करी अँड सायनाईड : अन्नातून विषप्रयोग, घरातल्या 6 जणांची हत्या, 14 वर्षं सुरु राहिलेलं हत्याकांड

फोटो स्रोत, K. SASI
- Author, जयदीप वसंत
- Role, बीबीसी गुजरातीसाठी
एका नातेवाईकाच्या गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात गेलेल्या जॉलीची ओळख रॉय नामक तरुणाशी होते. त्यांच्यात बोलणं वाढायला लागलं, प्रेम बहरू लागलं.
पण या जोडप्यांचा प्रवास काही सोपा नव्हता. जवळपास 10 वर्षं वाट पाहिल्यानंतर दोघांचं लग्नही झालं.
या प्रेमकथेची सुरुवात तर चांगली होती, पण शेवट मात्र भयानक होता.
14 वर्षांच्या कालावधीत कुटुंबातील सहा सदस्य एकामागून एक मृत्युमुखी पडतात. जेव्हा याचं कारण शोधण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा कुटुंबाची सून जॉली जोसेफचा यामागे हात असल्याचं समोर येतं.
जॉलीचा यात सहभाग आहे हे समजल्यानंतर कुटुंबीय आणि शेजाऱ्यांना धक्काच बसला. कारण ती एका चांगल्या शैक्षणिक संस्थेत प्राध्यापिका होती. तिचा स्वभाव नम्र, गरजूंना मदत करणारा होता.
जॉली दोन आयुष्यं जगत होती. जवळपास एका दशकाहून अधिक काळ तिने कुटुंबाला अंधारात ठेवल्याचं तपासातून समोर आलं. जॉलीच्या आयुष्यात एक पुरुष आला होता, ज्याच्याशी तिने लग्नही केलं.
शुक्रवारी (22 डिसेंबर) ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर 'करी अँड सायनाइड' हा माहितीपट प्रदर्शित झाला. जॉलीची कहाणी या माहितीपटात सांगितली आहे.
ही घटना इतकी गुंतागुंतीची आहे की या वृत्तांतातील काही भाग वाचकांना गोंधळात टाकू शकतो. पण जर लक्षपूर्वक वाचलं तर तुम्हाला या गोष्टी लक्षात येतील.
घरच्या सुनेने मांडला हत्येचा खेळ
रॉयचं कुटुंब कोझिकोड जिल्ह्यातील कोडदथाई गावात राहत होतं. जुलै 1997 मध्ये त्याचं आणि जॉलीचं लग्न झालं. त्यांचं गाव मुस्लिम बहुल असल्याने ख्रिश्चन घरं तशी कमीच होती. त्यामुळे जॉली लोकांमध्ये लोकप्रिय झाली.
तिच्या शांत, मनमिळाऊ, विनम्र, धार्मिक स्वभावामुळे समाजातील आणि परिसरातील लोकांची ती लाडकी बनली. जॉलीची सासू अन्नामा थॉमस या जमीन आणि घराचा हिशेब बघायच्या, तर सासरे टॉम त्यात कसलाच हस्तक्षेप करत नव्हते.
तीन मजली घरात चार जणांचं कुटुंब गुण्यागोविंदाने राहत होतं. पुढच्या काही वर्षात जॉली आणि रॉयला रेमो आणि रेनॉल्ड ही दोन मुलं झाली. रॉयचा भाऊ रोजो आणि बहीण रेन्जी इतरत्र राहत होते.
केवळ पदवीपूर्व शिक्षण घेतलेल्या जॉलीने बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे एम. कॉमपर्यंत शिक्षण घेतल्याचं सासरच्यांना पटवून दिलं.
जॉलीने बीएडचा अभ्यास करण्यासाठी सासू अन्नामा यांची परवानगी मागितली. निवृत्त शिक्षिका असलेल्या अन्नामा यांनी शिक्षणानंतर तिला नोकरी करण्याच्या अटीवर परवानगी दिली.

फोटो स्रोत, Getty Images
पलानी मिशनरी कॉलेजमध्ये गेस्ट लेक्चरर म्हणून नोकरी मिळाल्याचं जॉलीने कुटुंबीयांना सांगितलं आणि ती त्यांना अधूनमधून भेटायला येत राहिल असंही सांगितलं.
काही वर्षांनंतर जॉलीने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये नोकरी मिळाल्याचा दावा केला. ओळखपत्र आणि विद्यापीठ अनुदान आयोगाची कागदपत्रं दाखवल्यावर कुटुंबीयांना याची खात्री पटली.
कामासाठी बाहेर पडताना जसा पोषाख असतो तशी अगदी टापटिप बनून ती बाहेर पडायची. लोक तिला आदराने 'जॉली टीचर' म्हणत.
