लहान मुलांचे संगोपन: द्वेषाच्या या काळात आपल्या मुलांना प्रेमाचे धडे कसे द्यायचे?

पालकत्व

फोटो स्रोत, NATASHA BADHWAR

    • Author, नताशा बधवार
    • Role, बीबीसीसाठी

आई होण्याचं स्वप्न मी कायम पाहायचे. मला स्वत:वर पूर्ण विश्वास होता. मी एक 'आदर्श आई' होऊ शकेन हे मला माहिती होतं. माझ्या लहान मुलाचा हात पकडून मी चालतेय, मुली आणि मी, हातात हात पकडून चालतोय आणि आनंदात आहोत अशी कल्पना मी करायचे.

मला पहिलं बाळ होण्याच्या अनेक वर्षं आधीपासून मी काही नोट्स बनवायला सुरुवात केली होती. मी माझ्या मुलांना कसं मोठं करणार याच्या नोट्स. त्या नोट्स चांगल्या होत्या.

मी माझ्या मुलीला पहिल्यांदा हातात घेतलं तेव्हा मी प्रसूतीगृहात होते.

तिचं रडणं थांबतच नव्हतं. मी तिच्यासाठी गाणं गायला सुरुवात केली. मी गायला लागले आणि ती रडायचं थांबली. ती माझं गाणं ऐकतेय असा मला विश्वास होता. माझा आवाज ती ओळखत होती.

ती माझ्या पोटात होती तेव्हापासून हे गाणं मी तिच्यासाठी गात होते. पण माझा आवाज कायमच तिला शांत करेल असं नाही, हे माझ्या लवकरच लक्षात आले.

लहान मुलं

फोटो स्रोत, NATASHA BADHWAR

बाळ का रडू शकतं याची एक चेकलीस्ट म्हणजेच यादी मी, माझे पती आणि माझ्या आईने तयार केली.

या यादीनुसार,

1. तिला भूक लागली आहे का?

2. बाळाचा ढेकर काढण्याची गरज आहे का?

3. डायपर ओलं झालंय का?

4. तिला झोपण्यासाठी हळू हळू हलवण्याची गरज आहे का?

5. तिचं नाक बंद झालंय का?

6. आणि पुन्हा पहिला प्रश्न

कधी कधी मुलांना काही केल्या शांत करणं कठीण असतं. सर्व प्रयत्न अपयशी झाले तर आम्ही तिला एका रेशमी निळ्या रंगाच्या बांधणीच्या ओढणीत गुंडाळायचो आणि मोटरसायकलवर घेऊन जायचो. यामुळे सर्वांनाच दिलासा मिळायचा.

लोकांचं ऐकून घेण्याची सवय

मला अशीच एक घटना आठवते. एकदा आम्ही संध्याकाळी फिरण्यासाठी बाहेर पडलो. अचानक पाऊस सुरू झाला आणि आम्ही जवळच्या चहाच्या टपरीवर थांबलो. पण मला आजूबाजूच्या लोकांची कुजबूज ऐकू आली. एवढ्या चिमुकल्या बाळाला घेऊन हे आताचे आई-वडील घराबाहेर पडतात. मी माझ्या बाळाला सुरक्षित माझ्या छातीजवळ घेतलं होतं. पण तरीही मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केल्यासारखं वाटलं.

पालक

फोटो स्रोत, NATASHA BADHWAR

जसजशी वर्षं सरत गेली आमचाही पालक म्हणून हा प्रवास पुढे सरकत गेला. ऋतू बदलत होते आणि त्याप्रमाणे माझे अनेक गैरसमज दूर होत गेले.

मी शिकले की लोकांना टक लावून पहायचं आहे तर पाहू दे. लोकांची कुजबुज ऐकून आपण दु:खी व्हायचं नाही, हे मी शिकले.

अनोळखी लोकांची टिप्पणी, सल्ले आणि त्यांच्या नाराजीवरही आपण केवळ स्मित हास्य द्यायचं, याचा सराव मी केला.

