शिवसेनेनं दिलेली भारत-पाकिस्तान मॅचमध्ये साप सोडण्याची धमकी, BCCI ने बोलावले होते सर्पमित्र

फोटो स्रोत, Getty Images
- Author, स्नेहल माने
- Role, बीबीसी मराठीसाठी
22 ऑक्टोबर 1991… सर्व वृत्तपत्रांमध्ये ठळक बातमी आली होती-‘वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी उखडली...’ वानखेडे स्टेडियमवर 28 ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान सामना होणार होता.
हा सामना होऊ नये म्हणून हा खटाटोप केला होता.
पण खेळपट्टी कोणी आणि का उखडली होती?
हे केलं होतं बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसैनिकांनी. पाकिस्तानसोबत क्रिकेट न खेळणं बाळासाहेबांची आणि परिणामी शिवसेनेची फार जुनी भूमिका होती.
बाळासाहेब स्वतः क्रिकेटप्रेमी होते. पण पाकिस्तानसोबत भारताने क्रिकेट खेळण्यास त्यांचा विरोध होता. त्यामागे त्यांची स्वतःची अशी भूमिका होती.
पाकिस्तानची सर्व बाजूनी कोंडी केली, क्रिकेट जगतात बदनामी झाली तर पाकिस्तानी सरकारवर दबाव येईल आणि यातून भारतातील दहशतवादी कारवाया थांबतील असा त्यांचा हिशोब होता.
अशातच 28 ऑक्टोबर 1991 ला भारत पाकिस्तान सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळविण्याचं ठरलं. आपला या सामन्याला विरोध आहे, असं शिवसेनेने जाहीर केलं.
18 ऑक्टोबर 1991 रोजी शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला. शिवसेनेच्या या मेळाव्यात बाळासाहेबांनी 28 ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान सामन्याच्या वेळी 'मुंबई बंद' करण्याचा इशारा दिला.
वानखेडे स्टेडियमवर भारत-पाकिस्तान सामना आयोजित केला तर तो उधळून लावूच, पण स्टेडियमही पेटवून भस्मसात करू, अशी धमकीच त्यावेळी बाळासाहेबांनी दिली होती.
काँग्रेसचे नेते सुधाकर नाईक त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या सरकारने पाकिस्तानी खेळाडूंना संरक्षण देण्याचं आणि काहीही झालं तरी हा सामना खेळवण्याचं ठरवलं होतं. आता हा सामना प्रत्येकाच्या प्रतिष्ठेचा मुद्दा बनला होता.
कुदळीचे दांडे तुटले तरी ते खेळपट्टी खणत राहिले...
बरोबर दोन दिवसांनी म्हणजेच 21 ऑक्टोबरला दुपारी दीडच्या सुमारास वानखेडे स्टेडियमच्या दारात चार पाच गाड्या भरून माणसं आली.
पोलिस बंदोबस्त चोख होता म्हणून गाड्या थोड्या आडोशाला घेतल्या. त्यातली एक गाडी मात्र थेट गेटजवळ गेली. गाडीतल्या माणसांनी सांगितलं की, आम्हाला वास्तुविशारद प्रभू यांच्या कार्यालयात जायचं आहे. पोलिसांनीही गाडी आत सोडली. स्टेडियममध्ये रंगरंगोटी आणि इतर कामं सुरू होती.
या सात लोकांनी पार्किंगमध्ये नेलेल्या गाडीतून कुदळी आणि इंधनाचे कॅन नेले होते. ते काढले आणि धावत खेळपट्टीपाशी गेले. यातल्या एकादोघांनी कुदळीने खेळपट्टी उखडण्यास सुरुवात केली.
खणताना कुदळीचे दांडे तुटले तरीही ते लोक खड्डे खणतच राहिले. बाकीच्यांनी वाहनांसाठी वापरलं जाणारं इंजिन ऑइल खेळपट्टीवर ओतलं.

