Mothers day: ओझं नाही तर आनंददायी अनुभूती असावी मातृत्व

    • Author, नूतन ठाकरे
    • Role, बीबीसी मराठीसाठी

बदलत्या काळानुसार सुजाण पालकत्वाला बरंच महत्त्व आलंय. आज जागतिक पालक दिन आहे. त्यानिमित्तानं हा विशेष लेख.

आई-वडील होणार म्हणजे आता मोठी जबाबदारी येणार, याची जाणीव होऊ घातलेल्या पालकांना कधी नव्हे इतकी जास्त आहे. मात्र, या सुजाण पालकत्वाच्याही आधीची एक पायरी आहे आणि ती म्हणजे सुजाण मातृत्व. बाळ हे आईच्या पोटातून जन्म घेतं. तान्हुलं बाळ तर सर्वस्वी आईवर अवलंबून असतं.

बाळ मोठं होतं असताना त्याचे वडील, आजी-आजोबा त्याची बरीच काम करत असतात. शी-शूला नेणं, बागेत फिरवणं, बाळासाठीचं सामान आणण्यासारख्या अनेक जबाबदाऱ्या ते घेत असले तरी या जबाबदारीतला मोठा वाटा हा आईचाच असतो.

वर्षभराच्या बाळाला सोडून आईने कामासाठी महिनाभर बाहेरगावी जायचं म्हटलं, तर आपल्या समाजातल्या मध्यमवर्गीय कुटुंबात ही बाब सहज पचनी पडेल का?

याचाच अर्थ बाळाची पहिली जबाबदारी ही आईवरच असते. म्हणूनच स्त्रीला आई व्हायचं आहे की नाही आणि व्हायचं असेल तर कधी, याचा पहिला निर्णय हा तिचाच असायला हवा. पण, वास्तव तसं नाही.

आई होण्याची भावना नैसर्गिक असली तरी आई होण्यासाठी कौटुंबिक, सामाजिक आणि सांस्कृतिक दबावही असतोच. खरंतर बरेचदा हा दबावच इतका जास्त असतो की आपल्याला मूल हवं की नको, हा विचारच मुलीच्या मनात येत नाही. तसा तो आला तरी बहुतांश प्रकरणांमध्ये मुली दबावापुढे झुकतात किंवा त्यांना झुकावं लागतं. या दबावामुळे मग तिची मानसिक आणि भावनिक घुसमट होत राहते.

लग्न झालं की लगेच घरात पाळणा कधी हलणार, याची कुजबूज सुरू होते. सुरुवातीला घरातूनच आई, सासू यांच्याकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष विचारणा, सल्ले, टोमणे सुरू होतात. लग्नाला वर्ष होत आलं आणि तरीही गोड बातमी आली नाही की नातेवाईक, आप्तेष्टांकडच्या कार्यात, समारंभात इतर बायका मुलीवर याच प्रश्नाचा भडिमार करत असतात.

'मग कधी येणार गुड न्यूज?'

कधी येणार गूड न्यूज, काय प्लॅनिंग सुरू आहे का अजून, नको बाई उशीर करू, काही प्रॉब्लम आहे का, अजून कशी नाही बातमी, करियर होतं गं, आधी हे महत्त्वाचं या आणि अशा प्रश्नांचा इतका ओव्हरडोस होत असतो की बऱ्याच मुली मग अशा कार्यक्रमांना जाणंच टाळतात.

पुढेपुढे मग घरची मंडळीच उघड उघड बोलायला लागतात. तू फक्त बाळाला जन्म दे, पुढे आम्ही करू सगळं. आमचे हातपाय चालतात तोवर घ्या मनावर... कधी हिचं उदाहरण, कधी तिचं उदाहरण, असं बरंच काही होत असतं. जवळपास प्रत्येक घरात हेच चित्र असतं. कुटुंब, आप्तेष्ट यांच्याकडून होणारा हा दबाव एक प्रकारचा मानसिक छळच असतो. काही प्रकरणांमध्ये तर त्याचे भयंकर परिणाम होत असतात.

