मोदींना 'गुजरातचा कसाई' म्हणणाऱ्या बिलावल भुत्तोंच्या कुटुंबीयांचे भारताशी 'असे' होते संबंध

भारत पाकिस्तान

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, इकबाल अहमद
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुत्तो यांचं एक वक्तव्य सध्या चर्चेत आहे. 15 डिसेंबर 2022 रोजी पार पडलेल्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीनंतर बिलावल भुत्तो यांनी नरेंद्र मोदी यांना ‘गुजरातचे कसाई’ म्हटलं.

यापूर्वी भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी पाकिस्तानचा उल्लेख ‘दहशतवादाचे केंद्र’ असा केला आणि त्यानंतर त्यांना प्रत्युत्तर देताना बिलावल भुत्तो यांनी मोंदीविरोधात हे वक्तव्य केलं.

बिलावल भुत्तो यांच्या या वक्तव्याचा भारताने निषेध केला. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी 19 डिसेंबरला बिलावल यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, ‘पाकिस्तानकडून हीच अपेक्षा केली जाऊ शकते.’

बिलावल भुत्तो हे पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांचे पुत्र आहे. बेनझीर दोन वेळा पाकिस्तानच्या पंतप्रधान राहिल्या आहेत. तर बिलावल यांचे आजोबा जुल्फीकार अली भुत्तो पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री, राष्ट्रपती (1971 ते 1973) आणि पंतप्रधान (1974 ते 1977) होते.

हा फोटो 2003 सालचा आहे. भारताचे तत्कालीन उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांना भेटण्यासाठी त्या दिल्ली येथे गेल्या होत्या.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, हा फोटो 2003 सालचा आहे. भारताचे तत्कालीन उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांना भेटण्यासाठी बेनझीर भुत्तो दिल्ली येथे आल्या होत्या.

यापूर्वीही बेनझीर भुत्तो (1953-2007) आणि जुल्फीकार भुत्तो (1928-1979) यांनीही अशा प्रकारची वादग्रस्त वक्तव्य केली होती. पण त्यांचे भारताशी संबंध चांगले होते असं जाणकार सांगतात. बेनझीर भुत्तो आणि जुल्फीकार भुत्तो दोघांचे निकटवर्तीय आणि कौटुंबिक मित्र भारतीय होते.

याची राजकीय पार्श्वभूमी पाहता याचं एक कारण असंही असू शकतं की, त्यांनी भारताविरोधात कितीही कठोर धोरण आखलं तरी भुत्तो यांचे भारताशी असलेले संबंध चार पिढ्यांचे आहे हे वास्तव सुद्धा नाकारता येत नाही.

शाहनवाज भुत्तो (सिंध) मोठे जमीनदार होते आणि असंही म्हटलं जातं की त्यांच्याकडे जवळपास अडीच लाख एकर जमीन होती. सिंध त्यावेळी बॉम्बे प्रेसिडेंसीचा भाग होता. त्यांनी हिंदू राजपूत महिला लाखीबाई यांच्याशी विवाह केला. विवाहानंतर त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला होता. त्यांना खुर्शीद बेगम म्हणायचे.

शाहनवाज आणि खुर्शीद बेगम यांना चार मुलं आणि एक मुलगी होती. जुल्फीकार अली भुत्तो हे शहानवाज आणि खुर्शीद बेगम यांचे तिसरे पुत्र होते. शाहनवाज भुत्तो यांची मुंबईत बरीच संपत्ती होती. त्याकाळी जुल्फीकार अली भुत्तो मुंबईतील कॅथेड्रल शाळेत शिकत होते.

पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो आणि भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो आणि भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी शाहनवाज भुत्तो भारतातील जुनागड संस्थानाचे पंतप्रधान होते.

15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला आणि पाकिस्तानचा जन्म झाला. त्यावेळी जुनागड संस्थानाचे शेवटचे नवाब मोहम्मद महाखबत खान तृतीय यांनी पाकिस्तानात विलीन होण्याचा निर्णय घेतला.

पाकिस्तानने हे मान्य केलं परंतु जुनागडच्या हिंदू बहुल जनतेने मात्र विरोध केला आणि जुनागड पुन्हा भारतात सामील झालं. त्यानंतर जुनागडचे नवाब आणि शाहनवाज भुत्तो दोघंही पाकिस्तानात गेले.

