मुसोलिनीने रवींद्रनाथ टागोरांना इटलीला बोलावून त्यांच्या नावाचा गैरवापर केला?

मुसोलिनी आणि रवींद्रनाथ टागोर

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, रेहान फजल
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

तसं तर रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांच्या हयातीत अनेक देशांना भेटी दिल्या. पण इटालियन हुकूमशहा बेनिटो मुसोलिनी याने 1926 मध्ये टागोरांना इटलीला येण्याचं निमंत्रण दिलं आणि टागोर इटलीला गेले देखील. पण त्यावरून चांगलाच वाद निर्माण झाला होता.

इटलीला गेल्यामुळे टागोरांवर परदेशात आणि भारतात टीका झाली. त्यासाठी त्यांना बरंच स्पष्टीकरण द्यावं लागलं.

बेनिटो मुसोलिनीला फॅसिस्ट विचारसरणीचा जनक म्हटलं जातं. पण त्याचा अंत भयावह होता. मुसोलिनी आणि त्याची मैत्रिण क्लारेटा पेटाची या दोघांनाही 29 एप्रिल 1945 रोजी लेक कोमोच्या किनाऱ्यावर गोळ्या घालण्यात आल्या. त्यानंतर त्यांचे मृतदेह मिलान मध्ये नेऊन पिआसाले लोरेटो येथे उलटे टांगण्यात आले.

वीस आणि तीसच्या दशकात मुसोलिनीची चलती होती. विन्स्टन चर्चिल, जॉर्ज बर्नार्ड शॉ, रवींद्रनाथ टागोर आणि अगदी महात्मा गांधीही त्याची स्तुती करायचे.

1941-43 च्या दरम्यान सुभाषचंद्र बोस यांनीही मुसोलिनीला आपला मित्र मानलं होतं. जानेवारी 1941 मध्ये ते कलकत्त्याहून निसटून काबूलला पोहोचले तेव्हा काबुल ते बर्लिन प्रवासादरम्यान त्यांनी ऑर्लॅंडो माजोटा हे इटालियन नाव धारण केलं.

टागोरांना निमंत्रित करण्यासाठी मुसोलिनीने आपले दोन प्रतिनिधी शांतीनिकेतनला पाठवले

1925 मध्ये मुसोलिनीने त्याचे दोन प्रतिनिधी, कार्लो फॉर्मिची आणि जुसेपे टुची यांना शांती निकेतनमध्ये पाठवलं होतं. त्यांच्यासोबतच त्याने शांती निकेतनच्या ग्रंथालयासाठी अनेक मौल्यवान पुस्तकं भेट स्वरूपात पाठवली होती.

कल्याण कुंडू त्यांच्या 'मीटिंग विथ मुसोलिनी : टागोर्स टूर्स इन इटली' या पुस्तकात लिहितात, "टागोरांच्या इटली भेटीमुळे त्याच्या राजवटीला कायदेशीर वैधता मिळेल, असा मुसोलिनीचा विश्वास होता. त्यामुळे त्याने टागोरांना राजकीय पाहुणे म्हणून इटलीला आमंत्रित केलं होतं. विशेष म्हणजे, कलकत्त्यातील इटालियन वाणिज्य दूतावासालाही मुसोलिनीच्या या निर्णयाची खबरबात नव्हती."

कृष्णा कृपलानी टागोरांच्या चरित्रात लिहितात, "टागोर मुसोलिनीने दिलेल्या आमंत्रणामुळे प्रभावित झाले होते. त्याचं रूप, व्यक्तिमत्त्व पाहण्याच्या इच्छेमुळे टागोरांनी मुसोलिनीचं आमंत्रण स्वीकारलं. इटली सोडण्यापूर्वी ते म्हणाले, मुसोलिनीचे आमंत्रण स्वीकारण्याचा अर्थ असा होत नाही की मला त्याचे सर्व विचार पटतात. ज्या गोष्टी मला योग्य वाटत नाहीत त्याबद्दल मी शांत बसणार नाही."

