गोव्यात भारतीय सैन्य गेलं आणि 36 तासांच्या आत पोर्तुगीजांनी आत्मसमर्पण केलं

फोटो स्रोत, Getty Images
- Author, रेहान फजल
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
परदेशात राहून भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे कृष्ण मेनन गोव्याचं वर्णन करताना म्हणायचे की, गोवा म्हणजे भारताच्या चेहऱ्यावर असलेला एक 'फोड' आहे. ते नेहरूंना नेहमी म्हणायचे की, "गोवा भारतात सामील करायला हवा."
गोव्याबद्दल नेहरूंनाही एक प्रकारचा 'मेंटल ब्लॉक' होता. त्यांनी पाश्चिमात्य देशांना आश्वासन दिलं होतं की, ते बळाचा वापर करून गोवा भारतात विलीन करणार नाहीत. पण कृष्ण मेनन यांनी नेहरूंना पटवून दिलं की, गोवा ही पोर्तुगालची वसाहत आहे आणि तुम्ही त्याबाबत दुटप्पी धोरण स्वीकारू शकत नाहीत.
एकीकडे ते वर्णद्वेष समर्थक देशांवर टीका करत आहेत, पण दुसरीकडे भारताला लागून असलेला गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यात असून देखील त्यावर मौन बाळगून आहेत.
पोर्तुगीजांनी गोव्यातून बाहेर जावं यासाठी शांततापूर्ण प्रयत्न करण्यात आले. पण यात अपयश आल्यावर नेहरूंनी सैन्य पाठवून गोवा मुक्त करण्याच्या योजनेला हिरवा कंदील दिला.
हल्लीच प्रकाशित झालेल्या 'गोवा, 1961 द कम्प्लीट स्टोरी ऑफ नॅशनॅलिझम अँड इंटिग्रेशन' या पुस्तकात वाल्मिकी फलेरो लिहितात, "2 डिसेंबर 1961 रोजी भारतीय सैन्याने सैनिकांची जमवाजमव सुरू केली. 50 व्या पॅराशूट ब्रिगेडला आग्रा, हैदराबाद आणि मद्रासहून बेळगावला बोलवण्यात आलं."
"उत्तर, पश्चिम आणि दक्षिण भारतातील 100 हून अधिक प्रवासी रेल्वे सैन्याच्या तुकड्या पोहोचवण्यासाठी बेळगावकडे वळवण्यात आल्या होत्या. लष्करी साहित्य पोहोचवण्यासाठी अनेक मालगाड्यांचा वापर करण्यात आला. मालगाड्यांचा रस्ता बदलल्यामुळे कोळशाची कमतरता भासलेल्या अहमदाबादच्या अनेक गिरण्यांना फटका बसला."
पोर्तुगालने आपली जहाजं गोव्याच्या दिशेने पाठवली
पोर्तुगालनेही भारतीय कारवाईला सामोरं जाण्याची तयारी सुरू केली. पोर्तुगालने त्यांचं 'इंडिया' नावाचं जहाज भारताच्या दिशेने पाठवलं जेणेकरून पोर्तुगीज नागरिकांनी 'बँको नॅशनल अल्ट्रामॅरिनो' मध्ये जमा केलेलं सोनं आणि त्यांच्या बायका-मुलांना लिस्बनला पाठवता येईल.
पी एन खेडा यांनी त्यांच्या 'ऑपरेशन विजय, द लिबरेशन ऑफ गोवा आणि अँड अदर पोर्तुगीज कॉलनी इन इंडिया' या पुस्तकात लिहिलंय की, "9 डिसेंबर 1961 रोजी पोर्तुगीज जहाज लिस्बनहून मोरमुगावला पोहोचलं. जहाजाने 12 डिसेंबर रोजी परतीचा प्रवास सुरू केला. या जहाजात 380 लोकच बसू शकत होते, पण त्यावर 700 महिला आणि लहान मुलांना बसविण्यात आलं. जहाजात इतके लोक होते की काही लोक शौचालयातही बसले होते."

