You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अस्पृश्यतेचं समर्थन करणाऱ्या शंकराचार्यांना जेव्हा कुमार सप्तर्षींनी आव्हान दिलं होतं
- Author, कुमार सप्तर्षी
- Role, बीबीसी मराठीसाठी
कुमार सप्तर्षी हे समाजवादी चळवळीतील ज्येष्ठ नेते आहेत. बीबीसी मराठीसाठी प्राची कुलकर्णींनी त्यांची मुलाखत घेऊन या लेखाचे शब्दांकन केले आहे.
1973 साली पुरीचे शंकराचार्यानी दिलेलं एक कुमार सप्तर्षींनी स्वीकारलं आणि दोन दिवस त्यांच्याशी वाद घातला. धार्मिक प्रश्नांना तार्किक मुद्द्यांवर घातलेला हा वाद महाराष्ट्रासह देशभर गाजला. त्या ऐतिहासिक वादाची ही कहाणी :
झालं असं की, 22 मार्च 1973 मध्ये पुण्याच्या 'केसरी’ वृत्तपत्रात पुरीचे शंकराचार्य निरंजनदेव तीर्थ यांनी एक जाहीर आव्हान दिलं होतं.
शंकराचार्यांचं ते आव्हान होतं : “अस्पृश्यतेचं पालन करणं सोडून दिल्यामुळेच महाराष्ट्रात भयंकर दुष्काळ पडला आहे. परिवर्तनवादी लोकांना अस्पृश्यता पाळू नका म्हणून सांगतात. हा समतेचा विचार ईश्वराला व निसर्गाला मंजूर नाही. माझ्या या भूमिकेशी कुणाचा मतभेद असेल तर त्याच्याबरोबर मी आठ दिवस जाहीरपणे अखंड वादविवाद करण्यास तयार आहे.”
कुमार सप्तर्षी हे तेव्हा 31 वर्षांचे होते. आपल्या विचार-वर्तुळातील मित्रांशी चर्चा करून त्यांनी शंकराचार्यांचं हे आव्हान स्वीकारण्याचा निर्णय घेतला.
कुमार सप्तर्षींनी शंकराचार्यांना आव्हान दिलं
पुरीचे शंकराचार्य हे पूर्वीचे नागपूरचे 'खरे' आडनावाचे गृहस्थ आहेत हे कळलं. आम्ही फोन करून शंकराचार्यांच्या भेटीसाठी वेळ मागितली.
युवक क्रांती दलाचे (युक्रांद) पाच-सहा कार्यकर्ते बरोबर घेऊन, ठीक पावणेसहा वाजता पुण्यात जिथे ते थांबले होते, त्या मंगल कार्यालयात आम्ही गेलो. नमस्कार करुन त्यांच्या हातात पत्र दिलं.
मी म्हणालो, "आप जिस दिन, जो भी समय तय करेंगे हम उस वक्त आयेंगे. आप बताईये, विवाद का आधार धर्मग्रंथमे लिखे हुए वचन या तर्क होगा.”
जरा वेळ थांबून शंकराचार्य म्हणाले, “पंचोकी क्या जरुरत है.अलग समय निश्चित करनेकी भी कोई जरुरत नही. वादविवाद अभी शुरू होगा.”
मनुस्मृतीवर महाराजांचं व्याख्यान सुरू होण्यापूर्वी पंडित वसंत गाडगीळांनी संस्कृतमधून प्रस्तावना केली.
वादविवादाचं आव्हान स्वीकारणारे काही तरुण सभागृहात आल्याचं श्रोत्यांना सांगितलं. मला व्यासपीठाकडे पाचारण करण्यात आलं. जमिनीवर उभं राहण्यास सांगितलं.
मी हात जोडून बोलायला सुरुवात केली, "आदरणीय महाराज आप जैसे इतने बडे, बुजुर्ग, महान व्यक्तीके सामने मेरे जैसा छोटा आमदी बहुत दबा हुआ महसूस कर रहा है. मै आपको प्रणिपात करता हूॅं."
'प्रणिपात' हा खास ब्राम्हणी शब्द.
आपण सारे अत्यंत जाणकार आहात. मी वैद्यकीय व्यवसाय करणारा डॅाक्टर आहे. मी धर्मग्रंथ अवश्य वाचतो. परंतु धर्मग्रंथांचा अर्थ जाणून घेणं, तो इतरांना सांगणं हा माझा पेशा नाही.
मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे. 1972 सालात महाराष्ट्रात भयंकर दुष्काळ सुरू झाला. तो अजून चालू आहे. मी सहकाऱ्यांबरोबर दुष्काळी भागात फिरलो आणि दुष्काळग्रस्त जनतेला शक्य तेवढी मदत करण्याचा प्रयत्न केला. या वादासाठी तीच माझी गुणवत्ता आहे.
शंकराचार्य महाराजांची भूमिका वेगळी आहे. समता या मूल्याला त्यांचा कडवा विरोध आहे. मला याचा आनंद आहे की त्यांनी आपला विरोध लपवून ठेवलेला नाही. आज आपल्याला दोन-तीन प्रश्नांवर चर्चा करायची आहे. तात्त्विक मंथनातून शुद्ध तत्त्वामृताचा शोध आणि बोध घ्यायचा आहे.
