जेव्हा 600 भारतीय सैनिकांनी ब्रिटिशांविरोधात जाऊन इंडोनेशियन स्वातंत्र्य चळवळीला पाठिंबा दिला होता

पोस्टर

फोटो स्रोत, IWM SE 5979

    • Author, त्रिशा दंतियानी
    • Role, बीबीसी न्यूज, इंडोनेशिया

1945 मध्ये ब्रिटिश सैन्यासोबत लढणाऱ्या सुमारे 600 भारतीय सैनिकांनी बंड करत इंडोनेशियन स्वातंत्र्य चळवळीला पाठिंबा दिला होता.

बीबीसीने तत्कालीन ब्रिटीश वसाहतीचा भाग असलेल्या पंजाबच्या वजिराबादमधील एका सैनिकाच्या कुटुंबाचा शोध घेतला आणि त्यांचे अनुभव जाणून घेतले.

संयोग श्रीवास्तव हे मूळचे भारतीय असून ते जवळपास 25 वर्षांपासून इंडोनेशियातील सुराबाया इथे वास्तव्यास आहेत. ते सांगतात की, भारत आणि इंडोनेशियासाठी सुरबायाच्या लढाईला भावनिक महत्त्व आहे.

सुरबाया येथील आपल्या घरातून बीबीसी इंडोनेशियाला दिलेल्या व्हर्च्युअल मुलाखतीत श्रीवास्तव सांगतात, "या दोन्ही देशांवर परकीय आक्रमकांनी दीर्घकाळ अत्याचार केले. जेव्हा ब्रिटिश भारतीय सैन्याचे सैनिक इथे आले, तेव्हा त्यांना दिसलं की त्यांना त्यांच्याच लोकांशी लढायला भाग पाडलं जात आहे.'

या युद्धात शहीद झालेल्या सैनिकांच्या स्मृतीप्रित्यर्थ बांधलेल्या 'टोगो रेसलर्स' या राष्ट्रीय स्मारकाला त्यांनी जेव्हा भेट दिली तेव्हा त्यांनी इंडोनेशियन स्वातंत्र्यसैनिकांसोबत प्राणांची आहुती देणाऱ्या भारतीय सैनिकांची नावं शोधण्याचा प्रयत्न केला.

श्रीवास्तव सांगतात, "तुम्ही या स्मारकाला भेट दिली तर तुम्हाला आणखी बऱ्याच गोष्टी कळतील. येथील भारतीय वंशाचे लोक आणि ज्यांनी इंडोनेशियन शाळांमध्ये शिक्षण घेतले आहे, त्यांना या इतिहासाची माहिती आहे."

पण श्रीवास्तव यांच्या मते, भारतीय वंशाच्या बहुतेक लोकांना भारत आणि इंडोनेशियाच्या या वारशाची पूर्ण माहिती नाहीये. त्यांना आशा आहे की बरेच लोक या कथेच्या मुळापर्यंत जातील.

संयोग म्हणतात, "मला वाटतं की यामुळे लोक आणखीन जवळ येतील आणि त्यांच्यात माणुसकीची भावना वाढेल. यामुळे भारतीय लोकांमध्ये दोन्ही देशांप्रती जबाबदारीची भावना निर्माण होईल आणि दोन संस्कृतींमध्ये परस्पर संबंध, परस्पर आदर आणि शांतता आणि सहकार्याची भावना निर्माण होईल."

सुराबायाची लढाई आणि 600 भारतीय सैनिकांची भूमिका

सुराबायाची लढाई महत्त्वपूर्ण होती कारण ती आशियातील ब्रिटिश साम्राज्याची शेवटची महत्वाची लढाई होती.

सप्टेंबर 1945 मध्ये मित्र राष्ट्रांचे सैन्य सुराबायामध्ये तैनात होते. ब्रिटीश तसेच ऑस्ट्रेलियन सैन्य देखील याठिकाणी उपस्थित होते.

पण इंडोनेशियन लोक ब्रिटनच्या बरोबरीने डच सैन्याला पाहून संतापले होते. त्यांचं म्हणणं होतं की, हॉलंड केवळ ब्रिटनला त्यांचा देश परत घेण्यास मदत करत आहे.

इंडोनेशियाच्या आधुनिक इतिहासाचे तज्ञ आणि ऑक्सफर्ड इतिहासकार पीटर कॅरी यांच्या मते, "एका अर्थाने ब्रिटिशांनी 1946 मध्ये डचांना इंडोनेशियात परत येण्याचे दरवाजे उघडले. पण सप्टेंबर 1945 ते मार्च 1946 पर्यंत ब्रिटन हाच सर्वेसर्वा होता."

