पुण्यातील DRDOच्या शास्त्रज्ञाचं पाकिस्तानी एजंटकडून 'सेक्स्टॉर्शन आणि हनीट्रॅप'?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, मानसी देशपांडे
- Role, बीबीसी मराठीसाठी, पुणे
4 मे 2023 रोजी संपूर्ण देशाला हादरवणारी एक बातमी समोर आली.
दहशतवाद विरोधी पथकाच्या पुणे युनिटकडून देशातील प्रमुख संशोधन संस्था असलेल्या डिफेन्स रिसर्च एंड डेव्हलपमेंट आॅर्गनायझेशन (डीआरडीओ) मधली शास्त्रज्ञाला अटक केल्याची माहीती समोर आली.
पाकिस्तान इंटेलिजन्स आॅपरेटिव्ह (पीआयओ) च्या हस्तकांशी सोशल मिडीयाच्या माध्यमातून संवेदनशील शासकीय गुपिते पुरवल्याच्या आरोपाखाली दशतवाद विरोधी पथकाने त्यांना अटक केली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
शासकीय गुपीतं अधिनियम कलमाखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रदीप मोरेश्वर कुरुलकर (वय 59) असं या शास्त्रज्ञानाचं नाव असून ते डायरेक्टर ऑफ रिसर्च एँड डेव्हलपमेंट इस्टॅब्लिशमेंट (इंजिनिअर्स) या पदावर डीआरडीओ मध्ये कार्यरत होते.
त्यांच्याविरोधात 3 मे 2023 रोजी दहशतवाद विरोधी पथकाने काळाचौक पोलीस स्टेशनमध्ये डीआरडीओनेच दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला.
त्यानंतर त्यांना अटक करुन पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आलं.
नेमकं काय प्रकरण काय?
दहशतवाद विरोधी पथकाने शिवाजीनगर कोर्टात सादर केलेल्या माहितीनुसार डीआरडीओला प्रदीप कुरुलकर यांनी परदेशातील ‘शत्रू’ राष्ट्रांशी अनधिकृतपणे संवाद साधल्याची गोपनीय माहिती मिळाली.
यानंतर डीआरडीओने कुरुलकर वापरत असलेले लॅपटाॅट, मोबाईल आणि डेस्कटाॅप जप्त केले.
या डीवायसेसची डीआरडीओकडून फाॅरेन्सिक तपासणी करण्यात आली. तपासणी नंतर डीआरडीओच्या अंतर्गत स्टॅंडींग कमीटीकडे केस सोपवण्यात आली.
या कमिटीच्या फायनल अहवालानुसार जप्त केलेले डीवायसेस हे दहशतवाद विरोधी पथकाच्या अप्पर पोलीस महासंचालकांकडे पाठवण्यात आले.
डीआरडीओच्या स्टँडिंग कमिटी आणि फाॅरेन्सिक तपासणीत असं आढळून आलं की,
'प्रदीप कुरुलकर हे डायरेक्टर, डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनच्या पदावर असताना ते पाकिस्तान इंटेलिजन्स ऑपरेटिव्हच्या संपर्कात होते.
त्यांनी कार्यालयीन पदाचा आणि अधिकारांचा गैरवापर करुन शासकीय गुपीतं आणि इतर संवेदनशील माहिती पिआयओ सोबतच्या व्हाॅट्सएप मधील मेसेजेस, व्हाईस आणि व्हीडिओ काॅलद्वारे दिली.'
डीआरडीओची तक्रार दहशतवाद विरोधी पथकाला प्राप्त झाल्यावर कुरुलकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
हनीट्रॅप चा प्रकार?
पुणे युनीटमधल्या दहशतवाद विरोधी पथकातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर बीबीसी मराठीला सांगितलं की, प्राथमिक तपासणीत ही हनीट्रॅपची केस असल्याची शक्यता आहे.
“प्रथमदर्शनी हा हनीट्रॅपचा प्रकार वाटतो आहे. पीआयओने महिलांचे काही सोशल मीडिया प्रोफाईल तयार केलेले आहेत. डिफेन्स किंवा सिक्यूरिटी संदर्भात काम करणाऱ्यांचे काही प्रोफाईल असतील तर ते काय करतात की हळूच त्यांना रिक्वेस्ट पाठवतात. त्यांच्या अकाउंटवर सुंदर मुलींचा फोटो असतो. महिलांच्या आवाजात बोलतात. ते काही वेळेस पुढे पण जातात आणि व्हीडिओवर काही गोष्टी पण करतात.(ही त्यांची मोडस आपरेंडी असते.) हे इथे झालंय की नाही हा तपासाचा मुद्दा आहे.
पण त्यांचं एवढं चॅट आहे तर नक्की काही ना काही त्या अनुषंगाने असणार. त्यातून हे पुढे झालेलं दिसतंय. असे इंटरनेटवर नेहमी प्रयत्न सुरु असतात. कधी कधी मोठा मासा गळाला लागतो. सामान्य लोकांसोबत सेक्स्टाॅर्शन होतं. हा वेगळा प्रकार आहे,” अशी माहिती दहशतवाद विरोधी पथकातील अधिकाऱ्याने दिली.
कुरुलकर यांच्यासंदर्भात प्रामुख्याने व्हॅट्सएपवर चॅट दिसून आले आहेत. पण त्यांचा पिआयओसोबत प्रथम संपर्क कसा झाला यासंदर्भात अधिक माहिती तापासातून समोर येईल, असं दहशतवाद विरोधी पथकाकडून सांगण्यात आलंय.