माझा दावा आहे, की निसर्गाचा स्वभावशुद्ध समतावादी आहे. त्याला या तत्त्वात किंचितही बदल चालत नाही.
ईश्वराला विषमता मंजूर आहे हे महाराजांचं दुसरं विधान आहे; पण त्या विषयावर मी बोलणार नाही. त्या विधानाची मी दखल घेऊ इच्छित नाही. कारण ईश्वर ही संकल्पना देखील मानवनिर्मित आहे.
माझी भूमिका उपस्थित श्रोत्यांपुढं स्पष्ट करून प्रत्यक्ष वादविवादाला प्रारंभ करण्यासाठी शंकराचार्यांच्या आसनाकडं नजर वळवून मी माझ्या युक्तिवादाला सुरुवात केली.
महाराज, लोक अस्पृश्यतेच्या प्रथेचं पालन करत नसल्यामुळं महाराष्ट्रात दुष्काळ पडला हे आपले कथन तर्कविसंगत आणि बुद्धीला न पटणारं आहे. त्यातील विसंगती झाकण्यासाठी आपण ईश्वर आणि निसर्ग यांना मध्ये घेत आहात. मला नम्रपणे सांगायला पाहिजे हिंदू धर्मग्रंथांमध्येही या प्रथेचं समर्थन आढळत नाही.
अर्थात, धर्मग्रंथ निसर्गनिर्मित नसून मानवनिर्मित आहेत. ज्या वर्गानं हे ग्रंथ कधी तरी लिहिले आहेत, त्यांचे वारसदार आजही त्यांचा आश्रय घेतात. अस्पृश्यतेचं स्पष्ट समर्थन धर्मग्रंथांनी केलेलं नाही; पण त्यांच्या पानापानांत विषमतेचा प्रचार मात्र अवश्य आहे.
धर्मग्रंथांत ग्रंथित केलेला विचार तर्काशी, मानवी हक्कांशी आणि एकुणात माणुसकीशी विसंगत असेल, तर त्यांचा आपण सर्वांनी त्याग केला पाहिजे. धर्मग्रंथांचा आधार घेऊन कुणीही चुकीच्या गोष्टींचा प्रचार करू नये. तो समाजावर अन्याय होईल.
निसर्गाचं श्रेष्ठत्व आपण सर्वांनी मानायलाच हवं. निसर्गाचं ज्ञान केवळ कल्पनेनं होत नाही. विज्ञान हे निसर्गाची गुपितं उलगडवून दाखणारं शास्त्र आहे.
सत्याचा शोध घेताना विज्ञानानं तीन कसोट्या सांगितल्या आहेत. निसर्गाचे नियम कळले आहेत असा दावा कुणाला करायचा असेल, तर त्याला वैश्विकता, कालसातत्य अन मानवी इच्छेपासून मुक्त असं ते स्वायत्त आणि त्रिकालाची बाधा न होणारं, तीनही कसोट्यांवर उतरणारं सत्य आहे हे पटवून द्यावं लागतं.
कोप ही मानवी भावना आहे. निसर्गाला भावना नसतात. अस्पृश्यता निसर्गनिर्मित आहे हे वैज्ञानिक सत्य नाही. सत्य असेल तर ते तीन कसोट्यांवर उतरायला हवं. वैश्विकता ही पहिली कसोटी. अस्पृश्यता वैश्विक नाही. भारताबाहेर अस्पृश्यता ही कुप्रथा सापडत नाही.
दुसरा निकष कालसातत्याचा. पृथ्वी निर्माण झाल्यापासून अस्पृश्यता ही कुप्रथा अस्तित्वात नव्हती. जगाच्या अंतकाळापर्यंत ती टिकून राहणार नाही. ही प्रथा जगाच्या आदिकाळापासून अस्तित्वात आहे आणि ती जगाच्या अंतापर्यंत चालू राहणार आहे अस आपण सप्रमाण सिद्ध करु काय?
तिसऱ्या निकषावरही आपलं विधान टिकत नाही. पाणी शंभर अंश तापमानाला उकळतं हे त्रिकालाबाधित सत्य आहे. कारण विश्वात पाणी कुठही त्याच तापमानाला उकळतं. माणसाच्या इच्छेनं निसर्गाचं सत्य बदलता येत नाही अस्पृश्यता ही कुप्रथा मानवी इच्छेपासून मुक्त, निरपेक्ष किंवा स्वायत्त नाही.
आपण माणसाच्या भावना आणि निसर्गाचे नियम यात गल्लत करून चुकीचा सिद्धांत मांडला आहे. माणसांच्या इच्छा परिवर्तनीय असतात. निसर्गाचे नियम मात्र अपरिवर्तनीय आहेत. मानवी इच्छा तर्कविसंगत असल्या तरी त्या इतरांवर लादायचा जेव्हा प्रयत्न होतो, तेव्हा त्या इच्छांना इकडून तिकडून आधार शोधण्याचे डावपेच आखले जातात.
