'व्हॉट्सअ‍ॅप घोस्ट पेअरिंग' स्कॅम तुम्हाला माहिती आहे का? अशी होऊ शकते फसवणूक

    • Author, अमरेंद्र यारलागड्डा
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

आपल्या सर्वांच्याच फोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप असतोच. तुम्हीही व्हॉट्सअ‍ॅप वापरत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

कारण सायबर गुन्हेगार व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करून नव्या प्रकारे फसवणूक करत असल्याचं तेलंगणा पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

'व्हॉट्सअ‍ॅप घोस्ट पेअरिंग' या नावाने हा नवीन स्कॅम सुरू आहे.

दरम्यान, या प्रकरणी केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY) देखील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

व्हॉट्सअ‍ॅपद्वारे होणाऱ्या या फसवणुकीपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी सावध राहावं असं आवाहन करण्यात आलं आहे.

फसवणुकीचा हा प्रकार नेमका काय आहे?

सायबर गुन्ह्यांबाबत लोकांमध्ये जागरूकता वाढत असताना, गुन्हेगारही फसवणुकीसाठी नवनवीन पद्धती वापरत आहेत.

पूर्वी फोन कॉल्सद्वारे किंवा मेसेज पाठवून मालवेअर व्हायरसद्वारे फसवणूक केली जात असे.

आता मात्र थेट व्हॉट्सअ‍ॅप पेअरिंग (लिंकिंग) चा वापर करून फसवणूक केली जात असल्याचं पोलिसांना आढळून आलं आहे.

"'हाय… तुमचा हा फोटो तुम्ही पाहिलात का?' अशा मजकुरासह एखादी लिंक पाठवून या स्कॅमची सुरुवात केली जाते," असं हैदराबाद शहराचे पोलीस आयुक्त व्ही. सी. सज्जनार यांनी सांगितलं.

"ही लिंक ओळखीच्या व्यक्तीकडून आली असली, तरी चुकूनही त्यावर क्लिक करू नका," असा इशाराही त्यांनी दिला.

सज्जनार म्हणाले की, अशा लिंकवर क्लिक केल्यानंतर एक बनावट व्हॉट्सअ‍ॅप वेब पेज उघडतं आणि कोणताही ओटीपी किंवा स्कॅनिंग न करता तुमचं व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट थेट हॅकर्सच्या डिव्हाइसशी (कॉम्प्युटर, लॅपटॉप किंवा मोबाईल) कनेक्ट होतं.

आणि त्यानंतर वापरकर्त्याचं अकाउंट लॉक होतं आणि त्यांना स्वतःचे व्हॉट्सअ‍ॅप वापरता येत नाही, अशी माहिती सज्जनार यांनी दिली.

एकदा पेअरिंग झालं की…

वापरकर्त्याचे वैयक्तिक व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट सायबर गुन्हेगारांच्या डिव्हाइसला लिंक झाल्यानंतर सगळ्यात आधी माहिती चोरी केली जाते, असं तेलंगणा सायबर सिक्युरिटी ब्युरोच्या संचालिका शिखा गोयल यांनी सांगितलं.

"बँक खात्याची माहिती, वैयक्तिक चॅट्स, फोटो, व्हीडिओ अशी सगळीच माहिती सायबर गुन्हेगारांच्या हाती लागते. त्यानंतर ते सदर वापरकर्त्याच्या नावाने इतरांना संदेश पाठवून फसवणूक करतात," असं त्यांनी सांगितलं.

'एमईआयटी'ने काय सांगितलं?

ऑल इंडिया रेडियोने दिलेल्या वृत्तानुसार, घोस्ट पेअरिंगच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY) नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना व तत्व जारी केली आहेत.

"व्हॉट्सअ‍ॅपमधील डिव्हाइस लिंकिंग फीचरचा वापर करून गुन्हेगार व्हॉट्सअ‍ॅप खाती हॅक करत आहेत. पेअरिंग कोड्सच्या मदतीने कोणतीही प्रमाणीकरण प्रक्रिया न करता खाती हॅक केली जात आहेत," असं मंत्रालायनं स्पष्ट केलं.

या सूचनांचे पालन करणे महत्वाचे

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY) म्हटलं आहे की, संशयास्पद लिंक्सवर अजिबात क्लिक करू नये.

हेच मत शिखा गोयल यांनी बीबीसीशी बोलताना व्यक्त केले. त्यांनी याबाबत दिलेल्या सूचना पुढीलप्रमाणे.

  • व्हॉट्सअ‍ॅप सेटिंग्समधील 'Linked Devices' हा पर्याय नियमितपणे तपासा. जर तुम्ही अज्ञात डिव्हाइसेसशी कनेक्ट असल्याचं निदर्शनात आलं तर ताबडतोब लॉग आउट करा.
  • व्हॉट्सअ‍ॅप सेटिंग्समध्ये Account मध्ये जाऊन 'Two-Step Verification' हे फीचर आवर्जून सुरू ठेवा.

अकाउंट हॅक झाल्यास काय करावे?

सर्व खबरदारी घेतल्यानंतरही कधी-कधी अकाउंट हॅक होण्याची शक्यता असते. त्यामुळे आवश्यक काळजी घ्यावी, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

जर व्हॉट्सअ‍ॅप किंवा ब्राउझर हॅक झालं असेल, तर तत्काळ त्याचा वापर थांबवा, असं शिखा गोयल यांनी सांगितले.

  • हॅकिंगदरम्यान आलेले मॅसेज, लिंक्स, पॉप-अप्स यांचे स्क्रीनशॉट घ्यावेत.
  • ट्रान्झॅक्शन आयडी, UTR नंबर, कॉल लॉग्स सेव्ह करावेत.
  • ईमेल, बँकिंग आणि सोशल मीडिया अकाउंट्सचे पासवर्ड तत्काळ बदला.
  • जर बँक किंवा पेमेंट अ‍ॅपमधून पैसे गेले असतील, तर त्वरित संबंधित संस्थांशी संपर्क साधून तक्रार नोंदवा.
  • गुगल क्रोम आणि अ‍ॅप्सचे अधिकृत नवीन अपडेट्स नियमितपणे इन्स्टॉल करा.

अशा सूचना पोलिसांनी दिल्या.

तक्रार कुठे करावी?

कोणत्याही परिस्थितीत ओटीपी, पिन, सीव्हीव्ही किंवा व्हॉट्सअ‍ॅप कोड कुणालाही शेअर करू नयेत, असा सल्ला तेलंगणा पोलिसांनी दिला आहे.

सायबर फसवणूक झाली असल्यास किंवा सायबर गुन्ह्यांशी संबंधित कोणतीही असल्यास 1930 या क्रमांकावर किंवा cybercrime.gov.in या पोर्टलवर तक्रार नोंदवावी, असं शिखा गोयल यांनी सांगितलं.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.