भारतात चलनी नोटांचं डिझाईन कोण ठरवतं? त्यावरील फोटो बदलण्याचे अधिकार कुणाकडे आहेत?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, हर्षल आकुडे
- Role, बीबीसी मराठी
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारताच्या चलनी नोटांवर देवी लक्ष्मी आणि गणपतीच्या फोटोची मागणी केली होती. यानंतर देशभरातील अनेकांनी यासंदर्भात विविध मागण्या सुरू केल्याचं दिसून आली.
शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून ते विनायक सावरकर, बाळासाहेब ठाकरे, नरेंद्र मोदी यांचे फोटो नोटांवर लावण्यात यावेत, अशी मागणी राजकीय नेत्यांकडून केली जात होती.
सध्या भारताच्या नोटांवर महात्मा गांधी यांचा फोटो आहे. हा फोटो आहे तसाच ठेवत दुसऱ्या बाजूला गणपती आणि लक्ष्मी यांचा फोटो लावला जावा, असं अरविंद केजरीवाल म्हणाले होते.
जून महिन्यातही माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम आणि लेखक रविंद्रनाथ टागोर यांचे फोटो लावण्याची मागणी उपस्थित करण्यात आली होती. मात्र, महात्मा गांधी यांचा फोटो बदलण्याचा विचार नसल्याचं स्पष्टीकरण देऊन रिझर्व्ह बँकेने त्या चर्चेला पूर्णविराम दिला होता.
देशात नोटांवरील फोटो बदलण्याची मागणी सातत्याने होते. काही काळ यावरून राजकारण तापतं. नंतर काही दिवसांनी हा विषय मागे पडतो. पण खरंच नेते मागणी करतात, त्याप्रमाणे नोटांवरील फोटो बदलले जाऊ शकतात का?
जर ते शक्य असेल तर त्यासाठीची प्रक्रिया काय आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा निर्णय घेण्याचे अधिकार कुणाकडे आहेत, याबाबत सविस्तर माहिती या लेखात जाणून घेऊ -
भारतीय नोटांचा इतिहास
भारताच्या चलनी नोटा कोण छापतं आणि त्याची प्रक्रिया काय असते, याची माहिती घेण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम नोटांचा इतिहास समजून घेणं आवश्यक आहे.
सध्या भारतीय चलनी नोटांवर समोरील बाजूस महात्मा गांधी यांचा फोटो दिसतो. पण आपल्या नोटांवर गांधीजींचा फोटो पूर्वी नव्हता, असं तुम्हाला सांगितलं तर?
होय, भारताला 1947 साली स्वातंत्र्य मिळालं, पण नोटांवर गांधीजींचा फोटो येण्यास 1969 सालचा नोव्हेंबर महिना उजाडावा लागला.

फोटो स्रोत, RBI
देश स्वतंत्र झाल्यानंतर काही महिन्यांतच महात्मा गांधी यांची हत्या झाली. दरम्यान स्वतंत्र भारताच्या नव्या नोटांचं डिझाईन करण्याचं काम सुरू होतं.
रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरील माहितीनुसार, पहिल्यांदा भारत सरकारने 1949 साली एक रुपयाच्या नोटेचं नवीन डिझाईन तयार केलं. त्यावेळी नोटेवर पूर्वी असलेला ब्रिटनच्या राजाचा फोटो हटवून महात्मा गांधींचा फोटो लावण्यात येईल, असं मानलं जात होतं.
त्यानुसार, एक डिझाईन बनवण्यातही आलं होतं. पण, अखेरीस महात्मा गांधींच्या फोटोच्या ऐवजी चलनी नोटेवर अशोक स्तंभ असावा, यावर समितीचं एकमत झालं.

फोटो स्रोत, RBI
1950 मध्ये भारतीय प्रजासत्ताकात पहिल्यांदाच 2, 5, 10 आणि शंभर रुपयांच्या नोटा चलनात आणण्यात आल्या.
2, 5 आणि शंभरच्या नोटेच्या डिझाईनमध्ये फारसा फरक नव्हता, पण रंग वेगवेगळे होते. 10 रुपयांच्या नोटेच्या मागच्या बाजूला शिडाच्या होडीचा फोटो तसाच ठेवण्यात आला होता.
1953 मध्ये नवीन चलनी नोटांवर हिंदी प्रामुख्याने छापण्यात आली. रुपयाचं बहुवचन काय असेल, याविषयी चर्चा झाली आणि रुपयाचं बहुवचन 'रुपये' असेल असं ठरलं.

