You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मणिपूर हिंसाचार: महिलांना लक्ष्य का केले जात आहे? -बीबीसी ग्राउंड रिपोर्ट
- Author, दिव्या आर्य
- Role, बीबीसी न्यूज
- Reporting from, इम्फाळहून
दोन महिने झाले पण कुकी महिला मेरी (बदललेलं नाव) पोलिसांत तक्रात दाखल करण्याचं धाडस अजूनही करू शकलेली नाही.
मेरीच्या 18 वर्षीय मुलीचं त्यांच्या घराच्या समोरूनच अपहरण करण्यात आलं. तिच्यावर रात्रभर सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्यानंतर अत्यंत गंभीर जखमी अवस्थेत तिला पुन्हा घरासमोर फेकून देण्यात आलं.
पुनर्वसन शिबीरात मी मेरीला भेटले, तेव्हा तिने मला सांगितलं, “हल्लेखोरांनी माझ्या मुलीला धमकी दिली होती. जर कुणाला काही सांगितलं, तर मारून टाकू असं त्यांनी तिला धमकावलं होतं.”
मे महिन्यात मैतेई आणि कुकी समुदायातील संघर्ष शिगेला पोहोचल्यानंतर येथे जातीय हिंसाचार भडकला. तेव्हापासून मेरी ही शिबीरातच राहत आहे.
मणिपूर हिंसाचारात आतापर्यंत 130 जणांचा मृत्यू झाला तर 60 हजारांपेक्षा जास्त नागरिक आपल्या राहत्या घरांमधून विस्थापित झाले आहेत.
पण गेल्या आठवड्यात असं काही घडलं की ज्यामुळे येथील वास्तव चव्हाट्यावर आलं आहे.
एका जमावाने दोन कुकी महिलांची नग्न धिंड काढल्याचा एक व्हीडिओ एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
या घटनेमुळे मोठा संताप व्यक्त करण्यात आला. चहूबाजूंनी या प्रकरणावर टीका होऊ लागली. यानंतर या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये एका अल्पवयीन तरुणाचाही समावेश आहे.
यानंतर न्याय मिळण्याच्या अपेक्षेने मेरीनेसुद्धा आपली तक्रार पोलिसांत दाखल करण्याचा निर्णय घेतला.
ती म्हणते, “मी विचार केला की आता जर मी हे केलं नाही, तर मला पुन्हा दुसरी संधी मिळणार नाही. अन्यथा माझ्या मुलीवर अत्याचार करणाऱ्यांना शिक्षा मिळण्यासाठी मी प्रयत्नच केले नाहीत, याचं शल्य मला बोचत राहील.
घराला जमावाने घेरलं
19 वर्षीय चिन ही अजूनही घाबरलेली आहे. त्या मुलीसोबत घडलेली घटना आपल्यासोबतही घडू शकेल, अशी भीती तिला वाटते.
चिन म्हणते, “मी आणि माझी मैत्रीण नर्सिंगचं शिक्षण घेत आहोत. मी ज्या हॉस्टेलमध्ये राहत होते, तिथे मला कुकी असल्यामुळे लक्ष्य करण्यात आलं. तिथे आमच्यावर हल्ला करण्यात आला.”
“आम्ही जिथे लपलो होतो, त्या खोलीचा दरवाजा जमाव सातत्याने ठोठावत होता. तुमच्या पुरुषांनी आमच्या बायकांचा बलात्कार केला, आम्हीही तुमच्यासोबत तसंच करू, अशी धमकी ते देत होते.”
कोणत्याही हिंसाचारादरम्यान दुसऱ्या समुदायाचं खच्चीकरण करण्यासाठी त्यांच्यातील महिलांवर शारीरिक आणि लैंगिक अत्याचार केले जातात.
कुकी पुरुषांनी मैतेई महिलांवर केलेल्या अत्याचाराच्या कथित बातम्यांनी मैतेई पुरुषसुद्धा चिन आणि त्यांच्या मैत्रिणींविरुद्ध संतप्त होते.
चिन म्हणते, “मी अत्यंत बिकट परिस्थितीत होते. मी आईला सतत फोन करत होते. मला कधीही मारतील, हे आपलं शेवटचं संभाषण असू शकतं, असं मी आईला सांगितलं.”
त्यानंतर काही मिनिटांतच चिन आणि तिच्या मैत्रिणीला खोलीतून बाहेर काढण्यात आलं. तिला रस्त्यावर फरपटत नेण्यात आलं. बेशुद्ध होईपर्यंत तिला मारहाण झाली.