युद्धात गोळीबार करताना भारतीय सैनिक

फोटो स्रोत, IWM SE 6735

या काळात भारतावर इंग्रजांचे राज्य होते आणि भारताला अजून स्वातंत्र्य मिळाले नव्हते.

त्यामुळे सुरबायामध्ये शांतता राखण्यासाठी इंग्रजांनी पंजाब, मद्रास, महाराष्ट्र आणि इतर प्रांतांतून हजारो सैनिक भरती केले होते.

संशोधक वकार मुस्तफा यांच्या मते, ए जी खान यांनी 12 मे 2012 रोजी लिहिलेल्या 'इंडियन मुस्लिम सोल्जर्स, हेरोईक रोल इन इंडोनेशियाज इंडिपेंडंन्स' या लेखात असं म्हटलं होतं की, 'मुस्लीम सैनिकांच्या तीन ब्रिगेड डचच्या ताब्यात असलेल्या जावा बेटावर उतरल्या. ब्रिगेड 1 जकार्तामध्ये, ब्रिगेड 38 सेमरंगमध्ये आणि ब्रिगेड 49 सुराबायामध्ये उतरली.'

ब्रिगेड 1 च्या डिव्हिजन 32 ची कमांड अब्दुल मतीन आणि गुलाम अली यांच्याकडे होती. त्यांचं पहिलं काम होतं नि:शस्त्रीकरण करणं, सर्व जपानी लोकांना कैदी बनवणं आणि स्थानिकांकडून शस्त्र जप्त करणं.

'त्यांच्या ऑपरेशन्स दरम्यान त्यांना समजलं की त्यांना जपानी लोकांशी लढण्यासाठी नव्हे तर डच गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी संघर्ष करणाऱ्या इंडोनेशियन लोकांचं दमन करण्यासाठी पाठवण्यात आलं होतं.'

सैनिक

फोटो स्रोत, IWM SE 5866

या कारणामुळे 600 मुस्लिम सैनिक ब्रिटीश सैन्यातून बाहेर पडले आणि त्यांची शस्त्रे आणि दारूगोळा घेऊन स्वातंत्र्य सैनिकांच्या इंडोनेशियन प्रतिकार गटात सामील झाले.

प्राध्यापक पीटर केरी यांच्या म्हणण्यानुसार, 'मेजर जनरल रॉबर्ट मॅनसेर्ग यांच्या नेतृत्वाखाली 5 वी भारतीय तुकडी सुरबायामध्ये उतरली. भारतीय तुकडीकडे हवाई दल आणि नौदलाचे सहा हजार सैनिक होते.'

पण ब्रिटीश सैन्याला कल्पना नव्हती की सुमारे 600 भारतीय सैनिक ब्रिटिशांविरोधात बंड करतील आणि डच-ब्रिटिश सैन्याविरूद्ध इंडोनेशियन स्वातंत्र्यसैनिकांना सामील होतील.

मेजर मॅनसेर्ग यांनी पाच तुकड्यांना इंडोनेशियन स्वातंत्र्यसैनिकांविरुद्ध आघाडी उघडण्याचे आदेश दिले.

प्राध्यापक पीटर केरी सांगतात, "यावर भारतीय सैनिक म्हणाले, आम्हाला स्वतःला ब्रिटनपासून स्वातंत्र्य हवं आहे, मग आम्ही ब्रिटनच्या वतीने का लढायचं?"

संस्कृती आणि राष्ट्रवादाची भावना

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

राष्ट्रवादाची भावना सोडली तर भारतीय सैनिक आणि इंडोनेशियन स्वातंत्र्यसैनिक यांच्यात अचानक एकतेची भावना निर्माण होण्यामागे आणखीन एक कारण होतं ते म्हणजे त्यांचा विश्वास.

युद्धादरम्यान, इंडोनेशियन सैनिक आणि नागरिकांनी 'अल्लाहू अकबर'च्या घोषणा दिल्यावर भारतीय सैनिकांना आपण आपल्याच लोकांच्या विरोधात उभे आहोत असं वाटू लागलं.

झहीर खान यांनी त्यांच्या 'इन द रुल ऑफ पाकिस्तान ड्युरींग इंडोनेशियन स्ट्रगल' या पुस्तकात म्हटलंय की, ब्रिगेड वनच्या 32 व्या तुकडीचे कमांडर गुलाम अली आणि इतर मुस्लिम सैनिकांनी इंडोनेशियन नागरिकांना तांदूळ, साखर, मीठ आणि इतर वस्तूंचे वाटप केले.

