लेव्ह ताहोर : ज्यू समुदायातला बंदिस्त पंथ, जो शुद्धीकरणाच्या नावाखाली...

लेव्ह ताहोरचे लोक

फोटो स्रोत, EPA-EFE

फोटो कॅप्शन, लेव्ह ताहोरचे लोक
    • Author, रफ्फी बर्ग
    • Role, बीबीसी न्यूज ऑनलाईन मिडल इस्ट एडिटर

मेक्सिकन पोलिसांनी स्वयंघोषित अशा एका ज्यू समूहावर किंवा गटावर छापा मारला तेव्हा यातील माजी सदस्यांना या गटाचा अंत होईल, अशी आशा होती.

कारण, या गटावर लहान मुलांच्या विरोधात गंभीर गुन्हेगारी आरोप होते. पण तसं घडण्याऐवजी हे प्रकरण थंड बस्त्यात गेलं आणि हा गट पुन्हा एकदा सावरला.

पण त्यापूर्वी या बंदिस्त समूहाबद्दलचं बरंच काही जगासमोर आलं. समोर आलेल्या या माहितीमध्ये, बाहेरच्या यंत्रणा किंवा अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केल्यास सामूहिक नरसंहार करण्याच्या शक्यतेचाही समावेश होता.

या गटाच्या एका माजी सदस्यानं त्याच्या अत्यंत वाईट अनुभवाबाबत बीबीसीबरोबर चर्चा केली. ते सदस्य काही काळापूर्वीच तिथून पळून जाण्यात यशस्वी झाले होते.

इशारा : या कथेमध्ये शारीरिक आणि लैंगिक अत्याचाराबाबत वर्णन आहे.

इस्राईल आमीरचा विवाह झाला तेव्हा ते आणि त्यांची पत्नी 'खुपाह'च्या खाली उभे होते. खुपाह म्हणजे ज्यू विवाह सोहळ्यांमधील पारंपरिक छत्रीसारखा भाग असतो.

त्याखाली समुदायातील इतर सदस्यांचाही घोळका असतो. पण नवदाम्पत्यासाठीचा त्यांच्या जीवनातील हा सर्वांत आनंदाचा दिवस त्यांच्यासाठी वाईट स्वप्न का ठरावा?

इस्राईल आणि त्यांची पत्नी मल्के (नाव बदललेले) दोघंही 16 वर्षांचे होते. ते इथं म्हणजे त्यांच्या लग्नामध्येच पहिल्यांदा एकमेकांना भेटले होते.

लग्न समुहातील नेत्यांनी ठरवलेलं होतं. त्याच्या खूप पूर्वी याठिकाणी त्यांना मुलं म्हणून आणण्यात आलं होतं. हा समूह म्हणजे लेव्ह ताहोर, हिब्रू फॉर प्युअर हार्ट होता.

हा समूह ज्यू धर्माचं अगदी कट्टरतेनं पालन करत असल्याचा दावा करतो. मात्र या समुहाचे काही माजी सदस्य आणि इतरांसह इस्रायलचं एक न्यायालयंही हा समूह म्हणजे केवळ एक पंथ असल्याचं म्हणत आहे.

"आमच्याकडे काही पर्यायच नव्हता," असं इस्राईलनं आम्हाला बोलताना म्हणाले. त्यांच्या नातेवाईकाच्या घराच्या मागच्या बाजूला बसून आम्ही याबाबत चर्चा करत होतो. तेल अविव्हच्या दक्षिणेलाच ते घर होतं.

इस्राईलही आता 22 वर्षांचे झालेत.

"रब्बीनं (धर्मगुरूनं) मला त्याच्या ऑफिसमध्ये बोलावलं आणि पुढच्या आठवड्यात तुझा विवाह होत आहे, असं सांगितलं. तू नकार दिला तर शिक्षा मिळेल, असंही म्हटलं," असं इस्राईल म्हणाले.

