बिलावल भुट्टोः चर्चेसाठी वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी भारताची आहे

- Author, विनित खरे
- Role, बीबीसी प्रतिनिधी, गोव्यामधून
पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन म्हणजेच एससीओ बैठकीसाठी गोव्यात आले आहेत.
त्यांच्याशी बीबीसीने संवाद साधला असता त्यांनी “चर्चेसाठी वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी भारताची आहे," असं विधान केलं आहे.
काश्मीरबाबतीत पाकिस्तानच्या धोरणात काहीही बदल झालेला नाही असंही त्यांनी सांगितलं.
बिलावल भुट्टो यांनी भारतात येण्याचा घेतलेला निर्णय अनेकांना चकीत करणारा होता. कारण या संघटनेच्या पूर्वीच्या बैठकांत पाकिस्तानी परराष्ट्र मंत्र्यांनी नेहमीच व्हर्च्युअल उपस्थिती लावलेली होती.
गेल्या 12 वर्षांत भारतात येणारे बिलावल हे पहिलेच पाकिस्तानी परराष्ट्र मंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक हालचालीकडे, वर्तनाकडे, उद्गारांकडे आणि त्यांच्या हावभावावरही माध्यमांचं लक्ष आहे.
भारतीय परराष्ट्र मंत्र्यांनी पाकिस्तानच्या मंत्र्यांशी हस्तांदोलन केलं नाही, अशा बातम्या माध्यमांत झळकल्या होत्या.
त्यातच बैठक संपल्यावर भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांना ते ‘कट्टरवादाचे पुरस्कर्ते आणि प्रवक्ते’ आहेत असं संबोधलं.
‘मदत मागत ही नाहीये किंवा ते मदत देतही नाहीयेत’
सध्या पाकिस्तानात राजकीय अस्थैर्य आणि भयंकर मोठं आर्थिक संकट आहे. अशा स्थितीत पाकिस्तानचा शेजारी देश असणारा भारत काही मदत करू शकतो का?
गेल्या काही काळात भारताने संकटग्रस्त अफगाणिस्तान आणि तुर्कस्तानला मदत केली आहे, त्यामुळेच भारत पाकिस्तानलाही मदत करणार का असा प्रश्न विचारला जात आहे.
हा प्रश्न भुट्टो यांना विचारल्यावर त्यांनी स्मित करुन, “आम्ही मदत मागतही नाही आहोत आणि ते (भारत) मदत देत ही नाहीयेत”, असं उत्तर दिलं.
काश्मीरचा प्रश्न
पाकिस्तान जोवर कट्टरवादाला प्रोत्साहन देणं थांबवत नाही तोवर पाकिस्तानशी चर्चा होणार नाही अशी भारताची भूमिका आहे. तर भुट्टो यांनी बीबीसीच्या मुलाखतीत सांगितलं, “जोपर्यंत भारत 5 ऑगस्ट 2019 रोजी घेतलेल्या निर्णय़ाचा पुनर्विचारकरणार नाही तोपर्यंत चर्चा सफल होणार नाही.”
5 ऑगस्ट 2019 रोजी भारताने काश्मीरचा विशेष दर्जा समाप्त करुन जम्मू काश्मीरला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित केलं होतं. त्यानंतर पाकिस्तानने भारताशी कुटनितीच्या दर्जामध्ये घट केली.
गोव्यात भुट्टो म्हणाले, “सध्याच्या स्थितीत चर्चेसाठी पोषक वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी भारताची आहे. पाकिस्तानच्या दृष्टीने 5 ऑगस्ट 2019 रोजी केलेली कारवाई गंभीर आहे आणि जोपर्यंत त्याचा पुनर्विचार केला जात नाही तोपर्यंत दोन्ही बाजूंनी सुफळ चर्चा होणं कठीण आहे.”