मुलं जेव्हा स्वत: घराबाहेर पडली तेव्हा मी माझं मन मजबूत केलं. सर्वांत विशेष बाब म्हणजे आमच्या मानसिक सुरक्षेसाठी मी असं घर बनवण्यास सुरुवात केली जे आमचं घरटं असेल. जिथे आम्ही सुरक्षित असू. हसण्यासाठी आणि स्वत:ला आनंदी ठेवण्यासाठी जिथे परत येण्याची ओढ आम्हाला असेल.

आई-वडील होण्याचा अर्थ काय आहे?

आई-वडील होण्याचा संबंध केवळ मुलं जन्माला घालण्यापर्यंत नाहीय. नव्या निर्मितीचं काम तर त्यानंतर सुरू होतं. त्याआधी आपल्या अनेक गोष्टींना तिलांजली देण्याची गरज आहे. तुमचा अहंपणा सोडून देणं, गरोदर होण्यापूर्वी तुम्ही जे काही होता त्याला निरोप देणं.

तुम्ही स्वत:ला नव्याने उभं करणं आणि मूल जन्माला येण्यापूर्वी आपण दोघं सोबत काही होतो त्याची एक पुसटशी आठवण केवळ ठेवणं.

आई-वडील होणं म्हणजे एकाच श्वासात अभिमान आणि रितेपणा, दोन्हीचा अनुभव एकाच वेळी घेणं. काहीतरी गमवल्याची भावना असणं. परंतु नेमकं काय गमावलं आहे, हे सांगता येणं कठीण असतं. आपण नेमकं काय शोधत आहोत हे समजून घेण्यासाठी आपलं बालपण आठवत राहणं.

हे तुम्ही यासाठीही करत असता की तुमची लहानपणीची भीती, वाईट अनुभव आपल्या मुलांच्या वाट्याला येऊ नयेत असं तुम्हाला वाटत असतं. अशावेळी तुम्हालाही तुमच्या अशा जखमांची ओळख होते ज्या आजतागायत ताज्या आहेत पण त्या स्वीकारण्यासाठी तुम्ही तयार नव्हता.

लहान मुलं

फोटो स्रोत, NATASHA BADHWAR

एखादी व्यक्ती मोठी झाल्यावर, त्या व्यक्तीला मुलं झाल्यानंतर, त्याचं बालपण तिला आठवत राहतं आणि त्यावर काही करावं असंही त्याला वाटतं. मुलांना मोठं करताना हे सुद्धा लक्षात येतं की आपल्यातलं लहान मूल आता जिवंत करण्याची गरज आहे.

'मला माझ्या मुलींची काळजी वाटतीये'

माझी मुलं जशी मोठी होतायत मला ही काळजी वाटते की त्यांच्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी अगदी घरापासून ते बाहेरपर्यंत किती विस्कळीत झाल्या आहेत. वाईट बातम्या, कर्कश आवाज त्यांच्या कानावर आदळतोय.

टीव्हीतून येणारे आवाज, मोबाईवर व्हिडिओ, मोठ्या आवाजात घरात बोलणं, त्रास होतील अशा प्रतिक्रिया, इतरांचा अपमान करणं, असं सारं काही. यात आश्चर्य नाही की यापैकी बहुतांश तरुण आपल्या सभोवतालशी नातं तोडून तरुणपणात आलेले असतात.

असे तरुण जे प्रत्येक प्रकारच्या हिंसेविषयी शिथील झाले आहेत आणि ज्यांच्यावर ते अवलंबून होते त्यांना ते अनोळखी मानू लागले आहेत. संवेदनशील मुलं आपल्या आसपासच्या जगापासून स्वत:ला कायमचं दूर करतात.

चिंता, भीती आणि नैराश्य हे आपण आपल्यावर थोपत आहोत. पण पालक म्हणून आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की आपण लाचार नाही. आपल्या मुलांचं बालपण वाचवण्यासाठी आपल्याला ही भूमिका पार पाडायची आहे.

मुलं तेच करतात जे ते तुम्हाला करताना पाहतात

माझ्या आयुष्याच्या मध्यात आई म्हणून माझा प्रवास सुरू झाला. त्यावेळी मला कधीही असं वाटलं नाही की मी स्वत:ला सुधारण्याच्या कोणत्या मोहिमेवर आहे. मला शिकवायचं होतं, स्वत:ला काही शिकायचं नव्हतं.

