बेनझीर भु्त्तो : वडिलांना फाशी, भावाचा खून, स्वतःचा मृत्यू बॉम्बस्फोटात... एका महिला नेत्याचं थरारक आयुष्य

- Author, अनघा पाठक
- Role, बीबीसी मराठी
फातिमा भुट्टो डिसेंबर 2007 मध्ये आपल्या आईचा प्रचार करत होत्या. त्यांची आई लारकानातून पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या उमेदवारच्या विरोधात निवडणूक लढवत होत्या. कादीर नावाचे एक गृहस्थ आले आणि फातिमांना दबक्या आवाजात म्हणाले, चला इथून निघायला हवं.
"मी नाखुशीनेच गाडीत बसले. कादीर यांनी मला खिडकीजवळ बसू दिलं नाही. दोन्ही बाजूला दोन माणसं बसली आणि मध्ये मला बसवण्यात आलं. मला आधी कळलं नाही काय घडतंय.गाडीचं दार लावून ते म्हणाले... तुझ्या आत्याची हत्या झालीये."
फातिमा काहीच बोलल्या नाहीत. त्यांची आत्या आणि त्यांच्यात अनेक वर्षं झाले संबंध बिघडले होते, का ते पुढे येईलच.
त्या बळजबरीने पुन्हा गाडीच्या खिडकीपाशी जाऊन बसल्या आणि कादीरला म्हणाल्या, "ते एका रात्रीत आणखी एका भुट्टोला मारू शकणार नाहीत."
बेनझीर भुट्टो यांनी 27 डिसेंबर 2007 साली पाकिस्तानातल्या रावळपिंडीत हत्या झाली. त्याबद्दल लिहिताना त्यांची भाची फातिमा भुट्टो यांनी आपल्या 'साँग्स ऑफ ब्लड अँड स्वोर्ड्स... अ डॉटर्स मेमोयर' या पुस्तकात लिहिलेला हा किस्सा.
त्या पुढे लिहितात, 'काही वर्षांपूर्वी माझे वडीलही असंच काहीसं बोलले होते... ते आणखी एका भुट्टोला मारू शकणार नाहीत. मी आईला, भावाला फोन लावण्याचा प्रयत्न केला पण कोणालाच फोन लागला नाही. त्यावेळी मला जाणीव झाली की ते आमच्यापैकी कोणालाही मारू शकतात. प्रत्येक दशकात झुल्फीकार आणि त्यांच्या कुटुंबातल्या कोणाची तरी हत्या झालेली आहे.'
भुट्टो कुटुंब पाकिस्तानातलं धनाढ्य, जमीनदार, उच्चभ्रू कुटुंब. पाकिस्तानात लोकशाही पद्धतीने निवडून आलेले पहिले पंतप्रधान झुल्फीकार अली भुट्टो याच कुटुंबातले. राजकारणातही याच कुटुंबाचा दबदबा.
पण त्याबरोबरच या कुटुंबाला शाप होता हिंसेचा.
जगात काही राजकीय घराणी प्रसिद्ध होती आहेत. मग ते अमेरिकेतलं केनेडी घराणं असो, भारतातलं नेहरू-गांधी किंवा पाकिस्तानातलं. पण या सगळ्यांच कुटुंबांचा शाप एकच होता की प्रत्येक कुटुंबातल्या एकतरी राजकीय नेत्याची हत्यात झाली.
भारतात इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांची हत्या झाली, पण पाकिस्तानातल्या भुट्टो कुटुंबात तीन पिढ्या कोणाची ना कोणाची हत्या होत राहिली.
पण ही कथा भुट्टो कुटुंबातल्या एका अशा व्यक्तीची आहे जी मुस्लीम जगातली पहिली महिला पंतप्रधान होती, तिच्या वडिलांना फाशी दिली तेव्हा तिला अखेरचं दर्शनही घेऊ दिलं नव्हतं, आयुष्यातला मोठा काळ तिने एकतर तुरुंगात किंवा नजरकैदेत काढला होता, तिचा नवरा जेलमध्ये होता तेव्हा तिला देश सोडून पळून जावं लागलं होतं, आणि जिच्यावर तिच्याच सख्ख्या भावाला मारण्याचा आरोप होता - बेनझीर भुट्टो.
तरूण बेनझीरचा राजकारणात प्रवेश
पाकिस्तातलं राजकारण नेहमीच अस्थिर ठरलेलं आहे.