मारहाणीत आम्ही मेलो, असं जमावाला वाटलं, त्यामुळे मी वाचले, मी शुद्धीवर आले तेव्हा रुग्णालयात होते, मला पोलिसांनी तिथे दाखल केलं होतं, असं ती म्हणाली.
अब्रू आणि लज्जा
राज्यात जातीय संघर्ष भडकल्यानंतर अविश्वासाची दरी वाढली आहे. पण या सर्वात एक साम्य म्हणजे महिलांविरुद्धचा हिंसाचार.
मणिपूरमध्ये मिश्र लोकसंख्येचं वास्तव्य असलेली ठिकाणे आता उरलेली नाही. बहुतांश ख्रिश्चन कुकी पहाडी भागात वास्तव्यास आहेत. तर बहुतांश हिंदू मैतेई मैदानी प्रदेशात राहतात.
लष्कर आणि पोलिसांच्या चेक पॉईंटव्यतिरिक्त दोन्ही समुदायांनी आपापल्या गावांच्या सीमेवर आपापल्या पद्धतीने बॅरिकेडिंग केलेलं आहे.
संध्याकाळ होताच सर्वत्र संचारबंदी लावण्यात येते. पण तरीही रात्री झटापट झाल्याच्या बातम्या येतात. हिंसाचार सुरू झाल्यापासून अडीच महिने झाले इथलं इंटरनेट कनेक्शन बंदच आहे.
याच दरम्यान, दोन महिलांसंदर्भात व्हायरल झालेल्या व्हीडिओनेही खळबळ माजली.
या घटनेचा निषेध म्हणून कुकी समुदायासह मैतेई महिलांनीही आंदोलन आयोदित केलं.
मणिपूरचा इतिहास पाहिल्यास बरोबरीचा दर्जा मिळण्यासाठी महिला कायम पुढे आलेल्या आहेत.
मीरा पॅबिस (महिला मशालधारी) या संघटनेला इमास किंवा मदर्स ऑफ मणिपूर नावाने ओळखलं जातं. मैतेई महिलांचं ही एक शक्तिशाली संघटना आहे. या संघटनेने राज्यातील अत्याचार आणि मानवाधिकाराच्या उल्लंघनाविरुद्ध जोरदार आवाज उठवला आहे.
सिनाम सुअर्नलता लिमा या मीरा पॅबिस संघटनेच्या एक कार्यकर्त्या. येथील नोंगपोक सेकमाई ब्लॉक परिसरातील गावात त्या संघटनेचं नेतृत्व करतात. याच परिसरात जमावाने केलेल्या हल्ल्याचं शूटिंग व्हायरल झालं होतं. हल्लेखोरही याच भागातील आहेत.
लिमा म्हणतात, “हा व्हीडिओ पाहिल्यानंतर गावकऱ्यांनी स्वतःच आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिलं. यानंतर ब्लॉकमधील मीरा पॅबिस संघटनेच्या महिला एकत्र आल्या आणि त्यांनी त्याचं घरही जाळलं.
लिमा म्हणतात, “आग लावणं ही एक प्रतिकात्मक कृती आहे. समुदाय त्या पुरुषांनी केलेल्या क्रूर गुन्ह्याचा निषेध करतो. त्यांच्या या कृत्यामुळे संपूर्ण मैतेई समाजाला बदनाम करता येणार नाही.”
आरोपीचं घर जाळल्यानंतर त्याची पत्नी आणि तीन मुलांनाही गावाबाहेर काढण्यात आलं आहे.
महिलांचा जिथे सर्वाधिक सन्मान केला जातो, अशा समुदायात एका जमावाकडून अशा प्रकारचं कृत्य कसं होऊ शकतं?
लिमा म्हणतात, “ही कुकी पुरुषांनी मैतेई महिलांवर केलेल्या अत्याचाराचा बदला म्हणून केलेली कृती होती.”
पण, वैयक्तिकरित्या त्यांना अशा कोणत्याच हल्ल्याची माहिती नाही. मात्र, इज्जत वाचवण्यासाठी लैंगिक अत्याचार पीडितांनी मौन बाळगलं असेल, असंही त्या म्हणतात.
हिंसाचार भडकला तेव्हापासून ते आतापर्यंत मैतेई महिलांविरुद्ध लैंगिक अत्याचार झाल्याची बातमी पोलिसांनी फेटाळून लावलेली आहे.
मैतेई समुदायाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या कोकोमी संघटनेचे प्रवक्ते खुरैजाम अथाऊबा म्हणतात, “अनेक हल्ले झाले, पण त्या बातम्या समोर आल्या नाहीत.
