You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मणिपूरमध्ये हजारो ज्यू लोक कसे आले? ईशान्य भारतात आलेल्या ज्यूंचा 'हा' इतिहास जाणून घ्या
- Author, जयदीप वसंत
- Role, बीबीसी गुजरातीसाठी
मणिपूरमध्ये गेल्या पाच महिन्यांपासून हिंसाचार सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याच्या डोंगराळ भागात आर्म्ड फोर्सेस स्पेशल पावर्स अॅक्ट म्हणजेच अफ्स्पाची मुदत आणखी सहा महिने वाढवली आहे.
मणिपूर सरकारने बुधवार, 27 सप्टेंबर 2023 ला एक अधिसुचना जारी करून म्हटलं की, “मणिपूरच्या राज्यपालांचं मत आहे की वेगवेगळ्या दहशतवादी गटांच्या हिंसक कारवायांमुळे 19 पोलीस स्टेशनांच्या हद्दीत येणारा परिसर सोडून संपूर्ण राज्यात प्रशासनाच्या मदतीसाठी सशस्त्र दलांच्या कारवाईची गरज आहे."
मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून मणिपूरमध्ये हिंसाचाराचं वातावरण आहे. काहींच्या मते हा कुकी आणि मैतेई समाजातला संघर्ष आहे; काहींच्या मते तो ख्रिश्चन आणि हिंदूंमधला संघर्ष आहे. काहींच्या मते तो पर्वतीय भागात राहणाऱ्या आणि भटक्या लोकांमधला, आदिवासी आणि बिगर आदिवासी, बेकायदेशीर स्थलांतरित, ड्रग व्यापारी यांच्यातला संघर्ष आहे.
या सगळ्या गोंधळात बेने मिनाशे समुदायालासुद्धा या हिंसाचाराचा फटका बसला आहे. त्यांना 'कुकी' समाजातले म्हणून ओळखलं जातं, मात्र त्याचं मूळ इस्रायलमध्ये आहे.
गेल्या शेकडो वर्षांपासून ते ईशान्य भारतात स्थायिक झाले आहेत. आता मात्र ते त्यांच्या मायभूमीकडे निघाले आहेत.
ज्यू म्हणून त्यांची ओळख निर्माण केल्यानंतर हजारो बेने मिनाशे लोक इस्रायलहून स्थलांतरित झाले आणि इथल्या स्थानिक लोकांमध्ये मिसळले.
काही जण कधीतरी आपण इस्रायलला स्थलांतरित होऊ या आशेवर ईशान्य भारतात राहिले. त्यांच्या प्रेषितांच्या संदेशामुळे त्यांना आत्मविश्वास मिळाला आहे की, एक दिवस ते त्यांच्या मायभूमीवर परततील.
इस्रायलने ज्यू लोकांना भारतातूनच नव्हे तर इतर देशातून परत आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यासाठी त्यांची गुप्तचर संस्था मोसादने अनेक मोहिमा पार पाडल्या आहेत.
इस्रायलची 'मूळ'कथा
ज्यूंचा इतिहास ताम्रयुगापासून सुरू होतो. देवाने भटक्या समाजाचा नेता अब्राहमला सांगितलं होतं की तू मी सांगितलं तसं केलंस तर या लोकांचा म्होरक्या होशील. देवाने त्याला एकेश्वरवाद स्वीकारण्यास सांगितलं. त्याआधी लोकांचा बहु ईश्वरवादावर विश्वास होता. अब्राहमचे वडीलसुद्धा मूर्ती विकून पैसे कमावत होते.
अब्राहम हा ज्यू लोकांचा धर्मगुरू मानला जातो. तो ख्रिश्चन आणि मुस्लिमांसाठीसुद्धा महत्त्वाचा आहे. मुस्लिमांमध्ये तो इब्राहिम म्हणून ओळखला जातो. त्यांचा मुलगा इस्माईल हा अरबांचा धर्मगुरू म्हणून ओळखला जातो.
अब्राहमचा मुलगा इसाक आणि इसाकची बायको रेबेका यांना जुळी मुलं होती.