पाकिस्तान स्वतंत्र झाल्यापासून म्हणजे 1947 पासून आजपर्यंत तिथे कोणताही पंतप्रधान आपला कार्यकाळ पूर्ण करू शकला नाहीये. भारतात नेहरू, इंदिरा गांधी, वाजपेयी, मनमोहन सिंग, नरेंद्र मोदींसारखे नेते कार्यकाळ पूर्ण करून पुन्हा पुन्हा निवडून आले, पण शेजारच्या देशात हे कधीच घडू शकलं नाही.

फोटो स्रोत, Getty Images
लोकशाही पद्धतीने पाकिस्तानात निवडून आलेले पहिले पंतप्रधान म्हणजे बेनझीर भुट्टो यांचे वडील झुल्फीकार अली भुट्टो.
पण 1977 साली झुल्फीकार अली भुट्टोंच्या पाकिस्तान पीपल्स पार्टी पक्षाने निवडणुकीत हेराफेरी केल्याचा आरोप झाला आणि पाकिस्तानात दंगली झाल्या. याच काळात पाकिस्तानी लष्कराचे प्रमुख जनरल झिया उल हक यांनी पाकिस्तानात लष्करी राजवट लागू केली आणि झुल्फीकार अली भुट्टोंना अटक केली.
पुढच्याच वर्षी झिया पाकिस्तानेच राष्ट्राध्यक्ष झाले आणि पाकिस्तानात शरियाचा कायदा लागू करायला सुरूवात केली. 1979 साली प्रचंड विरोध होत असतानाही झुल्फीकार अली भुट्टोंना फाशी देण्यात आली.
भुट्टो घराण्यातला पहिला मृत्यू झाला होता.
वडिलांना फाशी झाली तेव्हा बेनझीर फक्त 25 वर्षांच्या होत्या. झिया सरकारने त्यांना आणि त्यांची आई नुसरतला (भुट्टोंची दुसरी पत्नी) तुरुंगात टाकलं होतं.
वडिलांचं अंत्यदर्शनीही त्यांना घेता आलं नाही. वडिलांची शेवटची भेट कशी होती याबद्दल बीबीसीशी बोलताना त्या एका जुन्या इंटरव्ह्यूमध्ये म्हणाल्या होत्या, "मी त्यांना (तुरूंगाधिकाऱ्यांना) विचारलं की वडिलांची ही शेवटची भेट आहे का, ते म्हणाले असूही शकते, नसूही शकते. मी म्हणाले असं कसं? एकतर हो म्हणा किंवा नाही."
त्या पुढे म्हणतात, "वडिलांना कळून चुकलं होतं. ते खूप शांत होते. ते घरच्या गोष्टींवर बोलले, पक्षाच्या धोरणांवर बोलले. त्यांना शेवटी सोबत काहीच ठेवायचं नव्हतं, पुस्तकं किंवा काही. माझे विचारच पुरेसे आहेत ते म्हणाले. फक्त त्यांच्या आवडीचा परफ्युम हवा होता. ते म्हणाले मी जाताना स्वच्छ, सुंदर, सुगंधित होऊन जाईन, कारण हे जग सुंदर आहे."
झुल्फीकार अली भुट्टोंची प्रतिमा पाकिस्तानात 'शहीद' अशी झाली होती. त्या प्रतिमेमुळे पाकिस्तानात भुट्टो कुटुंबाबद्दल सहानुभूतीची लाट आली.
वडिलांचा मृत्यू, दोन्ही धाकटे भाऊ आधी लंडन आणि मग अफगाणिस्तानात परागंदा अशा परिस्थिती झुल्फीकार यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीची सुत्रं आली ती फक्त 25 वर्षांच्या बेनझीरकडे.

फोटो स्रोत, Getty Images
त्या वयातही राजकारणाचे आडाखे पक्के असणाऱ्या बेनझीर भुट्टोंनी या सहानुभुतीचा फायदा घेतला नसता तर नवलंच.
बेनझीरचे भाऊ मुर्तझा अली भुट्टो अफगाणिस्तानात राहून जनरल झिया उल हक यांच्याविरोधात हिंसक कारवाया करत होते. त्या पार्श्वभूमीवर बेनझीर भुट्टो लोकशाहीच्या पाईक म्हणून समोर आल्या आणि लोकांच्या मनात त्यांनी जागा बनवली.
जनरल झिया उल हक यांच्या संपूर्ण कार्यकाळात बेनझीर एकतर तुरुंगात होत्या किंवा नजरकैदेत. बेनझीर, त्यांची बहिणी सनम आणि आई नुसरत यांच्या हालचालींवर झिया सरकारचं बारीक लक्ष असायचं. तरीही बेनझीर पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या सर्वोच्च नेत्या बनल्या, लोकांच्या गळ्यातल्या ताईत बनल्या.