यापूर्वी म्हणजे 1925 मध्ये ते इटलीला जाऊन आले होते. पण एक वर्षानंतर 1926 मध्ये त्यांनी पुन्हा इटलीला जाण्याचा निर्णय घेतला.

इटलीला जाण्यापूर्वी टागोर म्हणाले, "मला आनंद आहे की, ज्या व्यक्तीला महान म्हटलं जातं त्या माणसाचं काम मला माझ्या डोळ्यांनी पाहायला मिळालं आणि इतिहास या कामाची नोंद घेईल."

टागोरांकडून निर्णय घेण्यात चूक झाली, असं कृपलानी यांचं मत आहे. 15 मे 1926 रोजी रवींद्रनाथ टागोर 'अकुलिया' या इटालियन जहाजाने मुंबईहून इटालियन शहर नेपल्सला जाण्यासाठी निघाले. तेथून त्यांना एका विशेष ट्रेनने रोमला आणण्यात आलं.

बेनिटो मुसोलिनी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बेनिटो मुसोलिनी

इल रेस्तो डेल कार्लिनो या रोममधून प्रकाशित होणाऱ्या वृत्तपत्राने 1 जून 1926 च्या अंकात लिहिलंय की, "भारतीय कवी रोमच्या रेल्वे स्टेशनवर त्यांच्या पारंपारिक पोशाखात उतरले. त्यांच्या अंगरख्यावर सोनेरी नक्षीकाम केलं होतं.

त्यांनी डोक्यावर पागोटं घातलं होतं ज्यामुळे त्यांच्या शिडशिडीत बांध्याला राजस रूप लाभलं होतं. प्राध्यापक फॉर्मिची यांनी आपल्या संभाषणात सांगितलं की टागोरांच्या इटली भेटीचा मुख्य उद्देश मुसोलिनीचे आभार मानणं हा होता."

टागोर मुसोलिनीची भेट

संध्याकाळी ते कार्लो फॉर्मिची सोबत मुसोलिनीला त्याच्या पलाझो चिझी या राजप्रसादात भेटायला गेले.

कल्याण कुंडू त्यांच्या ''मीटिंग विथ मुसोलिनी : टागोर्स टूर्स इन इटली'' या पुस्तकात लिहितात, "टागोरांनी मुसोलिनीच्या खोलीत प्रवेश करताच मुसोलिनी आपल्या खुर्चीवरून उठला आणि टागोरांच्या स्वागतासाठी पुढे सरसावला. दोघांमधील संभाषण इंग्रजीत झालं."

"मुसोलिनी इटालियनमध्ये बोलत होता आणि फॉर्मिची त्याचा अनुवाद करत होते. मुसोलिनी म्हणाला, 'मी एक इटालियन आहे आणि मी तुमचा प्रशंसक आहे. तुमची इटालियनमध्ये अनुवादित झालेली सर्व पुस्तकं मी वाचली आहेत.'

हे ऐकून टागोर खूप प्रभावित झाले.

"पण मुसोलिनीचं चरित्र लिहिणारे डेनिस मॅक स्मिथ असं म्हणतात की, तो ढोंग करायचा. तितकं त्याचं साहित्यिक आणि बौद्धिक ज्ञान नव्हतं. मुसोलिनी म्हणायचा की, त्याने वॉल्ट विटमन, लाँगफिलो आणि मार्क ट्वेन वाचलंय. पण लोकांवर छाप पाडण्यासाठी तो असं बोलायचा. प्रत्यक्षात त्याने असं कोणतंच पुस्तक वाचलं नव्हतं."

मुसोलिनीच्या व्यक्तिमत्त्वाने टागोर प्रभावित झाले

टागोर

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

टागोरांनी मुसोलिनीच्या दयाळूपणाबद्दल आणि टुचीला शांतीनिकेतनला पाठवल्याबद्दल आभार मानले. मुसोलिनीने त्यांना आणखी दोन आठवडे रोममध्ये राहण्याचा आग्रह धरला आणि पुढच्या आठवड्यातील त्यांचा फ्लॉरेन्सचा प्रवास पुढे ढकलायला सांगितला.

