजव्यवस्थेत पुरुषांकडे कुटुंबप्रमुख म्हणून बघितलं जातं. लग्न, कुटुंब याबाबतच्या सामाजिक समजुती आणि धारणा अतिशय घट्ट आहेत.

अशाच ग्रामीण भागातल्या एका कुटुंबात जन्मलेल्या प्रवीण यांनी प्रवाहाच्या विरोधात जाणारे असे निर्णय घेताना त्यांच्या कुटुंबियांना काय सांगितलं? बाळाच्या संगोपनासाठी नोकरी सोडण्याचा निर्णय घेत असताना त्यांनी कसा संवाद साधला ?

याबाबत ते म्हणतात की, "आपले पालक हे एका परंपरेचे वाहक असतात. त्यांना समाजाने पिढ्यांपिढ्यांपासून एक मार्ग दाखवून दिलेला असतो, आयुष्याची एक परंपरा वाहण्यास शिकवलेलं असतं. त्यामुळे आपले पालक हे त्यांचं काम प्रामाणिकपणे करत असतात.

प्रवीण शिंदे आणि प्रियांका सोनवणे

फोटो स्रोत, Pravin Sindhu Bhima Shinde/FACEBOOK

पण आपल्या पिढीला आधुनिक मूल्यांचं महत्त्व माहिती आहे, नवीन विचार आत्मसात केला तर समाजाचं भलं होऊ शकतं हे आपल्याला पटलं आहे.

आपण सुधारणावादी विचारांचे पाईक आहोत हे आपल्याला पक्कं ठाऊक आहे त्यामुळे त्यांना एखादा नवीन विचार पटवून देत असताना आपण आपल्या मूल्यांवर ठाम राहीलं पाहिजे.

त्यामुळे लग्न करण्याच्या माझ्या पद्धतीबाबत असो किंवा मग मुलाचा सांभाळ करण्यासाठी नोकरी सोडण्याच्या निर्णयाबाबत असो मी मी माझ्या विचारावर ठाम होतो. म्हणूनच हे निर्णय घेऊ शकलो.

या प्रक्रियेत आम्ही आमचे विचार, त्यामागील भूमिका अगदी प्रेमाने घरच्यांना सांगितली. कधी कधी यावर किरकोळ वादही झाला, पण हा वैचारिक वाद करताना संवादाची दारं नेहमी उघडी ठेवली म्हणून कदाचित रूढींचं पालन करत आलेल्या माझ्या कुटुंबीयांना माझा विचार समजून सांगण्यास मला मदत झाली.

माझा नोकरी सोडण्याचा निर्णय अजूनही माझ्या कुटुंबीयांनी पूर्णपणे स्वीकारला नसला तरी त्यांच्याशी आमचा संवाद सुरु आहे आणि मला असं वाटतं की संवादातूनच ते यासाठी तयार होऊ शकतील.

यासोबतच आम्ही त्यांना समजावताना हेही म्हणालो होतो की, आम्ही सर्व रूढी परंपरा न पाळता अधिक अर्थपूर्ण आधुनिक पर्याय निवडत आहोत म्हणून आमच्याविषयी चुकीचं मत तयार करण्याऐवजी आम्ही माणूस म्हणून कसे वागतोय, संकटाच्या काळात आम्ही मदतीला उभे राहतो की नाही अशा माणुसकीच्या कसोट्यांवर तुम्ही आमच्याबाबतचं मत तयार करा. माणुसकीसाठी गरजेच्या असणाऱ्या या मूल्यांवर आम्ही ठाम आहोत का हे तपासा आणि मग निर्णय घ्या."

आम्ही लग्न करतानाच हा निर्णय घेतला होता

प्रवीण शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयाबाबत सोशल मीडियावर अनेकांनी कौतुक केलं आहे. हा निर्णय पुरोगामी, सुधारणवादी असल्याचं अनेकांचं मत आहे पण प्रवीण यांच्यावर आता कुटुंबासाठी पैसे कमवण्याची जबाबदारी असणार नाही.

त्यामुळे त्यांची पत्नी प्रियांका यांची या निर्णयात असणारी भूमिका समजावून सांगताना प्रवीण म्हणतात की "हे खरंच आहे की एक महिला म्हणून अचानक कुटुंबासाठी पैसे कमवण्याची जबाबदारी तुमच्यावर येणं हे एका अर्थाने तिच्यावर दबाव निर्माण करणारं ठरू शकतं.

लहानपणापासूनच ही जबाबदारी तुमच्यावर येणार आहे असं त्यांना शिकवलेलं नसतं, पैसे कमवणं ही तुमची जबाबदारी असणार आहे हेही स्पष्टपणे सांगितलेलं नसतं. त्यामुळे कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या खांद्यावर पडली तर महिलांना गोंधळून जायला होऊ शकतं.

आमच्या बाबतीत मात्र तसं घडलं नाही कारण प्रियांकाला तिच्या आईवडिलांनी खूप चांगलं शिक्षण दिलं होतं."

