तुमच्या लहान मुलांच्या रागावर असं मिळवा नियंत्रण

    • Author, नवीन नेगी
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

काही दिवसांपूर्वी पेपरमधल्या एका बातमीनं माझं लक्ष वेधलं. दिल्लीच्या कृष्ण नगरमध्ये एका सरकारी शाळेत दोन विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या भांडणाची ती बातमी होती.

शाळेत सकाळी प्रार्थनेच्या वेळी या दोघांचं भांडण झालं. नंतर ते भांडण वाढलं आणि चिडून एका विद्यार्थ्यानं दुसऱ्याला चाकूनं भोसकलं!

असं नाही की शाळकरी मुलांमधलं हे पहिलंच भांडण होतं. नक्कीच याआधीही शाळेत मुलं चिडल्यावर एकमेकांना मारत असल्याची अनेक उदाहरणं समोर आली आहेत. पण या प्रकरणात हिंसाचाराने गाठलेली पातळी चिंताजनक होती.

आजकाल अनेक किशोरवयीन मुलं हिंसेच्या घटना घडवून आणताना दिसतात. आणि मुलांमध्ये हे हिंसेचं वाढतं प्रमाण खरं चिंतेचं कारण आहे.

अल्पवयीन मुलांना जास्त राग येतो

UNICEFच्या एका नुसार जगभरात जवळपास 120 कोटी किशोरवयीन मुलं आहेत, म्हणजे ज्यांचं वय 10 ते 19 वर्षं आहे अशी मुलं. भारतात ही संख्या जवळपास 24.3 कोटी आहे, म्हणजे एकूण लोकसंख्येच्या साधारण एक चतुर्थांश इतकी. एवढंच नाही तर, जगभरात सर्वाधिक किशोरवयीन मुलं विकसनशील देशांमध्ये राहतात.

मुलांना किती राग येतो, हे त्यांच्या वयावर अवलंबून आहे. 2014मध्ये 'जर्नल सायकोलॉजिकल मेडिसीन'मध्ये प्रकाशित झालेल्या एका रिसर्चनुसार मुलींपेक्षा मुलांमध्ये रागाचं प्रमाण अधिक असतं.

हे संशोधन भारतातील सहा वेगवेगळ्या ठिकाणांमध्ये करण्यात आलं. यात दिल्ली, बंगळुरू, जम्मू, इंदूर, केरळ, राजस्थान आणि सिक्कीम या ठिकाणच्या 5,647 अल्पवयीन आणि युवकांनी सहभाग घेतला.

या संशोधनानुसार 16 ते 19 वर्षं वयोगटातल्या मुलांमध्ये रागाचं प्रमाण अधिक असतं, तर 20 ते 26 वयोगटात रागाचं प्रमाण कमी असतं. म्हणजेच किशोरवयीन मुलं जास्त रागीट असतात.

पण या संशोधनानुसार मुलींपेक्षा मुलांमध्ये रागाचं प्रमाण अधिक असलं तरी, 12 ते 17 वयोगटातल्या 19 टक्के मुली शाळांमध्ये कोणत्या ना कोणत्या भांडणात सहभागी झालेल्या आढळतात.

तेव्हा प्रश्न हा पडतो की मुलांमध्ये ही हिंसक प्रवृत्ती कुठून येते? आणि का?

मोबाईल गेमचा परिणाम?

मानसोपचार तज्ज्ञ आणि मॅक्स हॉस्पिटलच्या समुपदेशक दीपाली बत्रा सांगतात, "अनेक कारणांमुळे मुलं हिंसक होत जातात आणि त्याचं प्रमाणही वाढू शकतं. पालकांचं मुलांवर किती लक्ष आहे, हा एक महत्त्वाचा घटक ठरतो."

"मोठ्या शहरांमधले पालक आपल्या मुलांवर पूर्णपणे लक्ष ठेऊ शकत नाहीत. म्हणून ते मुलांच्या हाती मोबाइल फोन्स देतात. मोबाइलवर मुलं काही असे गेम्स खेळतात, जे हिंसक प्रवृत्तींना चालना देतात," त्या सांगतात.