फोटो स्रोत, Vintage Books
डिसेंबर 1961 मध्ये भारतातील अमेरिकेचे राजदूत जॉन केनेथ गॅलब्रेथ यांनी भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची भेट घेऊन गोव्यातील लष्करी कारवाई रद्द करावी यासाठी दबाव आणला.
गोव्यात लष्करी कारवाई करण्यासाठी 14 डिसेंबर हा दिवस निश्चित करण्यात आला होता. पण हा दिवस पुढे ढकलून 16 डिसेंबरवर नेण्यात आला. 15 डिसेंबर रोजी गॅलब्रेथ यांनी नेहरूंची आणि अर्थमंत्री मोरारजी देसाई यांची भेट घेतली.

एडिला गायतोंडे त्यांच्या 'इन सर्च ऑफ टुमॉरो' या पुस्तकात लिहितात, "मोरारजींना गोव्यातील हिंसाचार मान्य नव्हता. कारण वसाहतींच्या समस्या सोडवण्यासाठी अहिंसेचा वापर करावा असं त्यांचं म्हणणं होतं."
"पोर्तुगीजांना अमेरिकन मुत्सद्देगिरीवर इतका विश्वास होता की, 16 डिसेंबरच्या रात्री पोर्तुगीज गव्हर्नर जनरल आणि त्यांच्या सैन्याचा कमांडर इन चीफ एका मित्राच्या मुलीच्या लग्नाच्या मेजवानीला उपस्थित होते."

17 डिसेंबर रोजी गॅलब्रेथ यांनी नेहरूंना भेटून गोव्यातील लष्करी कारवाई सहा महिन्यांसाठी पुढे ढकलावी असा प्रस्ताव दिला. त्या बैठकीत उपस्थित असलेल्या कृष्ण मेनन यांनी नेहरू आणि गॅलब्रेथ यांना 'आता खूप उशीर झालाय' असं म्हटलं. कारण तोपर्यंत भारतीय सैनिक गोव्यात घुसले होते आणि त्यांना आता परत बोलवता येणार नव्हतं.
बऱ्याच वर्षांनंतर कृष्ण मेनन यांनी एका मुलाखतीत मान्य केलं होतं की, ते खरं नव्हतं. भारतीय सैनिकांनी तोपर्यंत गोव्याची सीमा ओलांडली देखील नव्हती.
त्याच रात्री कृष्ण मेनन यांनी गोव्याच्या सीमेवर जाऊन भारतीय सैन्याची पाहणी केली होती. मेनन यांनी नेहरूंना लष्करी कारवाईची वेळ सांगण्यापूर्वी भारतीय सैन्य गोव्यात दाखल झालं होतं.
अगदीच किरकोळ प्रतिकार झाला
17-18 डिसेंबरच्या मध्यरात्री भारतीय लष्कराने गोव्याची सीमा ओलांडली. टाइम्स ऑफ इंडियाने 19 डिसेंबर 1961 च्या वृत्तपत्रात 'अवर ट्रूप्स एंटर गोवा, दमन एंड दिव ॲट लास्ट' या हेडलाईनने बातमी छापली होती.
गोव्यात घुसण्यासाठी भारतीय सैन्याला अगदीच किरकोळ प्रतिकार करावा लागला. गोवा ताब्यात घेण्याची जबाबदारी मेजर जनरल कँडेथ यांच्या नेतृत्वाखाली 17 इन्फंट्री डिव्हिजनकडे देण्यात आली होती.
इतिहासकार रामचंद्र गुहा त्यांच्या 'इंडिया आफ्टर गांधी' या पुस्तकात लिहितात, "भारतीय सैन्याने 18 डिसेंबरच्या सकाळी उत्तरेकडील सावंतवाडी, दक्षिणेकडील कारवार आणि पूर्वेकडील बेळगाव येथून गोव्यात प्रवेश केला."

