मणिपूरमध्ये दोन दिवसांत 5 नागरिकांसह 2 जवानांची हत्या, ताज्या हिंसाचारामागील कारण काय?

    • Author, दिलीप कुमार शर्मा
    • Role, गुवाहाटीहून बीबीसी हिंदीसाठी

मणिपूरमध्ये 48 तासांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या हिंसाचारात 5 नागरिकांसह 2 सुरक्षा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला.

यापैकी एक घटना विष्णूपूर जिल्ह्याची आहे. याठिकाणी संशयास्पद कट्टरतावाद्यांनी गुरुवारी सायंकाळी एका पिता-पुत्रासह चार जणांची हत्या केली.

मृतांमध्ये थियाम सोमेन सिंह, ओइनम बामोइजाओ सिंह, त्यांचा मुलगा ओइनम मनितोम्बा सिंह आणि निंगथौजम नबादीप मेईतेई यांचा समावेश होता.

तर बुधवारी रात्री इंफाळ पश्चिम जिल्ह्यात कांगचुपमध्ये हल्लेखोरांनी मैतेईबहुल हावातील एका ग्रामरक्षकाची हत्या केली. तसंच बुधवारीच संशयास्पद कट्टरतावादी गटानं टँगनोपल जिल्ह्यात म्यानमारच्या सीमेला लागून असलेल्या मोरेह शहरात सुरक्षा दलांवर हल्ला केला होता. त्यात दोन पोलीस जवानांचा मृत्यू झाला होता.

हिंसाचाराच्या या वेगवेगळ्या घटनांमध्ये मृत्यू झालेले सगळे मेैतेई समुदायातील होते. त्यानंतर राजधानी इंफाळपासून ते विष्णूपूरसारख्या मेैतेई बहुल भागांमध्ये सुरक्षेच्या मुद्द्यावरून आंदोलनांला सुरुवात झाली आहे.

मणिपूरमध्ये 3 मेपासून घडलेल्या हिंसाचाराच्या घटनांनंतर गेल्या काही काळापासून शांततेचं वातावरण होतं. पण बुधवारी मोरेह शहरातून पुन्हा हिंसाचार सुरू झाल्यानं राज्यात भीती आणि दहशतीचं वातावरण तयार झालं आहे.

मणिपूरमध्ये निर्माण झालेल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर प्रश्नचिन्हं उपस्थित केलं जात आहे. या ताज्या हिंसाचारामागं नेमकं कारण काय आहे? आठ महिन्यांपासून हा हिंसाचार का थांबत नाही? असे प्रश्न निर्माण होत आहेत.

मोरेहमध्ये कसा उसळला हिंसाचार?

गेल्या 8 महिन्यांत मणिपूरच्या ज्या शहरी भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला आहे, त्यात सीमेला लागून असलेल्या मोरेह शहराचाही समावेश आहे.

कुकीबहुल असलेल्या या शहरात हिंसाचारात मैतेईंची बहुतांश घरं जाळण्यात आली होती. सध्याच्या परिस्थितीत मोरेहमध्ये एकही मेैतेई कुटुंब नाही.

मोरेहमध्ये आसाम रायफल्स आणि बीएसएफबरोबरच मणिपूर पोलिसांच्या तैनातीवरून विरोध होत आहे. त्याठिकाणी कुकी समुदायाचे लोक मणिपूरच्या कमांडोंना परिसरातून हटवण्याची मागणी करत आहेत. पोलीस कमांडोंमध्ये मेैतेई समुदायाचे जवान आहेत, त्यामुळं सुरक्षित वाटत नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. पोलिस कमांडोंबरोबर काही मेईतेई हल्लेखोर आले असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे.

कुकी समुदायाची प्रमुख संघटना कुकी इंग्पीचे ज्येष्ठ नेते थांगमिलन किपजेन यांच्या मते, हा लढा रोखण्यासाठी भारत सरकारनं हस्तक्षेप करणं गरजेचं आहे.

