You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
प्रजासत्ताक दिन: नरेंद्र मोदींनी परिधान केलेल्या टोपीची चर्चा, हे आहे टोपीचे वैशिष्ट्य
73व्या प्रजासत्ताक दिनादिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिधान केलेला पोशाख हा चर्चेचा विषय ठरू लागला आहे. विशेषतः नरेंद्र मोदींनी परिधान केलेली टोपी हा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे.
पूर्वी नरेंद्र मोदी रंगीत साफा परिधान करायचे. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी पांढरा कुर्ता, जॅकेट, खांद्यावर मणिपुरी स्टोल आणि डोक्यावर टोपी अशा पोशाखात दिसून आले होते.
मोदींनी घातलेली टोपी विशिष्ट प्रकारची होती. या टोपीबद्दल सोशल मीडियामध्ये जोरदार चर्चा सुरू झाल्याचं दिसून आलं.
नरेंद्र मोदी यांनी घातलेली टोपी मूळची उत्तराखंडची असल्याची माहिती समोर आली आहे. या टोपीला ब्रह्मकमळ टोपी असंही संबोधलं जातं. ब्रह्मकमळ हे उत्तराखंडचं राज्यफूल आहे.
येत्या काही दिवसांत उत्तराखंडमध्ये निवडणुका असल्यामुळे या टोपीचा संबंध राजकारणाशीही जोडला जात आहे.
नरेंद्र मोदी यांनी घातलेल्या या टोपीला पहाडी टोपी, गढवाली टोपी, कुमाँवी टोपी यांसारख्या वेगवेगळ्या नावांनीही ओळखलं जातं. त्याशिवाय त्याला ब्रह्मकमळ टोपी असंही म्हटलं जातं. पंतप्रधानांनी घातलेल्या टोपीमध्ये ब्रह्मकमळाचं चिन्हही होतं.
ही टोपी दिसायला जवळपास गांधी टोपीसारखीच असते. ही बनवण्यासाठी स्थानिक धाग्यांचा वापर केला जातो. हे धागे ऊबदार मानले जातात.
ब्रह्मकमळ टोपी बहुतांशपणे गडद रंगांमध्येच बनवली जाते. गांधीटोपीसोबतच गोलाकार टोपीही उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणात वापरतात. या टोपीला रंगीत बॉर्डर असते.
प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणेच संरक्षण राज्य मंत्री अजय भट्ट यांनीही ब्रह्मकमळ टोपी परिधान केली होती. अजय भट्ट हे उत्तराखंड येथील नैनिताल लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडची टोपी घातल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी त्यांचे आभार मानले आहेत.
धामी यांनी याबद्दल ट्विट करून म्हटलं, "आज 73 व्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रह्मकमळ टोपी परिधान करून देवभूमी उत्तराखंडची संस्कृती आणि परंपरा यांचा गौरव केला आहे. मी उत्तराखंडच्या सव्वा कोटी नागरिकांमार्फत पंतप्रधानांचे हार्दिक आभार मानतो."
मणिपूरचे मंत्री विश्वजीत सिंह यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानताना म्हटलं, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 73 व्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात लीरम फी हा मणिपुरी स्टोल परिधान करून आम्हा सर्वांचा गौरव केला. राज्याच्या परंपरेप्रति नरेंद्र मोदी यांचा हा आदरभाव आहे."
पंतप्रधान नरेंद्र मोदी अशा प्रकारचे स्टोल वापरताना यापूर्वीही अनेकवेळा दिसले आहेत. विशेषतः पूर्वोत्तर राज्यांमध्ये ते जातात तेव्हा तिथल्या परंपरांचे ते आवर्जून अनुकरण करतात.
स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमांमध्ये पंतप्रधान मोदी आतापर्यंत रंगीत साफा परिधान केलेले दिसून येत असत. पण यंदाच्या वर्षी ते उत्तराखंडी टोपी परिधान केलेले दिसले.
72 व्या प्रजासत्ताक दिनादिवशी नरेंद्र मोदी लाल पगडी परिधान केलेले दिसून आले होते. ही पगडी त्यांना गुजरातच्या जामनगर येथील शाही कुटुंबाकडून भेट स्वरुपात मिळालेली होती.
तर 2021 च्या स्वातंत्र्यदिनादिवशी नरेंद्र मोदींनी केसरी पगडी परिधान केली होती. लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये देशाला पहिल्यांदा संबोधित केलं होतं. त्यावेळी त्यांनी जोधपुरी पगडी परिधान केली होती.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)