You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बालमजुरीच्या विळख्यातून सुटलेल्या देवयानीने असा केला संघर्ष
- Author, अनघा पाठक आणि प्रमिला कृष्णन
- Role, बीबीसी प्रतिनिधी
"बाहेर अधिकारी पाहाणी करत होते आणि मी आतमध्ये लपून बसले होते. मीच नाही, माझ्यासारख्या अनेक मुली होत्या. आम्ही ज्या कपड्यांच्या फॅक्टरीत काम करत होतो त्या कंपनीच्या प्रशासनाने आम्हाला लपवून ठेवलं होतं. कारण आम्ही बालमजूर होतो."
18-वर्षांची देवयानी ती काम करत असलेल्या फॅक्टरीत धाड पडली तेव्हाची आठवण सांगत होती. ती तामिळनाडूतल्या इरोड जिल्ह्यातल्या कुडियेरी गावात राहाते. ती बालमजूर होती आणि तिला एका स्वयंसेवी संस्थेने बालमजुरीच्या विळख्यातून सोडवलं होतं.
सध्या ती मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा करते आहे.
"कपड्यांच्या फॅक्टरीत काम करणाऱ्यांना कामगारांना किमान वेतन मिळालं पाहिजे आणि गरीब घरातून येणाऱ्या मुलांना शिक्षणाच्या संधी मिळाल्या पाहिजेत," ती ठामपणे सांगते.
कापड उद्योग हा शेतीनंतर तामिळनाडूमधला सगळ्यात मोठा मुद्दा आहे. चांगले पैसे मिळतील या आशेने लोक या उद्योगात काम करायला येतात. "पण इथे काम करायला लागल्यानंतर त्यांच्या सगळ्या आशा लोप पावतात. कामगारांना इथं अतिशय कमी पगार मिळतो आणि सगळा नफा फक्त मालकच कमवतात," ती सांगते.
ती म्हणते की कपड्यांच्या या फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या कामगारांचं वेतन जर सरकारने ठरवलं तर कामगारांचं भलं होईल आणि सरकारलाही फॅक्टरी मालकांकडून कर स्वरूपात उत्पन्न मिळवता येईल.
गरिबीमुळे या भागातल्या अनेक मुलींची शाळा सुटते, शिक्षण अर्ध्यात थांबतं. "कुटुंब आधीच हवालदिल असतात, त्यांना खाणाऱ्या तोंडांच्या प्रमाणात काम करणारे हातही लागतात. मग या फॅक्टऱ्यांना कामगार पुरवणारे एजंट याचा फायदा घेतात," या भागात काम करणाऱ्या सामजिक कार्यकर्त्या जी. निर्मला सांगतात.
देवयानीची बालमजुरीतून सुटका निर्मला यांनीच पोलिसांच्या साहाय्याने केली होती.
"मग अशा गरीब घरातल्या मुलींना एजंट फॅक्टरीमध्ये काम देतात. त्यांना चांगला पगार आणि रोजच्या जेवण्याची सोय अशी आश्वासनं दिली जातात. पण त्यांना ना चांगला पगार मिळतो ना चांगलं अन्न. अशा मुलींना सतत काम करावं लागतं, एकही दिवस सुटी मिळत नाही, अगदी त्यांच्या घरी जाण्यासाठीही सुटी मिळत नाही," निर्मला सांगतात.
देवयानीने अशा एजंटांना शिक्षा व्हावी म्हणून सरकारला निवेदनही दिलं होतं. "मीच नाही, माझ्यासारख्या अनेक मुलींना लहान वयातच कपड्यांच्या फॅक्टरीमध्ये काम करण्यासाठी भरती करून घेतलं जातं. एक प्रकारची वेठबिगारीच म्हणा ना. अनेक मुलींच्या वाटेला माझ्याहूनही भयानक परिस्थिती आलेली आहे. काही जणींना तर 'तसल्या' कामासाठी जबरदस्तीने पाठवलं आहे," ती निःश्वास सोडते.
देवयानीनेही लहान वयातच कपड्यांच्या फॅक्टरीत काम करायला सुरुवात केली. घरच्या गरिबीमुळे तिची मोठी बहीण आणि ती, दोघी बालकामगार झाल्या.