इंडोनेशियन लोकांकडे पुरेसं अन्न नसल्यामुळे आणि गंभीर वैद्यकीय समस्यांना तोंड द्यावं लागत असल्याने, या मदतीचं खूप कौतुक करण्यात आलं.

खरं तर, गुलाम रसूल आणि इतर सैनिकांनी एक गुप्त बैठक घेतली होती. त्यांनी रिपब्लिक ऑफ इंडोनेशियन आर्मीच्या सुलिवांगी विभागाच्या कमांडरशी संपर्क साधला होता.

त्याचा कोड होता 'अस्सलाम अलैकुम'. प्राध्यापक केरी सांगतात की या बंधुत्वाचा धर्मापेक्षा राष्ट्रीयत्वाच्या भावनेशी जास्त संबंध होता.

ते सांगतात, 'यामागे केवळ धार्मिक भावना नव्हती. त्यापेक्षा राष्ट्रवादाचा घटक वसाहतविरोधी भावना अधिक प्रबळ करणारा होता.'

या युद्धात जवळपास 27 हजार लोक मारले गेले आणि 150,000 लोक विस्थापित झाले. यामध्ये बहुतेक महिला आणि लहान मुलं होती.

युद्धाच्या शेवटी 600 पैकी फक्त 75 भारतीय सैनिक जिवंत राहिले.

प्रोफेसर केरी यांच्या म्हणण्यानुसार, 'ही अत्यंत भीषण लढाई होती ज्यात 800 ब्रिटिश सैनिक मारले गेले.'

आम्ही डचांसाठी आमचं बलिदान का द्यावं?

ब्रिटीश सैन्यातील कॅप्टन पी आर एस मणी यांनी त्यांच्या 'द स्टोरी ऑफ इंडोनेशियन रिव्होल्यूशन 1945-1950' या पुस्तकात एक आठवण लिहिली आहे. एका राजपूत सैनिकाने त्यांना मृत्यूपूर्वी आपल्या मनातल्या गोष्टी सांगितल्या होत्या.

मणी नंतर फ्री प्रेस जर्नल, मुंबईसाठी पूर्णवेळ वार्ताहर बनले.

पी आर एस मणी लिहितात, 'तो पडून होता. इंडोनेशियन सैनिकाने त्याच्या छातीत गोळी झाडली होती. तो मरणारच होता इतक्यात त्याने मला विचारलं की, सर! आम्ही डचांसाठी आमचं बलिदान का द्यावं? (पृ. 107, 1989)

मणी लिहितात की, बंडात स्वातंत्र्यसैनिकांच्या खांद्याला खांदा लावून लढलेल्या भारतीय सैनिकांना इंडोनेशियन राष्ट्रवाद्यांनी खूप आदर दिला. (पृष्ठ 92-108)

पी आर एस मणी यांनी लिहिलंय की, इंडोनेशियातून भारतीय सैन्याला बाहेर काढण्यासाठी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी ब्रिटिशांवर सार्वजनिक दबाव वाढवायला सुरुवात केली होती. सैनिकांना मायदेशी पाठवण्याचे आवाहन ब्रिटिश सैन्याला करण्यात आले होते.

20 नोव्हेंबर 1945 रोजी ब्रिटीश सैन्याने शरणागती पत्करली तेव्हा त्यांचं आवाहन मान्य करण्यात आलं. हळूहळू भारतीय सैनिकांना भारतात परत पाठवण्यात आले. यावेळी मात्र त्यांना आपला देश स्वतंत्र करण्यासाठी आणखीन एक युद्ध लढायचं होतं.

संशोधक वकार मुस्तफा यांच्या मते, ए जी खान यांनी 12 मे 2012 रोजी लिहिलेल्या 'इंडियन मुस्लिम सोल्जर्स, हेरोईक रोल इन इंडोनेशियाज इंडिपेंडंन्स' या लेखात असं म्हटलं होतं की, इंडोनेशियाला 1945 मध्ये स्वातंत्र्य मिळालं तेव्हा 600 भारतीय सैनिकांपैकी केवळ 75 सैनिकच उरले होते.

'मोहिम संपल्यावर जिवंत राहिलेल्या अनेक सैनिकांनी इंडोनेशियामध्येच राहणं पसंत केलं ते टिंटारा केमनन रक्‍यत, बदन केमनन रक्‍यत नावाच्या युनिटमध्‍ये सामील झाले. मेजर अहमद हुसेन यांना लेफ्टनंट कर्नल पदासह रेजिमेंट 3 चे कमांडर बनवण्यात आले.'

