मणिपूर : 2 महिन्यांनंतरही न थांबणारी हिंसा, भीती, द्वेष आणि अविश्वासाची वाढती दरी

    • Author, राघवेंद्र राव
    • Role, बीबीसी,मणिपूर मधून ग्राउंड रिपोर्ट

भारतीय लष्करातून निवृत्त झालेला साइखोम रॉकेट हा त्याच्या खिशातून बंदुकीची एक गोळी काढतात, आणि याचं गोळीनं आपल्या मुलाचा बळी घेतल्याचं सांगतात.

10 जुलै रोजी त्यांना बातमी मिळाली होती की, इम्फाळपासून काही अंतरावर असलेल्या कडंगबंद भागात गोळीबार झाला आहे. या गोळीबारात साइखोम यांचा मुलगा शुबोल जखमी झाला होता.

साइखोम सांगतात, "माझं फोनवर बोलणं झालं होतं, तेव्हा सांगितलं की त्याच्या पायात गोळी लागलीय. मला वाटलं पायात गोळी लागलीय तर उपचारानं मुलगा बरा होईल. तिथं गेल्यावर कळलं की माझा मुलाचा मृत्यू झालाय."

साइखोम आणि शुबोल हे गेल्या काही दिवसांपासून मैतई समाजाच्या ग्राम संरक्षण समितीमध्ये स्वयंसेवक म्हणून काम करत होते.

10 जुलै रोजी सकाळी इम्फाळ खोऱ्यातील डोंगराळ भागात सशस्त्र गटांकडून झालेल्या गोळीबारात शुबोलचा मृत्यू झाला.

आपल्या मुलाची हत्या करणारी गोळी कुणी चालवली, याचा तपास व्हावा असं साइखोम म्हणतात. तसंच दोन महिने उलटूनही हिंसाचार का थांबत नाही, हे त्यांना समजत नाही.

साइखोम सांगतात, "राजकारण करणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की, चुकीचं काम करू नका. मानवी जीवन म्हणजे खेळणं नाही. सध्या केंद्रात आणि मणिपूरमध्ये भाजपचं सरकार आहे. दोन्ही सरकारं काहीच करू शकत नाहीत? सरकार काय करतंय? तुम्ही का काहीच करू शकत नाहीत?"

मृत शुबोलच्या घरी शोकाकुल नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. शुबोलची आई त्याच्या फुटबॉलच्या कपड्यांमध्ये तिच्या मुलाला शोधत होती.

संतप्त लोक इम्फाळच्या रस्तावर उतरले

शुबोलच्या मृत्यूची बातमी आल्यानंतर काही तासांनी स्थानिक लोकांच्या संतापाचा भडका उडाला आणि लोक रस्त्यावर उतरले.

शुबोलच्या घरापासून दीड किलोमीटर अंतरावर एम्मा मार्केटजवळ मोठ्या संख्येनं जमलेल्या महिलांनी सर्व रस्ते बंद पाडले.

या महिला मणिपूरचे मुखमंत्री एन बीरेन सिंह यांच्या घरी पोहचू शकणार नाहीत यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

दोन महिन्यांहून अधिक काळ सुरु असलेल्या मणिपूरच्या जातीय हिंसाचाराचा आणखी एक अध्याय इंफाळच्या रस्त्यांवर लिहिला जात आहे.

या विरोध प्रदर्शनात सहभागी झालेल्या निरुपमा लैशराम सांगतात की, "आमच्या सुरक्षेसाठी एका तरुण मुलानं आपल्या जीवाची पर्वा केली नाही. उद्या आणखी किती जणं मरतील माहिती नाही. आमचं रक्षण करा. ही आमची विनंती आहे. आम्हाला मरायचं नाही. आमचं कुटुंब आणि मुलं आहेत. कृपया आम्हाला वाचावा."

मणिपूर हिंसाचारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपर्यंत काही बोलले नसल्यामुळं या महिला दुखावल्या आहेत.