फोटो स्रोत, HARPER COLLINS
"याच दरम्यान भारतीय विमानांनी गोव्यातील लोकांना शांततेचं आवाहन करण्यासाठी पत्रकं टाकली. या पत्रकात म्हटलं होतं की, तुम्हाला मिळालेल्या स्वातंत्र्यावर आनंदी व्हा आणि ते आणखीन मजबूत करा. 18 डिसेंबरच्या संध्याकाळपर्यंत राजधानी पणजीला चारी बाजूंनी वेढा घालण्यात आला. गोव्यातल्या स्थानिक लोकांनी भारतीय सैनिकांना मदत केली आणि पोर्तुगीजांनी ज्या ठिकाणी सुरुंग पेरले होते त्याची माहिती दिली."
मोहीम सुरू झाल्यानंतर 36 तासांच्या आत पोर्तुगीज गव्हर्नर जनरलने बिनशर्त आत्मसमर्पणाच्या दस्तऐवजावर स्वाक्षरी केली होती.
पंजाब रेजिमेंटचे सैनिक पणजीत दाखल झाले तेव्हा त्यांनी पाहिलं की, पोर्तुगीज अधिकारी आणि त्यांचे सैनिक फक्त त्यांच्या अंतर्वस्त्रांवर होते.
जेव्हा त्यांना यामागचं कारण विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की, भारतीय सैनिक इतके निर्दयी आहेत की त्यांनी पोर्तुगीज सैनिकांना त्यांच्या गणवेशावरून ओळखलं तर ते बघताक्षणी त्यांना गोळ्या घालतील.

फोटो स्रोत, BHARATRAKSHAK.COM
ब्रिगेडियर सगत सिंग यांची महत्त्वाची भूमिका
ब्रिगेडियर सगत सिंग यांच्या नेतृत्वाखालील 50 व्या पॅराशूट ब्रिगेडने दिलेल्या जबाबदारी पेक्षा खूप मोठी कामं केली. आणि ते पणजीत ही इतक्या वेगाने पोहोचले की सर्वजण थक्क झाले.
ब्रिगेडियर सगत सिंग यांचे चरित्र लिहिणारे जनरल व्ही के सिंग सांगतात, "चोवीस तासाच्या आतच त्यांची बटालियन पणजीत पोहोचली. रात्र झालीय असं सांगत सगत सिंग यांनी बटालियनला थांबायला सांगितलं. पणजी हा दाट लोकवस्तीचा भाग आहे. रात्रीच्या वेळी हल्ला केला असता तर निष्पाप नागरिक मारले गेले असते. त्यामुळे त्यांनी सकाळी नदी पार केली. भारतीय सैनिकांना रोखण्यासाठी पोर्तुगीज सरकारने पूल तोडले होते. मात्र सगतसिंगच्या सैनिकांनी पोहत पोहत नदी पार केली."

फोटो स्रोत, SAGAT SINGH FAMILY
जून 1962 येईपर्यंत भारतीय सैनिक गोव्यातील त्यांची मोहीम पूर्ण करून आग्र्याला परतले देखील होते.
त्यानंतर आग्र्यातील प्रसिद्ध क्लार्क्स शीराज हॉटेलमध्ये एक रंजक किस्सा घडला होता. मेजर जनरल व्ही के सिंग सांगतात, "ब्रिगेडियर सगत सिंग त्या हॉटेल मध्ये गेले होते. तिथे काही अमेरिकन पर्यटकही आले होते. ते सगत सिंग यांच्याकडे डोळे रोखून पाहत होते. काही वेळाने त्यांच्यापैकी एकाने येऊन विचारलं की, तुम्ही ब्रिगेडियर सगत सिंह आहात का?"
"त्यावर सगत सिंग म्हणाले, पण तुम्ही हे का विचारताय? त्यावर ती अमेरिकन व्यक्ती म्हणाली की, आम्ही आत्ता पोर्तुगालहून आलो आहोत. तिकडे सगळीकडे तुमचीच चित्र लावली होती आणि त्याखाली लिहिलं होतं की, जो या व्यक्तीला पकडून आणेल त्याला दहा हजार डॉलर्स मिळतील. यावर ब्रिगेडियर सगत सिंग हसत हसत म्हणाले, "तुम्ही म्हणत असाल तर मी तुमच्यासोबत येतो." त्यावर तो अमेरिकन पर्यटक हसला आणि म्हणाला, "आता आम्ही पोर्तुगालला परत जाणार नाहीये."
पोर्तुगालने गोवा ताब्यात घेतल्याच्या बातम्या
दुसरीकडे पोर्तुगालची राजधानी लिस्बनमधील वृत्तपत्रांमध्ये पोर्तुगाली सैनिकांनी गोवा ताब्यात घेतल्याच्या, सैनिकांनी कडवा प्रतिकार केल्याच्या बातम्या छापून येत होत्या.
पोर्तुगाली सैनिकांनी भारतीय सैनिकांना बंदी बनवल्याच्या खोट्या बातम्याही छापून येत होत्या.
गोव्यात पोर्तुगीज सैनिकांची कमतरता असल्याचं पोर्तुगाली लोकांना सांगितलं गेलं नाही. ना त्यांना युद्धाचा अनुभव होता ना त्यांना कोणत्या मोहिमेसाठी तयार करण्यात आलं होतं.
शिवाय त्यांना विरोध करायचा असेल तरी त्यांच्याकडे पुरेशी साधनंही नव्हती. पोर्तुगालने सुरक्षा परिषदेत हा मुद्दा उपस्थित केला तेव्हा पोर्तुगालची वृत्तपत्र मोठंमोठे दावे करण्यात व्यस्त होती. त्यांनी
भारताचे 1500 सैनिक मरण पावल्याच्या बातम्या छापल्या होत्या.