झियांच्या विरोधात मत तयार होत होतं, पाश्चिमात्य देश त्यांच्या कारवाईचा विरोध करत होते पण 1979 साली चक्रं फिरली.
सोव्हियत युनियनने अफगाणिस्तानवर आक्रमण केलं आणि अमेरिका-रशियाच्या शीतयुद्धात आता पाकिस्तान एक महत्त्वाची भूमिका बजावायला लागला.
अचानक झियांना होणारा पाश्चिमात्य देशांचा विरोध मावळला कारण त्यांनी सोव्हियत युनियनच्या विरोधात अमेरिकेला संपूर्ण सहकार्य करण्याचं धोरण अंगिकारलं.
झियांची जागा आणखी पक्की झाली. बेनझीर त्यांच्या लष्करी राजवटीचा विरोध करत होत्या पण आता परिस्थिती बदलली होती. बेनझीर पुन्हा मागे फेकल्या गेल्या.
1984 बेनझीर यूकेला निघून गेल्या. दोन-तीन वर्षं अशीच गेली. याच काळात बेनझीरचं लग्न आसिफ अली झरदारींशी झालं. पुढच्याच वर्षी, म्हणजे 1988 साली झिया उल हक यांचा एका विमान अपघातात मृत्यू झाला. तो मृत्युही संशयास्पद परिस्थितीत झाला, पण त्याबद्दल नंतर कधीतरी.
पंतप्रधानपद
बेनझीर भुट्टो आता सर्वार्धांने स्वतंत्र झाल्या होत्या. आता त्या देशाचं नेतृत्व करायला तयार होत्या. लोकांचा त्यांना पाठिंबा होताच. त्या मायदेशी परत आल्या. आता पाकिस्तानात निवडणुका होणार होत्या.
अपेक्षेप्रमाणे त्यांचा पक्ष जिंकला. त्या पाकिस्ताची आणि मुस्लीम जगतातली पहिली महिला पंतप्रधान झाल्या.
1988 साली त्यांचं मंत्रिमंडळ स्थापन झालं तेव्हा सहकारी मंत्र्यांना धक्का बसला. बेनझीर भुट्टो गरोदर होत्या. पदावर असताना बाळंत होणाऱ्या त्या पहिल्या महिला पंतप्रधान ठरल्या.
बेनझीर भुट्टोंच्या हत्येचे प्रयत्न इथूनच सुरू झाले. दहा वर्षांनी त्यांना यश आलं.
भ्रष्टाचाराचे आरोप
बेनझीर भुट्टो लोकशाही पद्धतीने निवडून आल्या असल्या तरी त्यांच्या राज्यात सगळंच आलबेल नव्हतं. लवकरच लोकांच्या लक्षात आलं की देशात प्रचंड प्रमाणत भ्रष्टाचार होतोय.
बेनझीर भुट्टोंच्या पहिल्या कारकिर्दीत आणि दुसऱ्या कारकीर्दीतही त्यांच्यावर अनेकदा भ्रष्टाचाराचे आरोप झाले.
त्यांचे पती असिफ अली झरदारी यांचं तर टोपण नावचं पडलं होतं, 'श्रीयुत 10 टक्के' कारण कोणत्याही डीलवर ते 10 टक्क्यांची लाच मागायचे असं म्हटलं जायचं.
1990 साली तर कहरच झाला. झरदारींवर एक मोठा आरोप झाला की, त्यांना एका उद्योजकाच्या पायाला रिमोट कंट्रोलने स्फोट होईल असा बॉम्ब बांधला आणि त्याला सांगितलं की बँकेत जाऊन पैसे काढून दे तर हा बॉम्ब काढू. हे प्रकरण खूप गाजलं.
भ्रष्टाचाराचे सतत होत असलेले आरोप पाहून पाकिस्तानच्या राष्ट्रपतींनी 1990 मध्ये बेनझीर सरकार बरखास्त केलं.
भावाच्या खुनाचा आरोप
बेनझीर सरकार भ्रष्ट्राचाराच्या आरोपांनंतर बरखास्त झाल्यामुळे त्यांच्या पीपीपी पक्षाचे कार्यकर्ते आणि काही नेते नाराज झाले. अशात झियांच्या मृत्युनंतर बेनझीरचे भाऊ मीर मुर्तझा भुट्टो पाकिस्तानात परत आले होते.
त्यांनी झुल्फीकारांच्या नावाने आणखी एक नवा पक्ष स्थापन केला आणि तेही राजकारणात सक्रिय होते.