या विरोध प्रदर्शनात सहभागी झालेल्या रणीता लैशराम सांगतात की,

"मला मोदीजींना सांगायचय की, आम्ही भारतीय नाहीत का? मोदीजी आमच्या बद्दल थोडा जरी विचार करत असाल,आम्हाला भारतीय मानत असाल,तर बघा जरा मणिपूरमध्ये काय चाललंय. व्यवसाय बंद पडला आहे .मुलांचं शिक्षण बंद पडलंय. जणू काही सर्व नष्ट होत आहे."

"शांत बसून तोडगा निघणार नाही. मणिपूरमध्ये जे काही चाललं आहे ते केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून सोडवू शकतात. लवकरात लवकर तोडगा काढायला हवा. दोन महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे."

3 मे रोजी हिंसाचार सुरु झाल्यापासून मणिपूरमध्ये 142 लोकांचा मृत्यू झालाय. जवळपास 60,000 लोक बेघर झाले आहेत. राज्य सरकारच्या म्हणण्यानुसार, या हिंसाचारात जाळपोळीच्या 5000 घटना घडल्या आहेत.

मणिपूर सरकारनं नुकतंच सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या अहवालात म्हटलंय की, 'हिंसाचाराशी संबधीत 5,995 प्रकरणं नोंदवण्यात आली आहेत. 6,745 लोकांना ताब्यात घेण्यात आलं आहे.'

सध्या मणिपूर मधील कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीवर कुणीही 'ऑन रेकॉर्ड' बोलायला तयार नाही. पण परिस्थिती हळूहळू सुधारत असल्याचं राज्य सरकारनं सर्वोच्च नायालयात सांगितलंय.

कुकी समुदायाकडून वेगळ्या राज्याची मागणी

आम्ही चुराचांदपुरला गेलो जिथून हिंसाचार सुरु झाला होता. चुराचांदपूर हे इम्फाळपासून फक्त 70 किलोमीटर अंतरावर आहे. पण इथे पोहचणं आता सोपं नाही.

इम्फाळ आणि चुराचांदपूर दरम्यान येणाऱ्या विष्णुपूर जिल्ह्याचा भाग बफर झोन बनवण्यात आला आहे. भारतीय लष्कर आणि निमलष्करी दलाच्या अनेक चौक्या पार करून आम्ही चुराचांदपूरला पोहोचलो.

हिंसाचारात मारल्या गेलेल्यांच्या स्मरणार्थ एक स्मारक बांधण्यात आलं आहे, त्याला 'वॉल ऑफ रिमेंबरेन्स' असं नाव देण्यात आलं आहे.

या स्मारकावर हिंसाचारात मरण पावलेल्या लोकांच्या चित्रांसमोर त्यांचे नातेवाईक दुःख व्यक्त करण्यासाठी दररोज येत आहेत. या स्मारकावरील चित्रात दोन वर्षांच्या बाळाचा ही समावेश आहे. काळया पोशाखात डझनभर महिला दररोज स्मारकासमोरील रस्त्यावर आंदोलन करतात.

या आंदोलनात सहभागी झालेल्या क्रिस्टी सुआंतक सांगतात, "आमच्याकडे सरकारच नाही. आमच्या बाजूनं उभं राहणारं कुणी नाही. आमच्या बाजूनं बोलणारं कुणी नाही.आमच्या बंधू भगिनींच्या जाण्याचा शोक इथं येऊन आम्ही व्यक्त करतोय, आम्ही न्यायाची मागणी करतोय. आम्हाला वाचावा... हा संदेश आम्ही जगाला देऊ इच्छितो."

कुकी समाजाची मोठी लोकसंख्या असलेल्या चुराचांदपूर परिसरात स्वतंत्र प्रदेशाची मागणी जोर धरू लागली आहे. लोकांनी ठिकठिकाणी चुराचंदपूर नाव पुसून टाकलंय आणि लमका असं लिहलंय.

इंडिजिनस ट्रायबल लीडर्स फोरमच्या संयोजक मेरी जोन्स म्हणतात,"आम्हाला चुराचांदपूरमध्ये पूर्णपणे स्वतंत्र प्रशासन हवं आहे, ते पूर्ण राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश असू शकत. मला विश्वास आहे की, केंद्रसरकार विचारपूर्वक येथील आदिवासी लोकांसाठी काही मार्ग काढेलं."