फोटो स्रोत, Getty Images
18 डिसेंबरला संबंध दिवस गोवा रेडिओने युद्ध संगीत प्रसारित केलं पण भारतीय सैनिक गोव्यात दाखल झाल्याची कोणतीही बातमी दिली नाही.
भारतीय विमानांनी दाबोलीम विमानतळावर बॉम्बफेक सुरू केली त्यावेळी शाळेत जाणाऱ्या मुलांना घरी परतण्यास सांगण्यात आलं.
दाबोलिम विमानतळावर हंटर विमानांतून बॉम्बफेक करण्यात आली
18 डिसेंबर रोजी सकाळी सात वाजता स्क्वाड्रन लीडर जयवंत सिंग यांच्या नेतृत्वाखाली सहा हंटर विमानांनी पुण्यातील हवाई दलाच्या तळावरून उड्डाण केलं. त्यांनी बांबोलीम येथील रेडिओ स्थानकावर रॉकेट आणि बंदुकीने हल्ला केला. हे रेडिओ स्थानक अवघ्या 10 मिनिटांत उद्ध्वस्त झालं.
आता गोव्याचा बाह्य जगाशी संपर्क तुटला होता. गोवा रेडिओचं ते प्रसिद्ध निवेदन 'हे पोर्तुगाल आहे, तुम्ही ऐकत आहात रेडिओ गोवा' कायमचं बंद झालं.
त्याचवेळी 12 कॅनबेरा आणि 4 हंटर विमानांनी पुण्यातून गोव्यासाठी उड्डाण केलं. त्यांनी गोव्यातील दाबोलिम धावपट्टीवर प्रत्येकी 1000 पौंड वजनाचे 63 बॉम्ब टाकले.
वाल्मिकी फलेरो लिहितात, "पहिल्या फेरीत 63 पौंडांचे बॉम्ब टाकूनही भारतीय हवाई दल शांत बसलं नाही. सुमारे अर्ध्या तासानंतर त्यांनी पुन्हा हल्ला केला आणि यावेळी एकूण 48 हजार पौंडांचे बॉम्ब टाकले."
"पुढे अर्ध्या तासानंतर फ्लाइट लेफ्टनंट व्हिव्हियन गुडविन यांना उध्वस्त झालेल्या दाबोलिम धावपट्टीचे छायाचित्रं घेण्यासाठी पाठवण्यात आलं. छायाचित्रांवरून असं दिसून आलं की धावपट्टीला मोठं नुकसान झालं नव्हतं. त्यानंतर 11 वाजून 40 मिनिटांनी दाबोलिमवर तिसरा हल्ला करण्यात आला."
महिला-मुलांना लिस्बनला पाठविण्यात आलं
भारतीय हवाई दलाने जोरदार बॉम्बफेक करूनही दाबोलिम हवाई तळ उध्वस्त झालं नव्हतं, तिथे फक्त काही खड्डे तयार झाले होते. त्यावेळी गोव्यात असलेल्या पोर्तुगीज अधिकाऱ्यांनी ठरवलं की, आपल्या बायका-मुलांना विमानाने पोर्तुगालला पाठवून द्यावं.
त्यावेळी दाबोलीममध्ये केवळ दोनच विमानं उपलब्ध होती. अंधार पडताच दाबोलीम धावपट्टीवरील खड्डे तातडीने दुरुस्त करण्यात आले. चारी बाजूंनी घेराव पडला असताना देखील गव्हर्नर जनरल सिल्वा यांनी या विमानांना उड्डाण करण्यास परवानगी दिली.
वाल्मिकी फलेरो लिहितात, "पोर्तुगीज अधिकार्यांच्या बायका-मुलांना दोन विमानांमध्ये बसविण्यात आलं. आणि सोबतच काही महत्त्वाची सरकारी कागदपत्रं देण्यात आली. या विमानांनी अंधारात मोठी जोखीम पत्करून 700 मीटर लांबीच्या धावपट्टीवरून दिवे न लावता उड्डाण केलं."
"समुद्रात उभ्या असलेल्या भारतीय युद्धनौकांनी या विमानांवर गोळीबार केला पण ते निसटण्यात यशस्वी झाले. लांबचा पल्ला गाठत ही विमानं पाकिस्तानातील कराची विमानतळावर उतरली."

