You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा अधिक वापर केल्यामुळे आपल्या मेंदूची क्षमता कमी होते का?
- Author, जॉर्ज सँडमॅन
- Role, बीबीसी प्रतिनिधी
तुम्ही शेवटचं एखाद्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर (एआय) आधारित चॅटबॉटला काय काम करायच्या सूचना दिल्या होत्या किंवा त्या चॅटबॉटकडून काय काम करवून घेतलं होतं?
कदाचित तुम्ही त्या चॅटबॉटला एखाद्या कठीण प्रश्नाच्या उत्तरासाठी रूपरेषा तयार करण्यास सांगितलं असेल किंवा एखाद्या मोठ्या डेटा सेटचं सखोल विश्लेषण करण्यास सांगितलं असेल, किंवा नोकरीसाठी अर्ज करताना तुमचं कव्हर लेटर त्या पदासाठी आवश्यक गोष्टींशी मेळ खातं की नाही, हे तपासायला सांगितलं असेल.
काही तज्ज्ञांना चिंता वाटत आहे की याप्रकारची काम स्वत: करण्याऐवजी आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे (एआय) करवून घेतल्यानं आपला मेंदू कमी श्रम घेतोय.
त्यांना वाटतं की यामुळे आपली विश्लेषणात्मक, टीकात्मक विचार करण्याची क्षमता आणि समस्या सोडवण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.
या वर्षाच्या सुरुवातीला मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीनं एक अभ्यास प्रकाशित केला आहे.
त्यात आढळलं आहे की ज्या लोकांनी निबंध लिहिण्यासाठी चॅट जीपीटीचा वापर केला, अशांमध्ये त्या काळात कॉग्निटिव्ह म्हणजे आकलनाबाबतच्या प्रक्रियेशी संबंधित मेंदूतील नेटवर्कच्या क्रिया कमी झाल्या.
संशोधकांचं म्हणणं आहे की त्यांच्या अभ्यासातून "शिकण्याच्या क्षमतांमधील संभाव्य घसरणीबाबतची गंभीर चिंता समोर येते."
या अभ्यासात एकूण 54 जणांचा सहभाग होता. एमआयटी आणि जवळपासच्या विद्यापीठांमधून त्यांची निवड करण्यात आली होती.
या अभ्यासात सहभागी झालेल्यांच्या मेंदूतील क्रियांना इलेक्ट्रोएन्सेफॅलोग्राफी (ईईजी) द्वारे रेकॉर्ड करण्यात आलं. ही प्रक्रिया करताना डोक्याच्या त्वचेवर इलेक्ट्रोड लावले जातात.
मग या अभ्यासात सहभागी झालेल्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सकडून निबंधावरील प्रश्नांचा सार तयार करण्यास, स्रोत शोधण्यास आणि भाषा तसंच शैलीत सुधारणा करण्यासाठी कामं करवून घेतली.
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर कल्पना विस्तारासाठी आणि त्यांची व्यवस्थित मांडणी करण्यासाठीदेखील करण्यात आला. मात्र काही युजर्सना वाटत होतं की याबाबतीत एआय खूप परिणामकारक नाही.
'एआयमुळे उत्तर शोधणं खूपच सोपं होतं'
एका वेगळ्या अभ्यासात, कार्नेगी मेलॉन विद्यापीठ आणि मायक्रोसॉफ्ट (को-पायलट) यांना आढळलं की जर लोक आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर गरजेपेक्षा जास्त अवलंबून राहू लागले, तर त्यांची समस्या सोडवण्याची क्षमता कमी होऊ शकते.
संशोधकांनी 319 अशा पांढरपेशा (व्हाईट कॉलर) कर्मचाऱ्यांचं सर्वेक्षण केलं, जे त्यांच्या कामात आठवड्यातून किमान एकदा एआय टूल्सचा वापर करतात.
त्यांना विचारण्यात आलं की एआयचा वापर करताना ते क्रिटिकल थिंकिंगचा वापर कसा करतात.
या अभ्यासात एआयला देण्यात आलेल्या 900 वेगवेगळ्या कामांचं विश्लेषण करण्यात आलं.
यात नव्या निष्कर्षांसाठी डेटाचं विश्लेषण करण्यापासून ते एखादं काम ठरलेल्या नियमांनुसार होतं की नाही, याची तपासणी करण्याचाही समावेश होता.
अभ्यासानुसार या लोकांना एआयच्या क्षमतेवर जितक्या प्रमाणात विश्वास होता, तितक्याच कमी प्रमाणात त्यांनी क्रिटिकल थिंकिंगचा वापर केला.