जेव्हा रेबेका गरोदर होती तेव्हा देवाने तिला जुळी मुलं होतील असं सांगितलं होतं. ते एक महान देश स्थापन करतील असंही त्यांना सांगितलं होतं.
मोठा भाऊ लहान भावाच्या हाताखाली काम करेल असंही त्यांना सांगण्यात आलं होतं.
इसू हा त्यांचा मोठा मुलगा होता. तो एक निष्णात शिकारी झाला आणि तो भटक्यांचं आयुष्य जगू लागला. लहान मुलगा जेकबने मात्र स्थिरस्थावर आयुष्याची वाट निवडली आणि तो तंबूत राहू लागला. त्यांना याकूब म्हणूनही ओळखू लागले.
इसूचा जन्मसिद्ध हक्क असूनसुद्धा राजपदाची सूत्रं जेकबकडे आली. त्यामुळे इसूला राग आला. वचपा काढण्यासाठी तो मेसोपोटामियाला गेला. आजचा इराक आणि आसपासचा भाग म्हणून तो ओळखला जातो.
हे होत असतानाच जेकबला एक वर मिळाला. देवाने त्याला तुला हक्काची जमीन मिळेल आणि अनेक मुलंबाळं होतील, जी धरतीसाठी वरदान ठरतील, असा आशीर्वाद दिला.
या जागेला जेकबने 'बेथाल' असं नाव दिलं. त्यानंचर जेकब त्याचे मामा लाबन यांच्याकडे गेला आणि त्यांची गुरंढोरं राखण्यासाठी मदत करू लागला.
तिथे जेकब त्याच्या मामाची मुलगी रेचलच्या प्रेमात पडला. जेव्हा मामाने त्याच्या श्रमाचा मोबदला मागितला तेव्हा जेकबने त्याची धाकटी मुलगी रेचलशी लग्न करण्याचं वचन दिलं. मात्र, रेचलशी लग्न करण्यापूर्वी आणखी सात वर्षं मामासाठी काम करण्याचा निर्णय परस्परसंमतीने दोघांनी घेतला.
मात्र, लग्नाच्या दिवशी मामाने त्याची मोठी मुलगी लियाचं लग्न जेकबशी लावलं. जेव्हा त्याने मामाला याबद्दल विचारलं तेव्हा त्याने सांगितलं की, त्याने असं केलं कारण धाकट्या मुलीचं लग्न मोठ्या मुलीच्या आधी होऊ शकत नाही.
रेचलशी लग्न करण्यासाठी मामाने जेकबला आणखी सात वर्षं काम करायला लावलं. जेकबने ते स्वीकारलं. नंतर त्या दोघांचं लग्न झालं.
लबानने जेकबला आपल्या दोन मुलींसह लिहा आणि बिलाह नावाच्या दासीसुद्धा दिल्या. जेकबला त्यांच्यापासूनही मुलं झाली.
अनेक वर्षं काम करून त्याने कमावलेल्या संपत्तीच्या सहाय्याने जेकबने त्याच्या बायको आणि मुलांबरोबर पॅलेस्टाईनचा प्रवास सुरू केला.
जेकबला 12 मुलं होती. त्यापैकी 10 मुलं त्यांच्या समुदायाची कुटुंबप्रमुख झाले. लीयापासून त्याला एक मुलगी झाली. तिचं नाव दीना होतं.
रेचलला बेंजामिन आणि जोसेफ ही मुलं झाली. जोसेफ स्वत: कोणत्याही वंशाचा पूर्वज नव्हता. मात्र मिनाशे आणि इप्राहिम या त्याच्या मुलांच्या नावावरून एक समुदाय अस्तित्वात आला.
इस्रायल- मायभूमी आणि अज्ञातवास
बायबलमध्ये असलेल्या माहितीनुसार जेकबचे वारस इजिप्तमध्ये 450 वर्षं राहिले आणि इस्रायलचा जन्म झाला. त्यामुळे इजिप्तच्या लोकांना चिंता वाटू लागली आणि त्यांनी इस्रायली लोकांना (ज्यू लोकांना नाही) शाप द्यायला सुरुवात केली. त्यांना गुलाम म्हणून काम करण्यास भाग पाडलं.