"मूल न होण्यासाठीचा पहिला बळी हा स्त्रीच ठरत असते. मूल होत नाही म्हणजे पुरूषात काही दोष असेल, हे स्वीकारलंच जात नाही. बाईलाच डॉक्टरांकडे आणलं जातं. अनेक पुरूष तर बायकोला सोडून देतात. माहेरी पाठवतात. दुसरं लग्न करतात", असं स्त्री रोगतज्ज्ञ असणाऱ्या डॉ. मनीषा जगताप सांगतात.

'दबावामुळे मनोविकारालाही निमंत्रण'

मूल न होणाऱ्या स्त्रियांच्या मानसिकतेविषयी त्या सांगतात अशा स्त्रिया या मानसिकदृष्ट्या खूप खचलेल्या असतात. त्या सांगतात, "त्यांच्याकडे एक पेशंट आली होती. तिचे नातेवाईक तिला घेऊन आले होते. तिचे दिवस पूर्ण भरलेत आणि आता तिला कळा येत असल्याचं त्यांनी सांगितलं. पण, तिची सोनोग्राफी केली तेव्हा ती प्रेगनंटच नसल्याचं कळलं." वैद्यकीय भाषेत याला सुडो-प्रेगनन्सी म्हणतात.

मूल होण्याची अनावर इच्छा किंवा समाजात स्त्री म्हणून स्थान मिळवायचं असेल तर ते आई होऊनच मिळू शकतं, या भीतीमुळे स्त्रिची मानसिकता इतकी अस्थिर झालेली असते की त्या स्त्रिला मग आपण खरंच गरोदर असल्याचं भासू लागतं. तशी लक्षणं दिसायला लागतात. उलट्या होतात, डोहाळे लागतात. शरीरावर सूज असते. कळा येतात. प्रत्यक्षात मात्र ती गरोदर नसतेच.

लग्न झालं म्हणजे मूल होणारच ही इतकी साधी गोष्ट आहे का? आई होणं किती मोठी जबाबदारी आहे? मूल जन्माला घालायचं की नाही, हा त्या जोडप्याचा विशेषतः मुलीचा खाजगी प्रश्न नाही का?

यातला आणखी एक भयंकर प्रकार म्हणजे ज्या जोडप्यामध्ये काही वाद असतील त्यांना घरचेच जालीम उपाय सुचवतात, तो म्हणजे बाळ झालं ना की सगळं नीट होईल. आधीच नवऱ्याच्या छळाला त्रासलेल्या मुलीची मानसिक स्थिती काय असणार, त्यात बाळाला जन्म द्यायचा की नाही, याचं किती दडपण त्या मुलीवर येत असेल, याचा विचारच केला जात नाही.

'जाहिरातीतूनही भडिमार'

मातृत्वाला लाभलेल्या श्रेष्ठत्वाच्या वलयाला सिनेमे, जाहिराती, मदर्स डे सारखे सोशल सेलिब्रेशन्स यांच्या माध्यमातूनही खतपाणी घातलं जातं. आईची थोरवी गाणाऱ्या सिनेमांचा भारतीय सिनेसृष्टीत खच आहे. मदर इंडिया ते मॉमपर्यंत सिनेमांमध्ये आईची अनेक उदात्त रूपं चितारली आहेत.

दुसरीकडे बाळाचे कपडे, आंघोळीचा साबण, शॅम्पू, बाळाचे डायपर्स, लहान मुलांसाठीचे हेल्थ ड्रिंक्स, या आणि अशा जाहिराती आठवून बघा. त्यातही बाळाची आईच तुमच्याशी बोलत असते. कधी 'मम्मी ने मेरी की पुरी तैयारी....' कधी 'बच्चे के लिए पहला स्पर्श मा का और दूसरा सिर्फ हगिज का', तर कधी 'मै अपने बच्चो की सुरक्षा करती हू मॉर्टिन से...' म्हणत जाहिरातीतल्या या आया सजग माता होण्यासाठीचे मंत्र देत असतात.

