You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
IndVsSA: ब्रेक्झिटमुळे तो मायदेशी परतला आणि झाला हुकमी खेळाडू
- Author, पराग फाटक
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
एखाद्या तांत्रिक वाटणाऱ्या नियमामुळे क्रिकेटचा फायदा होऊ शकतो का? कदाचित हो, कदाचित नाही, पण हा प्रश्न तुम्ही दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाला विचाराल तर त्याचं उत्तर होकारार्थीच देतील.
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या ट्वेन्टी20 वर्ल्डकप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेच्या रायली रुसोने खणखणीत शतकी खेळी साकारली. ब्रेक्झिटसारख्या व्यावसायिक वाटणाऱ्या घडामोडीमुळे आफ्रिकेचा फायदा झाला आहे. कसं ते समजून घेऊया.
शरीराने हट्टाकट्टा आणि डावखुरा शैलीदार बॅट्समन रुसो पहिल्यांदा U19 वर्ल्डकप स्पर्धेत चमकला. 2008-09 हंगामात ईगल्स उर्फ नाईट्स संघासाठी रुसोने सर्वाधिक रन्स केल्या. दक्षिण आफ्रिकेतल्या डोमेस्टिक क्रिकेटमध्ये 2007 मध्ये त्याने पदार्पण केलं होतं.
भात्यात विविधांगी फटकेरुपी अस्त्रं, फास्ट आणि स्पिन अशा दोन्ही स्वरुपाच्या बॉलिंगचा सामना करण्याची हातोटी, उत्तम फिल्डर यामुळे रुसोने अल्पावधीत नाव कमावलं. 2009-10 हंगामात रुसोने 57.61च्या सरासरीने 1261 रन्स कुटल्या. याच हंगामात रुसोने तडाखेबंद त्रिशतकी खेळीही रचली. डोमेस्टिक क्रिकेटमधल्या उत्तम कामगिरीचा फायदा म्हणजे आयपीएल स्पर्धेतल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाने रुसोला ताफ्यात समाविष्ट केलं.
2010 मध्ये दक्षिण आफ्रिका अ संघात त्याला समाविष्ट करण्यात आलं. या संघाने बांगलादेश आणि श्रीलंकेचा दौरा केला. सलग चार वर्ष डोमेस्टिक क्रिकेटमध्ये रुसोची बॅट तळपत राहिली पण आफ्रिकेच्या टेस्ट संघासाठी त्याचा विचार झाला नाही.
2011 वर्ल्डकप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा न्यूझीलंडविरुद्ध पराभव झाला. राष्ट्रीय संघात प्रवेश न मिळाल्याने नाराज रुसोने उपहासात्मक ट्वीट केलं. यामध्ये चोकर्स असा शब्द होता. रुसोचं हे ट्वीट अनेकांना रुचलं नाही. थोड्या वेळानंतर रुसोने हे ट्वीट डिलिटही केलं.
अखेर 2014 मध्ये रुसोने आफ्रिकेसाठी वनडे आणि ट्वेन्टी20 पदार्पण केलं. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये दिमाखदार कामगिरी नावावर असणाऱ्या रुसोला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मात्र तशी छाप उमटवता आली नाही. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये त्याचा खेळ पाहून रुसोला नेक्स्ट बिग थिंग म्हटलं जायचं. पण पदार्पण केल्यापासून सहा इनिंग्जपैकी चारमध्ये रुसोला भोपळाही फोडता आला नाही. पण दक्षिण आफ्रिकेच्या निवडसमितीने त्याच्यावर विश्वास ठेवला. 2014मध्ये ट्वेन्टी20 वर्ल्डकप संघातही त्याचा समावेश करण्यात आला.
जानेवारी 2015 मध्ये रुसोने पहिलंवहिलं आंतरराष्ट्रीय शतक वेस्टइंडिजविरुद्ध झळकावलं. 2015 वर्ल्डकप संघात त्याचं नाव होतं. या स्पर्धेत रुसो 6 सामने खेळला. त्यामध्ये त्याने .. रन्स केल्या. पुढच्या वर्षी भारतात झालेल्या ट्वेन्टी20 वर्ल्डकप स्पर्धेतही रुसो आफ्रिका संघाचा भाग होता. त्याला एकाच सामन्यात संधी मिळाली, त्यामध्ये तो शून्यावर आऊट झाला.