जुल्फिकार अली भुत्तो पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बनले. 1963 मध्ये भारताचे तत्कालीन परराष्ट्रमंत्री स्वर्ण सिंह यांच्याशी त्यांनी त्यावेळी चर्चा केली होती. या बैठकीची कोणतीही अधिकृत नोंद नाही परंतु अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या एका मेमोच्या माध्यमातून (27 जानेवारी 1964) माहिती मिळते की, भारतशासित काश्मीरमध्ये जनमत एकत्र करण्याबाबत भुत्तो माघार घेण्यास तयार झाले होते. तसंच जनमत मिळवण्याऐवजी इतर कोणताही मार्ग स्वीकारण्यासाठी त्यांनी तयारी दर्शवली होती.

काश्मीरचा मुद्दा वादग्रस्त आहे असं भारतानेही मान्य केलं होतं. पण ही चर्चा अपयशी ठरली. त्यानंतर पाकिस्तानने संयुक्त सुरक्षा परिषदेत काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला.

या दरम्यान भुत्तो यांच्याविरोधात एक गंभीर आरोप झाला. ‘ऑपरेशन जिबरॉल्टर’अंतर्गत त्यांनी भारतशासित काश्मीरमध्ये प्रशिक्षित मुलांना पाठवलं असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला.

1965 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झालं आणि संयुक्त राष्ट्राने याची दखल घेतली. त्यानंतर 1966 मध्ये भारताचे तत्कालीन पंतप्रधान लालबहादुर शास्त्री आणि पाकिस्तानचे राष्ट्रपती अय्यूब खान यांच्यात ताश्कंद येथे एक करार झाला. भुत्तो त्यावेळी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री होते. त्यांनी याला विरोध केला.

भुत्तो कुटुंबाची राजकीय कारकिर्द जवळून पाहणारे आणि जुल्फिकार अली भुत्तो यांचं आत्मचरित्र (‘मेरा लहू’) लिहिणारे ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक फर्रूख सुहैल गोइंदी सांगतात, भुत्तो यांनी ही भूमिका घेतल्यानंतर त्यांच्या राजकारणाला नवीन दिशा मिळाली. त्यामुळे त्यांच्या राजकारणाची सुरूवात ताश्कंद कराराच्या विरोधापासूनच झाली.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि जुल्फीकार अली भुट्टो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि जुल्फीकार अली भुत्तो

1967 मध्ये एका रॅलीदरम्यान भुत्तो यांनी म्हटलं की, भारताविरोधात एक हजार वर्षांपर्यंत युद्ध लढणार. हे वक्तव्य लोकप्रिय ठरलं होतं.

फर्रूख सुहैल गोइंदी सांगतात, 60 च्या दशकात पाकिस्तानमध्ये भारत विरोधी राजकीय लाट होती आणि भुत्तो यांनी आपलं राजकारण पुढे नेण्यासाठी त्याचा पूर्ण फायदा घेतला.

15 डिसेंबर 1971 मध्ये भारतीय लष्कराने ढाका ((पूर्व पाकिस्तानची राजधानी जी नंतर बांग्लादेशची राजधानी बनली) जिंकलं. त्यादिवशी भुत्तो अमेरिकेत होते. त्यांनी संयुक्त राष्ट्र परिषदेत करार फाडून फेकला आणि बैठकीतून बाहेर आले. पण तरीही हेच भुत्तो 1972 मध्ये भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासोबत शिमला करार करतात. यात पाकिस्तानने पहिल्यांदा काश्मीर प्रश्न दोन देश चर्चा करून सोडवतील हे मान्य केलं आणि यामध्ये कोणीही तिसरं सामील होणार नाही,

शिमला करार झाल्यानंतर फ्रांसच्या एका वृत्तपत्राला त्यांनी मुलाखत दिली. पत्रकाराने त्यांनी ‘एक हजार वर्षांपर्यंत युद्ध करू आणि आता शिमला करार’ यात विरोधाभास असल्याचं विचारलं. यावर भुत्तो म्हणाले की, भारतीय उपखंडात मुस्लिमांचा इतिहास एक हजार वर्षं जुना आहे. आणि याविषयी ते वक्तव्य होतं. भारताशी एक हजार वर्षं युद्ध करणार असं ते वक्तव्य नव्हतं असा घुमजाव त्यांनी केला.