मात्र, प्रत्यक्षात ती कुठेही काम करत नव्हती. जॉलीने हे नवं ढोंग सुरू करण्यापूर्वी जुनं नातं संपुष्टात आणलं होतं.
14 वर्षांत सहा जणांना विषबाधा कशी झाली?
एका क्षणी जॉलीला वाटू लागलं की जर तिच्या सासूला, अन्नामाला तिच्या खोटेपणाबद्दल कळलं तर ती तिच्यावर रागवेल आणि संकट ओढवेल. तिचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं जाईल. त्यामुळे जॉलीने सासूचा काटा काढण्याचा निर्णय घेतला.
जॉलीविरुद्धच्या आरोपानुसार, तिने जिल्हा पशु रुग्णालयातून कुत्र्यांना मारण्याचं औषध घेतलं आणि ऑगस्ट 2002 मध्ये सासूच्या सूपमध्ये हे औषध टाकलं. एका झटक्यात अन्नामाचं आयुष्य संपलं. मात्र हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं लोकांना वाटलं.
आता कुटुंबाच्या आर्थिक चाव्या जॉलीच्या हातात गेल्या. या गोष्टीला तिच्या सासऱ्यांनीही विरोध केला नाही.
2008 मध्ये सासरे टॉम यांचं निधन झालं. कुटुंबावरचं छप्पर हरपलं. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, त्यावेळी जॉलीने सासऱ्यांनाही विष पाजलं. एवढंच नाही तर सासऱ्यांच्या संपत्तीचे वारस रॉय आणि स्वतः असल्याचं बनावट मृत्यूपत्र तयार केलं.
रॉयचा भाऊ रोजोला हे कळल्यावर धक्काच बसला, कारण त्याला आणि बहीण रेन्जीला संपत्ती मधील काहीच मिळालं नव्हतं. वडील टॉम यांनी असं करण्याचं कोणतंही कारण नव्हतं. पण जॉलीच्या प्रभावाखाली असलेल्या लोकांनी रोजोच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही.
सप्टेंबर 2011 मध्ये जॉलीच्या पतीचा बंद बाथरूममध्ये मृत्यू झाला. शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडून रॉय यांना उपचारासाठी हलविण्यात आलं. जॉलीने रॉयच्या जेवणातही विष टाकलं होतं. त्यानंतर रॉय जेवलेली भांडी, ग्लास साफ करून ठेवले.

फोटो स्रोत, Getty Images
अन्नामाचा भाऊ आणि रॉयचे मामा असलेल्या मॅथ्यू यांना आपल्या भाच्याचा मृत्यू संशयास्पद वाटला. त्यांच्या आग्रहास्तव मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले, त्यातून धक्कादायक बाब समोर आली.
सायनाइडमुळे रॉयचा मृत्यू झाला होता. रॉयसाठी जेवणाची तयारी करत असल्याचं जॉलीने कुटुंबीयांना सांगितलं होतं, पण रॉयचा बाथरूममध्येच मृत्यू झाला.
हृदयविकाराचा झटका आल्याने रॉयचं निधन झाल्याचं जॉलीने लोकांना सांगितलं. हे घर अशुभ असल्याचं आणि यामुळेच कुटुंबातील तीन सदस्य गेल्याचं तिने लोकांना सांगितलं.
याच टप्प्यावर केरळ पोलिसांची चूक झाली. पोटॅशियम सायनाइड आणि सोडियम सायनाइड हे अत्यंत विषारी पदार्थ आहेत. सोने आणि चांदी स्वच्छ करण्यासाठी आणि त्यातील अशुद्धता काढून टाकण्यासाठी याचा वापर होतो. ते सहजासहजी मिळत नाही आणि कोणाला किती विकले याचा तपशील ठेवावा लागतो.
इथे पोलिसांनी सायनाइडच्या स्रोताचा तपास केला नाही. ज्यामुळे आणखी तीन खून होणार होते.
या काळात रोजोने आपल्या भावाच्या मृत्यूचा तपास करण्यासाठी पोलिसांकडे अनेक निवेदने दिली. मालमत्तेत वाटा न मिळाल्याने तो जाणीवपूर्वक जॉलीची बदनामी करत असल्याचं पोलिसांना वाटलं.
रोजोने भावाच्या मृतदेहाच्या शवविच्छेदन अहवालाची प्रत मिळवली. त्यानुसार त्याच्या पोटात अन्न होतं. जॉलीने सांगितलं होतं की, ती स्वयंपाक करत असतानाच रॉय बाथरूममध्ये पडला. या खोट्या बोलण्यामुळे रोजोने जॉलीवर संशय घेण्यास सुरुवात केली. जॉली कामावर जात नसल्याचंही त्याच्या तपासातून समोर आलं.