ऑक्टोबर 2016मध्ये रुसोने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 122 रन्सची सुरेख खेळी साकारली. मात्र त्यानंतर त्याने घेतलेल्या निर्णयाने सगळ्यांनाच धक्का बसला. संधी आणि पैसा या दोन्हीचा विचार करुन रुसोने कोलपॅक नियमाअंतर्गत इंग्लंडमध्ये हॅम्पशायरसाठी खेळण्याचा निर्णय घेतला. कोलपॅक स्वीकारल्यामुळे आफ्रिकेसाठी खेळण्याचा मार्ग बंद झाला.
रुसो आणि फास्ट बॉलर कायले अबॉट यांनी आफ्रिकेला रामराम करत कोलपॅक स्वीकारलं. दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट वर्तुळात याचे तीव्र पडसाद उमटले. रुसोने कारकीर्दीच्या सुरुवातीच्या सहा इनिंग्जमध्ये चारवेळा शून्यावर आऊट झाला पण आम्ही त्याच्यामागे ठामपणे उभे राहिलो. संघाचा महत्त्वाचा घटक असताना रुसोने घेतलेला निर्णय पटणारा नाही असं आफ्रिकेचे तत्कालीन कोच रसेल डोमिंगो म्हणाले होते.
कोलपॅक काय आहे?
युरोपियन युनियनचा भाग असलेल्या देशातील नागरिक या युनियनमधल्या देशांमध्ये परदेशी न ठरता काम करू शकतात. म्हणजेच जर्मनीचा एखादा खेळाडू फ्रान्समध्ये कोलपॅक करार स्वीकारून स्थानिक खेळाडू म्हणून खेळू शकतो.
पण खरी मेख वेगळीच आहे. युरोपियन युनियन असोसिएशन अग्रीमेंटचा भाग असणाऱ्या इतर देशांनाही हा करार लागू होतो. म्हणजे युरोपाच्या बाहेर असलेल्या, पण युनियनच्या कराराचा भाग असणाऱ्या देशातल्या खेळाडूंना या कोलपॅक कराराचा फायदा करून घेता येतो. उदाहरणार्थ दक्षिण अफ्रिका, झिबाब्वे आणि कॅरेबियन बेटांचा समूह.
कोलपॅक नाव कसं पडलं?
मारोस कोलपॅक हा स्लोव्हाकियाचा हँडबॉलपटू. पण तो जर्मनीतल्या एका क्लबरोबर खेळत होता. पण परदेशी खेळाडू म्हणून त्याला त्याचं कंत्राट गमवावं लागलं. युरोपिय युनियनच्या कायद्याप्रमाणे त्यानं क्लबच्या या निर्णयाला कोर्टात आव्हान दिलं.
त्यात त्यानं म्हटलं, "मी जर्मनीत राहातो आणि अशा देशाचा नागरिक आहे जो युरोपियन युनियन असोसिएशन अग्रीमेंटचा भाग आहे. अशावेळी जर्मन हँडबॉल लीगमध्ये माझा बिगर युरोपियन युनियन खेळाडू म्हणून विचार होऊ नये."
कोलपॅक ज्या क्लबचा सदस्य होता तिथे दोन बिगर युरोपियन युनियन सदस्य देशांचे खेळाडू होते. त्यामुळे कोलपॅकचं कंत्राट रद्द करण्यात आलं होतं. युरोपियन युनियन कोर्टाने 2003 मध्ये कोलपॅकच्या बाजूने निर्णय दिला.
तेव्हापासून युरोपियन युनियन आणि त्याच्याशी सलग्न देशातल्या खेळाडूंना सदस्य देशांदरम्यान करार करून स्थानिक खेळाडू म्हणून खेळण्याची मुभा मिळाली.
दक्षिण आफ्रिका आणि युरोपियन युनियन हे कोटोनोयू करारान्वये एकमेकांशी संलग्न आहेत. या करारात झिम्बाब्वे तसंच अनेक कॅरेबियन देशही सहभागी आहेत.
गेल्या पंधरा वर्षांत आफ्रिकेने चाळीसहून अधिक प्लेयर्स कोलपॅकच्या निमित्ताने गमावले. कोलपॅक कराराचे अधिक पैलू इथे जाणून घेऊ शकता.