इस्रायलींची संख्या कमी करण्यासाठी नवजात अर्भकांना नाईल नदीत सोडून देण्यात यायचं. शेवटी त्यांनी देवाकडे मदतीची याचना केली. तेव्हा त्याने हझरत मुसाला पाठवलं.
आईने बाळ मोझेसला एका बास्केटमध्ये ठेवलं आणि नाईल नदीत वाहवून दिलं. त्याचं नशीब देवाच्या हाती सोपवण्यात आलं. मात्र मोझेसवर देवाची कृपा झाली.
इजिप्तच्या राजाच्या मुलीने त्याला वाचवलं आणि राजपुत्र म्हणून त्याला वाढवलं. एकदा तरुण मोझेसने अन्यायाविरुद्ध आवाज उठवला आणि छळ करणाऱ्या एका इजिप्शियन पहारेकऱ्याला मारून टाकलं.
राजाच्या रागापासून बचाव करण्यासाठी ते पळून गेले. फरार असताना त्याने गाई हाकणाऱ्याचं काम केलं आणि एका स्थानिक पुजाऱ्याच्या मुलीशी लग्न केलं. त्यावेळी त्याने त्याच्या इस्रायली लोकांना इजिप्तच्या गुलामगिरीतून बाहेर काढलं आणि त्यांना मायदेशी पाठवलं.
इस्रायली लोक त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही असा त्याला संशय आला तेव्हा देवाने त्याला अचाट शक्ती दिली. त्यानंतर मोझेस इजिप्तला परत गेला आणि राजाला त्याच्या लोकांची सुटका करण्याची विनंती केली.
जेव्हा राजाने तसं करण्यास नकार दिला तेव्हा त्याने राजाला 10 शाप दिले. त्यानंतर इस्रायली लोकांना सोडून देण्यात आलं. तनंतर त्याने त्याचं मन बदललं. नंतर त्याने इस्रायली लोकांसाठी 600 रथ पाठवले.
जेव्हा ते तांबड्या समुद्राकडे गेले, तेव्हा समुद्राने मोझेस आणि इतरांना मार्ग दिला. जेव्हा शत्रूंचे सैन्य तिथे गेले तेव्हा त्यांच्यावर पाण्याचा वर्षाव करून नष्ट करण्यात आलं.
तीन महिने वाळवंटात प्रवास केल्यावर ते माऊंट सिनाईला पोहोचले. तिथे देव आणि मोझेस यांच्यात संवाद झाला आणि देवाने मोझेसला 10 दैवी आज्ञा दिल्या.
तो इस्रायलच्या अस्तित्वाचा पाया झाला. आज असे 613 मार्गदर्शक तत्त्वं आहेत. त्यात अन्नपदार्थ, आरोग्य, यांचा समावेश आहे.
मोसादचं मिशन
इस्रायलची ही गुप्तहेर संस्था जगभरातल्या ज्यूंना परत आणण्यासाठीही प्रयत्न करते. इस्रायल ही दूध आणि मधाची भूमी म्हणून ओळखली जाते.
1984 मध्ये इथिओपियामधील अनेक ज्यूंना छावण्यांमध्ये ठेवण्यात आलं होतं. तिथे त्यांचा छळ करण्यात आला होता.
तेव्हा इस्रायलची गुप्तचर संस्था 'मोसाद'ने एक ऑपरेशन आखलं होतं. त्याला ऑपरेशन मोझेस असं नाव देण्यात आलं होतं. सुरुवातीला त्यांनी बनावट पासपोर्ट आणि इतर मार्गाने बाहेर काढण्यात आलं.
त्यानंतर मोसादने त्यावेळेच्या इथिओपियाच्या प्रशासकांबरोबर एक करार केला. त्यानुसार या युद्धग्रस्त प्रदेशाचा राजा ज्यूंनी भरलेल्या एका विमानाने जाईल आणि शस्त्रांनी भरलेल्या भूमीवर उतरेल असा ठराव संमत करण्यात आला होता. हे सगळं सहा महिने चाललं. त्यानंतर इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याच्या एका चुकीमुळे ही माहिती सार्वजनिक झाली आणि त्यामुळे ही व्यवस्था कोलमडली.
