मणिपूर हिंसाचारातील बळींची संख्या 54 वर

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठा बातम्यांचा थोडक्यात आढावा. -

1. मणिपूर हिंसाचारातील बळींची संख्या 54 वर

मणिपूर येथील वांशिक हिंसाचारातील बळींची संख्या वाढून 54 वर पोहोचल्याची माहिती समोर आली आहे.

3 मे रोजी मणिपूरमध्ये ऑल ट्रायबल स्टुडंट्स युनियनकडून एका सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यानंतर येथे हिंसाचाराचा प्रकार पाहायला मिळाला. या घटनेनंतर प्रशासनाने शूट अट साईटचा आदेश दिला आहे.

दरम्यान, या हिंसाचारात आतापर्यंत 54 जणांचा मृत्यू झाला असून 150 पेक्षा जास्त जण जखमी आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

चुराचंदपूर या हिंसाचारग्रस्त जिल्ह्यात संरक्षण दलाचे जवान मैतेई नागरिकांना अन्यत्र स्थलांतरित करीत असताना दंगलखोरांनी चौघांना गोळय़ा घालून ठार केले. तर आणखी एकाचा इम्फाळमध्ये मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

चुराचंदपूर जिल्ह्यात शुक्रवारी रात्री दोन वेगवेगळय़ा घटनांमध्ये पाच बंडखोर ठार झाले, तर इंडिया रिझव्‍‌र्ह बटालियनचे दोन जवान जखमी झाले, असं पोलिसांनी सांगितलं. ही बातमी लोकसत्ताने दिली.

2. उपचारासाठी आलेल्या रुग्णांना जात विचारली, अजित पवारांचं टीकास्त्र

नाशिक जिल्ह्यातील मनमाड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना त्यांची जात विचारल्याचा प्रकार समोर आला आहे.

“हा प्रकार जातीभेदाला खतपाणी घालणारा आहे. हे कृत्य घटनेच्या विरोधात असून, यातून राज्य सरकारची असंवेदनशीलता दिसून येते,”अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.

“शासकीय अथवा खासगी रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या कोणत्याही रुग्णाला त्याची जात विचारली जाता कामा नये. असा प्रकार मनमाड किंवा इतरत्र कुठेही सुरू असेल, तर तो तत्काळ थांबवण्यात यावा, अशी मागणीही पवार यांनी यावेळी केली. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली.

3. ‘माझाच बॅट, माझीच बॉल, मीच पंच आणि सर्व काही’

शरद पवार यांनी 2 मे रोजी आपल्या निवृत्तीची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात खळबळ माजली होती. नेते आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे अखेर शरद पवार यांना आपला निर्णय मागे घ्यावा लागला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील या घडामोडींवरून विविध प्रकारच्या राजकीय प्रतिक्रिया उमटत असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या घटनाक्रमावर टीकास्त्र सोडलं आहे.

त्या म्हणाल्या, “हे नाट्य पाहून असं वाटलं की, माझीच बॅट, माझाच बॉल, मीच अम्पायर आणि मीच सगळं काही. मला जे काही करायचं आहे ते मीच करणार आहे. मी माझा राजीनामा माझ्याकडे दिला. मला माझा राजीनामा मान्य नव्हता म्हणून मीच तो स्वीकारला नाही. त्यामुळे मी आता परत या पदावर येऊन लढणार आहे, अशी शरद पवारांची स्थिती आहे.”

“शरद पवारांनी राजीनामा दिला काय आणि तो मागे घेतला काय हे सगळं पाहून असं वाटलं की, हे सगळं एक नाट्य होतं. या नाट्याचा अनेकांना धक्का बसला, तर काहींना हा प्रकार आवडला नाही. या नाट्यानंतर काही लोकांनी मला या नाट्यावरील वेगवेगळे विनोद पाठवले आहेत,” असा टोला दमानिया यांनी लगावला. ही बातमी लोकसत्ताने दिली.

4. जग्गी वासुदेवांच्या व्हीडिओवरून वाद, आव्हाडांची कारवाईची मागणी

“संत रामदास हे शिवरायांचे गुरू होते. शिवाजी महाराजांनी स्वतःचे राज्य त्यांच्या चरणी अर्पण केले होते,” असे वक्तव्य सद्गुरू नावाने प्रसिद्ध असलेल्या जग्गी वासुदेव यांनी केल्यानंतर त्यावरून वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी वासुदेव यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

जग्गी वासुदेव यांचा एक व्हीडिओ ट्विट करताना आव्हाड म्हणाले, “जग्गी वासुदेव यांनी छत्रपती शिवाजीराजांविषयी एक खोटी कथा (आणि अॅनिमेशन) प्रसारित केली आहे. ज्यानुसार रामदास हा शिवाजींचा गुरू होता; रामदासाला भिक्षा मागताना पाहून शिवाजींनी स्वतःचे राज्य आणि स्वतःला रामदासांच्या चरणी अर्पण केले होते, आदी गोष्टी त्यामध्ये दर्शवण्यात आल्या आहेत.

“छत्रपती शिवाजीराजांबद्दल अशी हिणकस आणि खोटी माहिती वारंवार प्रसारित केली जाते आणि त्यांचा व महाराष्ट्राचा अपमान केला जातो. महाराष्ट्र हा अपमान सहन करणार नाही. राज्य सरकारला याबाबतीत कडक कायदेशीर कारवाई करावी लागेल, अन्यथा याने जनक्षोभ उसळेल,” असा इशाराही आव्हाड यांनी यावेळी दिला. ही बातमी दिव्य मराठीने दिली.

5. देशहितासाठी गरज भासल्यास राजकारणात एन्ट्री करणार – कंगना राणावत

देशहितासाठी गरज भासल्यास राजकारणात एन्ट्री करणार, असं वक्तव्य बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिने केलं आहे.

एबीपी माझाच्या माझा कट्टा कार्यक्रमात कंगनाने हे वक्तव्य केलं. यावेळी ती म्हणाली, “मला आधीपासूनच समाजकार्यात रस आहे. त्याचबरोबर मला राजकारणाचीही आवड आहे. त्यामुळे जर कोणत्याही राजकीय पक्षाने मला संधी दिली तर मी नक्कीच राजकारणात प्रवेश करेन.”

यावेळी कंगनाने मुंबईतील आपल्या घरावरील कारवाईबाबतही चर्चा केली.

“मी नेहमीच देशाचा विचार करुन माझं मत व्यक्त करते. यात अनेक व्यक्तींना माझं मत खटकतं. ते मला चुकीचं समजतात. जेव्हा माझ्या मुंबईतील मालमत्तेवर कारवाई झाली तेव्हा सत्ताधाऱ्यांनी आपल्याकडे असलेल्या ताकतीचा चुकीचा वापर केला,” असं कंगनाने म्हटलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)