पीपीपी कार्यकर्त्यांनी म्हणायला सुरूवात केली की मुर्तझा हेच झुल्फीकार अली भुट्टोंचे खरे वारस आहेत. याच काळात ते सिंध प्रांताच्या लारकानामधून (जे भुट्टो कुटुंबाचं मुळ गाव आहे) अपक्ष म्हणून विधिमंडळाची निवडणूक जिंकले.

फोटो स्रोत, Getty Images
एव्हाना बेनझीर आणि मुर्तझा दोन्ही भावाबहिणींमध्ये तणाव आलाच होता. मुर्तझांच्या हिंसक कारवायांमुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल होते. त्यामुळे 1993 साली ते पाकिस्तानात परत आल्या आल्याच त्यांची रवानगी तुरुंगात केली गेली.
मुर्तझा आणि बेनझीर एकमेकांचे कट्टर राजकीय वैरी बनले. मुर्तझा आता आपल्या बहिणीला बेनझीर भुट्टो असं न म्हणता, 'बेगम झरदारी' असं संबोधायचे. भुट्टो या नावापासून आपल्या बहिणीला वेगळं करण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा कदाचित.
फातिमा भुट्टो आपल्या पुस्तकात त्यांच्या नात्याविषयी बोलताना म्हणतात, "बेनझीर पुन्हा सत्तेत आली होती पण तिच्यासमोर आता विरोधक म्हणून तिचाच भाऊ होता. मुर्तझा म्हणजे एखाद्या किरकोळ राजकीय पक्षाचा साधासुधा नेता नव्हता तर पाकिस्तानच्या पितृसत्ताक समाजात मुर्तझाकडे झुल्फीकार अली भुट्टोंचा खरा वारसदार म्हणून पाहात होते. बेनझीरच्या खुर्चीला म्हणूनच धोका होता."
हेही नमुद करायला हवं की बेनझीर भुट्टोंचे सगळ्यात लहान भाऊ शाहनवाज भुट्टोंचा फ्रान्समध्ये असताना विषप्रयोगाने खून झाला होता. या प्रकरणातलं सत्य कधी समोर आलं नाही. हा खून का झाला, कोणी झाला हे कळलं नाही.
झुल्फीकार अली भुट्टोंच्या कुटुंबातला दुसरा मृत्यू झाला होता.
बेनझीर भुट्टो आणि त्यांची आई नुसरत यांच्या संबधातही कडवटपणा आला होता कारण नुसरत मुलाल पाठिंबा देत होत्या. खरंतर झुल्फीकार अली भुट्टोंना फाशी दिल्यानंतर याच दोघींनी पक्ष धुगधुगत ठेवला होता.
बीबीसी उर्दूने मीर मुर्तझा झुल्फीकार यांच्या मृत्यूवर विस्तृत ऑडियो डॉक्युमेंट्री केली आहे. त्यानुसार मुर्तझांचे समर्थक नेहमी आपल्यासोबत बंदुका ठेवायचे. याच काळात एका कट्टर मुर्तझा समर्थक आणि त्यांनी स्थापन केलेल्या अल झुल्फीकार पक्षातला एका मोठ्या नेत्याला अटक झाली होती.
मुर्तझांचा आरोप होता की पोलीस कस्टडीत या नेत्याची हत्या होऊ शकते. त्यामुळे ते सतत विरोध करत होते. बीबीसी उर्दूशी बोलताना त्यावेळेच्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की मुर्तझांचे समर्थक, त्यांच्यासोबत असणारे लोक काहीतरी हिंसक कारवाया करतील अशी भीती होती.
त्यामुळे पोलिसांनी या लोकांचे शस्त्रास्त्र परवाने तपासायचं ठरवलं.
दोन्ही बाजूंमध्ये इथपर्यंतच स्पष्टता आहे. पण 20 सप्टेंबर 1996 दिवशी संध्याकाळी काय घडलं याबद्दल अनेक प्रवाद आहेत.
मुर्तझा यांची मुलगी फातिमा भुट्टो आरोप करतात की, त्यांच्या वडिलांचा बेनझीर आणि झरदारींनी ठरवून खून केला. बेनझीर यांनी सगळे आरोप फेटाळत याला कुटुंबाविरुद्धचा कट म्हटलं होतं.
पण एवढं नक्की की त्या दिवशी पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मुर्तझा यांचा मृत्यू झाला.
भुटटो कुटुंबातला तिसरा मृत्यू झाला होता.
याच वर्षी बेनझीर भुट्टोंचं सरकार पुन्हा एकदा बरखास्त झालं. त्यांचे पती झरदारींना अटक झाली आणि त्यांच्यावर मुर्तझा भुट्टोच्या खुनाचा आरोपही ठेवण्यात आला.

