मुलांचे संगोपन : पालकांनी या गोष्टी मुलांसोबत अजिबात करू नयेत

मुंलांचे संगोपन
    • Author, नताशा बधवार
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

माझ्या वयाच्या प्रत्येकाजवळ एक गोष्ट असते ती म्हणजे थोड्या वेळासाठी का होईना आपण कसे हरवलो होतो किंवा आई-वडिलांपासून ताटातूट झाली आणि परत कशी भेट झाली वगैरे.

तुमच्या पालकांसोबत सार्वजनिक ठिकाणी असणं आणि तुमच्या पालकांपैकी कोणीही तुमचा हात धरलेला नाही हे अचानक लक्षात येणं, त्यांच्यापासून वेगळे होऊन, गर्दीत अचानक हरवणं. आपल्या सर्वांच्याच अशा आठवणी आहेत.

तेव्हा कदाचित जग अधिक ओळखीचे आणि तुलनेने लहान होते. पालकही त्यांच्या मुलांच्या सुरक्षिततेबद्दल इतके चिंतेत नसायचे. त्या काळात मोबाईल फोन देखील नव्हता.

मलाही असाच एक प्रसंग आठवतो. जेव्हा मी माझ्या धाकट्या बहिणीसह पंजाबमधील फरीदकोट या छोट्याशा शहरात हरवले होते. त्यावेळी मी पाच वर्षांची होते.

कुटुंबात एक लग्न होते आणि सर्व वडीलधारी मंडळी काही विधीसाठी वधूच्या घरी गेली होती. ज्या ठिकाणी वरात थांबवण्यात आली तेव्हा तिथे फक्त आम्ही काही लहान मुलं होतो. माझ्याकडे आजी आणि काकूंकडून मिळालेले काही पैसे होते.

मुंलांचे संगोपन

फोटो स्रोत, Natasha Badhwar

मी माझ्या लहानग्या आतेबहिणीला समजावून सांगितले की ती माझ्याबरोबर आली तर जवळच्या दुकानातून टॉफी विकत घ्याव्यात. मला खात्री होती की मला परत यायचा रस्ता माहित आहे.

आम्ही चॉकलेट विकत घेतले, पण फरीदकोटच्या छोट्या गल्ल्यांमध्ये हरवून गेलो. यातील काही गल्ल्या काही पावले चालत गेल्यानंतर एका घरासमोर बंद होत होत्या.

पण मी धाडसाने माझ्या धाकट्या बहिणीचा हात धरून चालत राहिले. आम्ही बराच वेळ भटकत होतो. तेवढ्यात आम्हाला एक माणूस दिसला जो त्याच्या घरासमोर स्कूटरची सर्व्हिसिंग करत होता. त्याला आम्ही सांगितले की आम्ही हरवलो आहोत. ज्या गावात जिथं लग्नं आहे तिथं आम्ही आलो आहोत. मग त्या व्यक्तीने इतर लोकांची मदत घेऊन आम्हाला आमच्या घरी पोहचोवलं.

आत्याने जेव्हा छोट्या बहिणीला मारले

आम्ही परत पोहचलो तेव्हा आम्हाला रस्त्यात वयस्कर माणसांची गर्दी खूप काळजीत दिसली. मला अजूनही आठवते की मी आता पुन्हा सुरक्षित आहे या विचाराने मला त्या वेळी किती दिलासा मिळाला होता. पण माझी आत्या जी माझ्यासोबत आलेल्या बहिणीची आई होती. ती थेट आमच्याकडे आली, तिने तिची चप्पल काढली आणि तिच्या चार वर्षांच्या मुलीला काही वेळ मारले.

मुलांचे संगोपन

फोटो स्रोत, NAtasha badhwar

पालक आणि त्याच्या मुलामधला तो प्रसंग मी कधीच विसरू शकत नाही. आम्हाला आशा होती की वडीलधारी मंडळी आमच्यावर प्रेम करतील आणि मिठी मारतील. पण माझ्या धाकट्या बहिणीला घरातून हरवल्याबद्दल खूप मार खावा लागला आणि मला खूप ऐकावं लागलं.