व्हीडिओ गेममुळं मुलांवर कसा परिणाम होतो, हे विचारल्यावर त्या सांगतात, "जेव्हा माझ्याकडे पालक मुलांमध्ये रागाचं प्रमाण वाढलं आहे, ही तक्रार घेऊन येतात तेव्हा मी विचारते की त्यंची मुलं किती वेळ व्हीडिओ गेम खेळतात. त्यावेळी कळतं की ती मुलं किमान तीन-चार तास व्हीडिओ गेम खेळतात."

"या खेळांत एकमेकांना मारावं लागतं. तुम्ही तेव्हाच जिंकता जेव्हा तुम्ही दुसऱ्याला संपवता. प्रत्येक जणाला जिंकावं वाटतं. हेच कारण आहे की व्हीडिओ गेममुळं मुलांचे स्वभाव बदलत आहेत."

हिंसा किंवा लैंगिक हिंसा असलेले व्हीडिओ गेम मुलांना खेळू देऊ नका, असा महत्त्वपूर्ण निर्णय 2010 साली अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने दिला. या निर्णयाआधी कॅलिफोर्नियाच्या गव्हर्नरनी आपल्या राज्यात एक कायदा आणला होता, ज्यानुसार 18 वर्षांचे होईस्तोवर मुलांना हिंस्र व्हीडिओ गेम खेळता येत नाहीत.

पॉर्नची उपलब्धता

पालक मुलांना मोबाइल फोन सहज उपलब्ध करून देत असले तरी त्याद्वारे अनेक नको त्या गोष्टीही त्यांच्या हाती लागत आहेत, याची जाणीव अनेकदा उशिरा होते.

याचाच एक धोका म्हणजे, मुलांना आता स्मार्टफोन्समुळे सहज आणि गुप्तरीत्या पॉर्नसुद्धा उपलब्ध होत आहे.

देहरादूनमध्ये राहणाऱ्या पूनम असवाल यांना आयुष हा पाच वर्षांचा एक मुलगा आहे. त्या सांगतात की आयुष आतापासूनच हवा तो व्हीडिओ युट्यूबवर सहज शोधू शकतो. आणि हे करणं तो शिकला त्याच्या आईवडिलांकडूनच.

आता आपल्या मुलाच्या सवयीनं त्या त्रस्त झाल्या आहेत. त्या सांगतात, "आयुष मोबाइलमध्ये गुंतलेला आहे, हे पाहून मला बरं वाटायचं. पण आता स्थिती हाताबाहेर गेली आहे. तो हिंसा असलेले कार्टून पाहतो. इंटरनेटवर शिवीगाळ आणि अश्लील व्हीडिओच्या लिंकदेखील येतात. भीती वाटते तो त्या लिंकवर क्लिक करेल तर काय?"

डॉ. बत्रा सांगतात, "इंटरनेट सहज उपलब्ध झाल्यामुळे मुलांपर्यंत आता पॉर्न सहज पोहोचतं. हे एखाद्या व्यसनासारखं आहे. यामध्ये असणाऱ्या हिंसेमुळे मुलांच्या मेंदूवर खूप वाईट परिणाम होतात."

1961 साली मानसशास्त्रज्ञ एलबर्ट बंडुरा यांनी पॉर्नमुळे होणारे परिणाम समजून घेण्यासाठी एक प्रयोग केला होता. त्यांनी लहान मुलांना एक व्हीडिओ दाखवला ज्यामध्ये एक व्यक्ती एका बाहुलीला मारत होता. त्यानंतर त्यांनी मुलांना एक बाहुली दिली. मुलांनी त्या बाहुलीसोबत तशीच वागणूक केली जशी त्या व्यक्तीने व्हीडिओमध्ये केली होती.

आईवडिलांशी असणारं नातं

शहरी जीवन धकाधकीचं झालं आहे. आईवडील दोघंही नोकरी करत असल्याने सर्वसाधारणपणे मुलांसाठी वेळ काढणं त्यांना कठीण झालं आहे. आणि आईवडिलांचं आपापसांत कसं नातं आहे, शिवाय मुलांशी त्यांचे संबंध कसे आहेत, याचा थेट परिणाम मुलांवर होत असतो, असं डॉ. बत्रा सांगतात.