"माझी बहीण 13 वर्षांची होती आणि त्यांनी तिला 19 वर्षांच्या मुलाशी विवाह करण्याची बळजबरी केली. ती रडत होती. ती एवढी जास्त रडली की, त्यांनी तिला एक वर्ष काहीही न बोलण्याची शिक्षा सुनावली. ती एक शब्दही बोलू शकत नव्हती. जेवायला मागू शकत नव्हती किंवा बाथरूमला जायचं सांगू शकत नव्हती, अगदी काहीही नाही."

ग्वाटेमालाच्या त्या परिसरातील समुहाच्या जीवनाचा हा एक दैनंदिन भाग होता. त्याठिकाणी पुरुष महिला दोघांसाठीही विवाहाचं कायदेशीर वय 18 होतं.

लेव्ह ताहोरमधील बहुतांश जण हे 2013 मध्ये कॅनडामधून पलायन केल्यानंतर मध्य अमेरिकेमध्ये स्थायिक झाले होते. त्याठिकाणी त्यांच्यावर लहान मुलांच्या लैंगिक शोषणाचे आरोप झाले. पण त्यांनी कायम तसे दावे फेटाळले आहेत.

एका वर्षाची शिक्षा संपल्यानंतर बहिणीला नीट बोलताही येत नव्हतं, असं इस्राईलनं सांगितलं. इस्राईल आणि समूहाच्या इतर माजी सदस्यांच्या मते, अशा प्रकारचं वर्तन हे समूहाचे नेते आणि उच्च पदावर असलेल्यांच्या गैरवर्तनाचा किंवा अत्याचाराचाच एक भाग होता.

त्यात अगदी क्षुल्लक चुकांसाठी मारहाण करण्याचा आणि विशेष म्हणजे मारहाण केल्याबद्दल अत्याचार करणाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी लहान मुलांवर बळजबरी करण्याचाही समावेश होता.

पण, इस्राईल यांच्या मते त्याठिकाणी यापेक्षाही खूप काही वाईट घडत होतं.

इस्राईल अमिर आणि ओरिट कोहेन

फोटो स्रोत, Raffi Berg

फोटो कॅप्शन, इस्राईल अमिर आणि ओरिट कोहेन

"मी रोज पाहायचो की, श्लोमो हेलब्रान्स (लेव्ह ताहोरचा संस्थापक) आणि इतर नेते मुलांना त्यांच्या खोलीमध्ये घेऊन जायचे. या मुलांचं वय अंदाजे आठ वर्षांपर्यंत असायचं. त्यानंतर ते मुलांना मिकवेह (शुद्ध करण्यासाठीचं पारंपरिक स्नान) साठी पाठवायचे. ते या मुलांसोबत काय करायचे मला कळत नव्हतं. पण आता मला कळलंय."

इस्राईल म्हणाले की, मुलांनी आणि मुलींनी त्यांच्यांवर लैंगिक अत्याचार आणि बलात्कार झाल्याचं त्यांना सांगितलं होतं.

बीबीसीनं या बलात्कार आणि अत्याचाराला बळी पडलेल्या काही पीडित चिमुकल्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला. ते आता समूहातून बाहेर पडले आहेत. पण तरीही त्यांच्यापैकी कोणीही बोलायला तयार झालं नाही.

अमेरिकेतील एक संस्था लेव्ह ताहोर सर्व्हायव्हर्स (LTS)नं त्यांच्या सदस्यांमध्ये काही बलात्कार पीडित मुलं असल्याची माहिती बीबीसीला दिली. याबाबतच्या अधिकृत तपासामध्ये सहभागी असलेल्या सुत्रानं दिलेल्या माहितीनुसार, मध्य अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी समुहाच्या काही सदस्यांचे जबाब नोंदवले आहेत. त्यात त्यांनी बलात्कार केल्याची कबुली दिलीय.

इस्राईल यांच्या मते, "हेलब्रान्सनं एखाद्या मसिहासारखी स्वतःची प्रतिमा तयार केली होती. जणू तो हवं ते करू शकत होता, कारण तो एक पवित्र व्यक्ती किंवा आत्मा होता. मी लोकांच्या कल्याणासाठी स्वर्गातून आलो आहे आणि माझ्याकडे चमत्कारिक शक्ती आहेत, असं त्यानं आम्हाला सांगितलं होतं. त्याच्या अनुयायांना त्याच्यावर विश्वासही होता."

