पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांचे समर्थक कोण आणि विरोधात कोण?

फोटो स्रोत, Reuters
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मंगळवार, 9 मेला इस्लामाबाद कोर्टाच्या बाहेर अटक झाली.
त्यांच्या अटकेनंतर इस्लामाबाद हायकोर्टाच्या सुनावणी दरम्यान शहराचे पोलीस प्रमुख अकबर नासिर कोर्टात हजर झाले आणि त्यांनी म्हटलं की इम्रान खान यांना भ्रष्टाचार प्रकरणी अटक झाली आहे.
त्याआधी 8 मेला इम्रान खान यांनी ट्विटरवर पाकिस्तानचे विद्यमान पंतप्रधान शहबाज शरीफ यांना अनेक प्रश्न विचारले होते. त्यांनी विचारलं होतं की ‘सैन्य अधिकारी कायद्यापेक्षा वरचे आहेत का? मला (इम्रान) घटनात्मक अधिकाराचा वापर करण्यापासून का थांबवलं जातंय?’
इम्रान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तानातल्या शेअर बाजारावरही याचा परिणाम दिसला. 9 मेला पाकिस्तानी शेअर बाजार 400 अंकांनी गडगडला.
स्टॉक मार्केटच्या जाणकारांनुसार देशाच्या राजकीय-आर्थिक परिस्थितीमुळे आधीपासूनच पाकिस्तानातला शेअर बाजार दबावाखाली होता. त्यात इम्रान खान यांना अटक झाल्यानंतर आणखी गडगडला. त्यांच्या अटकेनंतर एका तासाच्या आत शेअर विक्रीसाठी झुंबड उडाली.
शेअर मार्केटमधल्या तज्ज्ञांना वाटतंय की इम्रान खान यांच्या अटकेमुळे देशात राजकीय अस्थिरता आणखी वाढेल आणि त्याचा स्टॉक मार्केटवर वाईट परिणाम होईल.
‘पाकिस्तानात राजकीय अस्थिरता वाढेल’
इम्रान खान यांच्या अटकेची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून चालू होती. बीबीसी हिंदीच्या प्रतिनिधी प्रेरणा यांनी बीबीसी उर्दूचे संपादक आसिफ फारूकी यांच्याशी या बाबतीत सविस्तर बातचीत केली. त्याचा सारांश खालीलप्रमाणे –

फोटो स्रोत, EPA
प्रश्न : इम्रान खान यांच्या अटकेची गेले अनेक दिवस फक्त चर्चा होत होती, मग मध्येच अचानक त्यांना अटक कशी झाली?
उत्तर : हे अचानक घडलेलं नाही. पडद्यामागे कारवाई होत होती. नॅशनल अकाऊंटिबिलीट ब्यूरो (नॅब) पाकिस्तानातल्या भ्रष्टाचारासाठी उत्तरदायी संस्था आहे.
त्यांनी इम्रान खान आणि त्यांच्या पत्नीला नोटीस पाठवली होती. यात असं म्हटलं होतं की त्यांनी सादर व्हावं आणि काही प्रश्नांची उत्तरं द्यावीत. या नोटीशीचं उत्तर न दिल्यामुळे त्यांच्या अटकेची वेळ आली.
हे प्रकरण इम्रान खान पदावर असतानाचं आहे. तेव्हा त्यांनी पंजाबमध्ये (पाकिस्तानातलं) अध्यात्म आणि सुफीवादावर काम करणारं एक विद्यापीठ उभारण्याची परवानगी दिली होती.
ते विद्यापीठ बनवण्यासाठी पंजाब सरकारने काही जमीन खरेदी केली होती. नॅशनल अकाऊंटिबिलीटी ब्यूरोचं म्हणणं आहे की इम्रान खान आणि त्यांच्या पत्नीने या जमिनीच्या खरेदीत घोटाळा केला.
जमीन बेकायदेशीर पद्धतीने खरेदी केली गेली ज्यामुळे सरकारला नुकसान झालं. यावरूनच इम्रान खान यांच्यावर इम्रान खान यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत.
नॅशनल अकाऊंटेबिलिटी ब्युरोचा वापर
प्रश्न : नॅशनल अकाऊंटेबिलिटी ब्यूरोची कमान कोणाच्या हातात आहे आणि ही संस्था कशाप्रकारे काम करते?