फोटो स्रोत, Getty Images
दरम्यान, गोव्याचे गव्हर्नर जनरल मेजर जनरल सिल्वा वास्को द गामा येथे पोहोचले.
त्याठिकाणी मेजर बिल कार्वेलो यांच्या नेतृत्वाखाली शीख रेजिमेंटचे सैनिक पहिल्यांदा पोहोचले.
ब्रिगेडियर रवी मेहता यांनी एका मुलाखतीत वाल्मिकी फलेरो यांना सांगितलं होतं की, "मेजर बिल कार्वेलो, कॅप्टन आर.एस. बाली आणि मी असे तिघेजण जनरल सिल्वा ज्या इमारतीत होते त्या इमारतीच्या गेटपाशी पोहोचलो. जनरल सिल्वा ज्या मेसमध्ये बसले होते त्या टेबलापाशी जाऊन उभे राहिलो. भारतीय सैन्याने चारी बाजूंनी घेराबंदी केली आहे आणि आता प्रतिकार करण्याचा काही फायदा नाही हे त्यांना कळून चुकलं होतं. बिल यांनी गव्हर्नरला सलाम केला, यावर गव्हर्नरनेही उभं राहून त्यांचं अभिवादन स्वीकारलं."
बिल म्हणाले की तुम्ही तुमच्या सैनिकांना शस्त्र खाली ठेऊन त्यांच्या बॅरेकमध्ये जाण्याचा आदेश द्या.
शिवाय गव्हर्नरनेही आपल्या निवासस्थानी जावं असं त्यांनी सांगितलं. त्याठिकाणी भारतीय लष्कराचे काही सैनिक तैनात करण्यात आले होते.
कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल नंदा यांनी ठरवलं की, आत्मसमर्पणाचा औपचारिक समारंभ रात्री होईल.
जनरल सिल्वा यांनी आत्मसमर्पण केलं
19 डिसेंबर 1961 रोजी रात्री 9 वाजून 15 मिनिटांनी आत्मसमर्पण पार पडलं. त्यावेळी तिथे फार कमी लोक उपस्थित होते. गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेले डॉ. सुरेश कणेकर हे त्यापैकीच एक.
2011 मध्ये प्रकाशित झालेल्या 'गोवाज लिबरेशन अँड देअर आफ्टर' या पुस्तकात ते लिहितात, "हे आत्मसमर्पण खुल्या मैदानात पार पडलं. ब्रिगेडियर ढिल्लों एका जीपमध्ये बसले होते. त्यांनी तेथे उपस्थित असलेल्या गाड्यांना इंग्रजी 'सी' आकारात थांबायला सांगितलं. ज्या ठिकाणी जनरल सिल्वा आत्मसमर्पण करणार होते त्या ठिकाणावर गाडीच्या हेडलाइट्स रोखल्या होत्या."
"जवळपास 8 वाजून 45 मिनिटांनी जनरल सिल्वा यांना तिथे आणण्यात आलं. त्यांच्यासोबत त्यांचे चीफ ऑफ स्टाफ लेफ्टनंट कर्नल मार्के डी आंद्रेद होते. त्यांना सुमारे अर्धा तास वाट पहावी लागली. त्यांच्या दोन्ही बाजूला भारतीय सैनिक रांगेत उभे होते."
डॉ. कणेकर पुढे लिहितात, "सर्व व्यवस्था झाल्याचं जेव्हा ब्रिगेडियर ढिल्लों यांना सांगण्यात आलं तेव्हा ते त्यांच्या जीपमधून खाली उतरले आणि जनरल सिल्वा यांच्यासमोर उभे राहिले. ब्रिगेडियर ढिल्लों यांना उद्देशून लेफ्टनंट कर्नल नंदा म्हणाले की गोवा, दमण आणि दीवचे गव्हर्नर जनरल त्यांच्यासमोर आत्मसमर्पण करत आहेत."