समूहातील सदस्यांवर नियंत्रण ठेवण्याचा आणखी एक मार्ग होता, असं इस्राईल म्हणाले. हा मार्ग म्हणजे लहान मुलांना त्यांच्या आई वडिलांपासून वेगळं करायचं आणि इतर कुटुंबांबरोबर ठेवायचं. खऱ्या किंवा जन्मदात्या आई वडिलांना त्यानंतर मुलांबरोबर कोणत्याही प्रकारचा संपर्क ठेवण्याची बंदी असायची.

इस्राईल यांच्याबरोबरही हेच घडलं होतं. इस्राईल यांना वयाच्या 12 व्या वर्षी त्यांचे वडील शौल यांनी सहा भावंडांसह इस्रायलमधील घरातून समुहाचे सदस्य बनवण्यासाठी ग्वाटेमाला शहरात नेलं होतं.

इस्राईल सांगतात की, "लेव्ह ताहोरनं त्यांच्या कुटुंबीयांना खोटी आश्वासनं दिली होती. ग्वाटेमाला त्यांच्या मुलांसाठी स्वर्गासमान असेल आणि तिथं मुलांना खेळण्यासाठी प्राणी असतील, असं सांगण्यात आलं होतं.

पण त्याऊलट सर्वकाही अत्यंत धक्कादायक होतं. सर्वांना एकमेकांपासून वेगळं करण्यात आलं होतं. लहान मुलांना दगडांवर झोपायला लावलं जात होतं. आम्हाला रोज पहाटे 3 वाजता उठवलं जायचं. त्यानंतर दिवसभर प्रार्थना सुरू असायची, जेवण, पाणीच काय पण एकमेकांशी बोलूही दिलं जात नव्हतं.

जर रब्बी [हेलब्रान्स] आम्हाला प्रवचन देणार असेल, तर त्यात अनेक तास निघून जायचे. अनेकदा तर मी उभ्या उभ्याच झोपी जात होतो.

प्रत्येक बारीक सारीक गोष्टीवर नियंत्रण ठेवलं जात होतं. तुम्हाला बाथरूमलाही ते सांगतील तेव्हाच जाता येत होतं."

लेव्ह ताहोर शिबीरातील फोटो

फोटो स्रोत, Getty Images

"आम्हाला शिक्षण दिलं जात नव्हतं. आम्हाला तोराह (ज्यू समुदायाचा पवित्र ग्रंथ) किंवा तालमड (ज्यूंचे कायदे असलेला मुख्य ग्रंथ) देखील वाचू दिलं जात नव्हतं. कारण त्यामुळं कदाचित आमचे डोळे उघडले गेले असते. आम्हाला केवळ हेलब्रान्सचे लेख पाठ करावे लागत होते. रात्री 11 वाजेपर्यंत आम्ही झोपायलाही जाऊ शकत नव्हतो."

सदस्यांना केवळ काही भाज्या आणि फळं खाण्याचीच परवानगी होती, असं इस्राईल म्हणाले. नेत्यांनी आमच्या मांस, अंडी, मासे खाण्यावर बंदी घातली होती. त्यामुळं आमच्यावर अनुवांशिक परिणाम होईल, असं सांगण्यात आलं होतं.

ज्यूंच्या खाण्यासंबंधीच्या कायद्यानुसार हे निषिद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. पण इस्राईल यांच्या मते, यामागचा मुख्य उद्देश समुहातील सदस्यांना प्रोटीनची कमतरता कायम ठेवून कमकुवत बनवणं हा होता.

"हेलब्रान्स मात्र त्याला हवं ते सगळं खात होता - मांस, मासे अंडी सर्वकाही. ते त्याच्या आरोग्यासाठी आहे आणि तुम्ही यावर प्रश्न विचारू शकत नाही, असं ते म्हणायचे."

2017 मध्ये मेक्सिकोमध्ये नदीत बुडाल्यामुळं हेलब्रान्सचं निधन झालं. त्यानंतर त्याचा मुलगा नचमननं त्याची जागा घेतली. अमेरिकेतील न्यायालयानं तो त्याच्या वडिलांपेक्षा अधिक कट्टर असल्याचं वर्णन केलं होतं.

