Child Porn : इंटरनेटवरील लैंगिक शोषणापासून लहान मुलांचा बचाव कसा करायचा?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, विनीत खरे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
जुलै 2020 मध्ये आसाम पोलिसांकडे एका संशयास्पद फेसबुक पेजसंदर्भात तक्रार आली. याबाबत त्यांना एका खासगी संस्थेच्या माध्यमातून मिळाली.
या फेसबुक पेजवर लहान मुलांचे व्हिडिओ पोस्ट करून कदाचित मुलांचे लैंगिक शोषण किंवा सीसॅमला (CSAM-चाईल्ड सेक्शुअल अब्यूज मटेरियल) प्रोत्साहन दिलं जात आहे अशी माहिती खासगी संस्थेने ट्वीट केली होती.
मग हे प्रकरण आसाम सीआयडीकडे पोहचलं. त्यांनी गुवाहटीपासून 100 किलोमीटरवर असलेल्या एका गावातून 28 वर्षीय युवकाला सप्टेंबर महिन्यात अटक केली आणि नंतर तो जामिनावर सुटला.
हे फेसबुक पेज सुरू केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. आरोपीच्या मोबीईलमध्ये लहान मुलांच्या लैंगिक शोषणाचे व्हिडिओ किंवा सीसॅम आढळले असा दावा पोलिसांनी केला आहे. त्याने हे सर्व आरोप फेटाळले आहेत.
भारतीय कायद्यानुसार सीसॅमचे किंवा लैंगिक शोषणाचे प्रकाशन, त्याचा प्रसार आणि ते बाळगणे बेकायदेशीर आहे.
बीबीसीशी बोलताना या व्यक्तीने सांगितलं, "मी कधीही मुलांच्या लैंगिक शोषणाचे व्हिडिओ डाऊनलोड केले नाहीत. मी ते शेअर सुद्धा केले नाहीत. माझ्याकडे ते नाहीत."
या व्यक्तीने फेसबुक पेजच्या माध्यमातून कथित पैसे कमवले आणि अॅपचा वापर करून याचा प्रसार करण्याचा प्रयत्न केला असा आरोप पोलिसांनी केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फेसबुक पेजवर टेलिग्रामची एक लिंक होती. या लिंकवर क्लिक केल्यास एका टेलिग्राम चॅनेलवर तुम्ही पोहचता.

फोटो स्रोत, AFP
टेलिग्राम मुख्यत: मेसेजिंग अॅप आहे. 'चॅनेल्स' हे त्यांचं एक फिचर असून त्याच्या माध्यमातून अमर्याद प्रेक्षकांना प्रसारित करण्याची परवानगी असते. आणखी काही अॅप्सवरही सीसॅम व्हीडिओची घेवाण-देवाण होते असाही आरोप आहे.
पोलिसांनुसार, टेलिग्राम चॅनेलवर पैसे कमवण्याची योजना होती परंतु पोलिसांनी त्याआधीच या व्यक्तीला अटक करण्यात आली. दरम्यान, पैशांचा व्यवहार कसा होत होता हे अद्याप स्पष्ट नाही..
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या आसाम सीआयडीच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक गीतांजली डोले सांगतात, "व्हीडिओ पाहिल्यानंतर मी अनेक रात्र झोपू शकले नाही."
हे फेसबुक पेज आता ऑफलाईन करण्यात आलं असून प्रकरण आता न्यायप्रविष्ठ आहे.
बालकांच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणात वाढ
एका अहवालानुसार कोरोना आरोग्य संकटाआधी वर्ष 2018 मध्ये दरदिवशी 109 मुलांचं लैंगिक शोषण होत होतं.

कार्यकर्ते आणि पोलीस अधिकाऱ्यांनुसार भारतात कोरोना काळात सीसॅमची ऑनलाईन मागणी आणि प्रसार यात वाढ झाल्याची नोंद झाली आहे.
भारताच्या सायबर सुरक्षेत महत्त्वाची भूमिका असणारे केरळ राज्याचे पोलीस सायबरडोमचे प्रमुख मनोज अब्राहम यांच्यानुसार कोरोना साथीच्या आजारात यात 200 ते 300 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
केरळचे उदाहरण यासाठी कारण केरळ सायबरडोम सीसॅमची माहिती काढण्यासाठी तंत्रज्ञानाच्यादृष्टीने इतर राज्यांच्या तुलनेत आधुनिक आहे.
मनोज अब्राहम यांना काळजी आहे की, ऑनलाईनवर भारतीय बनावटीच्या सीसॅम व्हिडिओंचा प्रसार वाढला आहे.
मनोज अब्राहम म्हणाले, "कोरोना आरोगय संकटात आम्ही बरेच स्थानिक व्हिडिओ पाहिले. यात मल्याळम मनोरमाचे कॅलेंडर किंवा केरळ किंवा भारतीय गोष्टी ठळकपणे दिसून आल्या."
म्हणजेच हे व्हिडिओ केरळमध्ये किंवा भारताच्या इतर भागांत शूट केलेले आहेत. चिंतेची बाब म्हणजे यापैकी अनेक व्हिडिओ घरात बनवलेले आहेत.
मनोज अब्राहम सांगतात, "तुम्ही घरात पाहू शकता. सर्वात भयानक म्हणजे घरात मुलगा किंवा मुलीच्या जवळची व्यक्ती असे व्हिडिओ बनवत आहे."