कधी महापुरुषांची वाणी, कधी धर्मग्रंथ, कधी ईश्वर, तर कधी निसर्ग यांचा आधार घेतला जातो. पण ही बनवाबनवी असते. आपण भक्तांच्या, अनुयायांच्या मनावर आणि बुद्धीवर अधिराज्य गाजवता. आपणासारख्यांनी पोकळ आणि घातक विधानं केल्यानं समाजाची जबरदस्त हानी होते.
ज्यांना अस्पृश्यता प्रथा नष्ट करायची आहे, त्यांच्या प्रबोधनाचा परिणाम नष्ट करण्यासाठी निसर्गाच्या कोपाची भीती तुम्ही दाखवत आहात. तुम्ही समाजाला सांगत आहात, की 'या लोकांचं ऐकलं तर अनर्थ होईल, निसर्गाचा कोप होऊन दुष्काळ पडेल, तुमचा विनाश होईल.' एका धर्माचार्याला अशी भाषा शोभादायक नाही.
आणि शंकराचार्य चिडले
शंकराचार्य म्हणाले,
"निसर्ग म्हणजे विषमता, विषमता हा निसर्गाचा धर्म आहे. प्रत्येक कणात विषमता भरलेली आहे. निसर्ग विषमतेने भरलेला आहे. कोणत्याही दोन माणसांचे डोळे, नाक, कान सारखे नसतात. समानता ही सप्तर्षी सारख्या समाजवाद्यांची फँटसी आहे. त्यांची ही कल्पना निसर्गाचा आणि देवाचा घोर अपमान आहे."
यावर मी उत्तर दिलं, "तुम्ही माणसांमध्ये जे वरवरचे भेद वर्णन करत आहात त्याला विषमता मानता येणार नाही. ती फक्त विविधता आहे. मी डॉक्टर आहे, माझा अनुभव आहे की निसर्ग न्याय्य आहे. माझे प्रशिक्षण फक्त मृत मानवी शरीरावर केले जाते. आम्ही मृत मानवी शरीराच्या प्रत्येक भागाचा सराव करतो. जर प्रत्येक माणसाचे शरीर वेगळे किंवा वेगळे असते, तर हे प्रशिक्षण निरर्थक ठरले असते. आणि आणखी एक गोष्ट. संपूर्ण मानवजातीच्या फायद्यासाठी, आम्ही समाजवादी लोक समान हक्क मागतात. मानवी हक्कांच्या बाबतीत समानता असली पाहिजे."
मग ते म्हणाले, "माणसात भेद आहेत. तुम्हाला दिसत नसेल तर ठीक आहे. मी तुम्हाला आणखी एक उदाहरण देतो. गाय किंवा इतर कोणत्याही प्राण्याचे उदाहरण घ्या, काही गायींचा रंग काळा असतो, काही काही पांढऱ्या, तर काही लाल आहेत. यामागचे कारण फरक आहे."
शंकराचार्यांचं सादरीकरण पूर्ण झाल्यावर त्यांनी एकतर्फी घोषणा केली, "आम्ही जिंकलो, सप्तर्षी हरले! श्रीराम जयराम म्हणा... अधर्माचा नाश होवो."
माझ्या प्रश्नांची थेट उत्तरे देण्याचं त्यांनी टाळलं.
ते म्हणाले, "तुमच्या औषधाचा अभ्यास करण्यात काही निसर्ग सर्वांना समान वागणूक देत नाही. ज्याला मारावं लागतं त्याला फाशीची शिक्षा देतो. ज्याला मारावेच लागत नाही, तो असला तरी टायफॉइडचा झटका आला तरीही तो मरत नाही. रोग आणि मृत्यूचा संबंध नाही. जेव्हा माणसाचं मागील जन्माचं पुण्य संपतं तेव्हा तो मरतो."
शंकराचार्य माझं म्हणणं पूर्ण ऐकून घेत नसत. अर्ध्यातच माझं म्हणणं तोडून ते पुढच्या उदाहरणाकडं वळत. हा प्रकार बराच वेळ चालू राहिला. वाद निष्कर्षाप्रत पोहोचेना.
शेवटी महाराज म्हणाले, "हे बघ, चार पोरांना एका रांगेत उभे करा आणि त्यांना दगड फेकायला सांगा. प्रत्येकाचा दगड वेगळ्या अंतरावर जाईल. निसर्गाने सर्व मुले समान ताकदीची निर्माण केली असती, तर सर्वांचे दगड समान अंतरावर पोहोचले असते. निष्कर्ष एकच आहे, प्रत्येक व्यक्तीची शक्ती वेगळी असते. समाजवादी विचारसरणीच्या लोकांचा असा विश्वास आहे की प्रत्येकाची शक्ती समान आहे. त्यांचा सिद्धांत चुकीचा सिद्ध झाला आहे.”