यानंतर दोन वर्षांत भारताने 1974 मध्ये पहिली अणु चाचणी केली. त्यावेळी भुत्तो यांनी लगेचच पत्रकार परिषद बोलावली आणि म्हणाले भारतीय उपखंड आता असुरक्षित आहे. पाकिस्तान सुद्धा आता अणुशक्ती बनणार. ‘आम्ही चारा खाऊ पण अणुबॉम्ब निश्चित बनवू.’ असंही ते म्हणाले होते.

फर्रूख सुहैल गोइंदी यांच्यानुसार, भुत्तो यांच्या बदललेल्या या विचारधारेचं मुख्य कारण पाकिस्तानचं अंतर्गत राजकारण होतं. ते सांगतात, पाकिस्तानचा पंजाब प्रांत भारताच्या जवळ असल्याने भारतातील राजकारणाचा परिणाम होतो आणि पाकिस्तानचा नेता जोपर्यंत पंजाबमध्ये लोकप्रिय होत नाही तोपर्यंत त्या नेत्याला पूर्ण पाकिस्तानचा नेता मानलं जात नाही.

पीपीपी सिंधचा पक्ष मानला जातो. त्यामुळे पंजाबमध्ये लोकप्रिया व्हायचं असेल तर तिकडे भारताविरोधात भूमिका घेणं आवश्यक मानलं जातं असंही गोइंदी सांगतात.

जुल्फीकार अली भुट्टो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जुल्फीकार अली भुत्तो

लाहोर येथील पाकिस्तानचे ज्येष्ठ पत्रकार सैय्यद मुमताज अहमद सांगतात, जुल्फीकार अली भुत्तो यांनी ताश्कंद कराराचा फायदा करून घेत अय्यूब खान यांच्याविरोधात एका आंदोलनाची सुरुवात केली आणि पाकिस्तानसमोर स्वत:ला ‘काश्मीरचे हिरो’ म्हणून प्रोजेक्ट केलं.

सुरुवातीला ताश्कंद येथे फॉर यूएनमध्ये भारत-पाकिस्तान सीजफायरची (1971) कागदपत्र फाडणं आणि नंतर शिमला करार करणं, भुत्तो यांच्या राजकीय विचारधारेत हा बदल का झाला?

फर्रुख सुहैल गोइंदी सांगतात, पंजाबी व्यवस्थेला त्यांना संदेश द्यायचा होता की ते पाकिस्तान विरोधी नाहीत. त्यांच्यानुसार पाकिस्तानची सत्ता, दक्षिणपंथी धार्मिक गट आणि विशेषत: लष्करात भुत्तो कुटुंबाला संशायाने पाहिलं जातं. म्हणजे मुस्लीम लीगला जसं पाहिलं जातं किमान तसं त्यांना पाहिलं जात नाही.

भुत्तो यांना अशा नजरेने पाहिलं जात होतं त्याचं एक कारण सांगतात फर्रूख गोइंदी म्हणाले, 1967 मध्ये जे आंदोलन त्यांनी सुरू केलं ते क्रांतिकारी होतं. डाव्या विचारधारेचा प्रभाव आंदोलनात दिसत होता आणि धार्मिक समूह आणि लष्कराच्या विरोधात होतं. त्यांच्यानुसार, या आंदोलनात सर्वाधिक सामान्य तरुण आणि कामगार वर्ग सहभागी होतं.

सैय्यद मुमताज अहमद सांगतात, 1971 च्या युद्धात पराभव झाल्यानंतर पाकिस्तान लष्कर कमकुवत झालं त्यामुळे भुत्तोवर ते अधिक दबाव टाकू शकत नव्हते.

ते सांगतात, म्हणूनच भुत्तो यांनी भारतासोबत शिमला करार केला आणि लष्कर काही करू शकलं नाही. शिमला करार केल्यानंतर लाहोरला पोहचल्या पोहचल्या भुत्तो यांनी हे सुद्धा स्पष्ट केलं की पाकिस्तानने काश्मीर प्रश्नावर कोणतीह तडजोड केलेली नाही.

