Mothers Day: आई कुठे काय करते?....

फोटो स्रोत, Getty Images
- Author, दीपाली जगताप
- Role, बीबीसी मराठी
मदर्स डेच्या निमित्ताने आईची भूमिका समजून घेण्याचा केलेला प्रयत्न.
"तिला घरी सोडून निघताना डोळ्यात पाणी येतं. वेदीनी साडेचार महिन्यांचीच होती जेव्हा सुटीनंतर मी पुन्हा कामावर रूजू झाले. आमच्या एका काकूंनी एकदा म्हटलं की किमान वर्षभर तरी मुलीजवळ थांबायचं ना. हे ऐकल्यावर मला वाईट वाटलं, दोषी असल्यासारखं वाटलं. पण आई म्हणून माझाही अनुभव तिच्या वयाएवढाच आहे. नोकरी की मूल की दोन्ही ही घालमेल सतत सुरू असली तरी मला वाटतं कोणतीच आई 'परफेक्ट' नसते. 'परफेक्ट' आई अशी कोणतीही व्याख्या नाही. प्रत्येक मुलासाठी आपली आई त्याच्यादृष्टीने परफेक्ट असते असं मला वाटतं." डॉ. मधूमीता काळे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या.
"मी घरून निघताना तिला दूध पाजून निघायचे आणि ऑफीसमध्येही पम्पिंग (बाटलीत दूध साठवणे) करायचे. पण काम जास्त असल्यास, मिटिंग असल्यास कधी कधी उशीर व्हायचा आणि मग छातीत दूध साठल्याने त्रास व्हायचा. पण आपल्या मेहनतीने उभं केलेलं करिअर असं सहज कसं सोडायचं? हा प्रश्न मनात येतोच." असंही त्या सांगतात.
एकाच वेळी नऊ पिल्लांची काळजी घ्यायची आणि दुसऱ्या बाजूला आपलं पिल्लू घरी काय करत असेल याचा विचार करायचा अशी काहीशी अवस्था डॉ. मधूमिता काळे यांची आहे.
डॉ. मधूमिता काळे वाईल्डलाईफ हेल्थ व्हेटर्नरी सायन्स विषयात न्यूझीलंड येथून पदव्यूत्तर आहेत. त्या मुंबईतील जिजामाता उद्यानात हम्बोल्ट पेंग्विन कक्षात पेंग्विनच्या डॉक्टर म्हणून गेल्या सहा वर्षांपासून काम करत आहेत.

फोटो स्रोत, DR.MADHUMITA KALE
शारीरिक आणि मानसिक दोन्ही पातळ्यांवर प्रत्येक आईचा संघर्ष सुरू असतो. त्यात नोकरी करायची म्हटलं की आव्हानांची एक भिंत समोर उभी राहते. अशा परिस्थितीत या उंबरठा ओलांडून काम करणाऱ्या आयांच्या मनात नेमकं काय सुरू असतं? जाणून घेऊया जागतिक आई दिवस म्हणजेच World Mother's Day च्या निमित्ताने.
'करिअर आणि मूल दोन्ही वर्थ आहेत'
डॉ. मधूमिता सांगतात, "पेंग्विनची काळजी सुद्धा मी एखाद्या बाळाप्रमाणेच घेते. इथे आल्यापासून त्यांना मी आणि माझी टीम सांभाळतेय. मी त्यांना हाताने भरवते, त्यांच्यासोबत खेळते, त्यांच्या बाळांनाही लहानाचं मोठं करते. हे करत असताना माझं बाळ मात्र घरी असतं. ती जेवली असेल का? खेळत असेल का? शांत झोपली असेल का? असे असंख्य विचार मनात घोळत असतात. मला शक्य तेव्हा मी तिला व्हिडिओ कॉल करते. मी घरी पोहचल्या पोहचल्या ती मला बिलगते. ती आता एक वर्षाची झाली आहे. आई संध्याकाळी घरी येणार हे तिलाही आता कळू लागलंय."

फोटो स्रोत, DR.MADHUMITA KALE/FACEBOOK
कधी कधी खूप दमायला होतं, त्रास होतो. नोकरी सोडण्याबाबत विचार मनात येतात पण करिअर आणि मूल या दोन्ही गोष्टी वर्थ आहेत असं त्या सांगतात. कुटुंबाची साथ असेल तर दोन्ही गोष्टी शक्य आहेत असा विश्वासही त्या व्यक्त करतात.