माझं उत्तर होतं, "महाराज, तुम्ही एक युक्तिवाद करा आणि उलट निष्कर्ष काढता. निसर्गाचे वर्तन सम आहे की असमान हा आजच्या चर्चेचा एकमेव मुद्दा आहे. सर्व मुलांनी फेकलेले दगड समान अंतरावर पोहोचणार नाहीत. बरं, यावरून गुरुत्वाकर्षण, वेग इत्यादी वैज्ञानिक सिद्धांत खोटे सिद्ध होत नाहीत. दगड फेकल्यास वातावरणात तेच बल आणि हवेचा वेग सारखाच राहिल्यास नियमानुसार दगड समान अंतरावर पोहोचतील. तर्कशास्त्रानुसार, वादविवाद जर तसे झाले नाही तर निकालापर्यंत आपण पोहोचू शकणार नाहीत."
तोपावेतो माझ्या लक्षात आलं होतं की, ते तर्कानं सुसंगत अशी चर्चा करूच शकणार नाहीत. चर्चा संपवण्यापूर्वी एखादा तडाखेबंद मुद्दा मांडावा, असा विचार माझ्या मनात चमकला.
शंकराचार्यांना माडीवरून उडी मारण्याचं आव्हान दिलं
मी म्हणालो, "आपण क्षणभर एक कल्पना करू या की उद्यान प्रसाद कार्यालयाच्या माडीवर आपण दोघं उभे राहिलो आहोत. तिथून आपण रस्त्यावर उडी मारली तर काय होईल, या विषयावर आपण दोघं चर्चा करत आहोत, अशी कल्पना करा. माझ्या मते, गुरुत्वाकर्षणामुळे आपण दोघंही रस्त्यावर आदळू, दोघांचं डोकं नक्कीच फुटेल. हा घटनाक्रम निसर्गनियमानुसार अटळ आहे.
आपण पुण्यवान व्यक्ती अन मी मात्र एक पापी म्हणून दोघांच्या भविष्यात काडीमात्र फरक होणार नाही. आपण पुण्यशील, धर्माचार्य असल्यामुळं गुरूत्वाकर्षणाच्या नियमामध्ये निसर्ग आपल्यासाठी अपवाद करणार नाही. आपण हवेत तरंगणार आणि फक्त मीच रस्त्यावर आदळणार असं घडणार नाही. हे मला निश्चितपणे माहीत असल्यानं मी तर उडी मारणार नाहीच; पण आपल्यालाही मी उडी मारू देणार नाही. या काल्पनिक परिस्थितीमध्ये आपण काय भूमिका घ्याल?
आपल्या उत्तरावर या वादाचा निकाल लागू शकतो. आपण स्वतः उडी मारणार नसाल आणि मलाही उडी मारू देणार नसाल तर माझा मुद्दा आपण छुपेपणानं का होईना कबूल केला असं मानू या. कारण निसर्गाची भेदरहित अटळता आपण मान्य केल्यामुळंच पुढील भविष्य आपण जाणलं आणि अनर्थ टाळण्यासाठी दोघांपैकी कुणी उडी मारावी हा प्रस्ताव आपण नाकारला असं म्हणता येईल.
याउलट, मृत्यू पूर्वसंचितानुसारच आणि पूर्वनिश्चित वेळेलाच होतो हा सिद्धांत आपण खरोखरीच मानत असाल, तशी आपली धारणा दृढ असेल, तर आपण म्हणाल, की 'अरे कुमार, तू मरशील रे बाबा! तू उडी मारू नकोस. मी उडी मारतो. मला काही होणार नाही. माझी काळजी करू नकोस, माझं पुण्य अधिक आहे.' हे आपण सांगितल्यास आताच वादाचा निकाल लागेल. निदान आपल्या म्हणण्यावर तरी आपला विश्वास आहे असं सिद्ध होईल."
यावर जगद्गुरू शंकराचार्य काय उत्तर देतात हे ऐकण्यास सर्वजण कमालीचे उत्सुक झाले होते.
शंकराचार्य भयंकर क्रोधित झाले, ते म्हणाले,
"ये देखो! सुना आपने? इसने खुदका नाम कुमार सप्तर्षी रखा है. नाममें एक नही, सात-सात ऋषी हैं. अपने नाममें सात ऋषी होनेके बावजूद ये वेद, मनुस्मृती, ब्राह्मण्य और मेरा उपहास करता है. मैं हिंदू धर्मका आचार्य हूँ ना? इसलिए इसकी ये हिम्मत है. अरे, तुमने खुदका नाम डेव्हिड या महंमद क्यू नहीं रखा? रखो, सप्तर्षी नाम छोड दो. अगर तुम्हारी हिंमत है और तुम सच्चे हिंदू हो तो कुराण बायबलपर बोलो. उन ग्रंथोंपर टीका करो."
यावर मी म्हणालो, "मी एका शब्दानंही आपला वा हिंदू धर्माचा किंवा धर्मग्रंथांचा उपहास केलेला नाही. माझ्या तोंडी उगाच काही शब्द घालू नका. मला बायबल व कुराण यांचाही अनादर करण्याची अजिबात इच्छा नाही. बायबल आणि कुराण या धर्मग्रंथावर टीका केली तरच तो 'मर्द हिंदू' ठरतो ही आपली अजब व्याख्या आहे. सच्चा हिंदू कुणाच्याही पवित्र मानलेल्या स्थानांचा मनापासून परम आदरच करतो अशी माझी धारणा आहे. आपण कृपया क्रोध आवरा. शांत व्हा. सभ्य, सज्जन श्रोत्यांच्या श्रद्धांना चुकीच्या मार्गानं आव्हान देऊ नका. आपणास माझी नम्र विनंती आहे."