भुत्तो यांनी आपल्या आईसाठी जाहीर शिवी दिली

जुल्फीकार अली भुत्तो यांच्या आई हिंदू राजपूत होत्या. त्यानंतर नंतर इस्लाम धर्म स्वीकारला. त्यामुळे या कारणासाठी भुत्तो दबावाखाली असायचे का आणि म्हणून स्वत:ला अधिक भारत विरोधी दाखवायचे का?

फर्रूख सुहैल गोइंदी सांगतात, भुत्तो यांना जाणीव होती की त्यांची आई एका सामान्य कुटुंबातील आहे. ते म्हणायचे, ‘मी एक गरीब आईचा मुलगा आहे आणि गरीबांना समाज कशी वागणूक देतं हे मी पाहिलं आहे.’

लाहोरमधील ज्येष्ठ पत्रकर सैय्यद मुमताज अहमद सांगतात, जमात-ए-इस्लामी पक्षाचे लोक आणि त्यांच्या वृत्तपत्रात भुत्तो यांची आई हिंदू असल्याच्या मुद्यावरून त्यांच्यावर निशाणा साधायचे.

ते सांगतात, 1977 मध्ये निवडणूक प्रचारादरम्यान भुत्तो यांनी एका रॅलीमध्ये म्हटलं की, ‘माझे राजकीय विरोधी माझ्या आईला रोज शिव्या देत असतात त्यामुळे मलाही त्यांना आज शिवी द्यावी वाटत आहे.’

पाकिस्तान राजकारण

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पाकिस्तान

पुढे त्यांनी रॅलीमध्ये सहभागी झालेल्या महिलांना घरी जाण्यास सांगितलं. तुम्ही शिव्या ऐकू नयेत असं सांगत त्यांनी महिलांना घरी पाठवलं. यानंतर भुत्तो यांनी रॅलीदरम्यान आपल्या राजकीय विरोधकांना पंजाबीमध्ये शिवी दिली असंही अहमद सांगतात.

दोन्ही राजकीय विश्लेषक असंही मानतात की, भुत्तो यांच्या राजकीय निर्णय प्रक्रियेत त्यांच्या आई हिंदू असण्याबाबत कोणता

बेनझीर भुत्तो

बेनझीर भुत्तो 1988 ते 1990 पर्यंत आणि 1993 ते 1996 पर्यंत अशा दोन वेळा पाकिस्तानच्या पंतप्रधान राहिल्या आहेत. त्यांनी राष्ट्रीय टीव्हीवर काश्मीरचा मुद्दा उपस्थित करत ‘आझादी, आझादी, आझादी’चे नारे दिले. पण त्यानंतर त्यांच्यातही बदल झाले.

बेनझीर भुत्तो कायम सांगायच्या की, त्यांचे तीन रोल मॉडल होते. त्यांचे वडील जुल्फीकार अली भुत्तो, जोन ऑफ आर्क आणि इंदिरा गांधी. ज्येष्ठ काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी पाकिस्तानमध्ये 1978-82 दरम्यान परराष्ट्र सेवा अधिकारी म्हणून काम केलं आहे.

अय्यर सांगतात, 1971 पूर्वीपर्यंतचा पाकिस्तानचा दृष्टिकोन बांग्लादेश बनल्यानंतर पूर्ण बदलला. “1971 पूर्वीचा पाकिस्तान असा विचार करायचा की एक मुसलमान हिंदुंचा (कधी चार, चाळीस तर कधी 400 म्हणायचे) सामना करू शकतो. उद्या संध्याकाळपर्यंत लाल किल्ल्यावर इस्लामचा झेंडा फडकणार.”

मणिशंकर अय्यर सांगतात, पाकिस्तानमध्ये ते असताना कोणीही असा विचार करत नव्हतं आणि भाराताशी संबंध सुधारावेत अशी इच्छा जनरल जिया-उल-हक यांचीही होती.

बेनझीर भुत्तो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बेनझीर भुत्तो

राजीव गांधी यांनी डिसेंबर 1988 आणि नंतर जुलै 1989 मध्ये पाकिस्तानचा दौरा केला होता. त्यावेळी बेनझीर भुत्तो या पाकिस्तानच्या पंतप्रधान होत्या. यापूर्वी 1960 मध्ये जवाहरलाल नेहरू यांनी पाकिस्तानचा दौरा केला होता.

अय्यर सांगतात, पहिल्यावेळेस राजीव गांधी सार्क संमलेनासाठी गेले होते. पण जुलै 1989 मध्ये राजीव गांधी, बेनझीर भुत्तो यांच्या विनंतीनंतर गेले होते.