इस्राईलनं म्हटलं की, "मला जेव्हा एक लहान मूल म्हणून त्याठिकाणी नेण्यात आलं होतं, त्यावेळी सर्वकाही चुकीचं घडत आहे हे मला माहिती होतं, पण मी काहीही करू शकत नव्हतो. पण नंतर माझ्या लक्षात आलं होतं की, इथून बाहेर पडायला हवं."

जेव्हा त्यांची पत्नी मल्केला त्यांच्या लग्नाच्या दोन वर्षांनंतर मुलगा नेवो झाला, तेव्हा तो क्षण आला होता.

"तुम्ही कधी कुठे असता याची त्यांना नेहमी माहिती असते. पण एक दिवस नेत्यांनी मला काही तरी प्रिंट करून आणण्यासाठी शहरात (ओराटोरियो, ज्याठिकाणी समूह स्थलांतरीत झाला होता) पाठवलं होतं. ते एक इंटरनेटचं स्टोअर होतं आणि मला कॉम्प्युटर कसे दिसते हे काहीसं अस्पष्टच पण आठवत होतं. कारण लहान असताना घरी ते पाहिलं होतं. पण ते वापरायचं कसं हे मला माहिती नव्हतं. त्यामुळं मी दुकानाच्या मालकाकडे मदत मागितली."

छुप्या कॅमेरातील फोटो

फोटो स्रोत, Raffi Berg

गुगलबद्दल माहिती मिळाल्यानंतर इस्राईलनं दुकानाच्या मालकाला लेव्ह ताहोरबद्दल शोधण्यास सांगितलं, आणि जे समोर आलं ते धक्कादायक होतं.

"त्याठिकाणी या पंथाबद्दलचे काही लेख होते आणि त्यामुळे माझे विचार आणखी पक्के बनले होते."

समोर आलेल्या सर्च रिझल्टमध्ये त्यांच्या मावशी ओरिटबद्दल लिहिलेलं होतं. त्या इस्रायलमध्ये परत आल्या होत्या आणि समूहाबरोबर त्यांचा संघर्ष सुरू होता.

इस्राईल म्हणाले की, "मला वाटलं ओरिट आम्हाला विसरल्या असतील. पण त्या आम्हाला म्हणजे कुटुंबीयांना वाचवण्यासाठीच सर्वकाही करत आहेत, हे आम्हाला माहिती नव्हतं."

इस्राईलना त्यांचा ईमेल अॅड्रेस सापडला आणि त्यांनी ओरिट यांना संदेश पाठवला. ओरिट म्हणाल्या की, त्यांना तो मॅसेज मिळाल्यानंतर धक्काच बसला होता. त्यांनी एकमेकांशी संपर्क साधायला सुरुवात केली. इस्राईलला जेव्हाही कामासाठी पाठवलं जायचं, तेव्हा ते या दुकानावर यायचे. त्यानंतर इस्राईलनं गुप्तपणे कमावलेल्या पैशातून एक फोन खरेदी केला आणि ओरिट यांना फोन केला.

"त्यांनी माझा आवाज ऐकला तेव्हा त्यांना प्रचंड आनंद झाला होता. त्यांनी मला सांगितलं की, त्या मला नेण्यासाठी येणार आहेत आणि त्यानंतर काही दिवसांनी मी तिथून निसटलो," असं इस्राईल हसत सांगत होते.

"एका रात्री मी परिसराच्या गेटमधून कसाबसा बाहेर पडलो आणि हायवे येईपर्यंत 15 मिनिटं न थांबता जंगलातून वेगानं धावत राहिलो. मी एक बस थांबवली आणि त्या बसमधून दोन तासांत मी ग्वाटेमाला शहरात पोहोचलो. समूहातील इतर सदस्य मला शोधत येतील या भीतीनं मी घाबरलेलो होतो.