आईच्या मनाची ही घालमेल एकट्या मधूमिता यांची नाहीय. मूल झाल्यानंतर जगभरात करोडोच्या संख्येने महिला कामासाठी बाहेर पडतात. मला तर वाटतं काम करत असताना आपल्या मुलांच्या आठवणीत एकाच वेळी करोडो आयांच्या डोळ्यात पाणी येत असेल. कामासाठी घराबाहेर पडणाऱ्या प्रत्येक आईची आर्थिक, मानसिक आणि शारीरिक परिस्थिती वेगळी असली तरी आई म्हणून त्यांच्या भावना आणि आव्हानं एकसारखीच आहेत.
'वडिलांना कुणी का नाही विचारतं की मूल आणि करिअर कसं मॅनेज करता?'
एकवेळ तारेवरची कसरत सोपी पण आई झाल्यावर काम करणं सोपं नाही असं एका प्रतिष्ठित इंग्रजी वृत्तपत्रात काम करणाऱ्या हेमाली छापीया म्हणाल्या. त्यांना तीन मुलं आहेत. एक आठ वर्षांचा मुलगा आणि साडे तीन वर्षांची दोन मुलं.
हेमाली सांगतात, "नोकरी करत असताना मुलं सांभाळायची म्हटल्यावर अनेकांची मदत घ्यावी लागते. मदतनीस घरी असतात पण आपल्या मुलांच्या प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी इतर कुणावर अवलंबून रहावं लागतंय याचं सतत वाईट वाटत राहतं. शिवाय,मी ज्या क्षेत्रात काम करते तिथे कामाच्या वेळा निश्चित नसतात.
कधी असाईनमेंट आठ वाजता संपते तर कधी रात्रीचे 10 वाजतात. ताजं उदाहरण द्यायचं झाल्यास, आता उन्हाळ्याची सुटी सुरू आहे. माझ्या मुलाने हट्ट केला की मला पोहायला शिकायचं आहे. पण त्यासाठी क्लासच्या वेळा आणि माझ्या कामाची वेळ जुळवणं शक्य होत नाहीय. शाळेत इतर मुलं जेव्हा सांगतात की आम्ही सुट्टीमध्ये बाहेर गेलो होतो किंवा आम्ही सुट्टीत हे शिकलो तेव्हा माझा मुलगा सांगतो माझी आई नोकरी करते म्हणून मला हे करता आलं नाही. असं ऐकलं की मला मला खूप दु:ख होतं."

फोटो स्रोत, HEMALI CHAPPIA
"पण तरीही मी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला नाही. कारण नोकरी करणं म्हणजे केवळ पैसे कमवणं असं नाही. माझं व्यक्तिमत्त्व, माझी आवड, माझी एवढ्या वर्षांची मेहनत, आर्थिक आणि मानसिक स्वास्थ्य अशा बऱ्याच गोष्टी आपल्या कामाशी निगडीत असतात. आई म्हणून माझी जबाबदारी आहेच आणि ती कायमच राहणार आहे. 'Once a parent always a parent' मुलांना मोठं करणं हे आव्हान कसं पेलायचं ही रोज शिकण्याची प्रक्रिया आहे आणि मी दररोज शिकतेय," असं सांगितल्यावर त्या म्हणाल्या तरीही हा गुंता इथेच सुटत नाही.
"आई झाली तरी नोकरी करते म्हटलं की अगदी आपल्या कुटुंबातील सदस्यांपासून ते सहकाऱ्यांपर्यंत सगळेच सल्ले देतात. मी 'आईप्रमाणे' वागलं पाहिजे ही अपेक्षा असते. नोकरी करणारी मी माझ्या कुटुंबातील एकमेव सून आहे. नोकरीची काय गरज आहे असं मला अनेकदा ऐकवलं जातं. आहे त्या आर्थिक परिस्थितीत जुळवून घ्या असाही सल्ला दिला जातो. मुलांवर आईने संस्कार केले पाहिजेत असे टोमणे मारले जातात. पण आई म्हणून आपल्याकडून जेवढ्या अपेक्षा असतात तेवढ्या वडिलांकडून असतात का? मुलं झाल्यावर वडिलांना कुणी विचारतं का की तुम्ही मूल आणि ऑफीस कसं मॅनेज करता?" असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
'चांगल्या पगाराची नोकरी मी शेवटी सोडली'
नवी मुंबई येथे राहणाऱ्या माधुरी चव्हाण एक बँकर आहेत. त्यांना दोन मुली आहेत.
