You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
दत्तक गेल्यावर 58 वर्षांनी झाली खऱ्या आईची भेट
- Author, जेरेड इविट्स
- Role, बीबीसी न्यूज
1960 च्या दशकांत दत्तक गेलेल्या हजारो मुलांपैकी टिमथी वेल्च हे एक आहेत.
टिमथी यांना दत्तक देण्यात आलं तेव्हा त्यांचं वय फक्त 6 आठवडेच होतं. जून मेरी फेल्प्स ही त्यांची आई. टिमथी यांच्या जन्माच्यावेळेस त्या फक्त 18 वर्षांच्या होत्या.
आता मॅनमाऊथ येथे राहाणाऱ्या आपल्या खऱ्या आईला म्हणजे जून यांना कसं शोधून काढलं? याची कहाणी टिमथी यांनी सांगितली आहे.
टिमथी हे आता 59 वर्षांचे असून ते आपले दत्तक पालक बिल आणि युनिस यांच्या घरात मोठे झाले.
"तू एक खास माणूस आहेस, तू एका वेगळ्याच मार्गाने (आपल्या घरात) आलास, असं माझे पालक नेहमी म्हणायचे", असं टिमथी सांगतात.
"त्यांना त्यांचं स्वतःचं मूल होऊ शकणार नव्हतं. म्हणून त्यांनी दत्तक प्रक्रियेचा मार्ग निवडला, मला दत्तक घेतलं तेव्हा ते 36 वर्षांचे होते."
"आपल्या दत्तक पालकांच्या घरी आपण नेहमीच आनंदात होतो आणि पालकांच्या मृत्यूपर्यंत आपल्या खऱ्या आईचा शोध घ्यावा हा विचारही आला नाही", असं टिमथी सांगतात.
बिल यांचं 2018 साली तर युनिस यांचं 2020 साली निधन झालं.
"दत्तक मूल म्हणून तुम्ही नेहमीच आपल्या जनक कुटुंबाच्या शोधात राहाता. अर्थात त्यांचा शोध तुम्ही लावता किंवा न लावता हा भाग वेगळा," असं टिमथी सांगतात.
"व्यक्ती म्हणून आपल्या ओळखीवर त्याचा फार प्रभाव असतो. मला नेहमीच माझ्या व्यक्तिमत्वाबद्दल कुतुहल राहिलं आहे. माझ्या व्यक्तिमत्वामधल्या काही गोष्टी दत्तक कुटुंबापेक्षा वेगळ्या होत्या."
"दत्तक पालकांचं निधन झाल्यावर मला स्वतःबद्दल आणि जगाबद्दल काही वेगळ्या भावना मनात येऊ लागल्या."
"आपण सतत नात्यांच्या शोधात असतो त्यामुळे जेव्हा तुमच्या दत्तक पालकांचं निधन होतं तेव्हा तुमच्या मूळ जनक पालकांबद्दलचं कुतुहल नव्यानं जागं होतं, असं मला समुपदेशकानं सांगितलं."
"तेव्हा आपल्या बाबतीत हेच होत असल्याचं मला जाणवलं. त्यातून आता माझं काय? यावर विचार करायला मला एकप्रकारे परवानगीच मिळाली."
जानेवारी 2022मध्ये काही जुन्या कौटुंबिक फोटोंच्या आधारे टिमथी यांनी आपल्या जन्मदात्या आईचा शोध घ्यायला सुरुवात केली.
"मला हॅम्पशायरमधील यातेलेय हॅवन या माझ्या जन्मस्थळाचा फोटो सापडला."
"तेव्हा तिथल्या माता आणि बालकांच्या कुटुंबांचा एक फेसबूकवर ग्रुप असल्याचं माझ्या लक्षात आलं."
"त्यामध्ये सामिल करुन घेण्याची मी विनंती केली आणि त्या ग्रुपचे समन्वयक पेनी ग्रीन यांनी मला माझ्याबद्दल जाणून घेतलं."
"एक उत्साही इतिहास अभ्यासक म्हणून त्यांनी मला मदत केली आणि माझे मूळ जन्मदाते शोधून काढायला मदत केली."
पेनी ग्रीन या मूळच्या बेडफोर्डशायरच्या आहेत. त्यांनी या द हॅवन या संस्थेचा फेसबूकग्रुप स्थापन केला होता. ही संस्था बॅप्टिस्ट चर्चद्वारे चालवली गेली होती. तिथं बाळाला जन्म देणाऱ्या माता व बालकांची काळजी घेतली जाई.
62 वर्षांच्या पेनी सांगतात, "या संस्थेत अविवाहित महिला आपल्या मुलांना जन्म देत आणि त्यांची मुलं दत्तक दिली जात. बहुतांशवेळा जबरदस्तीनं ही मुलं दत्तक दिली जात."
"अविवाहित महिलांनी मुलाला जन्म देणं योग्य मानलं जात नव्हतं, त्यामुळे बाळंतपण आणि दत्तक देण्याची सोय करून त्यांच्यावर उपकार केले जात आहेत अशी भावना तेव्हा होती."
यातेले सोसायटीच्या माहितीनुसार 'द हॅवन' हे 1945 ते 1970 या काळात कार्यरत होते. या कालावधीत तिथं जवळपास 1800 बालकांना जन्म दिला गेला.
पेनी यांची आईही 36 वर्षांची होती. त्या अविवाहित होत्या म्हणून त्यांनाही बाळंतपणासाठी इथं पाठवलं गेलं होतं.