"ओरिट माझी वाटच पाहत होत्या पण मी त्यांना ओळखू शकलो नाही. सुरुवातीला तर त्यांना मिठी मारावी की नाही हेही मला समजलं नाही. कारण त्यांनी लेव्ह ताहोरमध्ये परिधान करतात तसे कपडे परिधान केलेले नव्हते. तसंच त्या ठिकाणी विरुद्ध लिंगाच्या व्यक्तीला स्पर्श करणं (विवाहाच्या नात्या व्यतिरिक्त) निषिद्ध होतं."

समूहाची ओळख बनलेली आणखी एक बाब म्हणजे वयाच्या तिसऱ्या वर्षापासून महिलांना संपूर्ण शरीर झाकेल असा विशिष्ट पोशाख परिधान करावा लागत होता. हा नियम विनम्रतेसाठी असल्याचं ते सांगतात.

छुप्या कॅमेरातील फोटो

फोटो स्रोत, Raffi Berg

सार्वजनिक ठिकाणी महिलांना डोळे सोडून संपूर्ण चेहराही झाकावा लागत होता. या सर्व प्रकारामुळं लेव्ह ताहोरचं वर्णन माध्यमांमध्ये 'ज्यूंचं तालिबान' असं केलं जाऊ लागलं होतं.

सुरुवातीला इस्राईलला त्यांच्या मुलाशिवाय परत जायचं नव्हतं. पण ओरिटनं त्यांना मुलासाठी परत येण्याचं आश्वासन दिलं आणि ते ग्वाटेमालाहून इस्रायलला रवाना झाले.

तोपर्यंत म्हणजे वयाच्या 19 वर्षांपर्यंत इस्राईल पाच वर्षे एवढा एकटेपणामध्ये राहिला होता की, त्याला वातावरणाशी जुळवून घ्यायला बराच संघर्ष करावा लागला.

"मला पुन्हा शून्यापासून जीवन सुरू करावं लागलं. लोकांना भेटणे, मैत्री करणे आणि अगदी भाषा पुन्हा शिकणं हे सगळं काही प्रचंड कठीण बनलं होतं," असं त्यांनी म्हटलं.

इस्राईल आणि ओरिट त्यानंतर अनेकदा त्यांच्या मुलाला परत नेण्यासाठी ग्वाटेमालाला आले, पण त्याचा काहीही फायदा झाला नाही.

अखेर, गेल्या सप्टेंबर महिन्यात इस्रायलच्या चार सदस्यांच्या पथकानं केलेल्या एका अंडरकव्हर ऑपरेशनद्वारे (मोसादचे चार एजंट, माजी पोलिस अधिकारी आणि एक वकील) एका खास पोलिस पथकानं मेक्सिकोच्या चिपास राज्यात लेव्ह ताहोरच्या काही ठिकाणांवर छापेमारी केली. काही गट याठिकाणी स्थलांतरीत झालेले होते.

हा छापा एका न्यायाधीशांच्या अधिकृत परवानगीनं झाला होता. या न्यायाधीशांनीच संघटीत गुन्हेगारीसंबंधी मेक्सिकोच्या विशेष वकिलांनी गोळा केलेल्या बलात्कार, ड्रग्ज तस्करी अशा गुन्हेगारी कारवायांच्या पुराव्यांची पडताळणी केली होती.

यात एका अत्यंत धक्कादायक आदेशाचाही समावेश होता, जो बीबीसीनं समूहाच्या एका नेत्याकडे पाहिला होता. "सामाजिक संस्था जर मुलांना तुमच्याकडून घेऊन जात असतील तर महिलांनी त्यांच्या मुलांची विष देऊन हत्या करण्याचे निर्देश," त्यात देण्यात आले होते.

"जर कोणी आमच्या मुलांना आमच्याकडून घेऊन जायला आलं, तर आम्हाला बलिदान द्यावं लागेल. तसं केलं तर शापित लोक आमच्या मुलांच्या पवित्र आत्म्याला अपवित्र करू शकणार नाहीत. आमच्या पवित्र आत्म्याने (श्लोमो हेलब्रान्स) मृत्यूपूर्वी तसे निर्देश दिलेले आहेत," असा या मजकुराचा थोडक्यात अनुवाद आहे.