शेजारच्या सुदानमध्ये आलेल्या एका ज्यू शिक्षकाने अमेरिका आणि इस्रायलमधील अनेक ज्यू आणि मानवाधिकार संस्था आणि सरकारी संस्थांना मदतीसाठी पत्रे लिहिली, त्यापैकी एक मोसादपर्यंत पोहोचली. या शिक्षकाच्या मदतीने इथिओपियामध्ये राहणाऱ्या ज्यूंना सुदानच्या मार्गावर येण्याची आशा दिसली.
इथिओपियामध्ये विखुरलेले, परंतु त्यांची मुळे न विसरलेल्या ज्यूंनी सुमारे 800 किलोमीटरचा पायी प्रवास सुरू केला. उपासमार, दरोडे, पाण्याची कमतरता, रोगराई यामुळे अनेकांचा वाटेतच मृत्यू झाला.
हे काळे ज्यू सुदानमधील मदत छावण्यांमध्ये पोहोचले. तिकडेही त्यांचा छळ थांबला नाही. तेथे मुलींवर अत्याचार केले जात होते, त्यांचे अपहरण करून त्यांना मध्यपूर्वेतील देशांमध्ये विकले जात होते.
मोसादने पर्यटनाच्या नावाखाली सुदानचा समुद्रकिनारा खोट्या नावाने भाडेतत्त्वावर घेतला आणि त्याचे रूपांतर एका रिसॉर्टमध्ये केले आणि शेकडो ज्यूंना समुद्रमार्गे सुदानमधून हाकलून दिले. यासाठी सुदानचे गुप्त पोलिस सीआयए, भाडोत्री आणि इतर अनेकांनी मदत केली किंवा त्यांना विकत घेतले.
इस्रायली इतिहासकार मायकेल बार-जोहर यांनी त्यांच्या 'मोसाद' या पुस्तकाच्या 21व्या प्रकरणात याचा उल्लेख केला आहे. त्यानंतरही, हे प्रकार वर्षानुवर्षे सुरू राहिले आणि अल्पसंख्येने ज्यू तेथे राहू शकले.
जेकबची बायको रेचलची नोकराणी बिलाहपासून जन्मली होती. मोझेसचा मुलगा त्यांना इथिओपियाला घेऊन गेला. नंतर मिनाशेचे वंशज दीर्घ प्रवास करून ईशान्य भारतात पोहोचले.
भारतात टप्प्याटप्यात आगमन
इ.स.पूर्व आठव्या शतकात, उत्तर इस्रायलचे राज्य अश्शूरच्या हल्ल्यात पडले. इस्रायली समुदायाच्या मौखिक इतिहासानुसार, हा समुदाय पर्शिया (सध्याचा इराण), अफगाणिस्तान, तिबेट आणि चीन मार्गे ईशान्य भारतात पोहोचला. हा मार्ग त्यावेळेच्या लोकप्रिय 'सिल्क रूट'शी ते जुळतो असं वाटते. ते प्रामुख्याने मिझोराम आणि मणिपूरमध्ये राहतात, सध्याच्या बांगलादेश, भारत आणि म्यानमार या तीन भागात राहतात.
शतकानुशतके ते ईशान्य भारतात वेगळे जीवन जगले आणि त्यांच्या पूर्वजांनी दिलेल्या काही प्रथा पाळल्या. मुख्य प्रवाहापासून वेगळे जीवन जगत असताना, ईशान्य भारतातील राज्यकर्त्यांनी त्यांच्यावर फारसं लक्ष केंद्रित केले नाही आणि त्यांच्या स्वतःच्या धार्मिक प्रथांचं पालन करणं सुरू ठेवलं.
डेव्हिड चिन्हाचा सहा-बिंदू असलेला स्टार देखील त्याच्या प्रथेशी संबंधित होता.
पूर्वजांनी सांगितले होते की एके दिवशी ते सर्व 'प्रॉमिस्ड लॅण्ड'वर जाण्यास सक्षम होतील आणि शतकानुशतके हीच माहिती पिढ्यानपिढ्या समोर गेली आहे.
