लहान मुलांचे संगोपन: आनंदाची गुरुकिल्ली आणि जादुई पेटी

लहान मुलं, पालकत्व, संगोपन

फोटो स्रोत, NATASHA BADHWAR

फोटो कॅप्शन, लहान मुलांची जडणघडण
    • Author, नताशा बधवार
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

मी माझ्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी. मला दोन भाऊ होते. लहानपणी आपल्याला एक बहीण असावी, असं फार वाटायचं. पण, मोठी झाल्यावर मला जणू लॉटरीच लागली. मी तीन मुलींची आई झाले. हा प्रवास माझ्यासाठी एखाद्या जादुई दुनियेच्या सफरीप्रमाणेच होता.

माझ्या आसपासच्या लोकांप्रमाणेच सुरुवातीला माझेही माझ्या मुलींच्या संगोपणाविषयी अनेक गैरसमज होते. जसजसा काळ पुढे सरकला माझा सगळा आत्मविश्वास आणि ज्ञान जे मला निसर्गाने दिलेलं वरदान वाटत होतं हळूहळू ढळू लागलं. आता मला पूर्वीपेक्षा बरंच हलकं वाटतं आणि कदाचित पूर्वीपेक्षा अधिक समज आली आहे.

मात्र, या मधल्या काळात मला जे धडे मिळाले त्यातून कुठलेही ठोस निष्कर्ष निघत नाहीत आणि त्यांचा नेहमी उपयोग होतो, असंही नाही. हे सगळं लहान मुलासारखंच आहे. त्यांच्याकडूनच मी सगळं शिकत गेले, माझ्या स्वतःच्या अनुभवातून.

कधी मनाची घालमेल झाली, कुठली अडचण आली तेव्हा स्वतःलाच काही काळ थोडं शांत व्हायला सांगते. एक हिंदी गाणं आहे ना - अभी तो पार्टी शुरू हुई है - अगदी तसंच.

लहान मुलं, पालकत्व, संगोपन

फोटो स्रोत, NATASHA BADHWAR

फोटो कॅप्शन, लहान मुलं

लग्नानंतर मला तीन अपत्य हवी, असं काही आमचं प्लॅनिंग नव्हतं. एकप्रकारे ही आमची नियती असावी, असं आपण म्हणू शकतो. तुम्हाला वाटत असेल की ही कशी माणसं आहेत, तर मला याचं अजिबात वाईट वाटणार नाही.

आम्ही अजिबात प्रॅक्टिकल नाही. मी सुरुवातीलाच सांगू इच्छिते की आम्ही कुठलंच काम खूप विचार करून करत नाही. आम्ही आमचे सगळे निर्णयही असेच घेतो. तेव्हा आम्ही एकूणच खूप मूर्ख आहोत, असंही तुम्ही म्हणू शकता.

अगदी सुरुवातीला जेव्हा आमच्या मुली खूप लहान आणि लाघवी होत्या, पण खूप दंगेखोरही होत्या त्यावेळी आमच्या अनेक मित्रांनी आमच्यापासून जरा लांब रहाणंच पसंत केलं होतं. त्यावेळी आमचे नातलग म्हणजे आत्या, काकू, मावशा आणि आज्या यासारख्या आमच्या कुटुंबातल्या ज्येष्ठांनी आमचा एकटेपणा दूर करण्यासाठी आमच्या आयुष्यात विशेष रस घ्यायला सुरुवात केली. एकप्रकारे आम्हाला दत्तकच घेतलं.

सहाजिकच त्यावेळी आम्हाला या सगळ्याचं विशेष कौतुक वाटलं नाही. पण, हळूहळू माझ्या लक्षात आलं की तुम्ही प्रवाहाविरुद्ध पोहोण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्ही बुडू लागता. या प्रवासात आपण बऱ्याच गोष्टी विसरायला हव्या.

तसंच आयुष्यात अनपेक्षित आश्चर्यांसाठीही तयार रहायला हवं. आयुष्यात होत असलेल्या बदलांप्रमाणे स्वतःला बदला. तुमच्या आधी अनेकांनी आयुष्याचा हा सिनेमा बघितला आहे. तेव्हा त्यांना मार्ग दाखवण्याची संधी द्या.

मुलं खूप लवकर मोठी होतात. मागे वळून बघताना वर्षं कशी भुर्रकन उडून गेल्यासारखी वाटतात. पण कधी-कधी दिवस संपतच नाहीये, असंही वाटतं.

लहान मुलं, पालकत्व, संगोपन
फोटो कॅप्शन, लहान मुलं

तुमचे मित्र तुम्हाला पुन्हा हुडकून काढतात. त्यातले काही कधीच बदलत नाही. त्यामुळे आता मी हे निश्चितपणे सांगू शकते मी वर्षानुवर्ष घरातच राहिले तरी माझे काही मित्र त्याच कॅफेमध्ये तेच चॉकलेट ड्रिंक पीत तशाच गप्पा मारत बसलेले दिसतील. मी 16 वर्षं लांब राहिले तरी ते माझं स्वागत असं करतील जणू भेटून जेमतेम 16 दिवस झालते.