सोशल मीडियावर तर गटारी, संकष्टी, एकादशीच्याही शुभसंदेशांचा पाऊस पडतोय. मदर्स डेबद्दल तर मग बोलायलाच नको. कितीतरी डेटा या मदर्स डेच्या शुभेच्छांसाठी खर्च होतो. जाहिरात विश्वात नवनवीन कॅम्पेन सुरू होतात. टिव्ही, मोबाईल बघणाऱ्यांवर नुसता भडीमार होत असतो. आईच्या या उदात्तीकरणातून लग्नाला बरेच वर्ष होऊनही आई न झालेल्या किंवा आई होण्याची इच्छा नसणाऱ्या मुलींच्या मनावर अप्रत्यक्ष दडपण येत राहतं.

शरीरावर होणारा परिणाम

अशा वेगवेगळ्या स्तरावरून येणाऱ्या दडपणाखाली दबून गेलेल्या मुलीला मग तो ताण नकोसा होतो. अनेक स्त्रियांमध्ये या ताणाचे गंभीर मानसिक परिणाम दिसतात. मनातल्या द्वंद्वामुळे मानसिक विकार जडू लागतात. शरीर आणि मनाचा संबंध आहे. त्यामुळे मन आजारी तर त्याचा परिणाम आपसूकच शरीरावर होतो.

शरीर आजारी असलं की पुन्हा अपत्यप्राप्तीमधल्या अडथळ्यांमध्ये वाढ होते. अशा प्रकारच्या एका दृष्टचक्रात स्त्री अडकते. या चक्रातून बाहेर पडण्यासाठी खरंतर समुपदेशन योग्य मार्ग. पण, मुलीला आणि तिच्या कुटुंबालाही अपत्य हाच त्यावरचा उपाय वाटतो. त्यासाठी काहीही करायची तिच्या मनाची तयारी होते. त्यातून बाबा-बुवा, पीर-फकीर, उपास-तापास, व्रत-वैकल्ये असे ना ना प्रकारचे उपाय सुरू होतात. आई होण्यासाठी कुठलीही किंमत मोजायला ती तयार होते.

अंधश्रद्धेला खतपाणी

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सरचिटणीस आणि मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हमीद दाभोलकर सांगतात, "जादूटोणाविरोधी कायद्याअंतर्गत जे गुन्हे दाखल झाले आहेत त्यातले जवळपास 60% गुन्ह्यांमध्ये पीडित महिला आहेत आणि त्यातल्याही अनेक महिला या मूल होण्यासाठी कुठल्यातरी भोंदूबाबाच्या जाळ्यात अडकलेल्या होत्या."

ते गुजरातमधल्या पार्वती मांचं उदाहरण देतात. ते म्हणाले, "गुजरातमध्ये पार्वती मां नावाची एक भोंदू बाई होती. तिने पोटावरून हात फिरवला की वंध्य स्त्रिलाही मूल होतं, असं मानायचे. तिच्याकडे येणाऱ्यांची संख्या मोठी होती. विशेष म्हणजे स्वतः स्त्री रोगतज्ज्ञ असणाऱ्या अनेक बायकाही आपल्या सुना किंवा ओळखीतल्या मुलींना घेऊन या पार्वती मांकडे जायच्या. बरेचदा स्त्री आणि पुरुषाच्या मानसिकतेकडे लक्ष दिलं जात नाही आणि मग ताणातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणून बुवा-बाबांच्या आहारी जाऊन फसवणूक होत असते."