पण लवकरच मला हे समजलं की पालकत्वासाठी आपल्या आई-वडिलांपेक्षा वेगळा मार्ग स्वीकारणं सोपं आहे परंतु आपल्या स्वत:च्या सामाजिक-सांस्कृतिक पूर्वग्रहांपासून स्वतंत्र होणं किती कठीण आहे.

माझ्या नैतिक शिक्षणाचे धडे माझ्या लक्षात होते. संस्कारांची माहिती मलाही होती. इंटरनेटवर उत्तर शोधणं मला येत होतं. शिवाय, पालकत्वावरील काही पुस्तकं माझ्याकडे होती. या पुस्तकांमध्ये छायाचित्रांसह अनेक आवश्यक संदर्भ होते. पण जीवन मूल्यं या विषयावरची पुस्तकं, वर्गात खूप सुंदर वाटतात पण वास्तविक जीवनात ती लागू होताना दिसत नाहीत. दरवेळी ती आयुष्याच्या कसोटीवर ती तपासून पाहावी लागतात.

मोठ्यांनी सांगितलेलं आपण नेहमीच का ऐकलं पाहिजे? शिक्षक नेहमीच बरोबर असतात का? आईस्क्रिमचं प्रमाण जास्त आहे हे कसं ठरवतात?

तुम्हाला आठवतं का आपले पालक यावर काय उत्तर द्यायचे, "मोठे झाल्यावर तुम्हाला जे करायचं आहे ते करा"

ते असं म्हणायचे पण त्यांना हे म्हणायचं नसतं. मला जर इच्छा असेल की माझ्या मुलांनी लवकर झोपावं, पौष्टिक जेवावं, सरळ, ताठ बसावं तर हे सर्व आधी मला करावं लागेल. मी जे करते मुलं तेच करतात, ते नाही जे मी त्यांना करायला सांगते.

मी कायम ऑनलाईन राहणार आणि मुलांनी कॉम्यूटर लॉग ऑफ करून खेळायला जावं अशी अपेक्षा केली तर असं होऊ शकणार नाही. मला प्रत्येक गोष्ट आधी स्वत: करावी लागेल.

गुंतागुंतीच्या गोष्टीही मुलांना समजतात

शेवटची गोष्ट एका भेटवस्तूची ज्याची अपेक्षा केली जाऊ शकत नाही. मुलांचा स्वभाव. यामुळे मला थोडा दिलासा मिळतो. मला केवळ ऐकायची गरज असते. मोठ्यांच्या बोलण्यात जो खोटेपणा असतो तो मुलं खूप सहज ओळखू शकतात.

माझी छोटी मुलगी जेव्हा चार वर्षांची होती तेव्हा ती म्हणाली, "सर्व लोक माझ्यावर प्रेम करतात. माझ्या घरी येणारे सर्व पाहुणे माझ्यावर प्रेम करतात."

मी तिला म्हणाले, 'ऐकायला तरी हे चांगलं वाटत आहे.' पण तिच्या बोलण्यात मला एक दु:ख जाणवलं.

'मला हे आवडत नाही,' असं ती म्हणाली. मग मी विचारलं की, 'तुला हे का आवडत नाही,'

ती म्हणाली, "काल आत्या माझ्याशी खूप छान बोलली पण लगेच थोड्यावेळाने ती आपल्या मुलीवर ओरडली. माझ्या बहिणीला कसं वाटलं असेल, याचा विचार करून मला वाईट वाटतंय."

हे ऐकल्यावर मी तिला मिठी मारली. आई-वडील म्हणून मला केवळ इतकंच करायचं आहे की मी माझ्या मुलांवर विश्वास ठेवायचा आहे. यामुळे त्यांचाही त्यांच्यावरील विश्वास कायम राहू शकेल.

योग्य काय आहे, न्याय काय आहे? याची समज मुलांमध्ये नैसर्गिक असते. जे लोक त्यांच्यासाठी महत्त्वाचे असतात त्याच्यांकडे ते लक्ष देतात. त्यांना त्रास झाला तर मुलांनाही त्रास होता. ते आपल्या आजूबाजूच्या लोकांची काळजी घेतात.

आपल्या मुलांची पिढी प्रेमाच्या थंड वाऱ्यासारखी असेल जी द्वेषाच्या ढगांना उडवून लावेल.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)