एवढं बोलून मी त्यांना हात जोडले.
महाराज शांत झाले. त्यांनी पवित्रा बदलला. त्यांना भक्तांच्या मनावर है ठसवायचं होतं. की दोन तास चाललेल्या या वादात ते जिंकले आहेत आणि कुमार सप्तर्षी हरला आहे.
म्हणून ते म्हणाले, "इस विवादका पूर्वार्ध इधर समाप्त होता है. कल शामको इस विवादका उत्तरार्ध होगा. कल देखते हैं क्या होता है? लेकिन आज तो कुमार सप्तर्षी हार गया, यह मैं जाहीर करता हूँ. हम जीत गये और हिंदू धर्म की जय हुई है."
मी त्यांचं बोलणं अडवत म्हणालो, "महाराज, मेरी लडाई हिंदू धर्मसे नहीं. आप हिंदू धर्मको बीचमें बेमतलब क्यूँ लाते हो? जीतम् मया, जीतम् मया ऐसा आक्रोश क्यूँ करते हो? मैं ना आपको हराना चाहता हूँ, ना मुझे जीतनेकी तमन्ना है. विवाद सिर्फ आपके विचारोंसे, आपकी भूमिकाओंसे है. आपसे मेरी कोई व्यक्तिगत दुश्मनी नहीं, कोई लडाई नही."
दुसऱ्या दिवशी रात्री कितीही वेळ लागला तरी वादसभेचा निर्णय लागेपर्यंत बसायचं ठरलं.
नामदेव ढसाळांनी शंकराचार्यांवर चप्पल फेकली
वादाच्या दुसऱ्या दिवशी माझ्या निषेधासाठी शिवसेनेचा मोर्चा निघणार होता. या मोर्चाला विरोध करणारा दलितांचा प्रतिमोर्चाही निघणार होता.
दलित पँथरचे नेते नामदेव ढसाळ यांनी शंकराचार्याच्या प्रवचनाच्या वेळी त्याचा दिशेनं एक चप्पल फेकली. ती बातमी 22 मार्चच्या वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाली. शिवाय नामदेवनं एक पत्रक प्रसिद्ध केलं होतं.
त्यात युक्रांदवर 'मध्यमवर्गीय, ब्राम्हणी संघटना' असा आरोप केला होता.
'हजारो वर्षं आमचे संथपणे गळे कापणाऱ्या, 3 चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा आजच्या काळात प्रचार करणाऱ्या शंकराचार्याना जोड्याने बडवलं पाहिजे. त्यांना सरकारनं अटक करावी. ते घटनेच्या विरोधात बोलतात. हा गुन्हा आहे. युक्रांदची बामणं उगाच वाद घालत बसतात. त्यामुळं शंकराचार्याची किंमत वाढते. असले निष्फळ कार्यक्रम बंद करा,' अशा आशयाचं ते पत्रक होत.
नामदेव ढसाळनं त्या मध्यरात्री माझ्याबरोबर संपर्क केला. मी त्याला रागावलो. मी त्याला म्हणालो,
"नामदेव, तू हे करायला नको होतंस. यानं तू काय साधलंस? समाजासमोरचा प्रश्न शंकराचार्यांचा नाही. प्रश्न आहे तो सामान्य भारतीय धर्मभावनेपोटी त्यांच्या विचारांचं पालन करतात हा. बहुजन समाज ब्राह्मणांचा द्वेष करतो. अर्थात, तेही चुकीचं आहे.
कोणताही द्वेष आंधळाच असतो, याउलट ब्राह्मणनिर्मित विचारांची गुलामगिरी सोडायला ब्राह्मणेतर तयार नाहीत. नामदेव, कायम लक्षात ठेव, की अशानं प्रतिक्रांतीला पोषक वातावरण तयार होतं. तुझ्या लढाऊपणाला विवेकशीलतेची, सत्याग्रहाची, अहिंसेची जोड दिलीस तर तू मोठा पुरोगामी नेता होशील."
त्याला पटत असावं; पण तो मला म्हणाला, "तुमचा अहिंसेचा, वैचारिक परिवर्तनाचा मध्यमवर्गीय लोकशाही मार्ग मला फार दूरचा वाटतो."
युक्रांदची भूमिका 'कुणीही कुणालाही जोडे मारू नयेत' अशी होती. म्हणून सकाळी बातमी वाचल्याबरोबर लगेच मी फोन करून शंकराचार्यांचं क्षेमकुशल विचारलं.
दुसरा दिवस
22 मार्च रोजी प्रचंड गर्दी जमा झाली होती. प्रवेशद्वारावर उभ्या असलेल्या लोकांनी मलाही प्रवेश नाकारला.