सार्क बैठकीदरम्यान सुद्धा बेनझीर यांनी राजवी गांधी आणि सोनिया गांधी यांना आपल्या निवासस्थानी रात्री जेवणासाठी आमंत्रित केलं होतं.

इंग्लंडमध्ये विद्यापीठात एकत्र असताना बेनझीर भुत्तो आणि त्यांचे मित्र प्रसिद्ध ज्येष्ठ पत्रकार करण थापर जेवणाच्या या कार्यक्रमाचा उल्लेख करतात.

बेनझीर यांच्या निधनानंतर हिंदुस्थान टाईम्समध्ये आपल्या एका लेखामध्ये थापर लिहितात, “त्याकाळी राजीव गांधी आणि बेनझीर यांनी लग्न करायला हवं आणि दोन्ही देशांच्या समस्येवर तोडगा काढावा असं गंमत म्हणून म्हटलं जायचं. बेनझीर यांनी मला नंतर सांगितलं की डिनरच्या वेळेस आम्ही यावरून खूप हसलो. बेनझीर यांनी मला सांगितलं की राजीव (गांधी) हँडसम आहेत पण तेवढेच टफ आहेत.”

करण थापर यांच्या माहितीनुसार, बेनझीर भुत्तो यांनी लालकृष्ण आडवाणी यांच्या कुटुंबाशीही चांगली मैत्री केली होती. 2002 मध्ये अमेरिकेत त्यांची भेट झाली होती. त्यांनी आडवाणी यांच्यासाठी अमेरिकन लेखक रॉबर्ट कपलान यांचं पुस्तक भेट म्हणून पाठवलं होतं. तसंच यानंतरही अनेक भेटवस्तू त्यांनी आडवाणी यांना पाठवले.

करण थापर यांनी 2018 मध्ये आपलं पुस्तक ‘डेविल्स अडवोकेट: दि अनटोल्ड स्टोरी’मध्ये एक चॅप्टर बेनझीर यांच्यावर लिहिलं आहे. त्यांनी काश्मीर प्रकरणीही आपलं मत बदललं होतं.

बिलावल भुत्तो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बिलावल भुट्टो

करण थापर यांचं म्हणणं आहे की, 2001 नंतरच फ्री ट्रेड, सॉफ्ट बॉर्डर आणि काश्मीरच्या दोन भागांसाठी एक संयुक्त संसद याविषयी त्या बोलू लागल्या होत्या.

फर्रूख सुहैल गोइंदी सांगतात, भारत आणि पाकिस्तान एका युनीयनप्रमाणे काम करू शकतात असं बेनझीर यांना वाटत होतं.

मणिशंकर अय्यर सांगतात, राजीव गांधी यांच्या मृत्यूनंतर ते एकदा पाकिस्तानात गेले होते. राजीव गांधी फाऊंडेशनच्या एका कार्यक्रमासाठी त्यांना निमंत्रण द्यायचं होतं.

बांगलादेशी दौऱ्यावर जुल्फीकार अली भुट्टो आणि शेख मुजीब-उर रहमान

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बांगलादेशी दौऱ्यावर जुल्फीकार अली भुत्तो आणि शेख मुजीब-उर रहमान

अय्यर सांगतात की, त्यांनी निमंत्रण स्वीकारलं होतं पण काही कारणास्तव ते भारतात येऊ शकले नव्हते.

अय्यर यांच्यानुसार त्यावेळी बेनझीर यांनी सांगितलं की, “मला कल्पना आहे की काश्मीरबाबत वक्तव्य करून मी सर्वात मोठी चूक केली होती.”

भुत्तो कुटुंबाला भारत विरोधी म्हटलं जायचं का?

भारताच्या प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ता, लेखक आणि योजना आयोगाच्या सदस्य राहिलेल्या आणि जुल्फीकर अली भुत्तो यांच्यावर पुस्तक लिहिलेल्या सैय्या सैय्यदैन हमीद म्हणाल्या, जुल्फीकार अली भुत्तो भारताचा द्वेष करायचे याचा जसा पुरावा नाही तसाच ते भारतावर प्रेम करायचे याचाही कोणताही पुरावा नाही.