फोटो स्रोत, Getty Images
खड्डय़ांमध्ये इंधन ओतल्यानं ते आतापर्यंत मुरलं होतं. खेळपट्टीचं होत असलेलं नुकसान बघून पोलीस धावत आले आणि या लोकांना बाहेर काढलं. खेळपट्टी खणनाऱ्यांत मुख्य सूत्रधार होते शिशिर शिंदे.
त्यावेळी बाळासाहेबांनी पत्रकार परिषद घेत शिवसैनिकांनी खेळपट्टी उखडल्याचं जाहीर केलं. पण खेळपट्टी खणली तरी सामना होणारच अशी भूमिका सरकारने घेतली होती.
मात्र खड्ड्यात इंधन टाकल्याने खेळपट्टीची पार वाट लागली होती. ती तीन दिवसांत दुरुस्ती होणं कठीण होतं. एकूणच साऱ्या परिस्थितीचा अंदाज आल्याने सुरक्षेचं कारण देऊन पाकिस्तानी संघाने भारताचा दौर रद्द केला.
रात्री अकरा वाजता कोटलाची खेळपट्टी खणली, शिवसेनेचा झेंडा रोवला
1990 आणि 2000 च्या दशकाच्या सुरुवातीस भारत आणि पाकिस्तानचे नेते द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी राजनैतिक साधन म्हणून क्रिकेटकडे वळले.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे क्रिकेट मुत्सद्देगिरीच्या सर्वांत मोठ्या समर्थकांपैकी एक होते. त्यांनी सप्टेंबर 1998 मध्ये पाकिस्तानचे तत्कालिन पंतप्रधान नवाझ शरीफ यांची न्यूयॉर्कमध्ये भेट घेतली.
दोघांनी जानेवारी आणि फेब्रुवारी 1999 मध्ये दोन सामन्यांच्या कसोटी मालिका व्हाव्यात असं ठरवलं. यात यजमान पद भारताकडे असणार होतं.
1998 मध्ये महाराष्ट्रात भाजप-सेना युतीचं सरकार सत्तेवर होतं. जानेवारी 1999 मध्ये भारत-पाकिस्तान दरम्यान एक कसोटी मुंबई येथे होण्याची शक्यता होती.
पण पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळायचं नाही, अशी भूमिका शिवसेनेनं घेतल्यानं तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी ती कसोटी रद्द केली. त्यामुळे मुंबईत होणारा सामना दिल्लीला हलवावा लागला.

फोटो स्रोत, RAVI RAVEENDRAN
10 वर्षांनंतर दोन्ही संघ कसोटीसाठी आमनेसामने येणार होते. भारताचा सर्वोत्कृष्ट फलंदाज सचिन तेंडुलकर आणि पाकिस्तानचा सर्वोत्तम गोलंदाज वसीम अक्रम यांना आमने सामने बघण्यासाठी क्रिकेटप्रेमी उत्सुक होते.
परंतु दिल्लीत देखील शिवसेनेने विरोध केला. 'इंडियन एक्स्प्रेस'ने त्यादिवशी नेमकं काय घडलं याचं वृतांकन केलं होतं.
त्या रिपोर्टमध्ये लिहिलं आहे की, 'रात्री अकरा वाजता शिवसैनिक फिरोझशाह कोटलाच्या आतमध्ये गेले. लोखंडी रॉडच्या साह्याने त्यांनी खेळपट्टी खणली.
त्यानंतर त्यांनी माध्यमप्रतिनिधी आणि छायाचित्रकारांना घटनास्थळी बोलावलं. त्यांनी फोटो काढून घेतले, पाकिस्तान दौऱ्याच्या निषेधाची पत्रकं वाटली. अर्ध्या तासात शिवसेनेचा ध्वजही मैदानात रोवण्यात आला.'
'थोड्या वेळात जवळच्या इंद्रप्रस्थ इस्टेट स्टेशनमधून पोलिसांचा ताफा कोटलामध्ये पोहोचला. आम्ही मैदानात पोहोचलो तेव्हा सुरक्षेसाठी केवळ दोनच सुरक्षारक्षक असल्याचं शिवसैनिकांनी सांगितलं. अशाप्रकारे खेळपट्टी खणण्याचा प्रकार होईल याची आम्ही कल्पना नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं होतं.'