एम. मॅथ्यू म्हणजेच रॉयचे मामा यांना आपल्या बहिणीचा, नंतर तिच्या नवऱ्याचा आणि आता भाच्याचा अकाली मृत्यू स्वीकारता आला नाही. त्यांनी स्वत: तपास सुरू केला आणि निष्पक्ष शवविच्छेदनासाठी अर्ज केला. आता जॉलीला मामांकडून धोका वाटू लागला.
2014 मध्ये मामांचंही निधन झालं. जॉलीने त्यांच्यावरही विषप्रयोग केला होता.
कुटुंबीयांना जॉलीवर शंका आली कारण ...
जेव्हा रॉयच्या आत्महत्येच्या अफवा पसरू लागल्या, तेव्हा जॉलीने कुटुंबातील सदस्यांना सांगितलं की तिने 'कुटुंबाची लाज' वाचवण्यासाठी ही गोष्ट त्यांच्यापासून लपवली.
आरोपानुसार, टॉमच्या भावाचा मुलगा साजू याच्यासोबत जॉलीचे अनैतिक संबंध होते. जॉलीला ते कायदेशीर करायचे होते, पण त्यात दोन अडथळे होते. साजूचे लग्न सिलीशी झालं होतं आणि त्यांना अल्फिन नावाची मुलगी होती.
2014 मध्ये, तिने दीड वर्षाच्या अल्फिनला विष दिलं. पण अन्ननलिकेत अन्न अडकल्यामुळे तिचा गुदमरून मृत्यू झाला असा लोकांचा समज झाला.

फोटो स्रोत, Getty Images
साजूची बायको सिलीने अल्फिनच्या मृत्यूला आपलं नशीब मानून आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न केला. 2016 मध्ये सिलीचा देखील मृत्यू झाला. तिच्यावरही विषप्रयोग झाला होता.
मॅथ्यू, अल्फिन आणि सिलीच्या मृत्यूमुळे रोजोचा संशय आणखीनच बळावला. आता त्याच्याच नव्हे तर इतरांच्याही मनातही संशय वाढू लागला.
सिलीच्या निधनाला एक वर्षही झालं नव्हतं, आणि इकडे जॉली आणि साजूने लग्न उरकलं. वहिनीला मोठी बहीण आणि आदर्श पत्नी मानणाऱ्या रेन्जीलाही याचा धक्का बसला.
मृतदेह कबरीच्या बाहेर काढण्यात आले आणि गूढ उलगडलं
असं म्हणतात की, 'गुन्हा हा एखाद्या बीजासारखा असतो. तो जमिनीत गाडायचा प्रयत्न केला तरी तो जमिनीतून रोपाच्या रूपात वर येतोच.' असंच काहीसं केरळ हत्याकांडात घडलं.
रोजो सांगतात की, 'कुटुंबात सहा लोक मरण पावले आणि प्रत्येक वेळी फक्त एकच व्यक्ती तिथे उपस्थित होती, जॉली. त्यांनी पोलिसांना कळवलं आणि प्राथमिक तपासात रोजोचे आरोप खरे असल्याचं निष्पन्न झालं.'
ऑगस्ट 2019 मध्ये रॉय यांचा मृतदेह कबरी बाहेर काढण्यात आला आणि फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात आला. तपास पुढे जात असताना आणखी पाच मृतदेह बाहेर काढण्यात आले आणि त्यांची फॉरेन्सिक तपासणी करण्यात आली.
ऑक्टोबर-2019 मध्ये, जोलिम्मा उर्फ जॉलीवर तिचा पती आणि इतर पाच खूनांच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. तिला मदत करणारा एक आरोपी दागिन्यांच्या व्यवसायात गुंतला असून सायनाइडचा पुरवठा त्यानेच केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.

फोटो स्रोत, INDIATODAY@X
एका महिलेने अनेक हत्या केल्याने केवळ केरळच नाही तर संपूर्ण देश हादरला होता. केवळ स्थानिकच नाही तर राष्ट्रीय माध्यमांनी देखील या बातमीची दखल घेतली होती.
ती प्राध्यापक म्हणून काम करत नव्हती. मग ती रोज कुठे जायची, कोणाला भेटायची, वेळ कसा घालवायची हे गूढ पोलिसांना ही उकललं नव्हतं. या मुद्द्यावरून केरळमध्ये अफवा आणि अटकळींना उधाण आलं.