पं. वसंत गाडगीळांना मी हसत म्हणालो, "कमाल आहे तुमची! आमच्यामुळं हा प्रसंग निर्माण झाला आणि तुम्ही चक्क मलाच म्हणजे नवरदेवालाच लग्नमंडपात प्रवेश नाकारताय." त्यांनी द्वारपालांना खुणावलं. मला प्रवेश मिळाला.
सभागृहात गेल्यानंतर आम्हाला बाहेर काय चाललं आहे ते कळायला मार्ग नव्हता. वादाला प्रारंभ व्हायला का उशीर होतोय ते कळत नव्हतं. कारण नंतर उलगडलं. गोंधळ घालणारी खास फौज अजून पोचलेली नव्हती. नंतर शंकराचार्य आले. चांदीच्या मखरात आसनस्थ झाले.
त्यांना हा वाद अंगलट येईल असा अंदाज आल्यानं तो उधळून लावायचा होता. शंकराचार्यांचं बोलणं मात्र पार पाडायचं होतं. प्रारंभी माझ्या निषेधाच्या घोषणा वगैरे झाल्या. मग महाराजांनी एकतर्फी जाहीर केलं की प्रथम ते पूर्ण भाषण करतील, मी नंतर बोलायचं आहे.
मी म्हणालो, "ठीक आहे. तुमचं निवेदन झाल्यानंतर मला शंकराचार्यांच्या प्रत्येक मुद्याला प्रत्युत्तर द्यायला पुरेसा वेळ मिळाला पाहिजे.”
महाराज रेटून बोलू लागले. मनुस्मृती हा ग्रंथ किती श्रेष्ठ आहे यावर त्यांनी अर्थशून्य रसाळ प्रवचन दिलं. ते एक तास चाळीस मिनिटं बोलले. प्रवचनाच्या मध्ये ते घोषणा देत. आज सभागृह वाक्यागणिक टाळ्या वाजवून शंकराचार्यांना अतिउत्साहानं प्रतिसाद देत होतं. कारण एकच. तसं त्यांचं आधीच ठरलं होतं.
मनुस्मृतीचं श्रेष्ठत्व सांगताना शंकराचार्य म्हणाले, "यह तो शास्त्रोंका शास्त्र और ग्रंथोंका ग्रंथराज है. इसमें सारे शास्त्रोंका समावेश है. वास्तुशास्त्र, परिवहनशास्त्र, आहारशास्त्र सब इसमें है. विश्वमें ऐसा एकभी विषय नहीं की जिसे मनुस्मृतीने स्पर्श नहीं किया हो."
परिवहन म्हणजे ट्रॅफिकचं शास्त्र मनुस्मृतीच्या ग्रंथात अत्यंत उच्चतम अवस्थेत आहे हे ऐकल्यावर तर माझं डोकं गरगरलं.
बसल्या जागी माझ्या तोंडून 'कुछ भी बक रहे हैं, असे शब्द नकळत उमटले. माझं पुटपुटणं इतरांना फारसे ऐकू गेलं नाही. पण महाराजांनी ते ऐकलं. त्यांनी मला लाऊड स्पीकरवरून दटावलं, "चूप बैठो, बीचमें मत बोलो. सभाशास्त्रके कुछ नियम होते हैं. अभी मैं बोल रहा हूँ. समझते नहीं?"
खरंतर शंकराचार्य गडबडले होते. स्वतःला सावरण्यासाठी त्यांनी घोषणा दिल्या. नंतर माझ्याकडं बोट करून ते म्हणाले,
"इनके राजमें एक दफे एक महिला प्रसूतीके लिए अस्पताल जा रही थी. लेकिन इनकी प्राइम मिनिस्टर साहेबा याने की इंदिरा गांधी उस रास्तेसे गुजरनेवाली थी. पुलिसने उस महिलाको रोका. प्रसूतीकी वेदनाओंसे महिला विवश होके आक्रोश कर रही थी, 'मुझे जाने दो.' आखिर उसी जगह रास्तेपरही वह महिला प्रसूत हो गयी. मनुस्मृतीका राज होता तो उस महिलापर अन्याय नही होता. क्योंकी उसमें लिखा है की, गर्भवती महिलाओंको पहले रास्ता दो. इनके राजमें महिलाओंको सडकपर मजबुरीसे प्रसूत होना पड़ता है."
त्यांना असं सुचवायचं होतं की मी काँग्रेसचा छुपा एजंट आहे.
शंकराचार्यांनी स्वतःच विजयी झाल्याची घोषणा केली
प्रवचन संपवताना शेवटी ते म्हणाले, "ये समाजवादी लोग सबकी समानता मानते है. इनको स्त्री-पुरुष भेदभी बिल्कूल मंजूर नही. मैं सब पुरुषोंको एक सवाल पूछना चाहता हूँ, आपमेंसे कौन महिला या तृतीयपंथी बनना चाहता है? वे हाथ उप्पर उठाये."
नंतर त्यांनी असाच प्रश्न महिला वर्गाकडं पाहून केला, "समाजवाद आल्यानंतर तुमच्यापैकी कोण पुरुष वा तृतीयपंथी बनायला तयार आहे? हात वर करा."
