AI मुळे रॅमचं झालं 'सोनं'; 2026 मध्ये उपकरणांच्या किमतींचा स्फोट होणार?

    • Author, टॉम गर्किन
    • Role, तंत्रज्ञान रिपोर्टर

आपण वापरत असलेल्या अनेक उपकरणांच्या किंमतीत 2026 मध्ये वाढ होऊ शकते. या वाढीमागचं कारण आहे, रॅमची किंमत.

ऑक्टोबर 2025 पासून रॅमची किंमत दुपटीहून अधिक झाली आहे. कधीकाळी रॅम हा कॉम्प्युटरमधील सर्वात स्वस्त घटकांपैकी एक होता.

रॅम म्हणजे रँडम ॲक्सेस मेमरी. स्मार्टफोनपासून ते स्मार्ट टीव्हींपर्यंत, अगदी वैद्यकीय उपकरणांपर्यंत सर्वकाही या तंत्रज्ञानावर चालतं.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय)साठी महत्त्वाच्या असणाऱ्या, एआयला शक्ती देणाऱ्या डेटा सेंटर्समध्ये प्रचंड वाढ झाली आहे.

या डेटा सेंटर्सला देखील रॅमची आवश्यकता आहे. त्यामुळेच रॅमच्या किंमतीत वाढ झाली आहे. यातून रॅमला असणारी मागणी आणि रॅमचा पुरवठा यातील ताळमेळ बिघडल्यामुळे तसं झालं आहे.

कारण पुरवठ्यापेक्षा मागणी अधिक आहे, त्यामुळे प्रत्येकालाच त्यासाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत.

किंमतीत छोटी वाढ झाली, तर अनेकदा उत्पादक तो भार स्वत: उचलतात. मात्र जर मोठी वाढ झाली, तर तो भार ग्राहकांवर टाकला जातो.

रॅमच्या किमतीमध्ये मोठी वाढ

रॅमच्या किमतीतील ही वाढ किरकोळ नसून चांगलीच मोठी आहे.

"काही महिन्यांपूर्वी आम्हाला ज्या किमतीला माल दिला जात होता, त्याच्या तुलनेत आता जवळपास 500 टक्के अधिक किंमत सांगितली जाते आहे," असं स्टीव्ही मेसन म्हणाले.

ते सायबर पॉवर पीसी या कॉम्प्युटर तयार करणाऱ्या कंपनीचे महाव्यवस्थापक आहेत.

ते म्हणाले की 'एक वेळ अशी येईल' की या कॉम्प्युटरच्या या भागाच्या वाढलेल्या किमती उत्पादकांना त्यांच्या उत्पादनांच्या "किमतीबद्दलचे निर्णय घेण्यास भाग पाडतील."

"एखाद्या उपकरणात मेमरी किंवा स्टोरेजचा वापर होत असेल, तर त्याच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे," असं ते म्हणाले.

"उत्पादक आणि ग्राहक या दोघांनाही या किमतीतील वाढीला कशाप्रकारे प्रतिसाद द्यायचा आणि त्यांच्यासमोर कोणते पर्याय आहेत याचा विचार करावा लागेल आणि तसे निर्णय घ्यावे लागतील."

रॅम किंवा रँडम ॲक्सेस मेमरीचा वापर, तुम्हा जेव्हा एखाद्या उपकरणाचा वापर करत असता, तेव्हा कोड साठवण्यासाठी केला जातो. जवळपास प्रत्येक प्रकारच्या कॉम्प्युटरमध्ये हा एक महत्त्वाचा घटक असतो.

उदाहरणार्थ, रॅमशिवाय तुम्हाला हा लेखही वाचता आला नसता.

हा घटक सर्वव्याप्ती आहे म्हणजे सर्वत्र वापरला जातो. त्यामुळे पीसीस्पेशलिस्ट या प्रतिस्पर्धी कॉम्प्युटर उत्पादक कंपनीचे डॅनी विल्यम्यस म्हणाले की किमतीतील ही वाढ '2026 मध्ये सुरू राहील' अशी त्यांना अपेक्षा आहे.