टागोरांनी आपल्या भाषणात कलेवर भर द्यावा असा आग्रह मुसोलिनीने धरला होता. पण डेनिस मॅक स्मिथ लिहितात, "मुसोलिनीला कलेचं महत्व तर पटलं होतं पण दुसऱ्या बाजूला तो असंही म्हणायचा की, कलात्मक मूल्यांच्या मागे धावल्यामुळे इटली राजकीय शिखराला स्पर्श करू शकली नाही."

टागोर आणि मुसोलिनी यांची भेट सुमारे तासभर चालली. तेव्हा मुसोलिनी टागोरांना म्हणाला, "तुमच्या मनात जी काही इच्छा असेल, ती सांगण्यास अजिबात संकोच करू नका. मी तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करीन."

टागोरांना मुसोलिनीबद्दल काय वाटतं हे फॉर्मिचीला जाणून घ्यायचं होतं. मॅक स्मिथ लिहितात, "टागोर म्हणाले, मुसोलिनी हे एक उत्तुंग व्यक्तिमत्व आहे यात शंका नाही. या माणसामध्ये इतका साधेपणा आहे की तो क्रूर शासक आहे यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. जे लोक मुसोलिनीला क्वचितच भेटायचे त्यांच्यावर त्याचं चुंबकीय व्यक्तिमत्व गारूड घालायचं. अनेक फॅसिस्ट नेत्यांनी कबूल केलं होतं की त्यांच्या सुरुवातीच्या काळात ते मुसोलिनीच्या जाळ्यात अडकले. टागोरही त्याला अपवाद नव्हते."

रोमहून परतताना मुसोलिनीसोबत आणखी एक भेट

टागोरांनी रोममध्ये अनेक ठिकाणी भाषणं दिली.

इटालियन सामाजिक कार्यकर्त्या मार्गा सार्टोरिया सव्हिला यांनी इटालियन वृत्तपत्र 'इल मेसेजेरो' मध्ये प्रकाशित केलेल्या लेखात लिहिलं होतं की, "ते 65 वर्षांचे असले तरी त्यांच्या चेहऱ्यावर एकही सुरकुती नव्हती. त्यांच्या शुभ्र पांढर्‍या दाढीच्या विरुद्ध त्यांचा चेहरा काळा आहे. सगळ्यांचं लक्ष त्यांच्या कपड्यांकडे होतं."

यावर टागोर म्हणाले होते की, "सगळेजण माझ्या कपड्यांकडे पाहतात. कदाचित या कपड्यातल्या माणसाच्या अंतरंगात डोकावण्यात त्यांना रस नसेल."

रोममध्ये 13 दिवस राहिल्यानंतर टागोर तिथून निघू लागले तेव्हा ते पुन्हा एकदा मुसोलिनीला भेटायला गेले.

टागोरांचे नंतरचे सहकारी प्रशांत चंद्र महालनोबिस यांनी त्यांच्या 'अवर फाउंडर प्रेसिडेंट इन इटली' या पुस्तकात लिहिलंय की, "टागोरांनी मुसोलिनीला सांगितलं की मी तुमच्या आणि तुमच्या लोकांच्या प्रेमळपणाने खूप प्रभावित झालो आहे. मी ही आठवण माझ्यासोबत घेऊन जाईन. पुस्तके, छायाचित्रे आणि अल्बम दिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. मला आशा आहे की एक दिवस भारतीय विद्वान आणि विद्यार्थ्यांना देखील इटलीला भेट देण्याची संधी मिळेल."

टागोरांना निमंत्रित करण्यासाठी मुसोलिनीने आपले दोन प्रतिनिधी शांतीनिकेतनला पाठवले

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, टागोरांना निमंत्रित करण्यासाठी मुसोलिनीने आपले दोन प्रतिनिधी शांतीनिकेतनला पाठवले

या भेटीत टागोर इटालियन राजकारणावरही थोडंसं बोलले.

यावर मुसोलिनी म्हणाला की, इतिहासात असे प्रसंग येतात जेव्हा शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कठोर पावलं उचलणं आवश्यक असतं आणि मानवी हक्क बाजूला ठेवले जातात पण हा टप्पा तात्पुरता असतो.