"राज्यात तुलनात्मक शांतता होती. कारण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डोंगरी भागातील कायदा सुव्यवस्थेवर ते स्वतः लक्ष ठेवतील असं सांगितलं होतं. तर खोऱ्यातील भाग मुख्यमंत्री बीरेन सिंह सांभाळतील असंही त्यांनी सांगितलं होतं. त्यामुळं आतापर्यंत राज्य पोलिसांचे कमांडो डोंगरी भागात येत नव्हते. पण आता मणिपूर सरकार मेईतेई समुदायाचे पोलिस कमांडो हेलिकॉप्टरद्वारे मोरेहला पाठवत आहे, त्यामुळं हिंसाचार वाढला आहे. राज्य सरकारनं शांतता पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी या कमांडोंना परत बोलवायला हवं," असं थांगमिलन किपजेन यांनी बीबीसीला सांगितले.

काही कुकी संघटनांनी मोरेह शहरातून मणिपूर पोलिस कमांडोंना हटवण्याच्या मागणीवरूनही अनेकदा आंदोलन केलं आहे.

गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्या मोरेहमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी (एसडीपीओ) चिंगथम आनंद कुमार यांची संशयास्पद कट्टरतावाद्यांनी हत्या केली होती. त्यानंतर परिसरात संघर्षाचं वातावरण वाढत गेलं.

अटकेच्या विरोधातील आंदोलन

मणिपूर पोलिसांच्या स्पेशल कमांडो टीमनं सोमवारी सायंकाळी एका चकमकीनंतर दोन संशयितांना पकडलं होतं. ते दोघं मोरेह शहराचे एसडीपीओ आनंद कुमार यांच्या हत्येत सहभागी असल्याचा पोलिसांचा दावा आहे.

पोलिसांनी या प्रकरणात दोघांना अटक केली आहे. ते दोघं कुकी-जो समुदायाशी संबंधित होते. अशा स्थितीत कुकी लोकांनी आणि विशेषतः या समुदायातील महिलांनी दोघांच्या सुटकेसाठी मोरेह पोलिस ठाण्यासमोर आंदोलन केलं.

पोलिसांनी आंदोलकांना हटवण्यासाठी शक्तीचा वापर केला. त्यात अनेक महिला जखमी झाल्या. त्याच्या पुढच्याच दिवशी शस्त्रधारी संशयास्पद कट्टरतावाद्यांनी मोरेह शहरात तीन वेगवेगळ्या ठिकाणी हल्ला करत दोन पोलिस कमांडोंची हत्या केली.

मणिपूरमध्ये कुकी कट्टरतावाद्यांकडून करण्यात आलेल्या या ताज्या हल्ल्यांबाबत किपजेन म्हणाले की, "म्यानमारमध्ये अजूनही संघर्ष सुरू आहे. त्यामुळं याठिकाणी अनेक कट्टरतावादी संघटना सक्रिय आहेत. मणिपूर सीमा बंद करण्यात आलेली नाही. त्यामुळं याठिकाणी हालचाली होत असतात. पण मोरेहमध्ये सुरक्षा दलांवर झालेल्या हल्ल्यात विदेशी कट्टरतावाद्यांचा हात नाही."

सुरक्षा सल्लागारांच्या राजीनाम्याची मागणी आणि त्यांचे उत्तर

राज्याच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत आंदोलन करणाऱ्या काही संघटनांनी मणिपूर राज्य आणि केंद्रीय दलांच्या एकत्रित तुकड्यांचे प्रमुख कुलदीप सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

राज्यातील मेैतेई महिलांची सर्वांत शक्तिशाली संघटना मीरा पैबीनंही ही मागणी केली आहे.

तर मणिपूरचे सुरक्षा सल्लागार कुलदीप सिंह यांच्या मते, सुरक्षादलांचे जवान आसाम रायफल्सच्या साथीनं कट्टरतावादी हल्लेखोरांचा सामना करत आहेत.

सुरक्षादलांवर झालेल्या हल्ल्याबाबत कुलदीप सिंह गुरुवारी सायंकाळी इंफाळमध्ये म्हणाले की, "म्यानमारच्या सीमेवर असलेल्या मोरेह शहरात बुधवारी पोलीस कर्मचाऱ्यांवर झालेल्या हलल्याच्या आधी एका गोपनीय रिपोर्टमध्ये एक सल्ला देण्यात आला होता. त्यात बंडखोर गटांबरोबर 'बर्माहून आलेले सैनक' सुरक्षादलांवर हल्ला करू शकतात असं सांगण्यात आलं होतं."