"हे अशा पद्धतीनं करायला हवं की त्यांना (मुलांना) त्रास होणार नाही. तसंच त्यांच्या शरीरालादेखील इजा करू नका. हे करण्यासाठी त्यांनी (महिलांनी) अशा गोष्टीचा वापर करावा, जी आम्ही वितरीत करू. ती मुलांना लगेचच द्यावी लागेल. मुलांनी घाबरून जाऊ नये म्हणून, त्यांना ते काय आहे हेही सांगू नये."

त्यानंतर मुलांना मारल्यानंतर महिलांनी स्वतःला संपवावं, असेही निर्देश देण्यात आले होते.

त्यामुळं मुलांना तातडीनं पालकांपासून वेगळं करण्यात आलं आणि हा परिसर रिकामा करण्यात आला.

बाहेर आणलेल्या मुलांमध्ये नेवो होता आणि त्याची पुन्हा इस्राईलशी भेट झाली. "मी रडलो, पण नेवो शांत होता. मी त्याचा पिता आहे, याची जाणीव त्याला झाली असणार याची मला खात्री आहे," असं इस्राईलनं म्हटलं.

मल्केचीदेखील सुटका करण्यात आली होती. पण तिनं समूह सोडण्यास नकार दिला. तिच्यासह सुमारे 25 जणांना सरकारी छावणीमध्ये ठेवण्यात आलं होतं. पण पाच दिवसांनंतर ते सगळे तिथून निसटले.

मानवी तस्करी आणि गंभीर लैंगिक गुन्ह्यांच्या संशयाखाली राज्य न्यायाधीशांच्या आदेशानं दोन नेत्यांना अटक करण्यात आली. पण एका स्थानिक न्यायाधीशानं परत त्यांची सुटका केली.

लेव्ह ताहोरनं इस्राईल यांच्यावर केलेल्या अत्याचारांची वेगळी दखल किंवा तपास करण्यात आला नाही.

लेव्ह ताहोरचे प्रवक्ते युरीएल गोल्डमन यांनी मात्र सर्व आरोप फेटाळले आहेत.

इसराईल आणि नेव्हो

फोटो स्रोत, Yisrael Amir

"मी सगळे आरोप पूर्णपणे फेटाळत आहे. आमच्याकडे असलेला सर्वांत मोठा पुरावा म्हणजे मेक्सिकोमधील न्यायाधीशांचे (स्थानिक) शब्द. सर्व पुराव्यांची शहानिशा केल्यानंतर न्यायाधीशांनी हा खटला बंद केला. उलट या समूहाचाच छळ करण्यात आला," असं गोल्डमन बीबीसीबरोबर बोलताना म्हणाले.

तसं पाहता स्थानिक न्यायाधिशांचा तर्कही अगदी बाजुला सारता येणार नाही. या प्रकरणाची सखोल माहिती असलेल्या एका सुत्रानं सांगितलं की, केंद्रीय तपास पथकाच्या सदस्यांनी गोळा केलेले सर्व पुरावे सादरच करण्यात आले नाहीत.

सरकारी छावणीतून पळून गेलेले सर्वजण आणि सोडण्यात आलेले दोन नेते हे सगळे पुन्हा ग्वाटेमालाला परतल्याचं सुत्रांचं म्हणणंय.

सुमारे 12 हजार किलोमीटर अंतरावर तेल अविव्हच्या उपनगरामध्ये इस्राईल हे सध्या त्यांचा मुलगा नेवोसह नव्या घरामध्ये पुन्हा एकदा आयुष्याचा कॅनव्हास रंगवण्याचा प्रयत्न करतायत.

तंत्रज्ञानाच्या वापरापासून एवढी वर्षं दूर राहिल्यामुळं ते सध्या बार इलान युनिव्हर्सिटीतून कम्प्युटर सायन्सचं शिक्षण घेत आहेत. सॉफ्टवेअर इंजिनीअर बनण्याचं त्यांचं ध्येय आहे.

"तसं झालं तर अवघं आकाश माझ्या कवेत येईल," असं ते म्हणाले.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)