19व्या शतकाच्या अखेरीस देशात ब्रिटिश राजवटीचा पाय बळकट झाला होता. या काळात देशात ख्रिश्चन धर्माचा प्रसार झाला आणि ख्रिश्चन मिशनरी आणि धर्मगुरूंनी देशभरात विविध ठिकाणी धर्मप्रसारक सहली केल्या.
त्यांनी ईशान्य भारताच्या आदिवासी भागांचाही दौरा केला. त्यात मिनाशेच्या वंशजाचाही समावेश होता. त्यांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला. त्यांना त्यांच्या मायदेशी परतता येईल असा दावा त्लाह यांनी केला होता. तेव्हा इस्रायलचा जन्मही झाला नव्हता.
जेव्हा बायबलचं 1970 च्या दशकात भाषांतर करण्यात आलं तेव्हा त्यांना ख्रिश्चन आणि ज्यूंच्या पद्धतींमध्ये बरंच साम्य आढळलं. मिझो समुदायाच्या झैतानचुंगी यांनी हरवलेल्या जातीचा उल्लेख केला आणि त्यांनी या विषयावर अनेक परिषदांमध्ये संशोधनप्रबंध सादर केला.
इस्रायलच्या रबाई यांनी या समुदायाच्या दाव्याची सत्यता पडताळून पाहण्यासाठी येथे प्रतिनिधी पाठवले. त्यांच्या राहणीमानात बरेच साम्य आढळले. ज्यू लोकांचं राहणीमान, खानपान, तसेच ज्यूंना स्वीकारार्ह नाही अशाही अनेक गोष्टी आढळल्या.
त्यानंतरच्या डीएनए चाचणीतून असे दिसून आले की समाजातील मातृसत्ताक व्यक्तींचा डीएनए मध्य पूर्वेचा होता. आंतरविवाहामुळे हे घडले असावे. यानंतर इस्रायलमधील काही स्वयंसेवी संस्थांनी या विषयावर संशोधन केलं.
मार्च-2005 मध्ये इस्रायलच्या मुख्य रब्बीने (धर्मगुरू) त्याला मिनाशेचे वंशज आणि ईशान्य भारतात राहणारे ज्यू म्हणून मान्यता दिली. त्यांना आलियाच्या अंतर्गत इस्रायलमध्ये त्यांचे कायमस्वरूपी वास्तव्य शक्य झाले. ज्यू असल्याने त्याला तेथील गृह मंत्रालयाच्या मंजुरीची गरज नव्हती.
ज्यू धर्मात आल्यानंतर त्यांना इस्रायलला पाठवण्यात आलं. हिब्रू भाषा, चालीरीती, संस्कृती, धार्मिक प्रथा आत्मसात केल्यावर आणि पुरुष असल्यास सुंता झाल्यानंतर त्यांना इस्रायलला पाठवले जाते. जवळपास 2,700 वर्षांनंतर, हजारो मिनाशे इस्रायलमध्ये राहतात आणि इस्रायलच्या संरक्षण दल, शिक्षण आणि इतर क्षेत्रात योगदान देतात.
काही इस्रायली तज्ज्ञांनी सांगितले की, पॅलेस्टाईनशी जोडलेल्या भागात लोकसंख्या वाढवण्यासाठी अशा भागातील लोकांना येथे आणून स्थायिक केले जात आहे.
व्यापारामुळे हजारो ज्यू भारतातही आले. शतकानुशतके ते मसाल्याच्या व्यापाराच्य़ा मार्गाने मलबार किनार्यावर पोहोचले आणि तेथेच स्थायिक झाले. ब्रिटिश राजवटीत राजधानी कलकत्ता आणि आर्थिक राजधानी मुंबई या शहरांमध्येही हजारो ज्यू लोक व्यवसायासाठी आले होते.
भारतातून टप्प्या टप्यात निर्गमन
1945 ते 1950 दरम्यान, जागतिक पातळीवर तीन महत्त्वाच्या घटना घडल्या, त्यामुळे भारतात राहणाऱ्या ज्यूंचे भवितव्य निर्णायक ठरलं. हिटलरच्या राजवटीत ज्यूंना वांशिक भेदभावाचा सामना करावा लागला. त्यामुळे दुसऱ्या महायुद्धात जर्मनीचा पराभव झाल्यानंतर जगभरात राहणाऱ्या ज्यूंना आपल्या मातृभूमीचे वेध लागले.