यात म्हटलं होतं, "जनरेटिव्ह एआयमुळे काम करण्याच्या दक्षतेत वाढ होऊ शकते, मात्र यामुळे कामाशी निगडित गहन किंवा सखोल विचार करण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. तसंच प्रदीर्घ काळ एआय टूलवर खूप जास्त प्रमाणात अवलंबून राहिल्यामुळे समस्या सोडवण्याच्या क्षमतेत घसरण होऊ शकते."
याच प्रकारचा एक अभ्यास ब्रिटनमधील शालेय विद्यार्थ्यांवर देखील करण्यात आला. ऑक्टोबरमध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसनं हा अभ्यास प्रकाशित केला.
या अभ्यासात आढळलं की प्रत्येक दहापैकी सहा विद्यार्थ्यांना असं वाटलं की एआयचा वापर केल्यामुळे शालेय गोष्टींशी निगडीत त्यांच्या क्षमतांवर नकारात्मक परिणाम झाला आहे.
अशा परिस्थितीत, एआयच्या वेगानं वाढत चाललेल्या वापराच्या पार्श्वभूमीवर असा प्रश्न निर्माण होतो की आपली आकलन क्षमता कमी होण्याचा धोका आहे का?
डॉ. अलेक्झेंड्रा टोमेस्कू, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसमध्ये जनरेटिव्ह एआय तज्ज्ञ आहेत आणि शालेय सर्व्हेक्षणावर काम करतात. त्या म्हणतात की अर्थात याचा परिणाम असाच होईल असं नाही.
त्या म्हणतात, "आमच्या अभ्यासातून आढळलं की दहापैकी नऊ विद्यार्थ्यांना वाटतं की एआयमुळे शालेय कामांशी निगडीत त्यांची किमान एक क्षमता सुधारली झाली आहे. मग ती समस्या सोडवण्याची क्षमता असो की क्रिएटिव्हिटी असो की रीव्हिजन असो."
"मात्र त्याचबरोबर, जवळपास एक चतुर्थांश विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की एआयच्या वापरामुळे त्यांना काम करणं सोपं झालं आहे. म्हणजेच हा मुद्दा अतिशय गुंतागुंतीचा आणि सूक्ष्म स्वरूपाचा आहे."
डॉ. टोमेस्कू असंही म्हणतात की अनेक विद्यार्थ्यांना एआयच्या योग्य वापराबाबत अधिक मार्गदर्शन हवं आहे.
चॅट जीपीटीचे प्रमुख सॅम ऑल्टमन यांच्या मते, दर आठवड्याला या टूलचा वापर करणाऱ्या युजर्सची संख्या 80 कोटींहून अधिक आहे. विद्यार्थ्यांना या तंत्रज्ञानाचा अधिक चांगला वापर करता यावा म्हणून चॅट जीपीटीनं विद्यार्थ्यांसाठी 100 प्रॉम्प्ट्सचा एक सेट जारी केला आहे.
प्राध्यापक वेन होम्स, युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि एज्युकेशनवर संशोधन करतात. त्यांना मात्र वाटतं की हे पुरेसं नाही.
त्यांना वाटतं की एआय टूल्सचा वापर करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याआधी, हे शिकल्यानंतर होणाऱ्या परिणामांबाबत अधिक व्यापक अकॅडेमिक संशोधन केलं गेलं पाहिजे.
प्राध्यापक होम्स म्हणतात, "आजच्या काळात, शिक्षण क्षेत्रात या टूल्सचा प्रभाव, त्यांची सुरक्षा, इतकंच काय त्यांचा खरोखरंच सकारात्मक परिणाम होतो आहे का, हे सिद्ध करण्यासाठी मोठ्या स्तरावर कोणताही स्वतंत्र पुरावा उपलब्ध नाही."
चांगले रिझल्ट, मात्र शिकण्यात कमकुवत?
प्राध्यापक वेन होम्स एका शोधाकडे लक्ष वेधतात. यात कॉग्निटिव्ह एट्रॉफीचा मुद्दा मांडण्यात आला आहे. म्हणजे अशी स्थिती, जेव्हा एआयचा वापर केल्यानंतर व्यक्तीच्या क्षमता आणि कौशल्य हळूहळू कमी होऊ शकतात.
त्यांचं म्हणणं आहे की ही समस्या अशा रेडिओलॉजिस्ट्समध्ये आढळून आली आहे, जे रुग्णांची तपासणी करण्याआधी एक्स-रे समजून घेण्यासाठी एआय टूलचा वापर करतात.
गेल्या वर्षी हार्वर्ड मेडिकल स्कूलकडून एक अभ्यास प्रकाशित करण्यात आला होता. यात असं आढळलं होतं की एआयच्या मदतीमुळे काही डॉक्टरांची कामगिरी सुधारली. मात्र काहींच्या कामगिरीत घसरणदेखील झाली.
असं का झालं? याचं संशोधकांना पूर्णपणे आकलन झालं नाही.