आपला अनुभव सांगताना त्या म्हणाल्या, "मी बँकेत होते तेव्हा माझे आई वडील माझ्या मुलांना सांभाळायचे. पण माझ्या पालकांचं वय झालं आणि त्यांनाही शारीरिक मर्यादा आहेतच. माझ्या मुलांना सांभाळणं कालांतराने त्यांना अशक्य होऊ लागलं आणि ते स्पष्ट मला म्हणाले की आम्ही तुला पैसे देतो पण तू घरी थांब आणि मुलांना सांभाळ. मग मी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. नोकरी सोडल्यावर मलाही असं जाणवलं की कळत-नकळत आपण कामाला प्राधान्य देत होतो."

फोटो स्रोत, Madhuri Chavhan
माधुरी मोहिते 20 वर्षांपासून नोकरी करत आहेत. त्यांनी आतापर्यंत दोन मोठ्या खासगी बँकांमध्ये उच्च पदावर काम केलं आहे.
"एकदा काम करत असताना माझी मुलगी मला उत्साहात काहीतरी सांगायला आली आणि मी मिटिंगमध्ये होते. माझं काम संपेपर्यंत ती झोपली. म्हणजे आपल्या मुलांच्या एवढ्या छोट्या इच्छाही आपण पूर्ण करू नयेत का? असा प्रश्न मला पडला. मी लॉकडाऊनच्या आधी नोकरी सोडली. मला त्यानंतरही दोन चांगल्या पगाराच्या आणि उच्च पदाच्या ऑफर्स आल्या पण त्या मी नाकारल्या. एवढ्या वर्षांचा अनुभव असताना प्रमोशन आणि पॅकेज नाकारावं लागतं याचं वाईट वाटतं."
माधुरी यांनी दोन वर्षं ब्रेक घेतल्यानंतर नुकतच काम करायला सुरुवात केली आहे. पण कामाच्या वेळा निश्चित आहेत या अटीवर आपण काम सुरू केल्याचं त्या सांगतात. नोकरी सोडून सर्वच प्रश्न सुटत नाहीत असंही त्या म्हणाल्या.
"नोकरी सोडल्यावर आर्थिक स्वावलंबन राहत नाही हे वास्तव आहे. कुटुंबाच्या आर्थिक स्थैर्यावरही त्याचा परिणाम होतो. नोकरी सोडल्यावर घरकामाची सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर येते. त्यामुळे दोन्ही बाजूने आपलीच गळचेपी होते असंही मला वाटतं आणि हे सुद्धा आपण लक्षात घ्यायला हवं." असंही त्यांनी स्पष्ट केलं.
'मी एक चांगली आई नाहीय असं वाटत राहतं'
एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या के.सनियाल यांना पाच वर्षांची मुलगी आहे. त्यांचे पती पायलट आहेत. पण नोकरीची संधी त्यांना लवकर मिळाली नाही त्यामुळे माझ्याकडे मी आई झाल्यावर ब्रेक घेण्याचा पर्याय नव्हता असं त्या म्हणाल्या.
आर्थिक स्थैर्य रहावं म्हणून आम्ही दोघंही नोकरी करतो असं अनेक जण सांगतात. त्यामुळे मूल झाल्यावर एका पालकाने बाहेरचं काम सोडण्याचा निर्णय केवळ त्यांच्या इच्छेवर अवलंबून असतो असं नाही.

फोटो स्रोत, Getty Images
सनियाल सांगतात, "आई झाल्यावर अनेक मुली करिअरमधून ब्रेक घेण्याचा विचार करतात. पण माझ्याकडे तो पर्याय नव्हता. माझी मुलगी मेहेरचा जन्म झाला तेव्हा कमवणारी मी एकटीच होती. त्यामुळे मी नोकरी सोडली नाही. आता मेहेर पाच वर्षांची आहे. आर्थिक परिस्थिती आजही फारशी चांगली नाही. एकूणच महागाई आहे. त्यात शिक्षणाचा खर्च, कुटंबाच्या गरजा पूर्ण करायच्या म्हटल्यावर हल्ली आई-वडील दोघांनाही नोकरी करावी लागते. पण मग मेहेरला पुरेसा वेळ देणं शक्य होत नाही याची जाणीव मला आहे. आई म्हणून माझ्या मुलीसाठी मी जे करायला हवं तेवढं मी करत नाही असं मला सारखं वाटत राहतं. मी एक चांगली आई नाहीये अशीही भावना मनात येते."