एक पालक आणि प्रौढ म्हणून मला आता माझ्या मावशीची वागणूक समजते आहे. तिला भीती वाटत होती की लोक काय म्हणतील? आपण आपल्या मुलाची काळजी देखील घेऊ शकत नाही या विचाराने ती त्रस्त होती. तिला आपल्या मुलीला धडा शिकवायचा होता. तिच्या मनात भीती निर्माण करायची होती आणि आईचा राग तिच्या लक्षात आणून द्यायचा होता जेणेकरून ती भविष्यात कधीही घराबाहेर पडू नये.

माझ्या आत्याला तिचा नवरा आणि कुटुंबातील इतर वडीलधाऱ्या मंडळींच्या रागाची जास्त भीती वाटत होती. तिने आपला सर्व राग तिच्या लहान मुलीवर काढला, जी आधीच भीतीने रडत होती. त्यात ती इतकी लहान होती की ति स्वतःची चूकही नीट समजू शकली नव्हती.

कोणत्याही संकटाच्या क्षणी आपल्या लहान मुलाशी कसे वागू नये, यासाठी ते दृश्य माझ्यासाठी प्रमाण बनले. कोणतीही चूक न केलेल्या एका लहान मुलीला मारहाण केल्याचा आघात मी कधीही विसरू शकत नाही. तिला त्याक्षणी प्रेमाची गरज होती, मारहाणीची नाही.

मुलांवर भीती आणि चिंता लादू नका

पालक या नात्याने जेव्हा मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न येतो तेव्हा आपण स्वतःला असहाय्य समजतो. अनेकदा भीतीचे वातावरण तयार होत असते. परंतु आपण आपल्या भीतीचे आणि रागाचे ओझे आपल्या मुलावर टाकू शकत नाही, ज्यांना अगोदरपासून त्रास होत आहे.

लहान मुलं

फोटो स्रोत, NATASHA BADHWAR

आपण इतर वडीलधाऱ्या मंडळीची मदत घेतली पाहिजे. आपल्या मुलांना आपल्याशिवाय जितकं सुरक्षित वाटतं त्यापेक्षा त्याला आपल्यासोबत राहणे अधिक सुरक्षित वाटलं पाहिजे याची खात्री करा.

जसजसे आपण मोठे होतो तसतसे आपल्यापैकी अनेकजण आपल्या पालकांचा राग स्वतःमध्ये आणतात. अनेक वेळा आपण स्वतःला अशा परिस्थितीत पाहतो की, आपल्या पालकांसोबतच्या समस्या हे बाहेरच्या जगातल्या समस्यापेक्षा अधिक जास्त धोकादायक आहे.

माझे असे काही मित्र-मैत्रिणी आहेत, ज्यांचा अपघात झाला होता किंवा त्यांचे शाळेत असताना कोणाशी तरी भांडण झाले होते, परीक्षा चांगली गेली नव्हती, गर्भपाताची गरज वाटत होती आहे किंवा इतर कोणत्याही वैद्यकीय मदतीची गरज होती, पण त्यांनी घरी मदत मागणे टाळले, आपल्या पालकांना या गोष्टीबद्दल कळलं तर काय होईल अशीच भीती त्यांना सतावत होती.

अशा परिस्थितीत पालकांना न कळवता सर्व जोखीम स्वतःच उचलणे त्यांना बरे वाटले. केवळ आपल्या आई-वडिलांना तणावापासून दूर ठेवण्यासाठी त्यांनी असे निर्णय घेतले, ज्यामुळे त्यांनी स्वतःला आणखी संकटात टाकले.

पालकत्व

फोटो स्रोत, NATASHA BADHWAR

हे पालक म्हणून सर्वांत मोठे अपयश नसेल तर काय? आपल्यासाठी सर्वांत सुरक्षित ठिकाण म्हणजे आपलं घर आणि कुटुंब असावं. पण हे असं नेहमीच होत नाही. अशी परिस्थिती आपणच निर्माण करतो आणि आपल्याला त्याची जाणीवही होत नाही, ही त्याहून वाईट गोष्ट आहे.