माणूस आणि एआय एकमेकांबरोबर कशाप्रकारे काम करतात, हे समजण्यासाठी अभ्यास करणाऱ्यांनी आणखी संशोधनाची मागणी केली. जेणेकरून अशा पद्धती विकसित करता याव्यात, ज्या माणसाच्या कामगिरीवर परिणाम करण्याऐवजी त्यात सुधारणा करतील.
प्राध्यापक होम्स यांना शंका वाटते की शाळा किंवा विद्यापीठातील विद्यार्थी त्यांच्या कामांसाठी एआयवर गरजेपेक्षा जास्त अवलंबून होऊ शकतात. यामुळे शिक्षणातून मिळणारी मूलभूत कौशल्यांचा त्यांच्यामध्ये विकास होणार नाही.
असं होऊ शकतं की एआयच्या मदतीनं एखाद्या विद्यार्थ्याला निबंधात चांगले गुण मिळतील. मात्र प्रश्न असा आहे की प्रत्यक्षात विद्यार्थ्यांमध्ये पुरेशी समज विकसित होते आहे का?
प्राध्यापक होम्स म्हणतात, "त्यांचं आउटपुट चांगलं आहे, मात्र प्रत्यक्षात त्यांची शिकण्याची क्रिया कमकुवत होते आहे."
चॅट जीपीटीच्या वापराबाबत त्याचे अधिकारी काय म्हणतात?
चॅट जीपीटीची मालकी ओपनएआय या कंपनीकडे आहे. या कंपनीत आंतरराष्ट्रीय शिक्षणाच्या प्रमुख असलेल्या जयना देवानी म्हणतात की, "या वादाबाबत कंपनी पूर्णपणे सजग आहे."
त्यांनीच ऑक्सफर्ड विद्यापीठाबरोबर करार करण्यात देखील भूमिका बजावली होती.
त्या बीबीसीला म्हणाल्या, "विद्यार्थ्यांनी त्यांचं काम आउटसोर्स करण्यासाठी चॅट जीपीटीचा वापर केला पाहिजे, असं आम्हाला अजिबात वाटत नाही."
त्यांचा मते, चॅट जीपीटीचा सर्वात चांगला वापर म्हणजे त्याचा वापर फक्त थेट उत्तर देणारं टूल म्हणून करण्याऐवजी ट्यूटरप्रमाणे करण्यात आला पाहिजे.
एखादा विद्यार्थी कसा स्टडी मोड सेटिंगद्वारे चॅट जीपीटीला प्रश्नोत्तरं करू शकतो, याचं त्या उदाहरण देतात.
विद्यार्थी असाच प्रश्न विचारतात, जो समजण्यास त्यांना अडचण येत असते. चॅटबॉट त्या प्रश्नाची सोप्या पद्धतीनं फोड करून विद्यार्थ्याला तो समजण्यात मदत करतं.
त्या आणखी एक उदाहरण देतात. विद्यार्थ्याला एखाद्या पूर्ण न समजलेल्या विषयावर रात्री उशीरा असाइनमेंट करणं.
त्या म्हणतात, "जर तुम्हाला एखादं प्रेझेंटेशन द्यायचं असेल आणि मध्यरात्र झाली असेल, तर तुम्ही तुमच्या (युनिव्हर्सिटी) ट्यूटरला ईमेल करून मदत मागणार नाही."
"मला वाटतं की जर चॅट जीपीटीचा वापर टार्गेटेड स्वरुपात आणि विचारपूर्वक करण्यात आला, तर त्यामध्ये शिकण्याची प्रक्रिया गतिमान करण्याची पूर्ण क्षमता आहे."
मात्र प्राध्यापक वेन होम्स या गोष्टीवर भर देतात की जो विद्यार्थी एआय टूल्सचा वापर करेल, त्यानं हे लक्षात घेतलं पाहिजे की, त्या टूल्सची रीझनिंग कसं काम करते आणि हे टूल उपलब्ध करून देणाऱ्या कंपन्या डेटा कशाप्रकारे हाताळतात.
ते म्हणतात की एआय देत असलेल्या उत्तरांची नेहमी पडताळणी करण्यात आली पाहिजे.
एआयची दूरगामी क्षमता आणि परिणामांकडे लक्ष वेधत ते म्हणतात, "ही फक्त कॅल्क्युलेटरची नवीन आवृत्ती नाही."
ते पुढे म्हणतात की, "मी माझ्या विद्यार्थ्यांना असं सांगत नाही की एआयचा वापर करू नका. मात्र हे मी नक्कीच सांगतो की आपल्याला याच्याशी संबंधित सर्व बाबी समजून घ्याव्या लागतील, जेणेकरून तुम्हाला विचारपूर्वक निर्णय घेता येतील."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.