"2025 मध्ये बाजारात उत्साह होता, तेजी होती. जर मेमरीची किंमत थोडी कमी झाली नाही, तर 2026 मध्ये ग्राहकांच्या मागणीत घट होईल, असं मला वाटतं," असं ते म्हणाले.

ते म्हणाले की, वेगवेगळ्या रॅम उत्पादकांवर त्यांना 'वेगवेगळ्या प्रकारचा परिणाम' दिसला आहे.

"काही कंपन्यांकडे या घटकांचा मोठा साठा आहे. त्यामुळे त्यांच्या किमतीतील वाढ कदाचित 1.5 पट ते 2 पट इतकी कमी आहे," असं ते म्हणाले.

मात्र ते म्हणाले की, इतर कंपन्यांकडे मोठा साठा नव्हता. त्यामुळे त्यांच्या किंमतीत '5 पटीनं वाढ' झाली आहे.

आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे होते आहे किमतीत वाढ

ख्रिस मिलर, चिप वॉर या पुस्तकाचे लेखक आहेत. ते म्हणाले की कॉम्प्युटरच्या मेमरीच्या मागणीत वाढ होण्यामागे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा 'मुख्य घटक' कारणीभूत आहे.

ते म्हणाले, "मेमरी चिप्सला असलेल्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. या वाढीमागे एआयला आवश्यक असलेली अधिक किमतीची, अधिक गुणवत्तेची हाय बँडविड्थ मेमरी हे कारण आहे."

"यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या मेमरी चिप्सच्या किमतीत वाढ झाली आहे."

ते पुढे म्हणाले, 'मागणी आणि पुरवठ्या'नुसार किमतीत "अनेकदा अचानक मोठ्या प्रमाणात चढउतार होतात." सध्या मागणीत लक्षणीय वाढ झालेली आहे.

टेक इनसाईटचे माईक हॉवर्ड बीबीसीला म्हणाले की, "शेवटी हे क्लाउड सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांवर अवलंबून आहे. त्यांनी 2026 आणि 2027 साठी त्यांना आवश्यक असणारी मेमरी निश्चित केल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे."

ते म्हणाले की यामुळे रॅमचं उत्पादन करणाऱ्या उत्पादकांसमोरचं मागणीचं चित्र स्पष्ट झालं. हे 'स्पष्टपणे लक्षात येण्यासारखं' होतं की "ॲमेझॉन, गुगल आणि इतर महत्त्वाच्या आणि मोठ्या प्रमाणात क्लाउड सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांच्या नियोजनाइतका रॅमचा पुरवठा होऊ शकणार नाही."

"मागणीबाबतची स्पष्टता आणि पुरवठ्याच्या मर्यादा या दोन्ही गोष्टी एकत्र आल्यामुळे, पुरवठादारांनी हळूहळू आणि काहीवेळा त्यांच्या किमतीत आक्रमकपणे वाढ केली आहे," असं ते म्हणाले.

"काही पुरवठादारांनी तर रॅमच्या किमतीचे कोटेशन किंवा दरपत्रक जारी करणंदेखील थांबवलं आहे. ही एक दुर्मिळ बाब आहे. यातून भविष्यात रॅमच्या किमतीत आणखी वाढ होतील असा त्यांना आत्मविश्वास असल्याचं दिसून येतं."

ते म्हणाले की, काही उत्पादकांना अशाप्रकारे वाढ होण्याचा अंदाज आधीच आला असेल. त्यामुळे त्यांनी किमतीमधील वाढीचा प्रभाव कमी करण्यासाठी वेळेआधीच त्यांचा साठा वाढवून ठेवला असेल. मात्र अशा कंपन्या 'अपवादात्मक' असल्याचं ते म्हणाले.

"कॉम्प्युटरच्या एकूण खर्चात मेमरीच्या खर्चाचा वाटा सामान्यपणे 15 ते 20 टक्के असतो. मात्र सध्याच्या मेमरीच्या किमतीमुळे हे प्रमाण 30 ते 40 टक्क्यांपर्यंत गेलं आहे," असं ते म्हणाले.