दोन्ही वेळा कुणीच हात वर केला नाही. महिला तर या प्रश्नावर लाजून लाजून थकल्या, लगेच महाराजांनी निर्णय जाहीर केला, "हम जीत गये. समता, समाजवाद किसीको पसंद नही. बोलो...."
त्यांचं कंटाळवाणं प्रवचन एकदाचं संपलं. मी ताडकन उठून आदल्या दिवशीच्या जागेवर महाराजांच्या शेजारी उभा राहिलो आणि ध्वनिक्षेपक मिळण्याची वाट पाहू लागलो. त्याच क्षणाला गडबड सुरू झाली. शिवसेनेचे काका वडके यांच्या नेतृत्वाखाली आलेले कसबा पेठेतील मठ्ठ पण शूर शिवसैनिक ओरडू लागले.
"काल तू हिंदू धर्माच्या प्रमुखांना, शंकराचार्यांना जोडा मारलास ना, त्याबद्दल. माफी मागितल्याशिवाय आम्ही तुला बोलू देणार नाही. आमच्या भावना दुखावल्या आहेत. सांगून ठिवतो."
त्यावर मी म्हणालो, "माझा हिंसेवर विश्वास नाही हे जगजाहीर आहे. दलित पँथरच्या नामदेव ढसाळांनी जोडा फेकला. तसं त्यांनी जाहीरपणे म्हटलेलं आहे. त्यांचं पत्रक वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालं आहे. त्यांचं क्रेडिट त्यांना या, मला जबाबदार धरू नका."
तेवढ्यात शंकराचार्य म्हणाले, "मुझे जूते मारनेके लिए तुमही जिम्मेदार हो निश्चित रूपसे जिम्मेदार हो. तुम्हारे विचारोंसे दलित मेरे खिलाफ उत्तेजित होते हैं. उत्तेजनाके कारण वे मुझे जूते मारते है. तुमको माफी मांगनीही पड़ेगी."
"महाराज, यह मुझपर सरासर अन्याय है. बहस करनेका साहस नहीं है आपके पास. आपने लंबा प्रवचन दिया. अभी मेरी बारी है. मेरा जवाब सुनना नहीं चाहोगे? विवाद टालनेके लिए आप बहाना बना रहे हो. यह तो चिटिंग है."
शिवसैनिक ही चर्चा ऐकत आरामात शांत बसले होते. काका वडके हे तसे माझे मित्र. हिंदुत्ववादी असूनही हुशार, वाचन वगैरे करणारा माणूस. तो उपस्थित असताना बिलकूल मारामारी होणार नाही याची मला खात्री होती.
शंकराचार्यांची युक्ती
अचानक शंकराचार्य आसनावरून उठले. माझ्या दिशेनं वेगात आले. माझ्याभोवतीचं कार्यकर्त्यांचं संरक्षक कडं तोडून ते जवळ आले. मला पोटाला चिकटून, माझ्याकडं पाठ करून दोन्ही हात लांब फैलावून उभे राहिले. शांतपणे त्यांनी पोज घेतली. सर्व फोटोग्राफर जमल्याची खात्री करून घेतली.
त्यांच्या तोंडाजवळ माइक धरण्यात आला. मग ते म्हणाले, "मत मारो सप्तर्षीको. मत मारो. मत मारो उसे. मैं किसी हिंदूको उसको मारने नहीं दूँगा. आपसे में सहमत हूँ की उसने मेरी माफी मांगनी चाहिए, तबतक उसे मोक्ष प्राप्त नही होगा. लेकिन वो माफी नही माँगेगा."
"उसको मार पड़ी तोभी वो माफी नहीं माँगेगा. बहुत उर्मट हैं. ये समाजवादी लोग मानवके हकतक समताको सीमित रखते हैं. हिंदू धर्म समाजवादीयोंसे अधिक समतावादी हैं. हिंदू धर्म समाजवादसे बहुत महान है. हिंदू धर्म मानव और सारे प्राणियोंमे 'ब्रह्म'का अस्तित्व मानता है. हिंदू धर्मकी मान्यताके अनुसार गाय, बैल, बिल्ली, चूहा और सप्तर्षी सबमें ब्रह्म मौजूद है.
भले वो माने या न माने. मैं हिंदूओंका पीठाधीश और प्रमुख आचार्य हूँ. आखिर सब हिंदूओंको मोक्ष देनेकी जिम्मेदारी मेरी है. सप्तर्षी जबतक मेरी माफी नही माँगेगा, तबतक उसको मुक्ती मिलना नामुमकीन है. इसकी मुझे घोर चिंता हैं लेकीन मुझे मेरी जिम्मेदारी अवश्य निभानी पडेगी. इसलिए भक्तों, सप्तर्षीकी ओरसे मैं मेरी माफी मांगता हूँ "
हा माझ्यावर सरळ सरळ अत्याचार होता. या प्रकाराला माफीची दांडगाई असे म्हणता येईल. काही करून 'सप्तर्षी हारला,' 'त्यानं माफी मागितली, त्याला मारायला उठले होते; पण शंकराचा अवतार असलेल्या क्षमाशील हिंदू चिडून। महान शंकराचार्यानी हिंदूंच्या रोषापासून त्याला वाचवलं. एवढ्या गोष्टी त्यांना बातमीपुरत्याच पाहिजे होत्या.