टागोरांच्या इटली भेटीवर रोमा रोलाँ यांची नाराजी

टागोर इटलीहून स्वित्झर्लंडला गेले. तिथे त्यांची भेट रोमा रोलाँ यांच्याशी झाली. खिलाफत चळवळीचे अपयश, ब्रिटनमध्ये बनवलेल्या वस्तूंवर बहिष्कार, टागोरांचे गांधींशी असलेले मतभेद आणि युरोपीय संगीत अशा भारताशी संबंधित अनेक विषयांवर दोघांनी चर्चा केली.

कल्याण कुंडू लिहितात, "रोमा रोलाँने टागोरांना सांगितलं की, फॅसिस्ट विचारसरणीची इटालियन वृत्तपत्रं टागोरांनी मुसोलिनीबद्दल केलेली विधानं छापून लोकांचं समर्थन मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत."

"युरोपमधील फॅसिस्ट विरोधी लोकांनी टागोरांच्या विधानांना विरोध सुरू केला आहे. यावर टागोरांनी रोलाँ यांना सांगितलं की, या भेटीपूर्वी मी इटलीला जावं की नाही या विवंचनेत होतो. पण मी त्यांचा दृष्टिकोनही समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो."

"रोलाँ म्हणाले की, इटलीमधील अनेक मुसोलिनीविरोधी लोकांना तुम्हाला भेटू दिलं नाही याचं मला खूप वाईट वाटतं आहे. रोलाँची अशी इच्छा होती की, टागोरांनी एका मुलाखतीद्वारे इटलीतून हद्दपार केलेल्या लोकांसाठी आपला पाठिंबा व्यक्त करावा. पण टागोरांनी नकार दिला, कारण ते अद्याप अशा कोणत्याही व्यक्तीला भेटले नव्हते."

जगातील अनेक महत्त्वाच्या व्यक्ति मुसोलिनीचे चाहते

इटालियन लेखक गुगलीलमो सल्वादोरी यांनी 16 जुलै 1926 साली टागोरांना एक पत्र लिहिलं. या पत्रात त्यांनी टागोरांना मुसोलिनीने दिलेली सर्व पुस्तकं परत करण्याचा सल्ला दिला तेव्हा टागोरांनी त्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केलं.

जेव्हा सल्वादोरी यांची भेट झाली तेव्हा, मुसोलिनी एक विशेष व्यक्तिमत्त्व असल्याचं त्यांनी कबूल केलं होतं.

मुसोलिनी

फोटो स्रोत, OXFORD UNIVETSITY PRESS

टागोर म्हणाले, "मला असं वाटतं की मुसोलिनीकडे त्याच्या लोकांवर नियंत्रण ठेवण्याची जबरदस्त ताकद असावी. पण यामुळे त्याच्या चुकांचं समर्थन करता येत नाही."

"मी इटलीमध्ये भेटलेल्या प्रत्येकाने मला सांगितलं की, मुसोलिनीने इटलीला अराजकतेपासून आणि विनाशापासून वाचवलं आहे."

केवळ टागोरच नाही तर सुनीती चॅटर्जी, हिंदू महासभेचे नेते श्यामा प्रसाद मुखर्जी आणि बंगालहून इटलीच्या दौऱ्यावर गेलेले अर्थतज्ज्ञ बिनॉय कुमार सरकार अशा अनेक विचारवंतांनीही मुसोलिनीचं कौतुक केलं. इतकंच नाही तर बर्नार्ड शॉ, डब्ल्यू बी येट्स, एझरा पाउंड आणि हॉलिवूड अभिनेता डग्लस फेअरबँक्स यांसारख्या जगातील बड्या आसामींनी मुसोलिनीची स्तुती केली होती.