रुसोने इंग्लंडमधल्या काऊंटी क्रिकेटमध्ये आपलं कौशल्य दाखवलं. हॅम्पशायर संघाचा तो अविभाज्य भाग झाला. कमीत कमी बॉलमध्ये जास्तीत जास्त रन्स करण्याचं त्याचं कौशल्य टिपलं गेलं. रुसो बांगलादेश प्रीमिअर लीग आणि पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत खेळू लागला. हॅम्पशायरशी करार संपल्यानंतर रुसो सॉमरसेटकडे गेला. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने सुरू केलेल्या द हंड्रेड स्पर्धेतही रुसो खेळला आहे.
ब्रेक्झिट आलं आणि...
इंग्लंडने युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे पडसाद जसे इंग्लंडच्या आर्थिक-सामाजिक आणि राजकीय क्षेत्रावर उमटले तसं क्रीडा क्षेत्रालाही फटका बसला. इंग्लंड आणि युरोपियन युनियन नातेसंबंध तुटल्यामुळे कोलपॅक करार अर्थहीन झाला. कोलपॅक लागू होणार नसल्यामुळे रुसोसारखे अनेक विदेशी खेळाडू जे स्थानिक खेळाडू म्हणून खेळत होते त्यांची नोंद विदेशी खेळाडू म्हणून होणार होती.
अंतिम अकरात ठराविक विदेशी खेळाडूच खेळू शकतात. यामुळे रुसोसारख्या असंख्य खेळाडूंसमोर संधीचाही प्रश्न निर्माण झाला. 1 जानेवारी 2021 पासून इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडे नोंद झालेल्या कोलपॅक खेळाडूंची नोंदणी रद्द होणार होती.
पैसेही नाही, करारही रद्द आणि संधीही नाही अशी विचित्र स्थिती निर्माण झाल्यामुळे कोलपॅक स्वीकारलेले असंख्य खेळाडू मायदेशी परतले. यापैकी एक नाव होतं रायली रुसो. पण ही घरवापसी झटपट आणि सोपी नव्हती. व्हिसा, इमिग्रेशन, कायदेकानू यांची पूर्तता केल्यानंतर रुसो मायदेशी परतला. दक्षिण आफ्रिकेसाठी खेळण्यास उपलब्ध असल्याचं स्पष्ट केलं.
तब्बल 6 वर्षांनंतर रुसोने दक्षिण आफ्रिकेची जर्सी परिधान केली. यंदा आफ्रिकेच्या इंग्लंड दौऱ्यातील ट्वेन्टी20 मालिकेसाठी रुसोचा संघात समावेश करण्यात आला. दुसऱ्याच लढतीत रुसोने नाबाद 96 रन्सची खेळी करत नांदीची वर्दी दिली.
भारत दौऱ्यासाठी त्याच्या नावाचा विचार झाला. 28 सप्टेंबरला तिरुवनंतपुरम इथे झालेल्या आणि 2 ऑक्टोबर रोजी गुवाहाटीला झालेल्या लढतीत रुसोला भोपळाही फोडता आला नाही. पण आफ्रिकेच्या संघव्यवस्थापनाने रुसोवरील विश्वास कायम राखला. रुसोने या संधीचं सोनं करत इंदूर इथे झालेल्या लढतीत नाबाद शतकी खेळी साकारली.
वर्ल्डकपसाठी निवडण्यात आलेल्या संघात रुसोचं नाव होतं. झिम्बाब्वेविरुद्ध रुसोला बॅटिंगच मिळाली नाही. बांगलादेशविरुद्ध मात्र रुसोने खणखणीत शतक केलं. ट्वेन्टी20 प्रकारात दोन सलग इनिंग्जमध्ये शतक झळकावणारा रुसो केवळ दुसरा बॅट्समन ठरला आहे. रुसोने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमच्या विक्रमाची बरोबरी केली.
Rilee Rossouw नावाचा उच्चारही थोडा वेगळा आहे. रायली रुसो असं त्याचं नाव आहे. रुसोकडे तूर्तास आयपीएलचं कंत्राट नाही पण गेल्या काही महिन्यातली त्याची कामगिरी लक्षात घेता डिसेंबर महिन्यात होणाऱ्या आयपीएल ऑक्शनमध्ये रुसोच्या नावासाठी मोठी बोली लागू शकते.
33वर्षीय रुसोची आफ्रिकेसाठी खेळण्याची उमेदीची वर्ष सरली आहेत. पण तो फिट आहे, कामगिरी चांगली होते आहे. त्यामुळे आणखी 4-5 वर्ष तरी रुसो आफ्रिकेच्या संघाचा भाग असू शकतो.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)