सुरुवातीला आम्हाला जेव्हा दोन मुली झाल्या होत्या आणि आम्ही बरेच तरुण होतो त्यावेळी मी एका टेलिव्हिजन चॅनलमध्ये काम करायचे. ती नोकरी मला फार आवडायची. माझ्या मुली आणि माझ्या नोकरीलाही मी आवडायचे. तरीही मनात कसलीतरी सल होती. वाटायचं काहीतरी चुकतंय. माझ्या मनात संशायचं वादळ घोंघावू लागलं. माझ्या आयुष्यातल्या सर्व चांगल्या गोष्टींची सांगड कशी घालायची, मला कळत नव्हतं.

आयुष्यात मला कधीही रिकामं वाटलं नाही. पण, खरंच एकटेपणा होता का? तर नाही. आमच्या आयुष्यात बराच गोंगाट होता.

पार्टीचा गोंगाट, कामाच्या ठिकाणचा गोंगाट आणि आपल्या मुलींकडे येताच डोक्यात सुरू असलेला साउंड ट्रॅक एका झटक्यात बदलायचा.

लहान मुलं, पालकत्व, संगोपन
फोटो कॅप्शन, लहान मुलं पुस्तक वाचताना

सुपरमॉम असण्याच्या शहरी मायावी जाळ्यात मी इतकी अडकले होते जणू एखाद्या आहे. वरवर बघता सगळ्यांना सगळं छान चाललंय, असंच वाटायचं. पण मला असं वाटू लागलं की माझ्या मनात काय सुरू आहे, हे कुणालाच कळत नाहीय. खरंतर माझं आयुष्य एक सुंदर अनुभव असायला हवा होता. पण मला खूप वाईट वाटत होतं.

पॅरेंटिंग माझ्या प्रामाणिकपणाची मोठी परीक्षा ठरली. मला स्वतःशी प्रामाणिक राहायचं होतं का? मला यातलं फारसं माहीतही नव्हतं. मित्र, ट्रेंड्स, टिव्हीवरचे कार्यक्रम आणि गॅजेट्सप्रति प्रामाणिक असणं, हे तर कायमच सोपं होतं. प्रत्येक प्रसंगात खचून न जाता धीर कसा ठेवायचा, हेही मला माहिती होतं. इतरांच्या नजरेत स्वतःची प्रतिमा उत्तम कशी ठेवायची, हे मला चांगलंच ठावुक होतं. मात्र, आता मला स्वतःकडे परत यायचं होतं, स्वतःला बघायचं होतं.

सुरुवात मला स्वतःच्या अंतर्मनाचा आवाज ऐकण्यापासून करायची होती.

लहान मुलं, पालकत्व, संगोपन

फोटो स्रोत, NATASHA BADHWAR

फोटो कॅप्शन, लहान मुलं

आपण आपल्या मुलांचा उत्तम सांभाळ तेव्हाच करू शकतो जेव्हा आपण स्वतःचा उत्तम सांभाळ करतो. हा मूलभूत नियम लहान मुलं आणि मोठे दोघांनाही सारखाच लागू होतो. वेळेत झोपावं, पोषक आहार घ्यावा आणि रोज थोडातरी व्यायाम करावा. गर्दीच्या वेळी ट्रॅफिकमध्ये अडकायची सवय होता कामा नये.

आपल्या आतलं लहान मुल हरवता कामा नये. त्या मुलाला भरपूर प्रेम द्या, त्याचं कौतुक करा आणि त्याला खुश ठेवा. आई-वडील एखाद्या लहान मुलाप्रमाणे आनंदी राहतील तर त्यांची मुलंही तशीच आनंदी राहतील आणि मुलं आनंदात असली की आई-वडीलही आपोआपच आनंदी राहतात. माझा अनुभव मला सांगतो की जेव्हा-जेव्हा मला माझी मुलं नाराज, अस्वस्थ वाटली त्या-त्या वेळी मी स्वतः काही कारणावरून अस्वस्थ होते. मला माझ्या भावना ओळखणं शिकायला हवं.

मुलांना एखादी नवी गोष्ट कळते तेव्हा सर्वात आधी ते ती गोष्ट आपल्या आई-वडिलांशी शेअर करतात.

माझी थोरली मुलगी सहर एक दिवस तिच्या बाबांना सांगत होती, "आई उदास असते तेव्हा अस्वस्थ दिसते. पण तुम्ही उदास असता तेव्हा रागवता."

मुलीचं हे बोलणं तिच्या बाबांना इतकं आवडलं की त्यांनी आपल्या सगळ्या मित्रांना हा किस्सा सांगितला.