महात्मा गांधींनीही घेतली होती मुसोलिनीची भेट

टागोरांच्या इटली दौऱ्यानंतर चार वर्षांनी महात्मा गांधी लंडनमधील गोलमेज परिषदेतून परतताना जिनिव्हामध्ये थांबले होते. तिथे त्यांची भेट रोमा रोलाँ यांच्याशी झाली. त्यांनी रोमा रोलाँ यांना सांगितलं की, माझा मुसोलिनीला भेटण्यासाठी रोमला जाण्याचा मानस आहे.

रोमा रोलाँ यांनी गांधींना रोखण्याचा खूप प्रयत्न केला आणि 1926 मध्ये टागोरांच्या रोम भेटीचं उदाहरण देऊन त्यांना इशारा दिला. पण गांधींनी ते ऐकलं नाही. गांधी प्रथम मिलानला गेले आणि तेथून विशेष ट्रेनने रोमला पोहोचले.

व्हॅटिकनमधील पोपने गांधींना भेटण्यास नकार दिला परंतु मुसोलिनीने त्यांना 20 मिनिट दिली.

त्याने गांधींना भारताशी संबंधित अनेक प्रश्न विचारले. इटालियन माध्यमांनी गांधी मुसोलिनीचे प्रशंसक असल्याचा आभास तयार केला.

गांधींच्या भाषणातून 'अहिंसा' हा शब्द मुद्दाम वगळण्यात आला. 'जरनालो द इटालिया' या मोठ्या प्रमाणावर वाचल्या जाणार्‍या इटालियन वृत्तपत्रानेही गांधींची खोटी मुलाखत प्रकाशित केली होती. गांधींनी या वृत्तपत्राला मुलाखत दिलीच नव्हती.

गांधी

फोटो स्रोत, Getty Images

पलाश घोष त्यांच्या 'मुसोलिनी अँड गांधीज स्ट्रेंज बेडफेलोज' या लेखात गांधींनी रोमा रोलाँ यांना लिहिलेल्या पत्राचा हवाला देत लिहितात की, "मुसोलिनी माझ्यासाठी एक गूढ आहे. त्याने केलेल्या अनेक सुधारणांनी मला भुरळ घातली. त्याने शेतकऱ्यांसाठी बरंच काही केलं.

तो कठोरपणे वागला आहे हे मला मान्य आहे पण मुसोलिनीच्या सुधारणांचा निष्पक्ष अभ्यास झाला पाहिजे. मला वाटतं की बहुतेक इटालियन लोकांना मुसोलिनीचं कठोर निर्णय घेणारं सरकार आवडतं."

नेहरूंनी मात्र मुसोलिनीला टाळलं

पण मुसोलिनीला भेटल्यानंतर ज्या प्रमाणे टागोरांना टीकेला सामोरं जावं लागलं त्याप्रमाणे गांधींवर टीका झाली नाही. याचं कारण कदाचित रोमा रोलाँ यांच्या सल्ल्यानुसार गांधींनी मुसोलिनीचा राजकीय पाहुणे बनण्याचा प्रस्ताव स्वीकारला नाही. मुसोलिनीला भारतामध्ये स्वारस्य होतं असे कोणतेही संकेत मिळत नाहीत.

1921 साली 'इल पोपोलो द इटालिया' या इटालियन वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या एका लेखात मुसोलिनीने असं भाकीत केलं होतं की, मोपला बंडामुळे भारतातील ब्रिटीश राजवट संपुष्टात येईल.

त्याच्या मते इटली आणि भारत या दोन्ही देशांनी एकत्र काम केलं पाहिजे कारण दोन्ही देश ब्रिटिशविरोधी आहेत. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र असं म्हणून देशांनी मित्रत्वाचे संबंध निभावले पाहिजेत.

पण जवाहरलाल नेहरूंनी मात्र मुसोलिनीला त्याची योग्य जागा दाखवली. 28 फेब्रुवारी 1936 रोजी नेहरू आपल्या पत्नीच्या कमला नेहरू यांच्या अस्थी घेऊन लुजानहून रोमला पोहोचले तेव्हा मुसोलिनीचे चीफ ऑफ प्रोटोकॉल त्यांना त्यांच्या विमानात भेटले. त्यावेळी चीफ ऑफ प्रोटोकॉल म्हणाले की, मुसोलिनी त्यांना संध्याकाळी सहा वाजता भेटू इच्छितो. मात्र नेहरूंनी मुसोलिनीला निरोप पाठवला की त्यांना भेटणं शक्य नाही.