त्यांनी सांगितलं की, कुकी समुदायाकडून मिळालेल्या धमकीनंतर गोपनीय माहिती गोळा करण्यात आली होती. त्यानुसार मोरेहमध्ये तैनात असलेल्या मणिपूर कमांडोंना लक्ष्य केलं जाणार होतं. कारण कुकी इंग्पी आणि नागरिक समाज संघटनेने अनेक लोक मोरेहमध्ये सुरक्षित ठिकाणी येत होते आणि ते पोलिस कमांडोना हटवण्याची मागणी करत होते.

पण या घटनेत विदेशी हल्लेखोरांचा सहभाग असल्याचे कोणतेही पुरावे अद्याप मिळालेले नाहीत.

मेईतेई समाजाच्या हितासाठी तयार करण्यात आलेल्या कोऑर्डिनेशन कमिटी ऑफ मणिपूर इंटिग्रिटी म्हणजेच कोकोमीचे ज्येष्ठ नेते किरेन कुमारे यांच्या मते, केंद्र आणि राज्य सरकारला मणिपूरमधील स्थिती सांभाळण्यात यश येत नाहीये.

त्यांच्या मते, "सरकार कुकी दहतवाद्यांवर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरत आहे. कुकींना मोरेह या सीमेवरील गावावर ताबा मिळवायची इच्छा आहे. म्यानमारमधील बंडखोर या कुकी दहशतवाद्यांच्या साथीनं आरपीजी स्फोटकांद्वारे हल्ला करत आहेत. कोणत्याही जातीय हिंसाचारात आरपीजी वापराचं आजवर ऐकिवात आलेलं नाही."

राज्यात शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रश्नावर मैतेई नेते किरेन कुमार म्हणाले की, "या भागात केवळ भारत सरकारच्या हस्तक्षेपाद्वारेच शांतता प्रस्थापित होऊ शकते. हिंसाचार सुरू होऊन आठ महिन्यांपेक्षा जास्त काळ झाला आहे. बीरेन सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं आहे. लोकांची हत्या केली जात आहे. घरं जाळली जात आहेत पण कुणालाही मणिपूरची काळजी नाही."

सुरक्षा व्यवस्थेत बदल

राज्यात समोर आलेल्या हिंसाचाराच्या या ताज्या घटनांनंतर सुरक्षेत नव्यानं बदल करण्यात आले आहेत. कारण कट्टरतावादी आधी अशा प्रकरचे हल्ले दुर्गम भागांतून करायचे.

पण नुकताच पोलिसांच्या कमांडोंवर जवळ येऊन हल्ला करण्यात आला आहे. त्यामुळं सीमाभागात आसाम रायफल्स, बीएसएफ आणि पोलिस कमांडोंच्या जवानांनी हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी मोठी मोहीम सुरू केली आहे.

दरम्यान राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे वैद्यकीय मदतीबरोबरच आणीबाणीच्या स्थितीत वापरल्या जाणाऱ्या विशेष हेलिकॉप्टरची मागणीही केली आहे. केंद्र सरकारनं हे हेलिकॉप्टर उपलब्धही करून दिले आहेत.

मणिपूरचे सुरक्षा सल्लागार कुलदीप सिंह म्हणाले की, "मोरेहमध्ये बीएसएफची एक तुकडी, लष्कराच्या दोन तुकड्या आणि चार कॅस्पर वाहनांसह अतिरिक्त कुमक तैनात केली आहे. त्याशिवाय केंद्रीय गृह मंत्रालयाचं एक हेलिकॉप्टरही या भागात उतरवण्यात आलं आहे."

मणिपूरमध्ये गेल्या 8 महिन्यांमधील हिंसाचारावर नजर ठेवणारे ज्येष्ठ पत्रकार प्रदीप फनजौबाम म्हणाले की, "डोंगरी भागासाठी स्वतंत्र प्रशासनाची मागणी केली जात आहे. मेईतेई समुदाय त्याला विरोध करत आहे. गेले काही दिवस हिंसाचार झाला नाही. पण कट्टरतावाद्यांनी सरकारचं लक्ष वेधण्यासाठी पुन्हा हल्ले सुरू केले आहेत."

"लोकसभा निवडणूक जवळ आहे. कट्टरतावाद्यांना वाटतं की, अशाप्रकारे त्यांना त्यांच्या मागण्या मान्य करुन घेता येतील. जर केंद्र सरकारनं वेगळ्या प्रशासनासारखा काही निर्णय घेतला तर मणिपूरबरोबरच नागालँड आणि मेघालयसारख्या राज्यांतही वाद सुरू होतील."

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)