"एका एजंटनी आम्हाला शोधलं आणि एका फॅक्टरीत कामाला लावलं. ते सहसा लहान मुली शोधतात म्हणजे कुटुंबाचं पोट भरण्यासाठी अशा मुली गरजेपेक्षा जास्त काम करतील. त्या एजंटने आम्हाला सोयीसुविधा, चांगला पगार अशी अनेक वचनं दिली, पण प्रत्यक्षात सगळं खोटं निघालं."
अशी उदाहरणं सर्रास असताना सरकार अशा बालमजुरीकडे डोळेझाक कसं करू शकतं, कोणावरच कशी कारवाई होत नाही?
सरकारचं, राजकीय पक्षांचं आणि या फॅक्टरी मालकांचं साटंलोटं आहे, असा आरोप इथले स्थानिक लोक करतात.
"निवडणुका लढवायला पैसा लागतो आणि पक्षांना हा पैसा या हे मालक पुरवतात. त्यामुळे कोणीही सत्तेत असलं तरी फॅक्टरी मालकांच्या हितसंबंधाना कोणी धक्का लावत नाही. त्यांना कोणतेही प्रश्न विचारले जात नाहीत. त्यांच्या अंतर्गत बाबींमध्ये सरकार हस्तक्षेप करत नाही," देवयानी सांगते.
कामगारांपैकी कोणी मृत्युमुखी पडलं तरी सरकार काही बोलत नाही, ती सांगते. या फॅक्टऱ्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांची, विशेषतः बालकामगार मुलींची परिस्थिती गंभीर आहे. "मी बाहेर पडले हे माझं नशीब, पण तिथे काम करणाऱ्यांचं आयुष्य अजूनही खडतर आहे," देवयानीच्या चेहऱ्यावर विषण्णता दिसते.
तिचंही आयुष्य सोप नाही. भल्या पहाटे तिचा दिवस सुरू होतो. घरातली कामं आटोपली की ती तिच्या आईसोबत केळीच्या बागांमध्ये काम करायला जाते. तिची आई या बागांमध्ये मजूर म्हणून काम करते. मग बस पकडून कॉलेजसाठी तालुक्याच्या ठिकाणी यायचं. संध्याकाळी घरी यायचं, आईला घरकामात मदत करायची आणि रात्री उशिरापर्यंत अभ्यास.
पण अशातही कधी कधी तिला केळीच्या बागांमधून फिरायला आवडत. नदीकिनारी तासनतास बसून पाण्यात पाय बुडवायला तिला आवडतात. तिथे तिचे सगळे ताण-तणाव पळून जातात आणि तिला शांत वाटतं.
इतर कोणत्याही 18 वर्षांच्या तरुणीपेक्षा देवयानी फार परिपक्व वाटते. तिच्या चेहऱ्यावर संघर्षांतून तावूनसुलाखून निघालेल्या माणसासारखे समंजस भाव दिसतात. तिची लढाई अजून संपली नाही पण ती निर्धाराने उभी आहे.
"बालकामगार म्हणून काम करताना मला प्रचंड भीती वाटायची. मला वाटायचं की माझं काही चुकलं तर एकतर मला इजा होणार किंवा मला कोणीतरी ओरडणार. ती मोठी मोठी मशीन दिवसभर गर्जायची, जणू काही एखादा राक्षस. मला वाटायचं दिवसभर न थांबता ही मशीन कसं काय काम करतात? नंतर समजलं, खरंतर मलाच मशीनसारखं राबवलं होतं. मीच नाही, माझ्यासारख्या अनेक मुली ज्या न थकता, न थांबता, न जेवता काम करत होत्या," ती सांगते.
एकेकाळी तिला मशिन्सची भीती वाटायची पण आता ती स्वतः मशिन्स बनवायला शिकतेय. "ज्या मशीनवर मी काम केलं ती कामगारांसाठी कधीच सुरक्षित नव्हती. म्हणूनच मला त्यांची भीती वाटायची. पण मी आता शिकतेय. एक दिवस मी जगातलं सगळ्यात सुरक्षित मशीन बनवेन. माझं स्वप्न आहे की एक अशी कंपनी काढायची जिथे मी लोकांना रोजगार देईन आणि कोणीही कमी पगारावर काम करणार नाही," ती उत्तरते.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)