कोरोना काळात या मुलांना पोलिसांकडून मिळणाऱ्या मदतीवरही परिणाम झाला आहे.
बालकांच्या अधिकारासाठी आवाज उठवणारे कार्यकर्ता मिगएल दास क्विहा सांगतात, "कोरोना काळात पोलीस कायदा व सुव्यवस्था राखण्यात व्यस्त होते. पोलीस कर्मचारी सुद्धा मोठ्या संख्येने कोरोनाग्रस्त होते."
जगभरातील परिस्थिती
एप्रिल 2020 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क तज्ज्ञांनी सतर्क केलं होतं की, ""बाहेर जाण्यावर निर्बंध आणि ऑनलाईन वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढल्याने ऑनलाईन सेक्शुअल ग्रूमिंगमध्ये वाढ होऊ शकते. बालकांच्या लैंगिक शोषणाची लाईव्ह स्ट्रिमिंग वाढू शकते आणि यासंदर्भातील उत्पादन आणि विक्री यातही वाढ होण्याची शक्यता आहे."
ग्रूम करणं म्हणजे मैत्री करणं, मग भावनात्मक नातं बनवणं आणि मग कॅमेऱ्यासमोर लैंगिक कृत्य करण्यासाठी प्रयत्न करणं.
2020 साली अमेरिकेतील 'नॅशनल सेंटर फॉर मिसिंग अँड एक्सप्लॉयटेड चिल्ड्रन' या संस्थेच्या 'सायबर टिपलाईन'कडे जवळपास 2 कोटी 17 फोटो, व्हिडिओ आणि इतर फाईल्सबाबत तक्रारी आल्या. यात सीसॅमसंबंधी साहित्य होते.
रिपोर्टनुसार, वर्ष 2019 च्या तुलनेत ही वाढ 28 टक्के एवढी होती. भारत या यादीत सर्वोच्च स्थानावर होता.
यामागे असलेली कारणं शोधणं कठीण नाही. बराच काळ घरी थांबावं लागल्याने मुलांची ऑनलाईन उपस्थिती वाढली आहे.
भयानक स्थिती
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीच्या काळात मुंबईतील कार्यकर्ता सिद्धार्थ पिल्लई यांच्याकडे 16 वर्षांचा एक मुलगा हताश होऊन आला. त्याच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. मोबाईल चॅटमधून त्याला कळालं की त्याच्या 10 वर्षांच्या बहिणीला आधी गेमिंग अॅप आणि नंतर सोशल मीडिया अॅपवर ग्रुम करण्यात आलं होतं.

खासगी संस्था आरंभचे सिद्धार्थ पिल्लई सांगतात, "अशा प्रकरणांची सुरूवात हाय, हॅलो पासून होते. मग संभाषण स्तुतीपर्यंत पोहचतं. मी नेहमी तुझाच विचार करत असतो इथपर्यंत संवाद पोहचतो आणि मग विषयाचे स्वरुप बदलते."
ते सांगतात, "ही एक ग्रूमिंगची रचना आहे. ग्रूम करणारा व्यक्ती बालकांना डिसेंसिटाईज किंवा त्याची संवेदनशीलता संपवण्याचा प्रयत्न करतो."
डिसेंबर 2019 आणि जून 2020 दरम्यान इंडिया चाईल्ड प्रोटेक्शन फंडला एका संशोधनात आढळलं -
1. भारतात सीसॅम कंटेट पाहणारे 90 टक्के पुरुष आणि एक टक्के महिला आहेत. इतर लोकांची ओळख पटलेली नाही.
2. 'स्कूल सेक्स व्हीडिओ' आणि 'टीन सेक्स' सारख्या व्हिडिओमध्ये बहुतांश लोकांना रस होता.
3. बहुतेक लोक आपले स्थान लपवण्यासाठी, सरकारी कायद्यांपासून वाचण्यासाठी व्हीपीएनचा वापर करतात.
आयसीपीएफ आणि त्याच्या भागीदारांनी सीसॅमची मागणी समजून घेण्यासाठी 100 शहरांचे सर्वेक्षण केले होते.
सीसॅमच्या वितरणाची माहिती मिळवणे
जाणकार सांगतात, बालकांच्या लैंगिक शोषणाचे व्हिडिओ सोशल मीडिया, वीपीएन, फाईल शेअरिंग अॅप्लिकेशन, इ. ठिकाणी शेअर होतात.
सीसॅमचे बरेचसे साहित्य डार्क वेबच्या बंद चॅटरुममध्येही शेअर होते. इथे व्यवहारासाठी बिटकॉईन वापरले जाते.
डार्क वेब इंटरनेटची अशी जागा आहे जिथे अनेक बेकायदेशीर कामं चालतात.

