AI स्टेथोस्कोप काही सेकंदात ओळखू शकेल हृदयाचे गंभीर आजार, पण हे काम कसं करतं?

    • Author, जॉर्ज राईट
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआयवर चालणाऱ्या स्टेथोस्कोपमुळे काही सेकंदात तीन प्रकारचे हृदयविकार ओळखता येतात, असं संशोधकांचं म्हणणं आहे.

स्टेथोस्कोपचा शोध 1816 साली लागला. रुग्णाच्या शरीरातील आवाज ऐकण्यासाठी डॉक्टर त्याचा वापर करतात.

ब्रिटनच्या एका टीमनं अशाच एका आधुनिक स्टेथोस्कोपचा अभ्यास केला आहे.

या स्टेथोस्कोपमुळे हार्ट फेल, हार्ट वॉल्व असे हृदयाचे आजार तसेच हृदयाचे असामान्य ठोके ताबडतोब ओळखता येतात, असं संशोधकांना आढळून आलं.

संशोधकांचं म्हणणं आहे की, हे उपकरण 'गेम चेंजर' ठरू शकतं आणि यामुळे रुग्णांना लवकर उपचार मिळू शकतात. संपूर्ण लंडनमध्ये हे उपकरण वापरण्याची योजना आहे.

एआय स्टेथोस्कोप काम कसं करतं?

एआय स्टेथोस्कोपमध्ये छातीच्या भागाच्या जागी एक लहान उपकरण आहे, जे पत्त्यांच्या घराइतकं मोठं आहे.

हे उपकरण मायक्रोफोनद्वारे हृदयाचे ठोके आणि रक्त प्रवाहातील काहीसे बदल देखील शोधू शकतं, जे मानवी कान नाही ऐकू शकत.

हे उपकरण ईसीजी (इलेक्ट्रोकार्डिओग्राम) चाचण्यादेखील करतं. हे हृदयाचे इलेक्ट्रॉनिक सिग्नल रेकॉर्ड करतं आणि त्याची माहिती क्लाउडवर पाठवतं, तिथं एआयद्वारे लाखो रुग्णांच्या डेटाचं विश्लेषण केलं जातं.

हा एआय स्टेथोस्कोप अमेरिकन कंपनी इको हेल्थनं तयार केला आहे.

इम्पीरियल कॉलेज लंडन आणि लंडनमधील इम्पीरियल कॉलेज हेल्थकेअर एएचएस ट्रस्ट यांनी केलेल्या अभ्यासात एआय स्टेथोस्कोपचा वापर करून 96 क्लिनिकमधील 12 हजारांहून अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली.

या रूग्णांची तुलना त्या 109 क्लिनिकमधील रूग्णांशी केली गेली, जिथं या एआय स्टेथोस्कोपचा वापर केला गेला नाही.

संशोधकांच्या म्हणण्यानुसार, एआय स्टेथोस्कोपमुळे 12 महिन्यांच्या आत रूग्णांमधील हार्ट फेलसारखी समस्या शोधण्याची शक्यता 2.33 पट जास्त होती.

त्याचप्रमाणं हृदयाचे असामान्य ठोक्यांच्या पॅटर्नला या उपकरणाद्वारे 3.5 पट अधिक सहजपणे शोधण्यात आलं. असामान्य हृदयाचे ठोक्यांची कोणतीही लक्षणं नसतात, परंतु यामुळे स्ट्रोकचा धोका वाढू शकतो.

या उपकरणामुळे हृदयाच्या व्हॉल्व्हचा आजार 1.9 पट अधिक सहजतेनं ओळखता आला.

रुग्णांवर वेळेवर उपचार करणं शक्य

ब्रिटिश हार्ट फाऊंडेशनचे (बीएचएफ) क्लिनिकल डायरेक्टर आणि कन्सल्टंट कार्डिओलॉजिस्ट डॉ. सोन्या बाबू नारायण म्हणाले, "200 वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेला साधा स्टेथोस्कोप 21व्या शतकात कसा अपग्रेड केला जाऊ शकतो, याचं हे ज्वलंत उदाहरण आहे."

ते म्हणाले की, अशा प्रकारचं नाविन्य खूप महत्वाचं आहे, कारण अनेकदा रुग्ण आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालयात पोहोचला तरच या आजाराबाबत माहिती मिळते.

ते म्हणाले, "हा आजार सुरुवातीच्या टप्प्यात समोर आल्यास रुग्णांना वेळीच उपचार मिळू शकतील आणि दीर्घ, निरोगी आयुष्य जगता येईल".

मॅड्रिडमध्ये झालेल्या युरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजीच्या वार्षिक काँग्रेसमध्ये हजारो डॉक्टरांसमोर हे निकाल सादर करण्यात आले.

नवीन स्टेथोस्कोप आता दक्षिण लंडन, ससेक्स आणि वेल्समध्ये वापरण्याची योजना आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)