"बहुतांश ग्राहकोपयोगी उत्पादनांच्या श्रेणींमध्ये नफ्याचं प्रमाण, मेमरीच्या किमतीतील ही वाढ सहन करण्याइतकं जास्त नसतं," असं ते म्हणाले.

उत्पादनांच्या किमतीबाबत 2026 मध्ये काय अपेक्षित आहे?

किमतीत वाढ होत असताना, ग्राहकांना हे ठरवावं लागेल की अधिक किंमत मोजायची की कमी शक्तिशाली उपकरण विकत घ्यायचं.

"आम्हाला मिळालेल्या बाजारपेठेतील बहुतांश माहितीनुसार, असं दिसतं की, 2026 आणि 2027 या वर्षांमध्ये जगभरात किमती आणि पुरवठा हे एक मोठं आव्हान असेल," असं मेसन म्हणाले.

काही मोठी कंपन्यांनी कन्झ्युमर मार्केटकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे. म्हणजे कमी नफा दिसत असल्यामुळे त्यांनी ग्राहकोपयोगी उत्पादनांच्या बाजारपेठेकडे पाठ वळवली आहे.

मायक्रॉन ही पूर्वी रॅमच्या सर्वात मोठ्या विक्रेत्यांपैकी एक होती. या कंपनीनं डिसेंबरमध्ये जाहीर केलं की एआयकडून असलेल्या मागणीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी ते त्यांच्या 'क्रुशियल' या ब्रँडची विक्री थांबवणार आहेत.

क्रुशियल हा मेमरी आणि स्टोरेज उत्पादनांच्या विस्तृत श्रेणीचा ब्रँड आहे.

"यामुळे बाजारपेठेतून एक महत्त्वाची कंपनी बाहेर पडेल," असं मेसन म्हणाले.

"यामुळे, एकीकडे ग्राहकांसमोर कमी पर्याय उपलब्ध असतात. तर दुसऱ्या बाजूला जर त्यांचं संपूर्ण उत्पादन एआयसाठी वापरलं गेलं, तर त्यामुळे इतरांना ग्राहकांसाठी अधिक उत्पादन करण्यास वाव मिळेल. त्यामुळे परिस्थितीमध्ये कदाचित संतुलन साधलं जाईल."

ग्राहकांसमोर काय असणार पर्याय?

हॉवर्ड म्हणाले की, "16 जीबी रॅम असलेल्या एखाद्या लॅपटॉपच्या उत्पादन खर्चात 2026 मध्ये 40 डॉलर ते 50 डॉलरची (जवळपास 3600 रुपये ते 4500 रुपये) वाढ होऊ शकते. खर्चातील या वाढीचा बोजा ग्राहकांवरच टाकला जाण्याची शक्यता आहे."

"स्मार्टफोनच्या किमतीवरही याचा परिणाम होत त्यात वाढ होईल," असं ते म्हणाले.

"स्मार्टफोनच्या उत्पादन खर्चात साधारणपणे 30 डॉलरनं (जवळपास 2700 रुपये) वाढ होऊ शकते. या वाढीचा भारदेखील थेट ग्राहकांवर टाकला जाण्याची शक्यता आहे," असं ते पुढे म्हणाले.

विल्यम्स म्हणाले की, वाढलेल्या किमतींचा आणखी एक परिणामदेखील होऊ शकतो.

"कॉम्प्युटर ही एक वस्तू आहे. आधुनिक जगात ती लोकांच्या दैनंदिन वापरासाठी लागणारी वस्तू आहे," असं ते म्हणाले.

"मेमरीच्या किमतीत वाढ झाल्यामुळे, ग्राहकांना एकतर उपकरणाच्या आवश्यक असलेल्या कामगिरीसाठी जास्त किंमत मोजावी लागेल किंवा कमी कार्यक्षमतेच्या उपकरणाची निवड करण्याची तडजोड करावी लागेल," असं ते म्हणाले.

अर्थात, यासाठी आणखी एक पर्याय आहे. ग्राहकांना "जुनं तंत्रज्ञान अधिक काळ वापरावं लागेल," असं विल्यम्स म्हणतात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)