"शांत राहाण्याचा आणि सभ्य वर्तणुकीचा सल्ला देणारे आईवडीलच जेव्हा आपापसात भांडताना मुलं पाहतात तेव्हा अशी मुलं राग आला की हिंसक बनतात. आपल्या मतानुसार सगळं झालं पाहिजे, यावर मुलांचा मेंदू स्थिरावलेला असतो. जेव्हा काही त्यांच्या मनाविरुद्ध होतं, तेव्हा ते वेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देतात. अशा प्रसंगी ते हिंसक रूप घेत असल्याचीही उदाहरणं आहेत."

त्या एक केस सांगतात, "माझे एक क्लायंट होते. ते लहानसहान चुकीसाठीही मुलाला मारहाण करायचे. याचा परिणाम असा झाला की मुलगा हा राग शाळेतील मुलांवर काढायचा. हा मुलगा शाळेत फार भांडखोर झाला होता."

आईवडिलांतील संबंधाचा मुलांवर कसा परिणाम होतो, या संदर्भात बीबीसीवर एक बातमी प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार मुलांच्या वयानुसार हा परिणाम बदलत असतो. "नवजात बाळाच्या हृदयाचे ठोके वाढतात तर 6 महिन्यापर्यंतच्या बाळातील हार्मोन्सवर परिणाम होतात. थोड्या जास्त वयाच्या मुलांमध्ये निद्रानाशाची समस्याही निर्माण होते."

हॉर्मोनमध्ये बदल

मोबाईल फोन, इंटरनेटची सहज उपलब्धता आणि नोकरी करणारे व्यग्र आईवडील, हे आधुनिक जीवनाचे अंग बनले आहेत. पण मुलांतील हिंसक प्रवृत्ती यापूर्वीही दिसून आली आहे.

जेव्हा मोबाइल किंवा इंटरनेट फारसं प्रचलित नव्हतं, तेव्हाही मुलांमध्ये हिंस्र प्रवृत्ती दिसून यायची. मग त्याची कारणं काय असतील?

डॉ. बत्रा म्हणतात, "पौगंडावस्थेत हॉर्मोनमध्ये बदल होत असतात, शिवाय शरीराची वाढ वेगाने होत असते. त्या म्हणाल्या, "पौगंडावस्थेचं वय 11 ते 16 समजलं जात. या वयात मुलांच्या मेंदूचा विकास फार वेगाने होत असतो. तर्क लावणारा मेंदूचा लॉजिकल सेन्सचा भाग वेगाने विकसित होत असतो. पण भावना समजणारा इमोशनल सेन्सचा भाग विकसित झालेला असतो. अशा वेळी मुलं निर्णय घेताना भावनिक होऊन निर्णय घेतात. त्यामुळे या वयातील मुलांवर आजूबाजूच्या वातावरणाचा मोठा परिणाम होत असतो. त्यामुळं मुलं रागीट होणं किंवा हिंसक होणं दिसून येतं."

मुलांतील बदल कसे समजतील

डॉ. बत्रा पालकांना काही सल्ले देतात. ते म्हणतात ''शाळेतून मुलाबद्दल तक्रारी येत असतील, जसं की मुलं शिवीगाळ करत असतील, अभ्यासात लक्ष न लागणं, तर मुलाच्या वर्तणुकीत बदल होत आहेत हे समजावं. अशावेळी त्याच्यावर लक्ष देणं आवश्यक आहे."

"मुलाला बाहेर घेऊन जा, त्याच्याशी वेगवेगळे गेम्स खेळा, त्याच्याशी मनमोकळेपणाने बोला आणि ऐकाही. प्रत्येक वेळी त्याच्या चुका काढू नका. मुलांच्या जीवनात 11 ते 16 हे वय फार महत्त्वाचं असतं. या वयात त्यांच व्यक्तिमत्त्व घडत असतं आणि त्यामुळे त्यांच्यावर लक्ष देणं फार आवश्यक आहे."

हे वाचलं का?