भाजी आणि फुगे विक्रेते बनून पोलिसांनी चोरट्यांच्या म्होरक्याला पकडलं

पोलीस

फोटो स्रोत, Bhargav Parikh

फोटो कॅप्शन, पोलिसांना केले वेशांतर
    • Author, भार्गव पारिख
    • Role, बीबीसी गुजरातीसाठी

"अहमदाबादेत गवंडी काम करण्याच्या माध्यमातून चोरांची एक टोळी सक्रिय झाली होती. या टोळीतील सदस्य पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी चोरी केल्यानंतर मध्य प्रदेशातील एका छोट्याशा गावात लपून बसायचे. गावात आमची (पोलिसांची) ओळख नव्हती, त्यामुळं आम्ही भाजी आणि फुगे विक्रेते बनून गावात गेलो. त्याठिकाणी दोन दिवस फुगे आणि भाज्या विक्री केल्यानंतर आम्ही चोरीच्या आरोपींना पकडण्यात यशस्वी ठरलो."

चोरांना कशाप्रकारे पकडलं याची माहिती देताना अहमदाबादच्या सोलाशिट डिटेक्टिव्ह स्टाफमधील पोलिस निरीक्षक के. डी. राविया यांनी हे सांगितलं.

अहमदाबादच्या वेगवेगळ्या भागात अनेक दिवसांपासून चोरींची प्रकरणं समोर येत होती. पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार या घरांना नुकतेच रंग दिलेले होते.

सुरुवातीच्या तपासामध्ये अनेक सीसीटिव्ही कॅमेऱ्यांचं फुटेज तपासल्यानंतर पोलिसांना एका व्यक्तीवर संशय आला आणि नंतर पुढचा तपास सुरू झाला.

पण पोलिसांसाठी संशयिताला पकडणं सोपं नव्हतं. कारण तो नेहमी मध्य प्रदेशात निघून जायचा.

चोरीच्या आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी कशाप्रकारे योजना आखली आणि 48 तासांमध्ये त्यांना कसं पकडलं याची कहाणी अत्यंत रंजक आहे.

आरोपी चोरी कशी करायचे?

वेगवेगळ्या भागामध्ये झालेल्या चोरी आणि आरोपींच्या एकूणच स्टाइलबाबत पोलिस निरीक्षक के. डी. राविया यांनी बीबीसीला माहिती दिली.

त्यांच्या मते, मध्य प्रदेशातून आलेले हे टोळीतील सदस्य अहमदाबादेत पेंटिंग आणि गवंडीकाम करायचे. गवंडी काम करताना ते माहिती घ्यायचे आणि नंतर घरांत चोरी करायचे. नंतर ते मध्य प्रदेशात निघून जायचे.

सुरुवातीच्या चौकशीच्या आधारे पोलिसांना आनंद शर्मा नावाच्या व्यक्तीवर संशय आला.

आनंद शर्मादेखील मध्य प्रदेशातून अहमदाबादेत गवंडी काम करण्यासाठी यायचे. ज्या घरात ते गवंडीकाम करायचे. त्याठिकाणी कुटुंबातील सदस्यांबरोबर बोलून ते सर्व माहिती घ्यायचे. नंतर ते मध्य प्रदेशातून टोळीला घेऊन यायचे आणि नंतर चोरी करायचे, असं राविया यांनी सांगितलं.

पोलीस

फोटो स्रोत, Bhagarv Parikh

फोटो कॅप्शन, पोलिसांनी वेशांतर करुन फुगे देखील विकले

चोरीचे प्रकार पाहता पोलिसांनी चाणक्यपुरी परिसरात नव्यानं तयार बनलेल्या फ्लॅटवर नजर ठेवली आणि गस्त घातली.

आनंद शर्मा यांनी चाणक्यपुरी परिसरात नव्यानं तयार झालेल्या फ्लॅटमध्ये फर्निचरचं काम केलं होतं. या फ्लॅटमध्ये राहणारे लोक फिरायला जाणार असल्याचंही त्यांना माहिती होतं.

सोला पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आर.एच. सोलंकी यांनी बीबीसीबरोबर बोलताना सांगितलं की, "आम्ही चोरीची शंका लक्षात घेऊन नव्यानं तयार करण्यात आलेल्या फ्लॅटच्या भागात गस्त घालून नजर ठेवायला सुरुवात केली."

"आम्ही आनंद शर्मांवर नजर ठेवून होतो. तेवढ्यात ते मध्य प्रदेशातून टोळी घेऊनही आले होते. पण त्याच्याबरोबरचे दोघं मध्य प्रदेशात रेल्वेनं परत जात होते. काही दिवसांतच चाणक्यपुरीत एका वकिलांकडं चोरी झाली आणि घरातून दीड लाखांचे दागिने चोरीला गेले.''