पहिल्या महायुद्धानंतरच ज्यू जमा होऊ लागले आणि सध्याच्या पॅलेस्टाईनच्या आसपास वसाहत स्थापन करू लागले आणि अरबांशी त्यांचा संघर्ष सुरू झाला. अखेर 1948 मध्ये इस्रायल जगाच्या नकाशावर अस्तित्वात आले. पोलंड, जर्मनी, अमेरिका, ब्रिटन, पोर्तुगालसह युरोप आणि जगभरातील ज्यू येथे स्थायिक होऊ लागले.
1947 मध्ये देशाची फाळणी झाली. सुरुवातीची वर्षे गोंधळलेली होती आणि खाजगी उद्योजकांना राष्ट्रीयीकरण, हिंसाचार, जातीयवाद इत्यादींमुळे त्यांच्या संपत्तीला धोका होता. भारतीय ज्यू 'प्रॉमिस्ड लॅण्ड'मध्ये स्थायिक होण्यासाठी आले, त्यांनी इस्रायलची निर्मिती केली.
सुरुवातीच्या दशकात तेथे आलेल्या भारतीयांना युरोपमधील गोर्या ज्यूंविरुद्ध वांशिक भेदभावाचा सामना करावा लागला.
भारतीय ज्यूंना गोऱ्या दुकानदारांकडून पांढऱ्याऐवजी काळी भाकरी दिली जात होती. त्यांना तात्पुरत्या आणि सामान्य घरांमध्ये राहावे लागले, जे त्यांच्या भारतातील राहणीमानापेक्षा खूपच कमी होते. त्यांना इतर देशातील इतर ज्यूंशी लग्न करण्याची परवानगी नव्हती आणि त्याला मान्यता मिळावी म्हणून आंदोलन करावे लागले.
इथिओपियातील कृष्णवर्णीय ज्यूंनाही वर्णभेदाने अन्यायकारक वागणूक दिली. एकदा तर एड्सच्या संसर्गाच्या भीतीने त्यांनी दान केलेलं रक्तही फेकून देण्यात आलं.
इथिओपियातील कृष्णवर्णीय ज्यू महिलांना त्यांच्या नकळत गर्भनिरोधक इंजेक्शन दिल्याचा आरोप होता. त्यांच्या लोकसंख्येमध्ये असामान्य घट झाल्याचे तपासादरम्यान उघड झाले. नंतर एका माहितीपटाच्या आधारे ही माहिती समोर आल्यावर समाजात एकच खळबळ उडाली.
ईशान्य भारतात राहणाऱ्या बेने मिनाशेंच्या मनात इस्रायल पाहण्याचं स्वप्न आहे आणि त्यांची ही इच्छा अलीकडच्या हिंसाचारानंतरच वाढली.
जगभरातील ज्यू समुदाय इस्रायलमध्ये एकत्र येत आहे?
बायबलमध्ये भाकीत केल्याप्रमाणे, जगाच्या कानाकोपऱ्यातून ज्यू इस्रायलमध्ये जमा होतील. जोसेफची मुले मिनाशे आणि एफ्राइमची मुले प्राचीन इस्रायली लोकांचं नेतृत्व करतील.
मिनाशे, जे भारतातून प्रवास करत आहे, ती इस्रायल संरक्षण दलात सेवा देत आहे, त्यामुळे काहींना तो अंदाज खरा वाटतो. अनुयायांना बायबलमध्ये जे सांगितले आहे त्यावर ते विश्वास ठेवतात.
त्यानुसार: भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे; मी तुझ्या मुलांना पूर्वेकडून आणीन आणि त्यांना पश्चिमेकडून गोळा करीन.
मी उत्तरेला म्हणेन, 'त्यांना सोपवा,' आणि दक्षिणेला सांगेन, 'त्यांना अडवू नका.'
माझ्या मुलाला दुरून आण आणि माझ्या मुलींना पृथ्वीच्या टोकापासून आण.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)