खुनाच्या आरोपातून तर त्यांनी निर्दोष सुटका झाली पण भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली त्यांना तुरुंगवासाची शिक्षा झाली.
ते 8 वर्षं तुरूंगात होते, आणि याकाळात आपला शारिरीक छळ झाल्याचंही त्यांनी म्हटलं.
सत्ता गेली, नवरा तुरुंगात आणि पाकिस्तानात मुशर्रफ यांची पुन्हा लष्करी राजवट... बेनझीर भुट्टो पुन्हा एकदा निर्वासितांचं आयुष्य जगायला दुबईत स्थायिक झाल्या. पुढची आठ वर्षं बेनझीरने दुबईत काढली.
2006-07 च्या सुमारास त्यांनी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांच्याशी पाकिस्तानात परत येण्याबद्दल चर्चा सुरू केली. त्यांचे पती झरदारी तोवर तुरुंगातून सुटले होते. झरदारी आधी अमेरिकेत आणि मग दुबईत येऊन कुटुंबासोबत राहात होते.
पाकिस्तानात कट्टरतावाद्यांचा प्रभाव वाढला होता, सतत आत्मघाती हल्ले होत होते, अशात अमेरिकाला वाटायला लागलं की भुट्टो आणि मुशर्रफ यांच्यात काहीतरी चर्चा होऊन बेनझीरने पुन्हा पाकिस्तानात परत यावं म्हणजे पुन्हा लोकशाहीची चळवळ सुरू करता येईल.
पाकिस्तानात निवडणूका जाहीर झाल्या आणि ऑक्टोबर 2007 मध्ये त्या पाकिस्तानात परत आल्या.
त्या परत आल्या त्याच दिवशी त्यांच्या रॅलीत बॉम्बस्फोट झाला. त्या थोडक्यात वाचल्या पण 150 अधिक माणसं मारली गेली.
दोनच महिन्यात त्यांच्या आयुष्याचा शेवट होणार होता.
बेनझीरच्या आयुष्यातला शेवटचा दिवस
बेनझीरचा शेवटचा दिवस खूपच लवकर सुरू झाला. त्यांना पाकिस्तानात परतून फक्त 72 दिवस झाले होते आणि आधीच एका हल्ल्याचा प्रयत्न झाला होता.
त्यांना लष्करी अधिकाऱ्यांनी रावळपिंडीत सभा घेऊ नका, तुमच्यावर हल्ला होणार आहे असंही सांगितलं. "जे हल्ला करणार आहेत, त्यांना अटक करा मग," बेनझीर म्हणाल्या.

फोटो स्रोत, Getty Images
पण लष्करी अधिकाऱ्यांनी त्यांना अटक करण्यात असमर्थतता दर्शवली. बेनझीरही हटून बसल्या की सभा घेणारच.
पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांनी बीबीसीच्या ओवेन बेनेट जोन्स यांच्याशी दुबईत आपला कार्यकाळ संपल्यानंतर अनेक वर्षांनी बोलताना म्हटलं की, "त्यांच्यावर हल्ला होणार मला माहिती होती. मी फोन करून सांगितलं त्यांना."
सरकारलाही तिथे आत्मघाती हल्ला होणार आहे याची कल्पना होती, पण तो कोणी थांबवू शकलं नाही. बेनझीरचं म्हणणं होतं की सरकारने आम्हा सगळ्यांना सुरक्षा द्यावी. मी आणि माझ्या लोकांचे जीव जाऊ नये.
आज बेनझीर भुट्टोंच्या पक्षाचे कार्यकर्ते आणि त्यांचे सहकारी त्यांच्या हत्येचा विषय निघाला की म्हणतात की तत्कालीन सरकारला जर खरंच बेनझीर यांचा जीव वाचवायचा होता तर मग त्यांनी सुरक्षा का दिली नाही? हल्ला थांबवण्यासाठी प्रयत्न का केले गेले नाहीत? नुसते इशारे देऊन काय साध्य करायचं होतं?
ओवेन बेनेट जोन्स यांनी आपल्या दहा वर्षांच्या बेनझीर भुट्टोंच्या हत्येच्या तपासात अनेक गोपनीय कागदपत्रं मिळवली, अनेक लोकांशी बोलले ज्यांना आपली ओळख जाहीर करायची नव्हती.