त्या सांगतात, त्यांनी संयुक्त राष्ट्राच्यावेळी आपल्या भाषणात आपल्या 11 वर्षांच्या मुलाचं मुर्तजा भुत्तो यांचं नाव घेऊन सांगितलं की त्याने त्यांना सांगितलं की भारत-पाकिस्तान सीजफायर (सरेंडर डॉक्यूमेंट) कागदपत्र घेऊन पाकिस्तानात परत येऊ नये.

सैय्यदा हमीदा सांगतात, भुत्तो यांनी फाशीपूर्वी जे शेवटचं भाष्य केलं त्यातही भारताचा कुठेही उल्लेख नव्हता. पण मुमताज अहमद सांगतात की, भुत्तो जवाहरलाल नेहरू यांना पसंत करत होते आणि असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही की ते नेहरूंना आपला आयडल मानत होते.

बेनझीर भुट्टो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बेनझीर भुत्तो

जनरल झिया यांनी भुत्तो यांना फाशी देण्याचा निर्णय जाहीर केला त्यावेळी इंदिरा गांधी यांनी प्रतिक्रिया देत विरोध केला होता. इंदिरा गांधी त्यावेळी विरोधक होत्या पण भारताचे तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी मात्र फाशीविरोधात कोणतंही वक्तव्य केलं नव्हतं.

भारतीय राजनेते पीलू मोदी आणि जुल्फीकार अली भुत्तो बालपणीचे मित्र होते. मुंबईत शहरी राहणीमान शिकवणारे त्यांचे उस्ताद होते असंही म्हणता येईल. अनेक वर्षांपर्यंत त्यांची मैत्री कायम राहिली. ‘जुल्फी, माय फ्रेंड’ असं पुस्तकही त्यांनी लिहिलं.

फर्रुख गोइंदी सांगतात, पीलू मोदी यांच्या निधनाच्या एक दिवस आधी त्यांची मुलाखत केली होती. त्यावेळी त्यांनी सांगितलं की, तरुण असताना भुत्तो यांना मुंबईत कपड्याचं दुकान सुरू करायचं होतं.

“अशी शक्यता होती की जुल्फीकर जास्त शिकले नसते तर त्यांचं कुटुंब आज मुंबईत असतं आणि त्यांचं कपड्यांचं दुकान असतं.” असंही फर्रूख गोइंदी सांगतात.

बिलावल यांचं वक्तव्य

बिलावल भुत्तो यांच्या वक्तव्याबाबत मुमताज अहमद सांगतात, भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पाकिस्तानबाबत जे वक्तव्य केलं त्यानंतर बिलावल यांच्याकडे पर्याय नव्हता त्यांना अशीच प्रतिक्रिया द्यावी लागणार होती.

“बिलावल भुत्तो यांना जुल्फीकार अली भुत्तो यांचा 1965 सालचा राजकीय वारसा पुन्हा जिवंत करण्याची संधी मिळाली आहे. भारतात बिलावल यांच्या विरोधात आंदोलनं झाली तर पाकिस्तानात त्यांचं राजकीय करिअर पुढे जाईल.” असंही ते सांगतात.

मणिशंकर अय्यर सांगतात, “भारताला हे समजायला हवं होतं की त्यांनी कठोर भाषा वापरली तर पाकिस्तानकडूनही त्याचं प्रत्युत्तर मिळेल.”

पुढे काय?

पाकिस्तान पुन्हा एकदा आपली 1971 च्या काळात असणाऱ्या विचारधारेच्या बाजूने झुकेल अशीही भीती मणिशंकर अय्यर यांना आहे. यावर एकच तोडगा आहे तो म्हणजे दोन्ही देशांनी पुन्हा चर्चेला सुरुवात करावी.

भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर

एका नेत्याच्या वैयक्तिक वक्तव्यापेक्षा आपलं हीत कशात आहे याला भारताने प्राधान्य द्यावं असंही ते सांगतात.

पाकिस्तानचे पत्रकार सैय्यद मुमताज अहमद सांगतात, पाकिस्तानच्या प्रत्येक राजकीय नेत्याला भारताशी चांगले संबंध बनवायचे आहेत पण भारतीय एस्टॅब्लिशमेंट म्हणजे लष्कराची ही इच्छा नाही. त्यामुळे विचार बदलत नाही तोपर्यंत भारत-पाकिस्तान यांचे संबंध सुधारणार नाहीत.

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)