सनियाल गेल्या 14 वर्षांपासून खासगी संस्थांमध्ये नोकरी करत आहेत. "मी ज्या क्षेत्रात काम करते तिथे कधी कधी रात्री 8-9 वाजेपर्यंतही काम करावं लागतं. फोन कॉल्स, मिटिंग याकडे लक्ष द्यावं लागतं. मग घरी आल्यावर स्वयंपाक करायचा असतो. कधी कधी असं होतं की तिला माझ्यासोबत खेळायचं असतं पण मला नाईलाजाने नाही म्हणावं लागतं. याचं वाईट वाटतं. सुटीच्या दिवशी जितका शक्य तितका वेळ मी देते. माझे पती सुद्धा शक्य तेवढा वेळ तिला देतात. कुटुंबातील सगळे मदत करतात. पण तरीही आई म्हणून अपराधीपणाची भावना मनात येते."
"आताचंच बघा ना, उन्हाळ्याच्या सुट्या सुरू झाल्या आहेत. इतर मुलं बाहेरगावी फिरायला जातात, समर कॅम्पसाठी जातात किंवा आवडता छंद शिकण्यासाठी क्लासला जातात पण खासगी कंपनीत एवढ्या सुट्या मिळत नाहीत. ती नाराज होते. मग तिचा रुसवा घालवण्यासाठी आम्ही काहीतरी करतो मग ती खूष होते. मुलं सुद्धा समजूतदार असतात. तेही समजून घेतात असं मला वाटतं,"
त्या पुढे सांगतात, "खासगी कंपन्यांमध्ये आता स्पर्धा खूप वाढली आहे. तुमच्या परफॉरमन्सवर संधी मिळते, पगार ठरतो त्यामुळे ते एक प्रेशर असतं. याचा परिणाम आपल्या स्वभावावर होत असतो. कामाचं समाधान मिळतं, आनंदही मिळतो, पण कधीतरी जबाबदाऱ्यांचा खूप ताण येतो. मला तर वाटतं आपल्या बायकांना खूप हात आहेत. आपण एकाचवेळी कितीतरी गोष्टी करत असतो. तेही आवडीने करतो. एखाद्या 'देवी'चं चित्र असतं त्यात तिला अनेक हात असतात. मला ते आपलंच चित्र आहे असं वाटतं."
'दोघांनी मुलांची समान जबाबदारी घ्यावी'
स्त्री-रोगतज्ज्ञ डॉ. सरीता पिकळे सांगतात, "समाज पूर्वीपासूनच नोकरी करणाऱ्या महिलांवर प्रश्न उपस्थित करत आलाय. पण विचार करा, तुम्ही रात्री जेव्हा एखाद्या हॉस्पिटलमध्ये भरती होता. तुमचा अपघात झालेला असेल किंवा हार्ट अटॅक आलेला असेल किंवा एखद्या महिलेला प्रसुती कळा सुरू झालेल्या असतील, तेव्हा रात्रीच्या शिफ्टला नर्स नसेल तर काय होईल? ती नर्स सुद्धा आपल्या मुलांना घरी ठेऊन कामावर आलेली असते. सर्व महिला डॉक्टर्स, महिला पोलीस, प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक कार्यालयात काम करणाऱ्या महिला कर्मचारी जर मूल झाल्यावर घरी बसल्या तर काय होईल? याचा विचार करा."
त्या पुढे म्हणाल्या, मी कायम हेच सांगते की संसार हा महिला आणि पुरूष दोघांचा आहे. मूल सांभाळणं ही आई आणि वडील दोघांची जबाबदारी आहे. त्यामुळे वडील म्हणून त्यांनी केवळ मोजकी कामं करायची आणि बाकी सर्व कामं आईच्या खांद्यावर सोपवायची असं व्हायला नको. ग्रामीण भागात महिला शेती करण्यासाठी जातात तेव्हा त्यांची मुलं घरीच असतात ना, प्रत्येक बाई जी कामासाठी घराबाहेर पडते ती कष्ट करत असते. त्यामुळे मुलांची जबाबदारी एकट्या आईवर सोपवणं चुकीचं आहे. मुलांचं जेवण, त्यांचं शिक्षण, त्यांच्या सवयी, सर्व काही दोघांनी मिळून केलं पाहिजे. बऱ्याच ठिकाणी हे होताना सुद्धा दिसतं. पण पूर्ण चित्र बदलायचं असेल तर आपल्याला मुलांवर समानतेचे संस्कार करायला हवे तरच पुढच्या पिढ्यांमध्ये बदल दिसेल असंही त्या आवर्जून सांगतात.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








