तिबेटमध्ये शेकडो लोक चीनविरोधात रस्त्यावर, 'अनेक तिबेटींच्या आत्महत्या'

फोटो स्रोत, TWITTER
तिबेटची राजधानी ल्हासामध्ये चीनविरोधात मोठ्या प्रमाणावर आंदोलनं सुरू असल्याचे व्हीडिओ व्हायरल होत आहेत.
ही आंदोलनं कोव्हीड लॉकडाऊनच्या विरोधात सुरू असल्याचं समोर आलंय.
सोशल मीडियावर असे बरेचसे व्हीडिओ व्हायरल झालेत. यात लोक शेकडोंच्या संख्येने रस्त्यावर उतरून विरोध करत आहेत. दरम्यान आंदोलक आणि पोलीस यांच्यात वाद झाल्याचं सुद्धा काही व्हीडिओंमध्ये दिसून येतंय.
कोरोनाचे रुग्ण आढळल्यापासून ल्हासामध्ये लॉकडाऊन लावण्यात आलं होतं. हे लॉकडाऊन लावून आज तीन महिने उलटलेत.
तिबेट हे चीनमधील सर्वांत सुरक्षित क्षेत्रांपैकी एक आहे.
बुधवारी सुरू झालेलं हे आंदोलन रात्री उशिरापर्यंत सुरूच असल्याचं सांगण्यात येतंय.
शेकडोंचा जमाव रस्त्यावर उतरला असून अधिकारी एका बाजूने त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत असल्याचं दृश्य एका व्हीडिओमध्ये दिसतंय.
लोकांनी शांतता राखावी तसंच परिस्थिती लक्षात घेऊन आपापल्या घराकडे परत जावं, असं आवाहन पोलीस करत आहेत.
दुसऱ्या एका व्हीडिओमध्ये, रात्रीच्या वेळी मोठ्या संख्येने लोक आंदोलन करताना दिसत आहेत. तर एक व्यक्ती यावर कमेंट पास करताना ऐकू येतेय.
ती व्यक्ती मॅनडरीन भाषेत म्हणते की, "बरेच दिवस झाले लोक आपापल्या घरात बंद आहेत. बरेचसे लोक पैसा कमावण्याच्या उद्देशाने इथं आले होते. जर त्यांना चीनच्या मुख्य भूमीत काम मिळालं असतं तर ते इथं आले नसते."
तर दुसर्या एका व्हीडिओमध्ये रस्त्यावर आंदोलन सुरू असल्याचं दिसतंय. लोकांच्या हातात बॅनर आहेत, ज्यावर "आम्हाला घरी जायचंय" असं लिहिलंय.
समोर आलेल्या व्हीडिओंची बीबीसीने पडताळणी केलेली नाही. सध्या हे व्हीडिओ सोशल मीडियावरून हटवण्यात आलेत. मात्र ट्विटरवर अजूनही हे व्हीडिओ सर्क्युलेट होत आहेत.
रेडिओ फ्री एशिया (आरएफए) या वृत्तसंस्थेने तिबेटी सूत्रांच्या हवाल्याने सांगितलंय की, निर्बंध हटवले नाही तर आंदोलनकर्ते स्वतःला पेटवून घेतील. पण अशाप्रकारचा इशारा नेमका कशासाठी देण्यात आलाय, याचा अर्थ काय हे अजून स्पष्ट झालेलं नाही.
ल्हासाच्या लोकांचं काय म्हणणं आहे?
आणखी एका सूत्राने सांगितल्याप्रमाणे, नागरिक आणि पोलिसांमधला संघर्ष अधिक हिंसक होण्याची भीतीही व्यक्त केली जातेय.

फोटो स्रोत, TWITTER
ल्हासात राहणाऱ्या एका व्यक्तीने बीबीसीशी बोलताना सांगितलं की, लॉकडाऊन असल्यामुळे तिला प्रदर्शनाच्या ठिकाणी जाता आलं नाही. मात्र तिच्या चॅट ग्रुपवर आलेले आंदोलनाचे व्हीडिओ तिने पाहिले असल्याचं ती सांगते.
नाव न जाहीर करण्याच्या अटीवर ती सांगते, "लोक घरात बंद आहेत. आणि आमचं जगणं मुश्किल झालंय. ल्हासामध्ये महागाई वाढलीय, घरमालकांनी भाड्यासाठी तगादा लावलाय. कामगारांना त्यांच्या गावाकडे जाण्यापासून रोखलं जातंय. आता त्यांच्याकडे कोणता मार्गच उरलेला नाहीये."
तिबेटमध्ये चीनविरोधात निदर्शनं
ल्हासामध्ये तीन महिन्यांपासून लॉकडाऊन आहे. झिरो कोव्हीड पॉलिसीमुळे लॉकडाऊन लावण्यात आलाय. त्यामुळे लोकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. अनेक लोक कामाच्या शोधात ल्हासामध्ये आले होते. चीनविरोधातील या निदर्शनात शेकडो लोकांनी सहभाग घेतला आहे.
"आम्ही परत कधी जाणार" हे लोकांना जाणून घ्यायचंय.
हान सांगतो की, तो मागच्या 80 दिवसांपासून या लॉकडाऊनमध्ये अडकलाय. त्याला त्याच्या घराच्या कंपाऊंडमध्ये तासनतास फिरण्याचं स्वातंत्र्य आहे , मात्र त्याला घराबाहेर जाण्याची परवानगी नाहीये.