जे इंटरनेट आपण वापरतो ते वेबच्या जगातील छोटा भाग आहे. याला सरफेस वेब म्हटलं जातं. यामागे लपलेल्या इंटरनेटला डीप वेब म्हटलं जातं. डीप वेबमध्ये असे पेज आढळतात जे सामान्य सर्च इंजिन शोधू शकत नाहीत. यूजर डेटाबेस, स्टेजिंग स्तरावरील वेबसाईट, पेमेंट गेटवे, इ.
ग्राहक कोण आहे याची कल्पना विक्रेत्यांना नसते आणि ग्राहकांनाही विक्रेते माहिती नसतात.
अधिकारी सांगतात, कंटेट शेअर करणारे हे लोक एकाच विचाराचे असतात. हेच लोक मेसेजिंग अॅपवर सीसॅम कंटेट शेअर करतात. हे संघटित समूहाचे काम नाही.
मनोज अब्राहम सांगतात, "असं नाही की एखादी कोणती गँग येईल, बालकांशी गोड बोलून त्यांचं अपहरण केलं जाईल आणि मग असं काही कृत्य करेल."
हे सॉफ्टवेअर आयकाईकॉप्स अधिकाऱ्यांना केरळ पोलिस स्पेशल विंग काउंटर चाइल्ड सेक्शुअल एक्स्प्लॉयटेशन सेंटरमध्ये गुन्हेगारांचे आयपी अॅड्रेस शोधण्यासाठी मदत करत आहे. आयकाईकॉप्स म्हणजे मुलांविरूद्ध इंटरनेट गुन्हे आणि बालक ऑनलाईन संरक्षक सेवा.

फोटो स्रोत, Getty Images
एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन वर्षांपासून हे सॉफ्टवेअर वापरल्यापासून सुमारे 1500 शोध मोहिमा हाती घेण्यात आल्या असून आतापर्यंत 350 जणांना अटक करण्यात आली आहे.
"एक वडील या नात्याने हे खूप वेदनादायक आहे," असं अधिकारी म्हणाले. आमच्या मुलांसोबत असं काही घडू नये अशी आमची इच्छा आहे. आम्ही जेव्हा कंटेट पाहतो तेव्हा आम्हाला आमची मुलं आठवतात."
आमचा प्रयत्न असतो की पीडित मुलांची ओळख आम्हाला मिळेल कारण छापेमारी करताना आम्हाला कळालं की स्थानिक मुलांचं शोषण होत आहे.
देशात बनवलेले सॉफ्टवेअर ग्रॅपनेल याचीही मदत घेतली जात आहे. या सॉफ्टवेअरचा विकास एका हॅकाथॉनदरम्यान झाला होता.
हे सॉफ्टवेअर डार्क वेबमधील सर्चप्रमाणे आहे. कीवर्ड टाईप केल्यानंतर सीसॅम असलेलं कंटेट प्राप्त होतं.
या आधारे पोलीस लोकांची ओळख पटवतात आणि त्यांच्यावर कारवाई होते.
पुढील मार्ग
लैंगिक शोषण साहित्य, सीसॅम, पीडोफिलिया हे भारतातील संवेदनशील विषय आहेत.
पुण्याच्या सरकारी केईएम रिसर्च इन्स्टिट्यूट स्वयंसेवी संस्थेतील डॉक्टरांपैकी एक पीडोफिलियाबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी आणि मानसिक आरोग्य म्हणून याकडे पाहण्यासाठी पाच वर्षांहून अधिक काळ काम करत आहे.

या संदर्भात त्यांनी चित्रपटगृह, सार्वजनिक गाड्यांवर जनजागृतीसाठी मोहीम चालवली. यात सहभागी असलेले आणि मनोविभागाचे प्रमुख डॉ. वासुदेव पराळीकर म्हणतात, "लॉकडाऊनमध्ये लोकांना एकटेपणा आणि अनिश्चितता जाणवली. यावर उपाय म्हणून लोक लैंगिकतेचा आधार घेतात. विशेषत: त्याच्या आजूबाजूला कोणताही पर्याय नसतो तेव्हा."
ते म्हणतात, "पेडोफाईलमध्येही मुलांच्या लैंगिक इच्छा वाढू शकतात. पण लोकांनी आम्हाला हे सांगितले नाही की त्यांनी कोरोना काळात अधिक सीसॅम कंटेट पाहिलं."
लॉकडॉऊन संपुष्टात येत असलं तरी बालकांचा ऑनलाईनकडे असलेला ओढा कमी होताना दिसत नाही.
मुलं ऑनलाईन असताना काय करत आहेत याकडे पालकांनी लक्ष द्यावं तसंच इंटरनेटवर काय सुरक्षित आहे आणि काय असुरक्षित याचीही माहिती त्यांना द्यावी असं आवाहन अब्राहम करतात.
पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवलं पाहिजे तसंच त्यांच्या आसपास कोण आहे याबाबतही सतर्क रहायला हवं असही ते सांगता.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