फोटो स्रोत, Getty Images
"नंदा यांच्या आदेशानुसार, जनरल सिल्वा पुढे आले. त्यांनी ढिल्लों यांना अभिवादन केलं. ढिल्लों यांनी ते अभिवादन स्वीकारलं नाही. हे बघून मला आश्चर्य वाटलं कारण सिल्वा हे मेजर जनरल होते आणि पदाने ही ते त्यांच्यापेक्षा वरिष्ठ दर्जाचे होते. त्यांनी ढिल्लोंना आत्मसमर्पणाची कागदपत्रे दिली."
त्यानंतर ढिल्लों आपल्या जीपमध्ये परतले आणि सिल्वा यांना पुन्हा त्याच ठिकाणी नेण्यात आलं जिथे ते नजरकैदेत होते. या संपूर्ण कार्यक्रमात सिल्वा किंवा ढिल्लों, या दोघांनी एक शब्दही उच्चारला नाही.
भारतीय सैन्याचे कमांडर जनरल कँडेथ वास्को द गामा इथे उपस्थित नसल्यामुळे त्यांना आत्मसमर्पण कार्यक्रमाला येता आलं नाही. आत्मसमर्पण पार पडेपर्यंत देखील कँडेथ यांना माहितीही नव्हतं की भारतीय सैन्य वास्को द गामा येथे पोहचलंय. रात्री अकरा वाजता त्यांना दूरध्वनीवरून याबाबत संपूर्ण माहिती मिळाली.
या आत्मसमर्पण कार्यक्रमाचे कोणतेही फोटो अस्तित्वात नाहीत. डॉ. सुरेश कणेकर लिहितात, "लेफ्टनंट कर्नल नंदा यांनी फोटो काढण्यासाठी एका फोटोग्राफरची व्यवस्था केली होती, परंतु त्याच्या कॅमेऱ्यात फ्लॅश नव्हता. नंदा यांनी त्याला सांगितलं होतं की मी इशारा करताच तू फोटो काढ. पण नंदा शेवटच्या क्षणी इशारा द्यायला विसरले आणि फोटोग्राफरने फोटो काढलेच नाहीत."
पोर्तुगीज जनरलची भेट
काही दिवसांनंतर दक्षिणी कमांडचे प्रमुख जनरल जे एन चौधरी यांनी पोर्तुगीज जनरल सिल्वा यांची तुरुंगात जाऊन भेट घेतली. जनरल सिल्वा यांचे सहकारी जनरल कार्लोस अझरेडो त्यांच्या 'वर्क अँड डेज ऑफ ए सोल्जर ऑफ द एम्पायर' या पुस्तकात लिहितात की, "जनरल चौधरी यांनी सिल्वाच्या कोठडीत जाऊन त्यांना अभिवादन केलं. जनरल सिल्वा उभं राहून अभिवादन स्वीकारणार इतक्यात चौधरी यांनी त्यांचे खांदे थोपटले. आणि त्यांना उभं राहू दिलं नाही. मग जनरल चौधरी यांनी एक खुर्ची ओढली आणि जनरल सिल्वासमोर बसले."