प्रियांका सोनवणे आणि त्यांचा मुलगा ओजस

फोटो स्रोत, Pravin Sindhu Bhima Shinde

"तिला स्वयंपूर्ण बनवण्यात त्यांची मोठी भूमिका होती, त्यामुळे शिक्षणानंतर ती नोकरीला लागली आणि आई वडिलांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या कुटुंबाची आर्थिक जबाबदारी उचलू लागली.

आम्ही आमच्या व्यक्तिगत आयुष्यात हे बदलण्याचा निर्णय घेतला. आम्ही लग्न करत असतानाच हे स्पष्ट केलं होतं की माझ्या आई वडिलांची जबाबदारी एक मुलगा म्हणून माझी असेल तर प्रियांकाच्या आई वडिलांची जबाबदारीसुद्धा तिची असेल.

त्यामुळे आर्थिक जबाबदाऱ्या या प्रियांकाच्या जगण्याचाच एक भाग बनल्या आहेत, त्यामुळे तिला आता आमची कुटुंबप्रमुख होण्यात तिला काही अडचण येईल असं वाटत नाही."

आपल्या पतीने घेतलेल्या या निर्णयाबाबत बोलताना प्रियंका सोनावणे म्हणतात की,

"आमच्या दोघांनाही असं वाटतं की आम्ही जे विचार करतो ते विचार, ती मूल्य आपल्या जगण्यात असायला हवीत तरच त्यांना काहीतरी अर्थ आहे. त्यामुळे आम्ही हे पाळण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. त्यामुळे स्त्री-पुरुष समानतेच्या विचाराला आम्हा दोघांच्या दैनंदिन आयुष्यात उतरवण्याचा प्रयत्न आम्ही नेहमी करत असतो. आमच्या लग्नाचा निर्णय घेताना किंवा मूल जन्माला घालण्याचा निर्णय घेताना आम्ही याचं पालन केलं.

बाळाचा निर्णय घेतानाही आम्ही या गोष्टींचा विचार केला होता. आधी बाळ असावं की नसावं याचाही आम्ही नीट विचार केला आणि दोघेही बाळाला जन्म देण्याच्या निर्णयावर आलो. हे करत असताना आम्हा दोघांच्या करिअरच्या कोणत्या टप्प्यावर मूल जन्माला आलं पाहिजे याचाही निर्णय आम्ही मिळून घेतला. त्यानंतर बाळाची जबाबदारी कुणावर असेल याबाबतही सविस्तर विचार केला होता.

सामान्यतः असं होतं की बाळ झाल्यानंतर मुलींच्या करिअरमध्ये बरेच अडथळे यायला लागतात. बाळ अवलंबून असतं त्यामुळे त्याची जबाबदारी संपूर्णतः आईवर टाकली जाते.

अनेकजण असंही म्हणतात की बाळ दोन वर्षांचं होऊ दे, ते एकदा त्याचं त्याचं राहायला लागलं की मग आईने तिच्या करिअरकडे परत जायला हरकत नाही. पण सध्याच्या स्पर्धेच्या युगात हा दोन वर्षांचा अवधी खूप मोठा ठरू शकतो. दोन वर्षांचा करिअर ब्रेक घेतल्यामुळे आईचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. तिला करिअरमध्ये परत जाण्यासाठी प्रोत्साहन देणारे, देखील कमीच असतात. हे माझ्या बाबतीत घडू नये म्हणूनच आम्ही हा निर्णय घेतला होता."

हा निर्णय घेताना आर्थिक नियोजन केलं होतं का?

यावर बोलताना प्रियांका म्हणतात की, "आम्ही दोघंही सर्वसामान्य कुटुंबातून आलेलो आहोत. प्रवीणवर त्याच्या कुटुंबाची आर्थिक जबाबदारी आहे आणि माझ्यावर देखील माझ्या कुटुंबाची तेवढीच जबाबदारी आहे. त्यामुळे आम्ही करिअर ब्रेक घेतला तर आर्थिक नियोजन कसं होईल? याचा विचार आमच्याही मनात आलेला होता.

पण ही जबाबदारी पुरुषानेच घ्यायची का? असाही विचार केला जातो की दोघांपैकी ज्याचा पगार जास्त आहे त्याने काम करावं आणि ज्याचा पगार कमी आहे त्यांनी काम सोडून द्यावं. आपल्याकडे अर्थातच पुरुषांना आणि स्त्रियांना मिळणाऱ्या पगारात फरक आहे.

अर्थात याचं समर्थन करताना पुरुषांकडे जास्त कौशल्ये असल्याचं सांगितलं जातं, पण त्यांना मिळणाऱ्या अधिकच्या संधी पाहिल्या जात नाहीत. त्यामुळे हादेखील एक प्रकारचा भेदभावच आहे.

सुदैवाने आता माझा पगार एवढा आहे की आम्ही आमच्या बेसिक गरजा भागवू शकू. भविष्याची भीती होतीच पण त्या भीतीपोटी आपण निर्णयच घेतला नाही तर काय अर्थ आहे? आयुष्यात एखादं अनपेक्षित वळण आलंच तर आम्ही नक्कीच विचार करू पण पुढे काहीतरी होईल यामुळे हा निर्णय न घेणं आम्हाला पटलंच नसतं.