त्याच दरम्यान मधली अलीजाने आनंदाची किल्लीच शोधली होती. ती उडी मारून माझ्या मागे यायची आणि माझ्या पाठीवर एक अदृश्य चावी लावत म्हणायची, "चल, मी तुला चावी भरली आहे, आता हसा बघू."

आणि त्यावेळी माझ्या चेहऱ्यावर कुठलेही नकारात्मक भाव असले तरी ते गळून पडायचे. तिच्या या निरागसतेसमोर नतमस्तक न होणं केवळ अशक्य.

लहान मुलं, पालकत्व, संगोपन

फोटो स्रोत, NATASHA BADHWAR

फोटो कॅप्शन, लहान मुलांच्या गंमतीजमती

मी नेहमी म्हणते की आई-वडील होण्यासारखं सुख नाही. पण, आयुष्यात समाधान मिळवणं किती अवघड आहे, हे वेगळं सांगायला नको. आयुष्यात उलथा-पालथ लगेच होते. मात्र, समाधानाच्या गावाला जाणारा मार्ग तितकाच अवघड वळणांचा असतो. जिथे शांतपणे आराम करता येईल, मनःशांती मिळेल, अशा ठिकाणी जाण्याचा प्रत्येक कुटुंबाचा मार्ग वेगळा असतो. तिथवर पोहोचण्यासाठी बळ असावं लागतं.

पॅरेंटिंग बरंच डिमांडिग असतं. आपल्याला कायम आपल्या मुलांसमोर असावं लागतं. कामासाठी घरापासून दूर रहाणं सोपं आहे. रोज ट्रॅफिकमध्ये अडकणं त्याहूनही अधिक सोपं आहे. आई-वडिलांना सोमवारचा दिवस सर्वांत जास्त आवडतो. तुम्ही घरून काम करत असाल तर तुम्हाला मुलांना शाळेत पाठवायचं असतं. पण, तुम्ही घराबाहेर काम करत असाल तर तुम्हाला स्वतःला बाहेर पाठवायचं असतं. लहान मुलांच्या आई-वडिलांसाठी सोमवारमध्ये शनिवार दडलेला असतो.

आपण आपल्या मुलांना जे देऊ तेच ते इतरांना देतील. मी माझ्या अवगुणांचा स्वीकार करायला शिकले आणि जी कामं मला उत्तम करता येतात, ज्यात माझा हातखंडा आहे ते साजरं करायलाही शिकले. रोज-रोज पौष्टिक पदार्थ बनवण्याचा मला कंटाळा येतो. पण, मी खूप छान फोटो काढते. त्यामुळे मी खूप फोटो काढते.

लहान मुलं, पालकत्व, संगोपन

फोटो स्रोत, NATASHA BADHWAR

फोटो कॅप्शन, लहान मुलं

आम्हाला बाहेर जाऊन काही मस्त खायची इच्छा होते तेव्हा आम्ही घराजवळच्या मार्केटमध्ये जाऊन डोसा खातो. कधी मोमोज आणि चाट-पापडीच्या दुकानात जातो. पण, फोटो मीच काढते. यातून तेवढ्याच नितांत सुंदर क्षणांची आणि आठवणींची जादुची पेटी तयार होते जेवढी चविष्ट खाण्याच्या आठवणींची असते.

आमची थोरली मुलगी सहर लहान असताना म्हणायची, "मला आजीने बनवलेला राजमा आवडतो. कांता मावशीच्या हातच्या पोळ्या आणि आईच्या हातची मॅगी."

मी कौतुक आणि प्रेमाचा स्वीकार करणं शिकतेय. खुशामतीचा आणि कृतज्ञतेचाही. मी माझ्या मुलींवर, त्या सांगत असलेल्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवते. मी स्वतःला महत्त्व द्यायला शिकले. मी स्वतःला सांगते, "तू खास आहेस. तुझं असणं महत्त्वाचं आहे."

माझ्या मुली किती खास आहेत, याची त्यांना स्वतःला जाणीव करून देण्याचा हाच एक मार्ग आहे. मी स्वतःचं म्हणणं ऐकते, माझ्या मुलींचं बोलणं ऐकते. फोन वाजतो तर वाजू देत. मी उचलत नाही. आमचे एखाद्या गोष्टीवर मतभेद झाले तर आम्ही एकत्र बसतो आणि बोलून त्यावर पर्याय शोधतो.

मुलीसुद्धा आक्रस्ताळेपणा करत नाहीत. आपली मुलं आपल्याला आपल्या बालपणात घेऊन जातात. आपण कुठून आणि कशी सुरुवात केली. आपण कसे असू शकतो. आपण काय पुन्हा मिळवू शकतो. मुलं… ठुमकत-ठुमकत चालणारी, शाळेत जाणारी चिमणी पाखरं. आमची मधली मुलगी अलीजा एकदा म्हणाली होती अगदी तसंच, "मला तर सगळं माहिती आहे. पण, तू काही गोष्टी विसरली आहेस, मम्मा."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)