फोटो स्रोत, Getty Images
'खेळपट्टी खणल्याप्रकरणी चार शिवसैनिकांना अटक करण्यात आली. शिवसेनेने दिलेल्या इशाऱ्यासंदर्भात त्याच दिवशी संध्याकाळी दिल्ली अँड डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी आणि विशेष सचिव यांची बैठक झाली होती. मात्र शिवसैनिक इतकं टोकाचं पाऊल उचलतील याची कल्पना नव्हती असं संघटनेने सांगितलं.'
खेळपट्टीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं. खेळपट्टी पूर्ववत करण्यासाठी दहा ते पंधरा दिवसांचा कालावधी लागेल मात्र सामना नियोजित दिवशी होईल असं संघटनेनं म्हटलं होतं.
साप सोडण्याची शिवसेनेची धमकी, मैदानावर 40 सर्पमित्र तैनात
या घटनेनंतर शिवसेनेने पाकिस्तानी क्रिकेटपटूंना भारतात खेळण्यापासून रोखण्यासाठी ‘कोणत्याही मर्यादेपर्यंत’ जाऊ असं जाहीर केलं.
एएफपीच्या वृत्तानुसार, तेव्हा शिवसेनेच्या दिल्ली युनिटचे प्रमुख जय भगवान गोयल म्हणाले होते, "खेळ मित्रांमध्ये खेळला जातो शत्रूंमध्ये नाही. जो देश तुमचा नाश करण्याच्या तयारीत आहे त्याच्याशी तुम्ही कसे खेळू शकता?"
या सगळ्या सावळ्या गोंधळामुळे पहिली कसोटी चेन्नईला हलवावी लागली, तिथे प्रेक्षकांनी दोन्ही संघांचे मोठ्या उत्साहात स्वागत केलं. पाकिस्तानने एक थरारक कसोटी सामना जिंकला. तिथे या संघाला स्टँडिंग ओव्हेशन मिळालं.

फोटो स्रोत, Getty Images
मालिकेतील दुसरा कसोटी सामना दिल्लीत झाला आणि भारतातील सर्वोच्च क्रिकेट संस्था बीसीसीआयने सर्व खबरदारी घेतली.
शिवसैनिकांनी सामन्यादरम्यान विषारी साप मैदानात सोडू, अशी धमकी दिली होती. त्यावर उपाय म्हणून बीसीसीआयने 40 सर्पमित्र मैदानावर तैनात केले होते. अखेर सामना सुरळीत पार पडला.
क्रिकेट सामन्यांना विरोधामुळे भाजप-शिवसेनेतले मतभेद
ज्येष्ठ पत्रकार सुनील गाताडे या घटनेबद्दल सांगतात की, "शिवसेनेला उत्तर भारतात आपलं अस्तित्व दाखवून द्यायचं होतं आणि जय भगवान गोयल यांना प्रसिद्धी हवीच होती. पाकिस्तानशी कोणत्याही प्रकारचे संबंध नको ही तर शिवसेनेची भूमिका होतीच. त्यातून हा प्रकार घडला."
"शिवसेनेनं पहिल्यांदा दिल्लीत अशाप्रकारचं आंदोलन केलं होतं. या प्रकारामुळे तत्कालीन केंद्र सरकारची मात्र कोंडी झाली. त्यावेळी दिल्लीत एनडीएचं सरकार सत्तेवर होतं आणि अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान होते.
पाकिस्तानशी संबंध सुरळीत करण्याचा त्यांच्या सरकारचा प्रयत्न होता आणि त्यांच्याच मित्रपक्षानं हा प्रकार केला होता. पण त्यांनी यापासून स्वत:ला दूर ठेवलं होतं आणि खेळात राजकारण आणू नये, अशी त्यांची भूमिका होती."