हिंसाचारला मणिपूर सरकार आणि मैतैई समुदाय जबाबदार?

चुराचांदपूर भागातही लोक हिंसारासाठी मैतेई समुदाय आणि मणिपूर सरकारला जबाबदार धरतात.

मेरी जोन्स सांगतात, "आम्ही स्वतःला मणिपूर सरकारचा भाग मानत नाही. आम्हाला जी वागणूक दिली जात आहे. त्यामुळे आम्ही स्वतःला मणिपूर सरकारचा भाग कसं मानू शकतो? आमची इच्छा असो वा नसो, आम्ही त्यांच्यापासून दुरावलोय. आणि आम्ही ते स्वीकारलंय."

मैतेई समाजाचे लोक आपली सशस्त्र ग्राम संरक्षण समिती स्थापन करत आहेत, त्याप्रमाणे चुराचांदपूरमध्ये अनेक तरुण शस्त्र घेऊन रस्तावर उतरल्याचं आपण पाहिलं.

हिंसाचार सुरु होऊन दोन महिने उलटले आहेत, मणिपूरच्या चुराचांदपूर भागातील वातावरणात थोडी सुधारणा होत आहे. पण तणाव मात्र कायम आहे.

चुराचांदपूर हे इम्फाळ खोऱ्यापासून पूर्णपणे तुटलं आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूही लांबच्या मार्गानं म्हणजे मिझोरममार्गे पोहचवल्या जात आहेत.

हिंसाचारात आपल्या प्रियजनांना गमावल्याचं दुःख इथल्या लोकांमध्ये आहे. जिथं चुराचांदपूर लिहलंय ते पुसून नवं नाव 'लमका' लिहलं गेलंय.

लोक सांगतात की, चुराचांदपूर नाव मणिपूरच्या मैतेई राजानं त्यांच्यावर लादलं आहे आणि आता त्यांना वेगळं प्रशासन हवं असल्यानं मणिपूरच्या मैतेई राजाशी संबधीत कोणत्याही आठवणी आम्हाला नको.

एनआरसीची मागणी

एकीकडे डोंगराळ भागात वेगळ्या प्रशासनाची मागणी जोर धरत असताना, दुसरीकडे म्यानमार मधून मणिपूरमध्ये दाखलं झालेल्या लोकांचा हिंसाचारात मोठा हात असल्याचा आरोप मैदानी भागातील लोक सातत्यानं करत आहे.

त्यामुळं खोऱ्यात राहणारे लोक आता एनसीआर लागू करून मणिपूरमध्ये बेकायदेशीरपणे घुसलेल्या लोकांची ओळख पटवण्याची मागणी करत आहेत.

डोंगराळ भागात राहणारे कुकी समाजाचे लोक याचा इन्कार करताहेत.

चुराचांदपूरमध्ये निदर्शनं करत असलेले हातनेईनेंग सांगतात, “ते आम्हाला भारतीय मनात नाहीत. ते आम्हाला बाहेरचे मानतात. ते म्हणतात की आम्ही म्यानमारचे आहोत. ते असं कसं म्हणू शकतात? आम्ही म्यानमारचे नाहीत, तिथून आलो नाहीत. आमचे पूर्वज युद्धाच्या वेळी इंग्रजांसोबत होते. आम्ही मूळ रहिवाशी आहोत. ते आम्हाला अवैध स्थलांतरीत कसे म्हणू शकतात?"

निंगथौजा लांचा हे चित्रपट निर्माते आणि कल्चरॉलॉजिस्ट आहेत. मणिपूरमध्ये बेकायदेशीरपणे प्रवेश केलेले लोक हे सध्याच्या संकटाच प्रमुख कारण असल्याच त्यांच मत आहे.

लांचा म्हणतात "त्या लोकांची ओळख पटण्यासाठी काही तरी यंत्रणा कार्यन्वित केली पाहिजे अन्यथा अशी संकट आणि संघर्ष निर्माण होत राहतील.”

मैतई आणि कुकी समुदायांमध्ये हा हिंसक संघर्ष सुरु आहे. हा हिंसाचार कधी आणि कसा थांबणार हा मोठा प्रश्न आहे, असं लांचा सांगतात.

"लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारे उपाय अंमलात आणावे लागतील. पण दोन्ही समुदायांचा केंद्र आणि राज्य सरकार यांच्यावरील उडालेला विश्वास ही मोठी समस्या आहे."

जळालेली घरं, घाबरलेले चेहरे आणि ओसाड गावं

जवळपास दोन महिन्यांपासून सुरु असलेल्या हिंसाचारामुळं राज्याच्या विविध भागातील हजारो लोकांना आपली गावं सोडावी लागली आहेत. असंच एक गाव सुगनू.

या अशाच एका हिंसाचार ग्रस्त गावाची पाहणी करण्यासाठी आम्ही बाहेर पडलो. तेव्हा स्थानिक महिला सुरक्षेसाठी ठिकठिकाणी वाहनांची तपासणी करत होत्या.

या महिला मैतई समाजातील आहेत. कुकी समाजातील लोक आपल्यावर हल्ला करतील, अशी भीती त्यांना वाटतेय. सुगनूकडून जाणाऱ्या रस्त्यावर आम्हाला ठिकठिकाणी अशीच चेक पोस्ट दिसली.

अशाच एका चेक पोस्टच्या गटाचं नेतृत्व करणाऱ्या नौरम सुमित म्हणाल्या "आम्ही ही वाहनं तापसतोय. कोण काय घेऊन जात आहे. काही जण बंदुका वैगरे घेऊन जात असतील तर सुरक्षेच्या कारणांसाठी आम्ही प्रत्येकाची तपासणी करतोय."

सुगानु गाव असं क्षेत्र आहे, ज्यात मैतई आणि कुकी समुदाय अनेक दशकांपासून शेजारी राहतात. 3 मे रोजी राज्यात हिंसाचार उसळला होता तेव्हा इथं राहणाऱ्या दोन्ही समुदायांनी शांतता करार केला आणि ठरवलं होत की, एकमेकांविरोधात हिंसा करायची नाही. हा शांताता करार 24 दिवस चालला. 28 मे रोजी सुगानु मध्ये हिंसाचार झाला होता.

त्यामुळं इथं राहणाऱ्या हजारो लोकांना घरं सोडून पलायन करावं लागलं. जे राहिले आहेत ते आगामी काळात आपलं काय होणार या भीतीनं जगत आहेत.

येथून पळून गेलेल्या लोकांमध्ये मैतई आणि कुकी या दोन्ही समुदायांचे लोक होते.

सुमारे 7,000 लोकसंख्येच्या भागात आता फक्त एक हजार लोक उरले आहेत, असं स्थानिकांनी सांगितलं.

सुगानुमध्ये तैनात असलेल्या पोलिसांचं म्हणणं आहे की, त्यांनी कुकी समुदायाच्या भागातून गावठी शस्त्र जप्त केली आहेत. इथं लोक आमच्याशी बोलले पण ओळख लपवण्याच्या अटीवरच.

इथं राहणाऱ्या एका व्यक्तीनं सांगितलं, "प्रत्येकजण घाबरलाय, पण माझ्या गावाच्या लोकांचं रक्षण करायचं आहे. माणसांशिवाय हे गावच उरणार नाही."

सुगानुसारखी अनेक क्षेत्र आहेत जिथं स्थानिक लोकांपेक्षा सुरक्ष रक्षक अधिक संख्येनं दिसतात. अनेक ठिकाणी लोक शस्त्रं घेऊन गावोगावी फिरताना दिसतात.

हिंसाचाराच्या चौकशीसाठी केंद्र सरकारनं न्यायालयीन चौकशी आयोग नेमलाय. सीबीआयनं ही या प्रकरणाचा तपास सुरु केलाय.

परिस्थिती सुधारत असल्याचं राज्य सरकारचं मत आहे. पण मणिपूरमधील रोजच्या हिंसाचारामुळे दोन समाजातील अविश्वासाची दरी मात्र वाढतचं चाललीय आणि मणिपूरचे लोक रोज त्याची शिक्षा भोगत आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)