त्यांनी मिळवलेल्या एका रिपोर्टवरून दिसतं की पाकिस्तान तालिबानचे दोन लोक बेनझीर सभा घेणार होत्या त्या जागेची पहाणी सकाळी सकाळी करून गेले. आत्मघाती हल्लेखोर तयार होते. त्यांनी शरीराला दारूगोळा बांधला. दोन मारेकऱ्यांपैकी एकाने हातात ग्रेनेड घेतला, दुसऱ्याने बंदूक.
बेनझीरच्या सुरक्षेसाठी 300 पोलीस तैनात होते, बॉम्ब हुडकणारी श्वान पथकं होती, मेटल डिटेक्टर्स होते आणि आसपासच्या इमारतींच्या छतांवर स्नायपर (लांब पल्ल्याच्या गोळ्या झाडू शकणारे सैनिक) तैनात होते.
दोन्ही बाजूंनी जय्यत तयारी झाली होती.
गर्दी जमली होती. बेनझीर भुट्टोंनी आपलं भाषण केलं आणि त्यांनी आपल्याला येणाऱ्या धमक्यांचा उल्लेख करून असंही म्हटलं की मी घाबरत नाही.
भाषण संपल्यावर त्या गाडीत बसल्या. याच वेळी काळा गॉगल घातलेला एक मुलगा त्यांच्या दिशेने जात होता. लोकांची इतकी गर्दी होती की कार तिथून हलत नव्हती. लोक कारच्या काचांवर थपडा होते, बॉनेटवर येत होते. लोकांना बेनझीरला पाहायचं होतं.
त्या उठल्या आणि त्यांनी आपलं डोक कारच्या सनरूफमधून बाहेर काढलं. एक मोठ्ठा आवाज झाला. आत्मघाती हल्ल्याची सुरुवात झाली होती. नादीम खान गाडीतच होत्या.
त्या हल्ल्याचं वर्णन करताना म्हणतात, "आधी गोळ्या झाडल्या गेल्या आणि मग धडाम असा आवाज आला. बेनझीर माझ्या अंगावर पडली. तिच्या अंगातून रक्त वाहत होतं. माझे पूर्ण कपडे तिच्या रक्ताने भरले."
बेनझीरच्या डोक्याला गोळी लागली होती. हल्ल्याच्या एका तासानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आलं.
झुल्फीकार अली भुट्टोंच्या चार मुलांपैकी तिसरीचीही हत्या झाली होती.
बेनझीर भुट्टोंची हत्या झाली त्याच बागेत 56 वर्षांपूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान लियाकत अली खान यांची हत्या झाली होती हा योगायोग.
बेनझीर भुट्टोंच्या मृत्युनंतर अगदी काही तासात गुन्हा घडला ते ठिकाण स्वच्छ करण्यात आलं. पाईपने पाणी मारून मारून स्वच्छ धुण्यात आलं. ज्यांच्याकडे पुरावे गोळा करण्याची जबाबदारी असते त्या पोलिसांनी पुरावे नष्ट केले होते. असं का केलं, कोणाच्या आदेशावरून केलं याचं उत्तर समोर आलं नाही.
तो एक फोन कॉल
या घटनेला एक दशक उलटून गेल्यानंतर पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांनी बीबीसीच्या ओवेन बेनेट जोन्स या प्रतिनिधींना दुबईत मुलाखत दिली.
त्यावेळेस त्यांनी म्हटलं की पाकिस्तानाच्या सरकारमधले काही घटक बेनझीर भुत्तोंच्या खूनात सहभागी असण्याची शक्यता असेल.
"मला नक्की सांगता येणार नाही पण पाश्चिमात्य देशांच्या विचारसणीकडे झुकलेली एक महिला नेता या लोकांच्या डोळ्यात नक्कीच खुपत असेल," ते म्हणाले.

खरंतर मुशर्रफ यांच्यावरच बेनझीर भुट्टोंच्या खुनाचे, खुनाचा कट रचल्याचे आणि या खुनासाठी सहाय्य केल्याचे आरोप झाले आणि गुन्हाही दाखल झाला.
सरकारी वकिलांचं म्हणणं होतं की भुट्टो पाकिस्तानात परत येण्याच्या तीन आठवडे आधी मुशर्रफ यांनी त्यांना फोन करून धमकी दिली होती की परत आलात तर तुमच्या सुरक्षेची खात्री नाही.
भुट्टोंचे जुने सहकारी मार्क सहगल आणि पत्रकार रॉन सस्किंड दोघांचा दावा आहे की, बेनझीरला मुशर्रफचा कॉल आला तेव्हा ते दोघं बेनझीरसोबतच होते. सहगल म्हणतात, "भुट्टो मला म्हणाल्या, त्यांनी मला धमकी दिली. ते म्हणाले परत येऊ नका, मला इशाराच दिला की परत येऊ नका."