'त्यांपैकी काहींनी स्थानिकांशी लग्न केलं. पुढे त्यांनी त्यांच्या मायदेशी (भारत/पाकिस्तान) परत जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यांना इंडोनेशियन दूतावासांनी सुरक्षा अधिकारी म्हणून सामावून घेतलं.'

स्वातंत्र्ययुद्धातील या भारतीय सैनिकांच्या अतुलनीय योगदानाची दखल घेत इंडोनेशिया सरकारने त्यांना देशाच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केलं. अनेकांना मरणोत्तर पुरस्कार दिला गेला. गुलाम अली यांना राष्ट्रपतींच्या हस्ते यानोतम पुरस्कार (1963) देण्यात आला.

नाईक मीर खान, गुलमार बानी, मुहम्मद याकूब, उमर दिन, गुलाम रसूल, गुलाम अली, मेजर अब्दुल सत्तार, मुहम्मद सिद्दिकी, मुहम्मद खान, फजल, सांजा फजल दिन आणि झियाउल हक हे सुराबायाच्या युद्धात सहभागी झालेले काही प्रसिद्ध सैनिक आहेत.

झिया-उल-हक यांनी ब्रिटीश सैन्यात असताना दुसऱ्या महायुद्धात सहभाग घेतला होता. नंतर ते बर्मा, मलाया आणि इंडोनेशियामध्ये तैनात होते. भारताच्या फाळणीपूर्वी ते रॉयल इंडियन मिलिटरी अकादमीमधून पदवीधर झालेल्या लष्करी अधिकाऱ्यांच्या शेवटच्या तुकडीतील एक अधिकारी होते.

जनरल झिया-उल-हक नंतर पाकिस्तानचे सहावे राष्ट्रपती झाले.

संशोधक वकार मुस्तफा यांच्या मते, ए जी खान यांनी 12 मे 2012 रोजी लिहिलेल्या 'इंडियन मुस्लिम सोल्जर्स, हेरोईक रोल इन इंडोनेशियाज इंडिपेंडंन्स' या लेखात असं म्हटलं होतं की, ' इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष सुकर्णो हे नेदरलँडच्या सैनिकांनी वेढलेल्या कारमध्ये अडकले होते. सुकर्णो थोडक्यात बचावले असले तरी कारचं मोठं नुकसान झालं होतं.'

सुकर्णो

फोटो स्रोत, Getty Images

झिया-उल-हक यांचा मुलगा मुहम्मद इजाज-उल-हक यांनी त्यांच्या 'शहीद-ए-इस्लाम जनरल मुहम्मद झिया-उल-हक' या आत्मचरित्रात याविषयी थोडक्यात लिहिलं आहे की, दुसऱ्या महायुद्धात झिया यांनी बर्मा, मलाया (मलेशिया) आणि जावा (इंडोनेशिया) अशा बऱ्याच आघाड्यांवर काम केलं.

याच पुस्तकात झिया यांचे निकटवर्तीय जनरल खालिद महमूद आरिफ यांनी 'झिया-उल-हक एक सैनिक म्हणून' असा लेख लिहिला आहे. त्यांच्या मते, झिया 12 मे 1945 रोजी कमिशनर झाले. सेकंड लेफ्टनंट झिया हे बर्मा आघाडीवर 13 लान्सर्समध्ये तैनात होते.

या युद्धाचा परिणाम भारत-इंडोनेशिया संबंधांवर झाला

सुराबाया येथील इंडियन असोसिएशनचे (आयएएस) अध्यक्ष मनोजित दास यांच्या मते, भारतीयांनी इतिहासातून शिकलं पाहिजे आणि देशांमधील संबंध मजबूत केले पाहिजेत.

बीबीसीशी बोलताना ते पुढे सांगतात की, "इतर गोष्टींबरोबरच भारत आणि इंडोनेशियामध्ये काही प्रमाणात सांस्कृतिक साम्य आहे. संस्कृती जवळपास सारखीच आहे आणि हे दोन देश जगातील सर्वात दाट लोकसंख्या असलेले देश आहेत."

सुराबाया येथे राहणाऱ्या 55 भारतीय कुटुंबांतील 180 लोक या संघटनेचे सदस्य आहेत.