दाभोलकर सांगतात, "मूल नसलेल्या स्त्रिला ताणाला सामोरं जावं लागतं. त्यातून चिंता आणि निराशेशी निगडित मानसिक आजार दिसतात. भीती वाटणं, अस्वस्थता यासारखे विकार जडतात. मात्र, आजारापर्यंत न पोचलेलेही अनेक ताण असतात. यात सतत चिडचिड होणं, निर्णय घेता न येणं, स्वतःच्या आयुष्यावर स्वतःचं नियंत्रण नसणं, कुणी दुसरंच आपलं आयुष्य हाकत असणं. याचा मुलांवर आणि कुटुंबावर परिणाम होणं, असे प्रकार दिसतात. आईचं मानसिक स्वास्थ चांगलं नसेल तर बाळाचं संगोपनही चांगलं होत नाही. त्याला हवी तशी जवळीक मिळू शकत नाही."

या सर्व टाळता येण्यासारख्या गोष्टी आहेत. आपल्या देशात माता-बाल आरोग्य क्षेत्रात बरंच काम झालं आहे. मात्र, यात केवळ शारीरिक आरोग्यावर लक्ष देण्यात आलं आहे. स्त्रीची मानसिकता समजून घेऊन आई होण्याच्या आधीपासून ते बाळाच्या संगोपनापर्यंत अनेक टप्प्यांवर स्त्रिला भक्कम मानसिक आणि भावनिक आधाराची गरज असते.

वंध्यत्व निवारण क्षेत्रातही वैद्यक शास्त्राने मोठी झेप घेतली आहे. IUI, IVF यासारख्या तंत्रामुळे वंध्य स्त्रिलाही मातृत्वाचं सुख मिळू शकतं. मात्र, या सगळ्या प्रक्रिया वेळखाऊ, संयमाची कसोटी बघणाऱ्या, खिशाला मोठं भगदाड पाडणाऱ्या तर असतातच शिवाय यासाठी करण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या तपासण्या, चाचण्या आणि प्रोसिजर्समुळे स्त्रिला स्वतःला शारीरिक वेदनांमधून जावं लागतं.

इतकंच नाही तर अशा प्रकारच्या इनफर्टिलिटी ट्रिटमेंट घेऊन जन्माला येणाऱ्या बाळामध्ये बालवयात आणि किशोरवयातदेखील मानसिक आजार होण्याची शक्यता नैसर्गिकरित्या जन्माला आलेल्या मुलांच्या तुलनेत जास्त असते, असं डेन्मार्कमध्ये 2014 साली करण्यात आलेल्या एका संशोधनात सिद्ध झालं आहे.

'गर्भाचं राजकारण'

पिंकी विराणी यांच्या 'Politics Of Womb' या पुस्तकात इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्चचे डॉ. शशीधरा यांची प्रतिक्रिया आहे. ते सांगतात, "आयव्हीएफद्वारा असो किंवा गर्भाशय रोपणाद्वारा असो वा अगदी नैसर्गिक पद्धतीने असो. जनुकांमध्ये इतके तांत्रिक किंवा कृत्रिम बदल घडवून अपत्य जन्माला घालून, तुम्ही कुठली क्रांती घडवत नाही आहात.

"किती विरोधाभास आहे बघा-खाद्य पदार्थांच्या जनुकांचं स्वरूप बदलून ते पदार्थ बाजारात आणले जाऊ लागले, तेव्हा ते मनुष्याच्या तब्येतीच्या दृष्टीने किती हानीकारक आहे, यावरून केवढं वादळ उठवलं गेलं. मग हीच जागरुकता खुद्द मनुष्याच्या पुढच्या पिढ्यांबाबत का दाखवली जात नाही," विराणी सांगतात.

आई होण्याच्या लालसेपायी स्त्रिया जशा भोंदूबाबांना बळी पडतात, तशाच आयुर्वेदिक, होमियोपॅथी, अलोपॅथी अशा वेगवेगळ्या पॅथींचा आपल्या शरिरावर प्रयोग करत राहतात. आयुष्याचं केवळ एकच ध्येय होऊन बसतं 'आई होणं'. बरं इतकं सगळं करूनदेखील बाळ होणार, याची शंभर टक्के शाश्वती कुठल्याच प्रोसिजरमध्ये नसते. मानसिक आणि भावनिकदृष्ट्या अगदी अस्थिर झालेल्या अशा स्त्रियांना समाजाच्या आधाराची गरज असते. पण, होतं नेमकं उलट. हाच समाज तिला टोचे देत राहतो.