बेनझीरने सहगल यांना सांगितलं की मुशर्रफ म्हणाले, 'त्या परत आल्या तर काय होईल याला मी जबाबदार नाही. आणि त्यांची सुरक्षितता त्यांचे मुशर्रफ यांच्यासोबत कसे संबंध आहेत यावर ठरेल.'
पण मुशर्रफ यांनी या आरोपांचं कायमच खंडन केलेलं आहे.
शाळकरी मारेकरी
बेनझीर भुट्टो यांची हत्या झाल्यानंतर काही आठवड्यातच पाच संशयितांनी कबूल केलं की, त्यांनी 15 वर्षांच्या बिलालला भुट्टोच्या खुनासाठी मदत केली. ते पाकिस्तानी तालिबान आणि अल-कायदाशी संबंधित होते.
बिलाल हा अफगाणिस्तानच्या दक्षिण वझिरीस्तानाचा राहाणारा होता. पण या पाचही संशयितांना कोर्टाने निर्दोष मुक्त केलं कारण सरकारी वकिलांकडून पुरावे जमा करण्यात आणि कोर्टात सादर करण्यात चुका झाल्या होत्या.

सरकारी वकिलांनी या निकालाविरोधात केलेले अपील अजूनही प्रलंबित आहेत.
नवऱ्यावर संशय
बेनझीर भुट्टोंच्या मृत्यूनंतर त्यांचे पती असिफ अली झरदारी पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष झाले. इतक्या मोठ्या पदावर असूनही बायकोच्या मारेकऱ्यांचा छडा लावू शकले नाहीत, त्यांना शिक्षा करू शकले नाहीत असं म्हणत अनेक लोक झरदारींवरच बेनझीरच्या खुनाचा आरोप करतात.
बेनझीरच्या मृत्युनंतर सर्वाधिक फायदा झरदारींचाच झाला असंही काहींचं म्हणणं आहे. बीबीसीच्या हाती आलेल्या गुप्त कागदपत्रांच्या आधारे हे सिद्ध होतं की पोलीस तपासात इतका हलगर्जीपणा केला होता की फक्त छोटे मासेच गळाला लागावेत, या प्रकरणात गुंतलेल्या मोठ्या धेंडांपर्यंत कोणी पोहचू नये असाच प्रयत्न होता की काय असा संशय यावा.
भुत्तोंच्या मृत्युच्या दोनच महिने आधी त्यांच्यावर जो जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला होता, त्यात 150 हून जास्त माणसं मारली गेली पण त्या हल्ल्याचे सूत्रधारही आणि ज्यांनी आत्मघाती हल्ला केला ते कट्टरवादी कोण होते हेही कधी कळलं नाही.
झरदारींनीही त्यांच्यावरचे आरोप फेटाळून लावले. हे आरोप करणाऱ्या माणसांनी 'आपली थोबाडं गप्प ठेवावीत' असंही ते म्हणाले.
झरदारी आता राष्ट्राध्यक्ष पदावर नसले तरी राजकारणात अजूनही सक्रीय आहेत.
मृत्युंची साखळी
बेनझीर भुट्टोंची ज्यांनी हत्या केली त्या लोकांना पाकिस्तानत वाचवलं गेलं एवढं नक्की. बेनझीर भुट्टोंच्या खुनानंतर त्या घटनेशी संबंधित असलेल्या लोकांच्या मृत्युचं सत्रच सुरू झालं.
बीबीसीच्या दीर्घ शोधपत्रकारितेत लक्षात आलं की किशोरवयीन बिलालला ज्या दोन लोकांनी मदत केली होती ती दोघं 15 दिवसात पाकिस्तानच्या सैन्याच्या चकमकीत मारली गेली. झरदारी सरकारच्या एका वरिष्ठ मंत्र्यांनी सांगितलं की हे ठरवून केलेलं 'एनकाऊंटर' होतं. या दोघांची नावं नादीर आणि नसरूल्ला खान अशी होती.
ही दोघं ज्या मदरशात शिकायची, तिथल्या अजून एका विद्यार्थ्यांचं नाव या प्रकरणात आलं होतं, त्याचाही मृत्यू झाला.
अब्दुल्ला नावाच्या मुलाने आत्मघाती हल्ल्याचं स्फोटकं लावलेलं जॅकेटची ने-आण करण्यात मदत केली होती. भुत्तोंच्या मृत्यूनंतर सहाच महिन्यात त्याचा एका बॉम्बस्फोटात मृत्यू झाला.