फोटो स्रोत, @BBHUTTOZARDARI
बिलावल भारतात आलेच आहेत तर ते द्विपक्षीय चर्चा करणार का असं विचारल्यावर भुट्टो यांनी आपण एससीओ बैठकीसाठी आलो आहोत आणि “यजमानांनी कोणत्याही द्विपक्षीय चर्चेचं सुतोवाच केलेलं नाही असं सांगितलं.”
भारतात आल्यामुळे भुट्टो यांच्यावर पाकिस्तानात टीका होत आहे. त्याबद्दल विचारल्यावर भुट्टो म्हणाले, “काश्मीरच्या बाबतीत आमच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही.”
5 मे 2023 शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी “आता कलम 370 इतिहासजमा झालेलं आहे”, असं स्पष्ट केलं.
कट्टरतावादावर प्रश्न विचारल्यावर...
एससीओ बैठकीनंतर झालेल्य़ा पत्रकार परिषदेत भारत हा कट्टरतावादाचा पीडित देश आहे असं एस. जयशंकर यांनी सांगितलं. ते म्हणाले, “कट्टरतावादाने पीडित असलेले (भारत) कट्टरतावादासाठी दोषी असलेल्यांशी (पाकिस्तान) कट्टरतावादावर चर्चा करत नाहीत.”
बीबीसीशी बोलताना भुट्टो म्हणाले, पाकिस्तान कट्टरतावादाने पीडित देश आहे. कट्टरतावादाने पाकिस्तानात जितके बळी घेतलेत तितके एससीओमधील कोणत्याही देशातील लोकांचे घेतलेले नाहीत.
आपली आई बेनझीर भुट्टो यांच्या हत्य़ेचा संदर्भ देत त्यांनी “मी स्वतः कट्टरतावादाचा पीडित असून त्याचं दुःख वैयक्तिकरित्या मला माहिती आहे,” असं सांगितलं.
ते म्हणाले, जर खरंच ठरवलं तर कट्टरतावादावर तोडगा काढण्यासाठी खऱ्या वास्तव चिंता आणि अशी विधानं करणं यात अंतर राखलं पाहिजे. भारताची कट्टरतावादाबद्दलची जी चिंता आहे त्यावर तोडगा निघावा असं आम्हालाही वाटतं, आणि पाकिस्तानला स्वतःच्या अशा चिंताही आहेत.
गोव्यात येण्याचं कारण...
बिलावल भुट्टो गोव्यात येण्याच्या निर्णयाचं पाकिस्तानात काही ठिकाणी स्वागत झालं तर काही ठिकाणी त्यांच्यावर टीका झाली.
एससीओच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत पाकिस्तान व्हर्च्युअल रुपाने उपस्थित राहिला मग बिलावल भुट्टो झरदारी यांनी भारतात येण्याची काय गरज होती, ते सुद्धा व्हर्च्युअल रुपाने उपस्थित राहू शकले असते असा विचार मांडण्यात आला होता.
भारतात जाऊन बिलावल यांनी पाकिस्तानच्या आजवरच्या भूमिकेला क्षीण केलं आहे, असं त्यांना प्रश्न विचारणाऱ्या लोकांना वाटतं.

बीबीसीने साधलेल्या संवादात बिलावल यांनी आपलं या बैठकीला येणं हे पाकिस्तान या संघटनेतील आपल्या भूमिकेकडे किती गांभिर्याने पाहातोय याचा संदेशच आहे.
“इतर मंत्र्यांची व्हर्च्युअल उपस्थिती आणि माझी स्वतः लावलेली उपस्थिती बाबत बोलायचं झालं तर बाकीच्या गोष्टी या एससीओच्या केवळ तांत्रिक स्वरुपाच्या भाग आहेत मात्र राष्ट्राध्यक्ष किंवा परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकांइतक्या त्या सक्षम नाहीत.”
“त्यामुळेच पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पाकिस्तानचं प्रतिनिधित्व करणं आणि एका महत्त्वाच्या व्यासपीठावर पाकिस्तानची भूमिका समोर आणणं, आमच्या दृष्टीने गरजेचं होतं.”
भुट्टो गोव्यात येण्याबद्दल जयशंकर यांना प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले,” ते एससीओचे सदस्य आहेत म्हणून इथं आले आहेत. यापेक्षा तुम्ही यात आणखी काही शोधू नका. इतकाच त्याचा अर्थ आहे.”
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