वकिलांच्या घरी चोरी झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला वेग दिला.

पोलिसांनी आरोपींना पकडण्याची योजना कशी बदलली?

आर.एच. सोलंकी म्हणाले की, "आम्ही लगेचच सीसीटीव्ही चेक केलं आणि त्या ठिकाणाहून एक स्कूटर जात असल्याचं पाहिलं. त्या स्कूटरवर नंबर दिसत नव्हता. नेहमीच्या पद्धतीनं चोरांनी शक्कल लावली होती. त्यामुळं आम्ही हे प्रकरण डिटेक्टिव स्टाफ (डी-स्टाफ) ला सोपवलं."

डी-स्टाफच्या रविया यांनी सांगितलं की, "फुटेजमध्ये आम्हाला एक सोनेरी रंगाची स्कूटर दिसली. त्या स्कूटरला समोरची नंबर प्लेट नव्हती. तसंच मागची नंबर प्लेटही वाकडी झालेली होती, त्यामुळं स्कूटरचा नंबर समजणं कठिण होतं. पण सोनेरी रंगाची स्कूटर क्वचितच कुणाकडे असेल, त्यामुळं आम्ही तिचा शोध सुरू केला."

"स्कूटर अहमदाबादच्या बाहेर गेली नसल्याचं आम्हाला सीसीटिव्हीवरून समजलं. शहरातील अंतर्गत भागात आम्ही सगळीकडं शोधाशोध केली. पण आम्हाला स्कूटर सापडलीच नाही. स्कूटरवरील व्यक्तीचा चेहरा दिसत नव्हता. पण त्याचा चेहरा बांधलेला रुमाल पाहून तो व्यक्ती मध्य प्रदेशचा आहे की उत्तर प्रदेशचा हा अंदाज आम्ही बांधला."

पोलीस

फोटो स्रोत, Bhagrav Parikh

फोटो कॅप्शन, पोलिसांनी म्होरक्याच्या मुसक्या आवळल्या

पुढे तपास केल्यानंतर एका ठिकाणी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये त्या व्यक्तीचा चेहरा दिसला. स्कूटरचा तपास केल्यानंतर ती एका पाणीपुरीवाल्याची असल्याचं समजलं. तो आरोपी आनंद शर्माच्या गावचा होता. आनंदच ती स्कूटर वापरत होता.

के. डी. राविया यांच्या मते, "आमची खरी परीक्षा आता सुरू झाली होती."

त्यानंतर पोलिसांनी पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांकडं कसून तपास केला. त्याच्याकडून संशयित आनंद शर्माच्या गावाबाबत माहिती मिळाली.

आरोपी आनंद शर्मा मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेर जिल्ह्याच्या भदरोली गावातील रहिवासी होता.

पोलिसांनी पाणीपुरीवाल्याकडून त्याच्या घराची माहिती मिळवली. तेव्हा तो गावात आत अरुंद गल्ल्यांमध्ये राहत होता, असं पोलिसांना समजलं. तिथं त्याला पकडणं कठिण होतं. तसंच गरज नसेल तोपर्यंत तो फोनही सुरू करत नव्हता. त्यामुळं त्याचं लोकेशन समजणं कठिण झालं होतं.

पकडण्यासाठी पोलिसांचे वेशांतर

यानंतर पोलिसांनी मध्य प्रदेशात एका जल पुरवठा कर्मचाऱ्याच्या मदतीनं फुगे आणि भाजीच्या गाड्यांची व्यवस्थी केली. आनंद शर्मा त्या परिसरात चहा प्यायला यायचा.

पोलीस कर्मचारी वेशांतर करून गाडीवर भाजी आणि फुगे विकू लागले. पण आनंद शर्मा घरीच चहा मागवू लागला होता, तो चहा प्यायला येत नव्हता.

पोलीस निरीक्षक के. डी. राविया म्हणतात की, आनंद शर्मा ज्या ठिकाणी राहायचा तिथपर्यंत पोहोचण्यासाठी त्याच गल्लीत एक घर भाड्यानं घेतलं. आम्हाला त्यांचं घर कोणतं हे समजलं होतं. आम्ही त्या गल्लीत गेलो तेव्हाच आनंद शर्मा बाहेर आला.

पोलिसांनी रात्री उशिरा छापा टाकत आनंद शर्मा यांना अटक केली.

पोलिसांनी सलग चार दिवस प्रयत्न करून या चोराला पकडलं. त्यांच्याकडून बरंच साहित्यही जप्त करण्यात आलं. आनंद शर्मानं गुन्हाही कबूल केला. त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)