या प्रकरणातल्या गाजलेल्या काही मृत्युंपैकी एक म्हणजे बेनझीर भुट्टोंचा सुरक्षारक्षक खालिद शहनशाह याचा. भुत्तो भाषण करत होत्या तेव्हा शहनशाह त्यांच्यापासून काही फुटांच्या अंतरावर होता. रावळपिंडीतल्या या सभेचे जे व्हीडिओ नंतर समोर आले त्यात खालिद काही विचित्र हालचाली करताना दिसतोय.
त्याचं डोक जरी हलत नसलं तरी त्याने भुट्टोंच्या दिशेन भुवया उंचावलेल्या दिसतात आणि त्याच वेळी तो आपली बोटं गळ्यावरून फिरवताना दिसतो. हा व्हीडिओ व्हायरल झाला. याचा अर्थ काय हा प्रश्न अनेकांना पडला पण हेही रहस्यच राहिलं. जुलै 2008 मध्ये शहनशाहची त्याच्या कराचीतल्या राहात्या घराबाहेर गोळ्या झाडून हत्या झाली.
पुढचा बळी गेला ते राज्य सरकारी वकील झुल्फीकार चौधरी यांचा. त्यांच्या मृत्युच्या काही दिवस आधी त्यांनी आपल्या मित्रांना सांगितलं होतं की बेनझीर भुट्टो हत्या प्रकरणात त्यांच्या हाती चांगले धागेदोरे आले आहेत.

3 मे 2013 ला ते या केसच्या सुनावणीसाठी जात असताना त्यांची इस्लामाबादमध्येच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
पण एक जिवंत राहिला होता. हा माणूस खरंतर मेला असंच सगळ्यांना वाटत होतं पण तो जिवंत होता.
त्याचं नाव इक्रमुल्ला. रावळपिंडीत बेनझीर भुत्तोंवर जो जीवघेणा हल्ला झाला हा त्यातला दुसऱा आत्मघाती हल्लेखोर. बिलालसोबत हाही होता. पण बिलालने केलेला हल्ला यशस्वी झाला त्यामुळे याने हल्ला केला नाही आणि जिवंत तिथून परत आला.
अनेक वर्षं पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी म्हटलं की इक्रमुल्ला एका ड्रोन स्ट्राईकमध्ये मेला. पण 2017 मध्ये पाकिस्तान प्रशासनाने मोस्ट वॉटेंड दहशतवाद्यांची नावं प्रसिद्ध केलं त्यातलं एक नाव होतं इक्रमुल्ला.
हा तोच इक्रमुल्ला होता जो बेनझीर भुट्टोंच्या हत्येच्या कटात सहभागी होता.
आता तो पूर्व अफगाणिस्तानात राहातोय आणि पाकिस्तान तालिबानचा मधल्या फळीतला कमांडर आहे अशी माहिती बीबीसीला मिळाली आहे.
बेनझीर भुट्टोंच्या हत्येप्रकरणी आजवर फक्त दोन लोकांना शिक्षा झाली. ते हल्लेखोरही नव्हते, तर ते दोन पोलीस कर्मचारी होती ज्यांनी बेनझीर भुट्टोंच्या हत्येनंतर गुन्हा झालेली जागा पाण्याने धुवून काढली.
अनेकांचं मत आहे की या पोलीस कर्मचाऱ्यांना शिक्षा देणं चुकीचं होतं कारण त्यांनी कृत्य कोणाच्या तरी सांगण्यावरूनच केलं होतं.
पण आज, बेनझीर भुट्टोंच्या हत्येला 15 वर्षं उलटून गेले तरी त्यांच्या हत्येचे सुत्रधार कोण हे समोर आलं नाही. उलट हे प्रकरण दाबण्याचाच प्रयत्न केला गेला.
बेनझीरच्या नशीबात आपले वडील, भाऊ यांच्यासारखाच हिंसक मृत्यू लिहिलेला होता. पाकिस्तानच्या राजकारणातल्या एका मोठ्या धड्याचा अंत झाला.
हेही वाचलंत का?
- पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याविषयी या गोष्टी माहीत आहेत का?
- हातोडा गँग, कराचीच्या रस्त्यावर दहशत पसरवणाऱ्या टोळीची कहाणी
- पाकिस्तानातील 'या' रस्त्यावर अलेक्झांडरचे 15 हजार सैनिक मरण पावले होते
- पाकिस्तानच्या इतिहासात कोणताही पंतप्रधान 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू शकला नाही, कारण...
- काश्मीरमधल्या 'त्या' अपहरणनाट्यानंतर फुटीरतावादाला कलाटणी मिळाली तेव्हा...
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