फोटो स्रोत, Getty Images
तो म्हणतो की, "कोव्हीडची नेमकी आकडेवारी किती आहे हे आम्हाला कसं समजेल. लोकांना ऑक्सिजनची गरज असल्याचं रोज कानावर येतं. सरकारला हवी तेवढी आकडेवारी ते जाहीर करत असतील."
टिकटॉक सारख्या दोयिन या चायनीज प्लॅटफॉर्मवर बऱ्याच पोस्ट व्हायरल झाल्याचं बीबीसीनं पाहिलंय. यात बरेच लोक कोव्हीडच्या निर्बंधांमुळे ल्हासामध्ये अडकल्याचं सांगतायत.
एका पोस्टमध्ये म्हटलंय की, "ल्हासामध्ये लॉकडाऊन लागून आज 77 दिवस झाले. हे अजून किती दिवस चालणारे काहीच माहिती नाही. मला आशेचा किरण दिसत नाहीये. प्रवासी कामगारांसाठी हा अत्यंत कठीण काळ आहे, आणि हे तुम्ही समजू शकता."
दुसर्या पोस्टमध्ये म्हटलंय की, "तीन महिने झाले आमच्याकडे कोणतंही उत्पन्नाचं साधन नाहीये. खर्चात अजिबात कपात झालेली नाहीये. ल्हासात अडकलेले माझे मित्र अजून किती दिवस अशाच परिस्थितीत राहणार?"
ल्हासामध्ये आढळल्या कोव्हिडच्या केसेस
ल्हासामध्ये जे आंदोलन सुरूय त्यावर सरकारकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ल्हासामध्ये गुरुवार अखेरपर्यंत कोरोनाच्या आठ नव्या केसेसची नोंद झाली आहे.

फोटो स्रोत, NANCY BROWN/GETTY IMAGES
आंदोलनाचे बरेच फुटेज चायनीज सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाले होते. सरकारने ते काढून टाकले असले तरी "ल्हासामध्ये आज रात्री काय घडलं" हे दोयिनच्या सर्च लिस्टमध्ये टॉपला होतं.
ल्हासामध्ये ऑगस्ट महिन्यापासून लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊननंतर अनेक तिबेटींनी आत्महत्या केल्याचा दावा मानवाधिकार संघटनांनी केलाय.
चीनच्या झिरो कोविड पॉलिसीमुळे अनेकांचे प्राण वाचले असले तरी लोकांच्या जीवनावर आणि अर्थव्यवस्थेवरही त्याचा विपरीत परिणाम झालाय. लोक आता लॉकडाऊनला कंटाळलेत, लोकांच्या प्रवासावरही बंदी घालण्यात आली आहे.
2008चं आंदोलन
बुधवारी जे आंदोलन झालं ते 2008 च्या आंदोलनानंतरचं दुसरं मोठं आंदोलन असल्याचं म्हटलं जातंय. 2008च्या हिंसाचारात 19 जणांचा मृत्यू झाला होता.
त्यावेळी चिनी सुरक्षा दलांनी आंदोलन शमवण्यासाठी रानटी पद्धतीने कारवाई केल्याचे आरोप करण्यात आले.
त्या घटनेनंतर, परदेशी लोकांसाठी तिबेटचे दरवाजे बंद करण्यात आले. आणि हजारो चिनी सैनिक त्या भागात तैनात करण्यात आले.
तिबेट हा चीनचा स्वायत्त भाग असून स्वायत्त सरकारच्या काळात या भागाचा मोठ्या प्रमाणावर विकास झाल्याचं चीनचं म्हणणं आहे.
चीनने आजवर अनेकदा मानवी हक्कांचं उल्लंघन केलंय. सोबतच राजकीय आणि धार्मिक छळ केल्याचे आरोपही चीनवर झालेत. चीनने मात्र हे आरोप फेटाळून लावलेत.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