पण विशेष म्हणजे पाकिस्तानी संघ भारतात येण्याआधीच शिवसेने तलवार म्यान केली होती.

फोटो स्रोत, Getty Images
खरंतर हा काळ शिवसेना भाजप यांच्यातील युतीच्या तणावाचा होता. महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि भाजपचा उपमुख्यमंत्री अशी वाटणी होती.
निवडणुकीचे वर्ष होतं अन् शिवसेना आपला ठसा देश पातळीवर उमटवण्यासाठी उत्सुक होती. कट्टर हिंदुत्वाचा कॉपीराइट कोणाचा यासाठी भाजप सेनेत बाबरी मशिदी पाडल्यानंतर सुप्त स्पर्धा सुरू झाली होती. त्यातूनच सेनेने भारत-पाकिस्तान सामना हा राष्ट्रीय पातळीवरचा मुद्दा बनवला.
याउलट पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे दोन्ही देशातील संबंध सुधारावे यासाठी क्रिकेट सामने झाले पाहिजेत या भूमिकेचे होते. अशातच बाळासाहेबांनी पाकिस्तान क्रिकेट टीमला भारतात खेळण्यास केलेला विरोध हा युतीतील वादाचा मुद्दा बनला.
तत्कालिन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडेंनी स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी चाचपणी सुरू केली. मात्र, त्यावेळी भाजप नेते प्रमोद महाजन बाळासाहेब ठाकरेंना भेटण्यासाठी ‘मातोश्री’वर गेले.
‘ट्रीब्यून इंडिया’ या वृत्तपत्राने 21 जानेवारी 1999 साली छापलेल्या लेखात असं म्हटलंय की, 'बाळासाहेब ठाकरे यांच मन वळवण्यासाठी आणि शिवसेनेने केलेल्या गंभीर संकल्पाचे परिणाम लक्षात घेऊन
तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांचम मन वळवण्यासाठी अडवाणींना मुंबईला पाठवलं होतं. त्यावेळेस माहिती आणि प्रसारण मंत्री असलेले प्रमोद महाजन अडवाणींसोबत होते. यावेळेस ठाकरे-अडवाणी-महाजन अशी तासाभराची बैठक झाली.'
'या दोन्ही नेत्यांनी पत्रकार परिषदेत संयुक्त निवेदन वाचून दाखवलं. त्यात असं म्हटलं होतं की पंतप्रधान वाजपेयी यांनी केलेल्या विनंतीला मान देऊन शिवसेना प्रमुख बाळ ठाकरे यांनी पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यांच्या मालिकेला विरोध करण्याचा निर्णय या वर्षासाठी स्थगित केला आहे.
या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मनोहर जोशी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे आणि बाळासाहेब ठाकरेंचे पुतणे राज ठाकरे हेही उपस्थित होते.'
विरोधाची भूमिका मागे का घेतली यावर बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की, भाजप आणि शिवसेनेतील मतभेदाचा फायदा काँग्रेसने घेतलेला त्यांना आवडणार नाही म्हणून त्यांनी पंतप्रधानांची विनंती मान्य केली होती.
प्रमोद महाजन यांची शिष्टाई कामी आली आणि भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून युतीचा तुटणारा संसार वाचला.
जावेद मियांदाद आणि बाळासाहेब ठाकरेंची भेट

फोटो स्रोत, Getty Images
शिवसेनेचा भारत-पाकिस्तान सामन्यांना विरोध होता, मात्र 2004 साली मातोश्रीवर एका पाकिस्तानी क्रिकेटपटूचं स्वागत मात्र झालं होतं.
30 जुलै 2004 रोजी पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू जावेद मियांदाद यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली.
दुसऱ्या दिवशी बहुतांश वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर या भेटीचं छायाचित्र आणि तपशील छापून आला.
मियांदाद यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीवेळी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे तत्कालीन उपाध्यक्ष आणि माजी खेळाडू दिलीप वेंगसरकरही उपस्थित होते.