फोटो स्रोत, KHALID CHAUDHARY
उत्तर : गेल्या काही वर्षांत ही संस्था वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. परवेज मुशर्रफ यांनी आपल्या कार्यकाळात या संस्थेची स्थापना केली होती. त्यांनी या संस्थेचा वापर विरोधी पक्षनेत्यांना गप्प करण्यासाठी अनेकदा केला.
या संस्थेकडे अनेक अधिकार होते. नॅशनल अकाऊंटेबिलिटी ब्यूरो कोणालाही अटक केल्यानंतर 60 दिवसांसाठी रिमांडमध्ये घेऊ शकत होती.
इम्रान खान यांच्या कार्यकाळात पाकिस्तान मुस्लीम लीगचे नेतेही या संस्थेच्या ताब्यात होते. यात नवाज शरीफ आणि मरियम नवाज यांचा समावेश होतो.
जेव्हा इम्रान खान यांचं सरकार कोसळलं तेव्हा सरकारने विचार केला की या संस्थेकडे मोठ्या प्रमाणात अधिकार आहेत आणि त्याच्या मदतीने विरोधी पक्षनेत्यांवर कारवाई करता येऊ शकते. त्यामुळे त्यांनी या संस्थेचे अधिकार कमी केले.
आज या संस्थेकडे गेल्या वर्षापर्यंत होते त्यापेक्षा कमी अधिकार आहेत. पण सगळ्यांच सरकारांनी आपल्या राजकीय अजेंड्यासाठी या संस्थेचा वापर केला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
प्रश्न : इम्रान खान यांच्याकडे काय कायदेशीर पर्याय आहेत? त्यांना अनेकदा कोर्टातून दिलासा मिळाला आहे, आता यावेळी काय घडू शकतं?
उत्तर : हा कायदेशीर नाही तर राजकीय प्रश्न झाला आहे. कायद्यांव्दारे त्यांना दिलासा मिळतो आणि मग नव्याने केसेस दाखल होतात.
जसं मी आधी म्हटलं की नॅशनल अकाऊंटेबिलिटी ब्यूरो आता तेवढा प्रभावी उरला नाहीये जेवढा अगदी मागच्या वर्षापर्यंत होता. तेव्हा लोकांना जामीन मिळणं फार अवघड होतं. दोन-दोन वर्षं त्यांना जामीन मिळत नव्हता.
पण आता तुलनात्मक रितीने इम्रान खान यांना जामीन मिळणं सोपं आहे.
पण पाकिस्तानातल्या राजकीय नेत्यांवर जेव्हा भ्रष्टाचाराची प्रकरण दाखल होतात तेव्हा त्यांना कायदेशीर स्तरावर पाहातानाच राजकीय दृष्टीनेही पाहावं लागतं.
यानंतरच तुम्हाला कळू शकतं की हे प्रकरण नक्की कधी संपेल. इम्रान खान प्रकरणातही आता कायदेशीर युक्तीवाद जास्त महत्त्वाचे नाहीत. खरंतर आमच्याकडची राजकीय परिस्थिती सगळ्या बाबींवर प्रभाव टाकते आहे.
सैन्याचं समर्थन
प्रश्न : पाकिस्तानात इम्रान खान यांच्या पक्षाचे लोक वगळता त्यांना कोणाचं समर्थन आहे आणि कोण त्यांच्या विरोधात आहेत?

फोटो स्रोत, Getty Images
उत्तर : आम्ही हे पाहिलंय की इम्रान खान सत्तेबाहेर गेले तेव्हापासून त्यांना कोर्टाकडून अनेकदा दिलासा मिळाला आहे.
इम्रान खान यांचे विरोधक तर असंही म्हणत आहेत की कोर्टात सुनावणी करणारे न्यायाधीशही तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे समर्थक बनून इम्रान खान यांच्या बाजूने निर्णय देत आहेत.
याआधीही इम्रान यांच्या अटकेचे अनेक प्रयत्न झाले, पण त्यांना कोर्टाकडून अभूतपूर्व रितीने दिलासा दिला गेला.
ते कोर्टासमोर हजर होत नाहीत तोपर्यंत कोर्टाने त्यांच्यासमोरचं पकड वॉरंट सस्पेंड ठेवलं.
जेव्हाही ते कोर्टासमोर हजर झाले, त्यांना जामीन मिळाला. गेल्या वर्षी पाकिस्तानी सैन्यानेही म्हटलं होतं की आता सैन्य राजकीय बाबींमध्ये हस्तक्षेप करणार नाही.
तज्ज्ञांना वाटतं की गेल्या वर्षं, दीड वर्षांत सैन्याने बऱ्याच अंशी स्वतःला राजकारणापासून दूर ठेवलं आहे. पण यामुळे पाकिस्तानाच्या सत्तावर्तुळात एक रिकामी जागा तयार झाली जी न्यायालयांनी भरून काढली.
आता कोर्ट वारंवार इम्रान खान यांना दिलासा देत असल्याने असं वाटतंय की ते लोकांसमोर प्रस्थापित होत आहेत. खान यांचा दावा आहे की सैन्यात असे लोक आहेत जे त्यांचं समर्थन करतात आणि त्यांना कोर्टाकडून समर्थन मिळत आहेच.
इम्रान खान पाकिस्तानातल्या इतर राजकारण्यांसारखे नाहीत. त्यांच्याकडे एक खास ताकद आलेय जिचा ते पूरेपूर वापर करतात.
राजकारणावर परिणाम
प्रश्न : या अटकेचे राजकीय पडसाद काय असतील? पाकिस्तानात यावर्षी निवडणुका आहे, पण आताची परिस्थिती पाहात निवडणुका होतील असं वाटतं का?

फोटो स्रोत, ANI
उत्तर : या अटकेचे काय परिणाम होतात हे तेव्हाच कळेल जेव्हा अटक किती काळासाठी झालीये हे स्पष्ट होईल.
जर एका महिन्यात ते जामीनावर बाहेर आले तर इम्रान खान यांना राजकीयदृष्ट्या फायदाच होईल.
पण जर निवडणुका होईपर्यंत ते अटकेत राहिले तर याचा तहरीक-ए-इन्साफला फटका बसेल. कारण इम्रान खान यांचा पक्षही पाकिस्तानातल्या इतर पक्षांसारखा व्यक्तीकेंद्रीत पक्ष आहे.
जर इम्रान खान स्वतः रस्त्यावर आले तरच लोक त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरतात. जर निवडणूक प्रचारात इम्रान खान स्वतः येऊ शकले नाहीत तर मग त्यांच्या पक्षासाठी हा कालखंड कठीण असेल.
याची दोन कारणं आहेत – एकतर जेव्हा उमेदवारांना तिकीट द्यायची वेळ येईल तेव्हा प्रश्न उद्भवतील आणि दुसरं जर इम्रान खान स्वतः लोकांना आवाहन करायला नसतील तर पक्षाला फटका बसेल.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