'महान शंकराचार्यांनी मामुली सप्तर्षीला वाचवण्यासाठी संतप्त हिंदू जमावाला अडवून धरलं' अशी बातमी त्यांना हवी होती. त्यासाठी हा बनाव रचण्यात आला होता.
फोटो काढून झाल्यानंतर शंकराचार्य शांतपणे चांदीच्या मखरात परत आसनस्थ झाले. त्यांचा डाव सफल झाला होता.
अखेर मी माफी मागायला तयार झालो
अचानक मी मोठ्यानं आरोळी ठोकली, "मला माइक द्या. मी माफी मागायला तयार आहे."
माझ्याकडं एकमेव शस्र उरलं होतं. सभागृहाबाहेर उभी असलेली रस्त्यावरची गर्दी म्हणजे जणू गावकुसाबाहेरची माणसं! माझ्या तोंडचा 'माफी' हा शब्द ऐकून त्यांना अतीव दुःख झालं. अर्थात मला ते नंतर कळलं.
बाहेरच्यांपैकी काहीजण म्हणाले, "शेवटी सप्तर्षीं बामणच निघाला. शंकराचार्यासमोर सपशेल झुकला. त्यांचं काम सोपं असतं. चातुर्वर्णाच्या विरूद्ध फक्त बोलायचं. आपल्याला बरं वाटतं. नंतर यांची तडजोड होणार. मांडवली होणार, यांचं काही खरं नाही हो. दलितांची दुःखं कळायला दलिताच्या घरातच जन्म घ्यावा लागतो. काही झालं तरी आई ती आई अन दाई ती दाई!"
माफी हा जादूई शब्द होता. सभागृहातील कुणी तरी आवाज दिला, 'ए, फक्त माफी माग बरं का. जादा बोलू नकोस. भंकस नाय पायजे' यावर लगेच मी म्हणालो, 'मला एकदम पिनड्रॉप शांतता हवी.' मी माफी मागणार नाही माफी हे फार मोठं आमिष होतं. ते लॉलिपॉप हिंदुत्ववाद्यांसमोर मी धरलं होतं. माझ्या तोंडून माफी मिळणार या आशेनं सगळे शांत झाले.
नंतर मी धीरगंभीर आवाजात म्हणालो, "आज मला एक अगदी नवा आणि अद्भुत साक्षात्कार झालाय. एखाद्याला प्रामाणिकपणे आपली चूक नाही असं वाटतं. दुसऱ्याला मात्र त्यानं न केलेल्या कृत्याची दुसऱ्या कुणीतरी माफी मागितली तरी योग्य वाटतं.
माफी म्हणजे अप्रत्यक्षरीत्या दिलेला कबुलीजबाबच असतो. न केलेल्या कृत्याबद्दल कबुलीजबाब कोण देईल, असं मला आजवर वाटत होतं. परंतु आताच माझ्या वतीनं शंकराचार्यांनी त्यांची म्हणजे स्वतःचीच माफी मागितली. त्यामुळं दुसऱ्याच्या वतीनं तिसरा कुणी माफी मागू शकतो हे नवीनच अजब ज्ञान मला शंकराचार्यांकडून आत्ताच मिळालंय.
नुकत्याच प्राप्त झालेल्या या ज्ञानाचा वापर करून महाराष्ट्रात खूप वर्षं राहून गेलेली एक माफी मी आज मागणार आहे. त्यात सर्वांचं भलं सामावलेलं आहे."
नंतर मी थोडा पॉज घेतला. सभागृहात टाचणी पडली तरी तो आवाज ऐकू येईल इतकी गंभीर शांतता होती.
मी धीरगंभीर आवाजात म्हणालो, "पंचवीस वर्षांपूर्वी राष्ट्रपिता महात्मा गांधींचा खून नथुराम गोडसे नावाच्या ब्राह्मण कुळात जन्मलेल्या एका माथेफिरूने केला. तेव्हापासून मराठी जनतेनं ब्राह्मण जातीचा द्वेष सुरू केला. ब्राह्मण म्हणाले, 'नथुराम गोडसे ही एक स्वतंत्र व्यक्ती आहे. एका व्यक्तीच्या कृत्याबद्दल अखिल ब्राह्मण जातीला जबाबदार धरणं चूक आहे.'
महाराष्ट्राचं वातावरण द्वेषमुक्त व्हावं या महान हेतूपोटी मी अखिल मराठी ब्राह्मण समाजातर्फे अखिल महाराष्ट्राची जाहीर माफी मागत आहे."
पुरीच्या शंकराचार्यांबरोबरचा हा वाद देशभर गाजला. त्यावेळी उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये या वादाच्या फार मोठ्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यामुळे बिहारचे तत्कालिन मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांची आणि माझी जुनी मैत्री अधिक घट्ट झाली, महाराष्ट्रात या विषयावर माझी बरीच व्याख्यानं झाली.
हेही नक्की वाचा
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)