पण त्यांच्या आईने बाळाला म्हणजे पेनीला आपल्यापासून दूर करायला नकार दिला. त्यांनी स्वतःचं नाव बदललं आणि आपण विवाहित असून पेनीच्या वडिलांचा कार अपघातात मृत्यू झाला, असं सांगितलं होतं.
"बाळंतपणाच्यावेळेस आपली आई फारच तरुण होती हे जाणून आपल्यालाही जबरदस्तीने दत्तक दिलं गेलं असावं", असं टिमथी यांना वाटतं.
ते सांगतात, "जून (आईसमोर) खरंच कोणताही पर्याय नव्हता. विशेषतः काम करुन जगायचं तिनं ठरवल्यावर तर नाहीच. कारण नोकरी करत तिनं माझा सांभाळ कसा केला असता?"
पेनी सांगतात, "द हॅवनमधील काही मातांना आपली मुलं आपल्यापासून दूर जाणार हे माहिती होतं पण ते कधी हे मात्र त्यांना सांगितलेलं नसायचं."
"एका आईनं आपल्या बाळासाठी खेळणं तयार केलं होतं. पण बाळ कधी दूर नेण्यात आलं हे तिला कधीच सांगितलं न गेल्यानं ती ते खेळणं देऊ शकली नाही", असा एक अनुभव पेनी सांगतात.
याचा काही मातांना इतका धक्का बसला होता की त्यांच्या मनातील भीतीमुळे त्या भूतकाळाबद्दल काहीही विचार मनात आणू शकत नव्हत्या.
पेनी यांच्या सल्ल्यानुसार टिमथी यांनी जनरल रजिस्टर ऑफिसमध्ये अर्ज केला आणि त्यांचा मूळ जन्मदाखला मागवला, त्यावर त्यांच्या आईचं नाव, जन्मतारीख, जन्मस्थळ होतं.
त्यांनंतर पेनी यांनी इंटरनेट आणि मतदार यादी वापर करुन टिमथीच्या आईचा शोध घेतला.
टिमथी यांच्यावतीने पेनी यांनी त्या मातेशी पहिल्यांदा संपर्क केला तेव्हा त्यांना त्यांचे सध्याचे यजमान मायकल मोर्टिमर असल्याचं समजलं.
त्यानंतर मोर्टिमर आणि त्यांच्या दोन्ही मुलांशी टिमथी यांची लंडनमध्ये भेट झाली.
"ते दोघेही अत्यंत दयाळू, विचारशील आणि चिंतनशील आहेत," असं टिमथी सांगतात.
"आमच्या आयुष्याच्या या टप्प्यावर भेट होणं हे मी नशीबवान असल्यासारखं मानतो. दोन्ही कुटुंबांना अधिकाधिक जाणून घेणं माझ्यासाठी आनंददायी ठरणार आहे."
ख्रिसची पत्नी अमांडा आणि ग्रेगची पत्नी गेमा तसंच त्यांच्या मुलांना भेटताही आलं.
58 वर्षं एकमेकांपासून दूर राहिल्यावर ख्रिस आणि ग्रेग यांनी 19 सप्टेंबर 2022 रोजी टिमथी यांना त्यांच्या आईला भेटायला नेलं.
ते सांगतात, "पहिल्यांदाच मी आईच्या डोळ्यांत माझी प्रतिमा उमटलेली पाहात होतं."
"ती एकदम भावनिक भेट होती आणि त्याचवेळा ती अगदी सहजही वाटली."
"आम्ही अनेक विषयांवर बोललो खरं, पण मला तिच्याकडे पाहाणं ती व्यक्ती म्हणून कशी आहे याचं आकलन करुन घेणं फार आवडलं. "
"तब्येतीच्या अनेक समस्या असल्या तरी माझ्या आईला नीट आठवतं."
आईच्या भेटीनंतर आपल्या पूर्वायुष्याबद्दलचा हरवलेला तुकडा नीट जुळल्यासारखं टिमथी यांना वाटतं.
"माझी आई 17 व्या वर्षी गरोदर राहिली. मी जन्मलो तेव्हा ती 18 वर्षांची होती. त्याच्या आदल्या वर्षी किंवा ती 16 वर्षांची असतानाही तिला एक मुलगा झाला होता. तोही दत्तक देण्यात आला मात्र त्याच्याबद्दल अद्याप माहिती नाही."
"तीन भावंडांत ती सर्वात लहान होती, तिची ऑड्री नावाची 10 वर्षांनी मोठी असलेली एक बहीण होती. तसेच तिचा बिल हा भाऊ तिच्यापेक्षा 8 वर्षांनी मोठा होता. तो अजून जिवंत आहे."
"हिदायत मामागन झार्दी हे माझे जनक पिता. ते इराणी मुस्लीम होते. ऑक्सफर्डमध्ये ते एकत्र यायचे."
"माझे जनक पिता आणि माझ्यापेक्षा मोठा असलेल्या भावाचा शोध सध्या अगदी सुरुवातीच्या पातळीवर आहे."
जून यांचा 1966 मध्ये विवाह झाला आणि त्यातून त्यांना टिमथी यांना भेटलेल्या ख्रिस आणि ग्रेग यांचा जन्म झाला.
आपलं कुटुंब सापडण्यावर टिमथी म्हणतात, "तुम्ही आतून खंबीर आणि मुक्त मनाचे असावं लागतं."
"आता मला भाऊही मिळाले आहेत. हे नव्यानं सापडलेलं नातं मला रोमांचक वाटतं."
"मी आता यापुढेही आईला भेटत राहून तिच्याबद्दल जाणून घेत राहिन."
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)