फोटो स्रोत, Getty Images
“आम्हाला तक्रारीनुसार व्हाॅट्सएप चॅट दिसत आहेत. प्रश्न हा आहे की, डायरेक्ट व्हाॅट्सएप सुरु झालं की अजून कुठून सुरु झालं. अजून आमचा डिटेल तपास सुरु झाला नाहीये. त्यांनी प्राथमिकपण असं सांगितलं की, व्हाॅट्सेएपवर मेसेज आला. पण आम्हाला शंका आहे की, आधी फेसबूकवरुन सुरु झालं असावं. जनरली एखादी व्यक्ती जर संरक्षण किंवा त्यासंदर्भात महत्त्वाच्या क्षेत्रात काम करत असेल आणि जर सोशल मिडीयावर त्यांचा फोटो टाकला, पद लिहिलं तर, ते पीआयओच्या इंटेलिजन्समध्ये फेसबूक स्क्रेपिंग ऍपच्या माध्यमातून कळतं.
मग ते हळूच एका सुंदर मुलीची रिक्वेस्ट पाठवतात. पुढे जर त्या व्यक्तीने इंटिरेस्ट दाखवला तर संवाद सुरु होतो. भारतीय नाव असतं, सुंदर मुलीचा फोटो असतो. मग सुरु होतं. मग फेसबूक मेसेंजरवर बोलणं सुरु होतं. मग व्हाॅट्सएपवर नंबर पाठवतात. मग पुढचे पाऊल घेतात. त्यांची मेथाॅडाॅलाॅजी पक्की झालीये. ही अशी पहिली केस नाहीये,” असंही दहशतवाद विरोधी पथकातील अधिकाऱ्याने सांगितलं.
प्रदीप कुरुलकर हे त्यांच्या हनीट्रॅपमध्ये असेच अडकलेत का? किंवा हा काही वेगळा प्रकार आहे का याचे डीटेल्स तपासातून पुढे येतील, असं तपास यंत्रणेकडून सांगण्यात आलेलं आहे.
प्रदीप कुरुलकर कोण आहेत?
कुरुलकर हे डीआरडीओ मधील एक नामवंत शास्त्रज्ञ मानले जातात. कुरुलकर यांचा जन्म 1963 साली झाला.
त्यांनी सीओईपी पुणे येथून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये बॅचलर डिग्री (बीई) पूर्ण केल्यानंतर 1988 मध्ये ते सीव्हीआरडीई, अवडी येथे डीआरडीओमध्ये रुजू झाले.
पुढे त्यांनी आयआयटी कानपूरमधून पॉवर इलेक्ट्रॉनिक्स मधील प्रगत अभ्यासक्रम पूर्ण केले. क्षेपणास्त्र प्रक्षेपक, लष्करी अभियांत्रिकी उपकरणे, प्रगत रोबोटिक्स आणि लष्करी वापरासाठीचे मोबाइल, मानवरहित प्रणालीचे डिझाइन यामध्ये त्यांचं स्पेशलायझेशन आहे.
कुरुलकर यांनी डीआरडीओमध्ये अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांवर काम केलं आहे. डीआरडीओच्या क्षेपणास्त्रांच्या प्रक्षेपण आणि ग्राउंड सिस्टीम्सच्या निर्मितीत त्यांनी मोलाची भूमिका बजावलेली आहे. डीआरडीओच्या उपग्रहभेदी क्षेपणास्त्र मिशन शक्तीच्या प्रक्षेपकाची निर्मिती कुरुलकर यांच्या नेतृत्वात झाली होती.

फोटो स्रोत, Getty Images
कुरुलकर यांना 2000 मध्ये सर्वोत्कृष्ट प्रकाशनासाठी सायन्स डे पुरस्कार, 2002 मध्ये उत्कृष्टतेसाठी डीआरडीओ अग्नि पुरस्कार, आकाश प्रोजेक्टसाठी 2008 मध्ये पथदर्शी संशोधन आणि उत्कृष्ट तंत्रज्ञान विकासासाठी डीआरडीओ पुरस्काराने गौरवण्यात आलेलं आहे.
कुरुलकर हे पुढच्या काही महिन्यांमध्ये निवृत्त होणार होते अशी माहिती बीबीसी मराठीला मिळाली.
या स्तरावरचे शास्त्रज्ञ अशा प्रकराच्या हनीट्रॅपमध्ये अडकल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
काही अनुत्तरित प्रश्न
कुरुलकर यांना अटक झाल्यानंतर पुढच्या तपासात काही प्रमुख प्रश्नांची उत्तरं मिळतील अशी अपेक्षा आहे.
दहशतवाद विरोधी पथक पुढील काही मुद्द्यांचा सखोल तपाल करणार आहे. यामध्ये आरोपीने कार्यालयीन गोपनीय माहिती आर्थिक फायद्यासाठी शेअर केली का, याचा तपास करण्यात येणार आहे.
आरोपीने पीआयओला दिलेली गोपनीय माहिती ही देशाच्या सुरक्षिततेस बाधा आणणारी असल्याने या माहितीसंदर्भात सखोल तपास केला जाईल.
आरोपी आणि पीआयओने एकमेकांशी गोपनीय माहिती अदान प्रदान करण्यासाठी इतर कोणत्या इलेक्ट्राॅनिक उपकरणांचा किंवा माध्यमांचा वापर केला आहे का, याची पडताळणी केली जाईल.
कुरुलकर हे परदेशात गेल्याचं दिसून आल्याने तेव्हा ते पीआयओला इतर देशात भेटले का याची पडताळणी केली जाईल.
आरोपीचे भारतातल्या इतर राज्यांतल्या इसमांशी संपर्क झाला असल्याचं प्रथमदर्शनी आढळलं आहे. त्या संदर्भात पुढे चौकशी केली जाईल.
या सगळ्या घडामोडींनंतर डीआरडीओची बाजू अजून पुढे आलेली नाहीये.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