स्थानिक अधिकारी आणि अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी जॉलीला मदत केली असल्याचं पोलीस तपासात उघड झालं. याशिवाय एक क्रिमिनल वकील जॉलीच्या घरी जात होता. एका सरकारी कंपनीचा कर्मचारी आणि जॉलीमध्ये रात्री उशिरापर्यंत चर्चा व्हायची.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'आरोपीने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. मुलांनी आणि जवळच्या नातेवाईकांनी जॉली विरोधात साक्ष दिली आहे. तिला न्यायालयात हजर केल्यावर तिला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोकांची गर्दी झाली होती. तर एका बाजूला घोषणाबाजी देखील सुरू होती.'
आरोपपत्र दाखल झाल्यानंतर जॉलीने जामीन मिळविण्यासाठी प्रयत्न केले. केरळमधील नामवंत व दिग्गज वकिलांनी तिचं वकीलपत्र घेण्याचा प्रयत्न केला, पण यात त्यांना यश आलं नाही. जॉलीने तुरुंगात आत्महत्येचा प्रयत्नही केला होता.
महिला सीरियल किलर्सबद्दल संशोधन काय सांगतं?
सीरियल किलर्सचा विचार केला तर महिलांपेक्षा पुरुषांची प्रकरणं जास्त समोर आली आहेत.
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार, 2022 मध्ये देशभरात सीरियल किलिंगची 24 प्रकरणे नोंदवली गेली. (खंड-1, पृष्ठ 166-176). ज्यामध्ये तामिळनाडूमध्ये सर्वाधिक सहा, आंध्रप्रदेशात चार, मध्यप्रदेश आणि गुजरातमध्ये प्रत्येकी तीन प्रकरणे नोंदवली गेली.
2021 मध्ये हा आकडा 13 होता. (खंड-1, पृष्ठ 166-176) मध्यप्रदेशात चार, छत्तीसगडमध्ये तीन, तामिळनाडूमध्ये दोन, गुजरात-मिझोराम-उत्तरप्रदेशमध्ये प्रत्येकी एक प्रकरण नोंदवलं गेलं.
भारतात सीरियल किलर किंवा सायकोटिक हत्येच्या घटनांची संख्या कमी असल्यामुळे स्त्रिया सीरियल किलर का बनतात याचा वैज्ञानिक अभ्यास पुरेशा प्रमाणात झालेला नाही. माध्यमातील वृत्तांनुसार, 2023 मध्ये मल्लिका नावाच्या महिलेला सीरियल किलिंगसाठी दोषी ठरवण्यात आले. ही महिला भारतातील पहिली सीरियल किलर महिला म्हणून ओळखली जाते.
योगायोगाने, जॉलीने खून करण्यासाठी विषच वापरल्याने तिला देखील 'सायनाइड मल्लिका' असं टोपणनाव मिळालं.

फोटो स्रोत, Getty Images
जॉलीचं प्रकरण समोर आलं त्याच वर्षी अमेरिकेतील पेन विद्यापीठाने 55 पुरुष आणि 55 महिला सीरियल किलरवर एक अभ्यास केला होता.
याच्या आधारे, 'हंटर अँड गॅदरर मॉडेल' तयार करण्यात आलं. त्यानुसार पुरुष सिरीयल किलर आपल्या सावजाचा पाठलाग करण्याची शक्यता जास्त असते, तर महिला आपल्या ओळखीतील व्यक्तीला मारण्याची शक्यता जास्त असते. या हत्येमागे मुख्यतः आर्थिक फायदे मिळवण्याचा हेतू असतो.
पीटर व्रोनस्की त्यांच्या 'फिमेल सीरियल किलर्स: हाऊ अँड व्हाई वूमन बिकेम मॉन्स्टर्स' या पुस्तकात (पृष्ठे चार-पाच) लिहितात की, 'महिला सिरीयल किलर्स बऱ्याचदा विषप्रयोग करतात आणि एखाद्या ओळखीच्या व्यक्तीचीच हत्या करतात.'
त्या पीडित व्यक्तीला त्यांच्याच घरात किंवा परिसरात मारतात. कधीकधी त्या त्याच्याबरोबर राहतात. पैशासाठी त्या एकापेक्षा जास्त पती किंवा प्रियकर करून त्यांची हत्या करतात. त्यांच्यासाठी 'ब्लॅक विडो' हा शब्द वापरला जातो.
48 वर्षीय जॉली ‘ब्लॅक विडो’ आहे की नाही याचा निर्णय केरळ न्यायालय घेईल आणि जर ती या प्रकरणात दोषी असेल तर तिला तिचं उर्वरित आयुष्य तुरुंगात घालवावं लागेल.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