"जावेद मियांदाद क्रिकेटपटू म्हणून मला आवडतो. 1986 साली ऑस्ट्रेलेशिया कप स्पर्धेत चेतन शर्माच्या गोलंदाजीवर शेवटच्या चेंडूवर मियांदादने षटकार खेचत पाकिस्तानला विजय मिळवून दिला होता. तो षटकार मी विसरू शकत नाही," असं बाळासाहेबांनी भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं होतं.
शिवसेनाप्रमुखांशी झालेल्या भेटीसंदर्भात मियांदाद यांना विचारलं असता ते म्हणाले, त्यांना क्रिकेट आवडतं.
अशा भेटी भविष्यातही होतील अशी आशा आहे. यातूनच दोन देशांमधील संबंध सुधारण्यासाठी मदत होऊ शकते. शिवसेनेने हिरवा कंदील दिला तर मुंबईत भारत-पाकिस्तान लढती होऊ शकतात.
मियांदाद यांच्या 'मातोश्री' भेटीनंतर विरोधी पक्षांनी शिवसेनेवर टीका केली होती. यासंदर्भात शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून बाळासाहेबांनी भूमिका मांडली.
ते लिहितात, 'मियांदादच्या भेटीचे राजकीय अर्थ काढले जात आहेत. त्यांच्या भेटीने शिवसेना आणि शिवसैनिकांच्या भूमिकेत काहीही बदल होणार नाहीत.'
मियांदादच्या 'मातोश्री' भेटीचा वापर माध्यमांमधील काहींकडून गोबेल्स प्रपोगंडासारखा केला जात आहे. पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंना भारतात खेळण्याची परवानगी मिळावी अशी विनंती मियांदाद यांनी केली. मी या विनंतीला नकार दिला, असंही बाळासाहेबांनी सांगितलं होतं.

फोटो स्रोत, JOHN MACDOUGALL
पाकिस्तानचे भारत दौरे न होऊ देण्याची शपथ
• 2005 साली पाकिस्तान भारत दौऱ्यावर येणार होता. परंतु, शिवसेनेच्या अनेक शिवसैनिकांनी अशी शपथ घेतली होती की, पाकिस्तानला संपूर्ण भारतात कोठेच खेळू देणार नाही.
पण पाकिस्तान संघ भारतीय दौऱ्यावर आला. त्यावेळी दिल्ली मधल्या एकदिवसीय सामन्यावेळी भारतीय विद्यार्थी सेना, जी शिवसेनेची एक विद्यार्थी शाखा आहे; त्यांनी स्टेडियम बाहेर निदर्शने केली होती.
• 2006 मध्ये भारतात चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेसाठी पाकिस्तानचा संघ भारतात येणार होता. पाकिस्तानचे सामने ज्या ठिकाणी होणार आहेत अशा जयपूर आणि मोहाली या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल, असंही शिवसेनेने सांगितलं.
पाकिस्तानला भारतात खेळू देणार नाही असा इशारा शिवसेनेने दिला होता. मात्र पाकिस्तानचा संघ भारतात दाखल झाला. पाकिस्तानचे सामने सुरळीतपणे पार पडले.
• 2010 मध्ये शाहरूख खान आयपीएल स्पर्धेत पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंच्या सहभागासंदर्भात बोलला. पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंना आयपीएलमध्ये खेळायला मिळावं अशी शाहरुखची भूमिका होती.
शिवसेनेने शाहरुखविरोधात आंदोलन केलं. शाहरुखचा 'माय नेम इज खान' चित्रपट ज्या चित्रपटगृहांमध्ये सुरू होता तिथे काही ठिकाणी शो बंद पाडण्याचे प्रयत्न झाले.
• 2014 मध्ये प्रो कबड्डी स्पर्धेत पाकिस्तानच्या खेळाडूंना सहभागी करून घेऊ नका असा इशारा शिवसेनेने दिला. महाराष्ट्रात झालेल्या सामन्यांमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंना खेळवण्यात आलं नाही.
हेही नक्की वाचा
हा व्हीडिओ पाहिलात का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