त्यापैकी बहुतेक लोक भारतातून स्थलांतरित झाले आहेत. पण असेही काही लोक आहे जे इंडोनेशियामध्ये मागील तीन किंवा चार पिढ्यांपासून राहतात.

मनोजित दास असा दावा करतात की 5 व्या तुकडीतील आणि इतर ब्रिटीश भारतीय तुकड्यांमधील सैनिक सुरबाया सोडून आग्नेय आशियाई देशांमध्ये गेले किंवा त्यांच्या मायदेशी परतले.

इंडोनेशियामधील भारतीय सैनिकांचं बलिदान आणि त्यांच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात भारतीय सैनिकांनी दिलेला पाठिंबा याविषयी लोकांना माहिती व्हावी, अशी त्यांची इच्छा आहे.

ते म्हणतात, "ही कथा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. म्हणजे त्या काळात काय घडलं हे लोकांना समजेल आणि ते जाणून घेण्याची आवड निर्माण होईल."

1947 मध्ये, जेव्हा भारताला अन्नटंचाईचा सामना करावा लागला तेव्हा पश्चिम बंगालला दुष्काळातून बाहेर काढण्यासाठी इंडोनेशियाने 10,000 टन तांदूळ भारतात निर्यात केला.

प्राध्यापक पीटर केरी म्हणतात, "भारत हा इंडोनेशियासाठी मित्राप्रमाणे होता आणि स्वातंत्र्यानंतर त्याला मान्यता देणाऱ्या पहिल्या देशांपैकी एक होता."

जेव्हा नेहरूंनी पत्रात इंडोनेशियाचं कौतुक केलं

इंडोनेशियाने बांडुंग येथे आयोजित केलेल्या आशिया-आफ्रिका परिषदेदरम्यान नेहरू आणि सुकर्णो यांच्यातील सहकार्य हे आणखीन एक उल्लेखनीय उदाहरण आहे.

प्राध्यापक केरी यांच्या म्हणण्यानुसार, नेहरूंनी एडविना माउंटबॅटन यांना लिहिलेल्या पत्रात असं म्हटलं होतं की, 'इंडोनेशियाच्या आदरातिथ्याने मी खूप प्रभावित झालो. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की, आम्ही ते इतक्या चांगल्या प्रकारे करू शकलो नसतो."

2012 ते 2014 या काळात संयोग श्रीवास्तव सुरबाया येथील भारतीय संघटनेचे अध्यक्ष होते. इंडोनेशिया स्वतंत्र झाला नव्हता तेव्हापासून ही संघटना अस्तित्वात असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

पी आर एस मणी यांच्या म्हणण्यानुसार, जनरल एडब्ल्यूएस मलाबी यांच्यावर गोळी झाडली तेव्हा सुरबाया येथील भारतीय संघटनेचे तत्कालीन अध्यक्ष कंदन त्यांच्या अगदी जवळ होते आणि त्यांना किरकोळ दुखापत झाली होती.

भारतीय समुदायाला स्थानिकांप्रती आदर आणि जबाबदारीची भावना आहे.

संयोग श्रीवास्तव आणि त्यांच्या पत्नी

फोटो स्रोत, SANYOG SRIVASTAV

ते म्हणतात, आम्ही सर्व जे भारतापासून दूर इतर देशांमध्ये राहतो, मला वाटतं की त्या देशासाठी आम्ही दिलेलं योगदान खूप महत्वाचं आहे. आणि शेवटी हे आपल्या देशासाठी योगदान देण्यास मदत करते.

'विशेषतः इंडोनेशियामध्ये राहताना आपण भारतापासून दूर आहोत असं कधीच वाटत नाही. सांस्कृतिकदृष्ट्या आपण खूप जवळ आहोत. आपले विचार, आपली विचारसरणी, आपल्या मोठ्यांचा आदर आणि पुढच्या पिढीला पुढे नेण्याची इच्छा या सर्व गोष्टी सारख्याच आहेत.'

संयोग श्रीवास्तव यांना वाटतं की, इंडोनेशियातील भारतीय सैनिकांच्या कथेतून भारतीय लोक शिकतील आणि ते जिथे राहतात त्या समाजासाठी योगदान देण्याचा दृढनिश्चय करतील.

ते पुढे म्हणतात की, 'तुम्ही राहता त्या देशाच्या भूमीचे आणि सीमांचे संरक्षण आणि समर्थन करणे ही तुमची नैतिक जबाबदारी आहे. त्या देशात राहणाऱ्या लोकांचा विकास व्हावा म्हणून मदत करून तुम्ही तुमच्या देशालाही मदत करता.'

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)