ते म्हणतात, “आमच्या महिला सार्वजनिकरित्या आपल्यावर झालेल्या अत्याचाराबाबत बोलणं किंवा पोलिसांत तक्रार करणं टाळत आहेत, कारण त्यांना आपली इज्जत वाचवायची आहे.”
त्यांच्या मते, संघर्षामुळे झालेल्या हत्या आणि विस्थापनाच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रीत करायला हवं.
न्यायाची मागणी
व्हायरल व्हीडिओमध्ये दिसत असलेल्या एका महिलेच्या भावाचं दुःख कित्येक पटींनी जास्त आहे.
जमावाने तिच्या बहिणीला निर्वस्त्र केलं, तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले, त्यानंतर तिचे वडील आणि लहान भाऊ यांची हत्या करण्यात आली.
पण महिलेचा एक भाऊ आणि आई त्यावेळी शेजारच्या गावात आपल्या नातेवाईकाकडे होते, त्यामुळे ते सुदैवाने वाचले.
त्या 23 वर्षीय भावाला मी एका नातेवाईकाच्या घरी एका छोट्याशा खोलीत भेटले, तेव्हा त्यांचा चेहरा गूढ आणि निर्विकार दिसून आला.
मी त्याला विचारलं की सरकार किंवा पोलिसांकडून तुझ्या काय अपेक्षा आहेत?
तेव्हा त्याचं उत्तर होतं, “त्या जमावातील प्रत्येक व्यक्तीला अटक करावी. दोन्ही समुदायांविरुद्ध निःपक्षपातीपणे कारवाई करावी.”
दोन्ही समुदायांच्या लोकांशी आम्ही चर्चा केली. त्यातून एक लक्षात आलं की त्यांचा केंद्र आणि राज्य सरकारवरचा विश्वास उडालेला आहे.
विरोधी पक्षांनी कारवाईची मागणी केली आहे. संसदेचं कामकाजही थांबवलं. संपूर्ण देशभरात यासंदर्भात आंदोलन केलं जात आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह हे मैतेई समुदायातील आहेत.
त्यांनी आरोपींना कठोर शिक्षा, म्हणजेच मृत्यूदंडाची कारवाई करण्याचं वचन दिलं आहे. पण हिंसाचार थांबवण्यात अपयश आल्यामुळे राजीनामा कधी देणार असा प्रश्न विचारल्यानंतर ते म्हणाले, “मी या सगळ्या भानगडीत पडणार नाही. माझं काम आहे राज्यात शांतता प्रस्थापित करणं आणि गोंधळ करणाऱ्यांना शिक्षा देणं.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मणिपूर हिंसाचारावर आपलं मौन सोडून दोन महिलांच्या व्हीडिओवर प्रतिक्रिया दिली.
पण लिमा यांच्या मते, नरेंद्र मोदी यांच्या त्या विधानामुळे त्यांच्या समुदायाची प्रतिमा धुळीस मिळाली आहे.
त्या म्हणतात, “कुकी महिलेवर हल्ला झाल्यानंतर पंतप्रधान या विषयावर बोलले. पण आम्हीही या सगळ्याला तोंड देत आहोत, आम्ही मैतेई महिला भारताचे नागरीक नाही का?
या व्हीडिओने मणिपूर हिंसाचाराची बातमी चव्हाट्यावर आणली आहे.
ग्रेसी हाओकिप या एक रिसर्च स्कॉलर आहेत. त्या सध्या नर्सिंग विद्यार्थिनी चिन हिच्यासह इतर अनेक पीडितांची मदत करत आहेत.
ग्रेसी म्हणतात, “जर हा व्हीडिओ समोर आला नसता तर आम्हाला सरकार आणि इतर राजकीय पक्षांकडून इतकं महत्त्व मिळालं नसतं. आता तरी आमच्या पीडितांना मदत मिळेल, अशी अपेक्षा आहे.
चिन हिने आपल्या समुदायातील महिलांमध्ये केलेल्या भाषणाबाबत माहिती मला दिली. तसंच तिने आता आपल्या परिसरातच दुसऱ्या एका नर्सिंग इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतल्याचंही तिने सांगितलं.
ती म्हणते, “माझ्या आईने मला सांगितलं आहे की ईश्वराने मला कोणत्या तरी कारणासाठी जिवंत वाचवलं आहे. त्यामुळे मी माझं स्वप्न अर्ध्यातूनच सोडून देणार नाही, असं ठरवलेलं आहे.”
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)