आई झाल्यावरच महिलेचं जीवन सार्थक होतं का?

डॉ. हमीद दाभोलकर म्हणतात, "बाईच्या जीवनाचं सार्थक मूल असण्यामध्येच आहे, असा आपल्या समाजाचा समज आहे. तिच्या इच्छेचा आदर, अशी आपल्याकडे व्यक्तिस्वातंत्र्याची कल्पना नसल्याने स्त्रिच्या मताला किंमत नाही. खरंतर आयुष्यातली जी इतकी आनंदाची बाब असायला पाहिजे ती स्त्रिला दिलेल्या दुय्यम स्थानामुळे ओझं होऊन जाते."

आता जरा विचार करा आई होण्याची उपजत उर्मी असलेली एक स्त्री आहे. पण, सोबतच आई होण्यासाठी तिच्यावर कुटुंबातून, समाजातून दबाव आहे आणि दुसरीकडे अशी मुलगी आहे जिच्यावर कुणाचाही दबाव नाही, उलट तिला आधार देणारं वातावरण आहे, अशा परिस्थितीत कुठली मुलगी जास्त योग्य निर्णय घेऊ शकेल. कोणाचं आयुष्य अधिक आनंददायी असेल.

मात्र, परिस्थिती अगदी निराशाजनक नाही. नव्या पिढीत अनेक सकारात्मक बदल दिसत आहेत. आज अनेक स्त्रिया स्वेच्छेने मातृत्व नाकारत आहेत. त्यामागे करियर, स्वतःच्या मर्जीने आयुष्य घालवण्याची इच्छा, पर्यावरण संरक्षण, हे जगच जगण्यासाठी योग्य नाही, मुलच नकोच हीच मूळ प्रेरणा, अशी अनेक कारणं आहे.

अमेरिकेत 1946मध्ये जन्मलेल्या स्त्रियांमध्ये मूल नसणाऱ्या स्त्रियांचं प्रमाण नऊ टक्के होतं. 1970मध्ये जन्मलेल्या स्त्रियांमध्ये हे प्रमाण सतरा टक्के इतकं वाढलं आहे. यातल्या बऱ्याच स्त्रिया या 'चाईल्डलेस बाय चॉईस' या गटातल्या आहेत. भारतातही अशी उदाहरण दिसत आहेत. वधू-वर सूचक साईट्सवर तर आता मुलं आणि स्वतः मुलीसुद्धा मला भविष्यात कधीही मूल नको, असं स्पष्ट करून आपला जोडीदार निवडत आहेत.

मूल होऊ द्यायचं की नाही, हवं असेल तर केव्हा, या सगळ्या निर्णयांमध्ये सहभागी करून घेण्यासाठी मुली आग्रही दिसतात. तरुण मुलंही आपल्या सहचरणीच्या निर्णयाचा आदर करतात. सल्लामसलत करून निर्णय घेतात. त्यात शक्य तेवढी मदतही करतात. यामुळे येणारं मातृत्व आणि पालकत्व अधिक आनंददायी आणि सुकर होतं. समाजात होणारा हा बदल सकारात्मक आहे.

तो स्वीकारला गेला पाहिजे. मातृदिन साजरा करताना मातेविषयी कृतज्ञता व्यक्त करावीच. मात्र, सोबतच मातृत्वासाठी कुठल्याही स्त्रीवर मी स्वतः दबाव आणणार नाही आणि कुणी तसं करत असेल तर तेही होऊ देणार नाही, याचीही खूणगाठ बांधावी. बदलत्या काळानुसार स्त्रिच्या मातृत्वाविषयीच्या बदलत्या भावनांही समजून घेण्याची गरज आहे.

(लेखातील विचार लेखिकेचे वैयक्तिक विचार आहेत.)

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)