फोटो स्रोत, BHARATRAKSHAK.COM
त्यांनी सिल्वाला सांगितलं की त्यांना काही हवं असेल तर ते कमांडर बिल कार्वेलो यांना सांगू शकतात. जनरल चौधरी यांनी सिल्वाला आश्वास्त केलं की, सिल्वा यांची पत्नी सुरक्षित असून भारत सरकार तिला लवकरच लिस्बनला पाठवणार आहे.
यानंतर भारतीय लष्करप्रमुख जनरल पी एन थापर हेही सिल्वा यांना भेटायला गेले. यानंतर सिल्वाला एका चांगल्या घरात हलवण्यात आलं.
सिल्वा यांना भारतीय सैन्यातील मेजर सीझर लोबो यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं. लोबो हे अस्खलितपणे पोर्तुगाली बोलू शकत होते.
पोर्तुगालच्या 3307 सैनिकांना युद्धकैदी बनविण्यात आलं
जनरल चौधरी यांनी आश्वास्त करून देखील सिल्वा यांची पत्नी फर्नांडा सिल्वा यांना चांगली वागणूक मिळाली नाही.
वाल्मिकी फलेरो लिहितात, "त्यांना त्यांच्या डोना पॉला येथील शासकीय निवासस्थानातून जबरदस्तीने बाहेर काढण्यात आलं. त्या पणजीच्या रस्त्यावर भटकताना दिसल्या. तेथील माजी मुख्य सचिव अबेल कोलासो यांनी त्यांना त्यांच्या शासकीय निवासस्थानी आश्रय दिला."

फोटो स्रोत, GOLDEN HEART EMPORIUM BOOKS
"जेव्हा हे प्रकरण संसदेत उपस्थित करण्यात आलं तेव्हा नेहरूंनी कोलासो यांचं कौतुक केलं आणि म्हणाले की, त्यांनी एका संकटात सापडलेल्या महिलेची सभ्य माणसाप्रमाणे मदत केली. 29 डिसेंबर 1961 रोजी फर्नांडा सिल्वा यांना भारतीय हवाई दलाच्या विमानाने मुंबईला नेण्यात आलं आणि तिथून त्यांना लिस्बनला पाठवण्यात आलं."

फोटो स्रोत, BHARATRAKSHAK.COM
त्यांचे पती जनरल सिल्वा यांना पाच महिन्यांनी आपल्या मायदेशी परत जाता आलं. या संपूर्ण कारवाईत भारताचे 22 जवान शहीद झाले तर 54 जवान जखमी झाले. अर्जुन सुब्रमण्यम यांनी त्यांच्या 'इंडियाज वॉ्स 1947-1971' या पुस्तकात लिहिलंय की, या मोहिमेत पोर्तुगीज सैन्याचे 30 सैनिक मरण पावले आणि 57 जखमी झाले होते.
वाल्मिकी फलेरो लिहितात, "लिस्बनमध्ये आल्यावर पोर्तुगीज युद्धकैद्यांना लष्करी पोलिसांनी एखाद्या सामान्य गुन्हेगारांप्रमाणे ताब्यात घेतलं. त्यांचे कुटुंबीय त्यांना विमानतळावर भेटण्यासाठी आले होते, पण त्यांना भेटू दिलं नाही. या युद्धकैद्यांना एका अज्ञात स्थळी घेऊन जाण्यात आलं. त्यांना भ्याड आणि देशद्रोही संबोधून त्यांचा अपमान करण्यात आला."

फोटो स्रोत, BHARATRAKSHAK.COM
गव्हर्नर जनरल सिल्वा यांच्यासह सुमारे डझनभर अधिकाऱ्यांची सैन्यातून हकालपट्टी करण्यात आली.
एवढंच नव्हे तर त्यांना आयुष्यभर कोणतंही सरकारी पद भूषवण्यासही बंदी घालण्यात आली होती. 1974 मध्ये जेव्हा पोर्तुगाल मध्ये सत्ताबदल झाला तेव्हा या लोकांना पुन्हा त्यांचं पद बहाल करण्यात आलं. मेजर जनरल सिल्वा यांना सैन्यातील त्यांच्या पूर्वीच्या पदावर घेण्यात आलं.

फोटो स्रोत, BHARATRAKSHAK.COM
गोव्यात राहणाऱ्या सर्व लोकांना भारताने भारताचं नागरिकत्व दिलं. पण भारताने त्यांच्यासमोर अट ठेवली की, तुम्हाला पोर्तुगीज नागरिकत्व सोडावं लागेल. भारताच्या कायद्यात दुहेरी नागरिकत्वाची तरतूद नाही पण 1961 पूर्वी गोव्यात राहणाऱ्या लोकांसाठी हा कायदा अपवाद आहे.

फोटो स्रोत, BHARATRAKSHAK.COM
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