बऱ्याचदा असं होतं की बाळ पोटात आल्यानंतरच्या नऊ महिन्यांमध्ये आईच्या शरीरात आणि मनात खूप मोठे बदल होतात. आईची प्रसूती हा तर खूपच मोठा टप्पा असतो. बाळ पोटात असतं तेंव्हा आईची खूप काळजी घेतली जाते पण बाळ जन्माला आल्यानंतर मात्र सगळ्यांचं लक्ष बाळावर केंद्रित होतं. आईला समजून घेणाऱ्या माणसाची याकाळात गरज असते.

प्रसूतीनंतर येणारी निराशा देखील समजून घेतली पाहिजे. पुरुषांना आईला किती त्रास होतोय हे बऱ्याचदा कळत नसतं कारण त्यांनी आई जी कामं करते ती कधी केलेली नसतात. त्यामुळे आम्ही घेतलेल्या या निर्णयामुळे आम्ही एकमेकांना खूप चांगलं समजून घेऊ शकू असं मला वाटतं."

बाळाच्या जबाबदारीमुळे एक माणूस म्हणूनही तुम्ही समृद्ध होता

प्रवीण म्हणतात की, "आपल्याकडे बाळाचं आईसोबत असणारं जिव्हाळ्याचं नातं नेहमीच अधोरेखित केलं जातं. पण आई आणि मुलांच्या या नाजूक नात्याचा पाया हा आईच्या लिंगभावात किंवा तिच्या बाई असण्यात नसून, त्या आईने मुलांसोबत घालवलेला वेळ, त्यांना वाढवण्याचं बजावलेली महत्त्वाची भूमिका यामध्ये असतो.

आईने तिच्या बाळाला प्रत्येक टप्प्यावर मोठं होताना अगदी जवळून बघितलेलं असतं. त्यामुळे आई आणि मुलाच्या नात्याला इतर कोणत्याही नात्यापेक्षा मोठा अर्थ प्राप्त होतो.

आता तुमच्या मुलासोबत असं विशेष नातं तयार व्हायला जेंडर किंवा लिंगभावाची मर्यादा आहे का? तर त्याचं उत्तर नाही असं होतं.

त्यामुळे ज्या ज्या गोष्टी एक आई तिच्या मुलांसाठी करू शकते त्या सगळ्या गोष्टी एक पुरुष बाप म्हणूनही करू शकतो, पण इथे ही जबाबदारी घ्यायची की नाही हा निर्णय मात्र वडिलांना घ्यावा लागतो.

आपल्या समाजरचनेत पुरुषांना या जबाबदारीपासून लांब राहायचं असतं म्हणून आईची अगदी पवित्र आणि महान अशी एक प्रतिमा मुद्दाम तयार केली गेली आहे.

उदाहरणार्थ आईला कुटुंबाची जबाबदारी एकट्याने घ्यायला जमेल की नाही? तिला तेवढा पगार मिळेल का? अशा शंका पुरुषांकडून उपस्थित केल्या जातात. असे वेगवेगळे युक्तिवाद करून पुरुषांनी या जबाबदारीपासून बऱ्याचदा पळ काढलेला दिसून येतो."

प्रवीण शिंदे आणि त्यांचा मुलगा ओजस

फोटो स्रोत, Pravin Sindhu Bhima Shinde

"मला मुळात आई आणि मुलाचं हे जे नातं आहे त्याचं आकर्षण होतं, एक बाप म्हणून माझ्या मुलासोबत तोच जिव्हाळा, तोच बंध मलाही अनुभवायचा होता आणि म्हणूनच मी हा निर्णय घेतला आहे.

यायोगे आमच्या भूमिकांमध्ये, आम्ही करत असलेल्या कामांमध्ये अदलाबदल होईल आणि एकमेकांना समजून घेताना नक्कीच त्याची मदत होईल.

बाळाला सांभाळताना झोपमोड होणं, सकाळी बाळासाठी खायला बनवणं, बाळाची शी-शू काढणं, सहा महिन्यांच्या बाळासोबत गप्पा मारणं, त्याच्या भाषेत त्याच्याशी संवाद करणं, त्याला या जगाची ओळख करून देणं, सभोवाराशी अवगत करणं ही सगळी काम एक बाप म्हणून मला करायची होती.

माझ्या बाळाच्या आयुष्यातील हे महत्त्वाचे क्षण जागून घेण्याची, त्यांचा सगळ्यांत जवळचा साक्षीदार होण्याची माझी इच्छा होती त्यामुळे माझ्यासाठी हा प्रवास मला माणूस म्हणून श्रीमंत करणारा असणार आहे.

सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे एकट्याने मुलाला सांभाळत असताना मी ज्या नवनवीन गोष्टी शिकेन, माझ्या कामाचा वेग आणि उरक वाढेल त्यातून मी जे काही शिकेन त्याचा फायदा आम्हाला आमच्या सहजीवनात होईल याची मला खात्री आहे."

हेही नक्की वाचा

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)