आपण आपला राग आपल्या मुलांवर काढतो कारण आपली नकारात्मकता ओतण्यासाठी ही सर्वांत सुरक्षित जागा आहे. माझी आत्या जर स्वतः घाबरली नसती तर तिने आपल्या लहान मुलीला मारहाण केली नसती. स्वतःच्या आयुष्यात तिला त्रास देणाऱ्या मोठ्या लोकांसमोर उभं राहण्याची हिंमत ती करू शकत नव्हती. पण ती आपल्या लहान मुलांना दबावाखाली ठेऊ शकत होती.

म्हणूनच आया त्यांचा राग मुलांवर काढतात. वडीलही तेच करतात. त्याक्षणी मुले त्यांना प्रत्युत्तर देऊ शकत नाहीत. मोठ्यांसमोर लहान मुलं असहाय असतात.

याहून अधिक धोकादायक काय म्हणजे जर त्यांना मोठ्यांनी हिणवले असेल तर ते शब्द त्यांच्या मनात कायमच घर करून राहतात. त्याचा त्यांना आयुष्यभर त्रास होतो आणि त्यांच्यात भावना दृढ होत जाते आणि त्यांना वाटत राहतं की मी वाईट आहे, मी नेहमी चुका करतो किंवा करते इत्यादी.

पालकांचे मुलांवर किती प्रेम असते याबद्दल आपल्याकडे विपुल लिखाण आढळेल, किंवा या विषयावर सातत्याने बोललं जातं. पण मुलांचं आई-वडिलांवर किती प्रेम असतं ही गोष्ट समजून घेण्याकडे लोकांचा फारसा कल नसतो. जसं आई-वडिलांना वाटतं की मुलं सुरक्षित राहावीत अगदी तसंच मुलांना देखील वाटत असतं की त्यांचे पालक सुरक्षित राहावेत.

मुले आसपास असतात तेव्हा हे करायचे?

लहान मुलांच्या आपल्यावरील प्रेमाला आपण काही नावं देतो, लडिवाळपणा, बालहट्ट, भित्री भागूबाई. ते आपल्यावर अवलंबून आहेत म्हणून ते आपल्यावर प्रेम करत आहेत असा आपण ग्रह करतो, त्यांच्या प्रेमाच्या अभिव्यक्तीची आपल्याला लाज वाटते.

खरी गोष्ट तर अशी आहे की अनेक प्रौढ लोकांना हेच कळत नाही की त्यांच्यात प्रेम स्वीकार करण्याची क्षमता कमी आहे. कौटुंबिक परिघात विश्वास आणि सन्मान जाहीर कसा करावा याबाबतीतला आपला अनुभव अत्यंत तोकडा आहे. एकत्र कुटुंबात वाढल्यावर तिथे एकमेकांना कधीकधी जशी वाईट वागणूक मिळते त्याचीच पुनरावृत्ती अनेकजण आपल्या आयुष्यात करतात आणि त्याची जाणीव देखील त्यांना नसते. भीती, दबाव, नियंत्रण आणि वर्चस्वाची भावना असणे हे तर पालकत्वाचं प्रारूपच बनलं आहे.

जेव्हा मुलं आपल्याशी बोलणं बंद करतात आणि ताण-तणावात जगू लागतात, तेव्हा आपण त्यांच्याबद्दल मनानेच निष्कर्ष काढू लागतो. त्यांच्या आसपास असं काय आहे जे त्यांना या कोशात ढकलत आहे, हे आपल्या लक्षातही येत नाही. त्यांना त्यांचे म्हणणे मांडायचे आहे, पण त्यासाठी सुरक्षित वातावरण बनवणे गरजेचे आहे.

जर या शब्दांचं प्रतिबिंब तुम्हाला तुमच्या मनात दिसत असेल तर वेळ आली आहे आपल्या जाणिवांमध्ये बदल करण्याची. हीच वेळ आहे आपल्यातील कमतरतांना दूर सारून आपल्या प्रेमाला फुलू देण्याची.

लहान मुलांचे संगोपन

फोटो स्रोत, NATASHA BADHWAR

आता तुमची मुलं तुमच्या आजूबाजूला असतील तर त्यांना मिठी मारा. तुम्ही दूर असाल तर त्यांना कॉल करा किंवा त्यांना मेसेज पाठवा. एकमेकांनी जवळ राहणं आणि एक सुरक्षित वातावरण तयार करणे आवश्यक आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)