इटलीहून परतल्यानंतरही टागोरांचं मुसोलिनीबद्दलचं आकर्षण कायम होतं

टागोरांचा मुसोलिनीबद्दलचा दृष्टिकोन आणखी काही वर्ष बदलला नव्हता. इटलीला जाऊन चार वर्ष झाल्यानंतर म्हणजेच 1930 मध्ये फॉर्मिचीच्या सल्ल्याने त्यांनी मुसोलिनीबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारं दुसरं पत्र लिहिलं.

प्रशांत चंद्र महालनोबिस, त्यांची पत्नी आणि रविंद्रनाथ टागोर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रशांत चंद्र महालनोबिस, त्यांची पत्नी आणि रविंद्रनाथ टागोर

पण कृष्ण दत्ता आणि अँड्र्यू रॉबिन्सन त्यांच्या 'सिलेक्टेड लेटर्स ऑफ रवींद्रनाथ टागोर' या पुस्तकात लिहितात, "हे पत्र मुसोलिनीपर्यंत पोहोचलं असतं, तर टागोरांना आणखी एक विरोध सहन करावा लागला असता. पण त्यांचा मुलगा रथींद्रनाथ यांच्या सांगण्यावरून हे पत्र त्यांनी पाठवलं नाही. "

मात्र कल्याण कुंडू यांनी मारिओ प्रेअर आणि सोफोरीचा हवाला देत हे पत्र प्रत्यक्षात पाठवलं होतं असं म्हटलंय. पण मुसोलिनीने हे पत्र वाचलं होतं की नाही याचा पुरावा उपलब्ध नाही.

कल्याण कुंडू लिहितात, "टागोर ब्रिटिश साम्राज्यवादावर कठोरपणे टीका करायचे. पण थोड्या काळासाठी ते फॅसिस्ट विचारांनी प्रभावित झाले होते. त्यांना कुठेतरी असं वाटत होतं की, इटालियन फॅसिझममध्ये साम्राज्यवादाला विरोध करण्याची ताकद असू शकते. टागोर यांचा दुसरा इटली दौरा एक वैचारिक चूक होती. मुसोलिनीबद्दल वाटणारा आदर आणखी काही वर्ष कमी झाला नव्हता."

इटलीच्या इथिओपियावरील आक्रमणाने मुसोलिनीविषयी वाटणारा आदर कमी झाला

1935 मध्ये जेव्हा इटलीने इथिओपियावर आक्रमण केलं तेव्हा टागोरांचं मुसोलिनीविषयीचं मत बदललं आणि त्यांनी 'आफ्रिका' ही कविता लिहिली.

17 मार्च 1935 रोजी त्यांनी मुसोलिनीचं व्यंगचित्र काढलं. टागोरांनी त्यांच्या आयुष्यात सुमारे अडीच हजार चित्रं काढली. पण यातल्या एकाही चित्राला त्यांनी नाव दिलं नव्हतं. त्यांनी या व्यंगचित्राला मात्र 'मुसोलिनी' हे नाव दिलं.

त्याच वर्षी, रोम्याँ रोलाँ आणि फ्रेंच लेखक ऑरी बाबूश यांनी पॅरिसमध्ये फॅसिस्टांच्या क्रूरतेचा निषेध व्यक्त करण्यासाठी एक परिषद बोलावली. यात त्यांनी जगातील उजव्या विचारसरणीच्या लोकांना फॅसिझमच्या विरोधात एकत्र येण्याचं आवाहन केलं.

रोलाँ आणि बाबूश यांच्या या प्रयत्नांना टागोरांनी पूर्ण पाठिंबा दिला. कदाचित टागोर त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात फॅसिझमच्या विरोधात जाऊन त्यांची पूर्वीची भूमिका सुधारण्याचा प्रयत्न करत असावेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)