फोटो स्रोत, RBI
1954 मध्ये एक हजार, दोन हजार आणि 10 हजार रुपयांच्या नोटा पुन्हा छापण्यात आल्या. 1978 मध्ये या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या.
म्हणजे 1978 मध्ये एक हजार, पाच हजार आणि 10 हजार रुपयांची नोटबंदी झाली होती.
दोन आणि पाच रुपयांच्या लहान चलनी नोटांवर सिंह, हरीण अशा प्राण्यांचे फोटो छापण्यात आले होते. पण 1975 मध्ये 100 च्या नोटेवर कृषी स्वावलंबन आणि चहाच्या मळ्यातून पानं खुडतानाचे फोटो दिसू लागले.
नोटांवर महात्मा गांधी कधी आले?
महात्मा गांधींच्या 100 व्या जन्मदिवसाच्या निमित्ताने 1969 मध्ये पहिल्यांदा चलनी नोटेवर महात्मा गांधीजींचा फोटो छापण्यात आला. यामधले गांधीजी बसलेले होते आणि मागे सेवाग्राम आश्रम होता.

फोटो स्रोत, Rbi.org.in
20 रुपयांची नोट रिझर्व्ह बँकेने पहिल्यांदा 1972 मध्ये चलनात आणली आणि याच्या तीन वर्षांनंतर 1975 मध्ये 50 ची नोट चलनात आणण्यात आली.

फोटो स्रोत, Rbi.org.in
80च्या दशकात नवीन सीरीजच्या नोटा छापण्यात आल्या. जुने फोटो हटवून त्यांच्या जागी नवीन फोटो आले. यावेळी महात्मा गांधींचे फोटो नोटांवर नव्हते.
1 रुपयाच्या नोटेवर तेलाची विहीर, 2 रुपयांच्या नोटेवर विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी संबंधित आर्यभट्ट उपग्रहाचा फोटो होता. 5 रुपयांच्या नोटेवर ट्रॅक्टरने शेत नांगरणाऱ्या शेतकऱ्याचा फोटो होता.

फोटो स्रोत, RBI
याच सेटमध्ये 10 रुपयांच्या फोटोवर मोर आणि शालीमार बागेचं छायाचित्रं होतं. 20 रुपयांच्या नोटेवर कोणार्क मंदिर, शंभर रुपयांच्या नोटेवर हिराकूड धरण यांचं चित्र होतं.
दरम्यान, देशाच्या अर्थव्यवस्थेचा झपाट्याने विस्तार होत होता आणि लोकांची खरेदी क्षमता वाढत होती. म्हणून रिझर्व्ह बँकेने ऑक्टोबर 1987 मध्ये पहिल्यांदाच 500 च्या नोटा चलनात आणल्या.
यावर महात्मा गांधींचं छायाचित्र पुन्हा एकदा आलं. आज आपल्या नोटेवर आहे त्याप्रमाणे समोरील बाजूस गांधींजींचा फोटो या नोटेवर लावण्यात आला. शिवाय, अशोक स्तंभ वॉटरमार्कमध्ये होता. तर मागील बाजूल गांधीजींच्या दांडी यात्रेचा फोटो छापण्यात आला.

फोटो स्रोत, Rbi.org.in
सुरक्षिततेसाठीची नवीन फीचर्स असणाऱ्या महात्मा गांधी सीरीजच्या नोटा 1996 साली छापण्यात आल्या. यामध्ये वॉटरमार्कही बदलण्यात आले आणि अंध लोकांनाही नोटा ओळखता याव्यात यासाठीचे नवीन फीचर्स यामध्ये सामील करण्यात आले. पण महात्मा गांधीजींचा समोरून फोटो कायम राहिला.

फोटो स्रोत, Rbi.org.in
पुढे याच सिरीजमध्ये 1 हजार रुपयांची नोट 9 ऑक्टोबर 2000 रोजी चलनात आणण्यात आली.

फोटो स्रोत, Rbi.org.in
भारतीय चलनामध्ये सगळ्यांत मोठा बदल दुसऱ्यांदा नोव्हेंबर 2016 ला करण्यात आला. 8 नोव्हेंबर 2016 ला महात्मा गांधी सीरीजच्या 500 आणि 1000 रुपयांच्या सर्व नोटा अवैध घोषित करण्यात आल्या.

फोटो स्रोत, Rbi.org.in
यानंतर महात्मा गांधी (न्यू) सिरीजमधील नव्या नोटा प्रसिद्ध करण्यात आल्या. यामध्ये वेगवेगळ्या रंगांचा वापर करून नोटांचा आकारही बदलून काहीसा लहान करण्यात आला आहे. 2000 रुपयांची नवीन नोट याच सिरीजमध्ये आहे.
दरम्यान, 1 रुपयाची नवी नोट 2015 मध्ये आणण्यात आली होती. पण ती पुढे फारशी चलनात आली नाही. सध्या 2 रुपये, 5 रुपये या मूल्याच्या नोटा नव्याने बनवल्या जात नाहीत. मात्र या मूल्याच्या जुन्या नोटा अजूनही चलनात वैध मानल्या जातात.

फोटो स्रोत, Rbi.org.in
भारतात नाण्यांचा वापर फार पूर्वीपासून करण्यात येतो. पण स्वतंत्र भारतातील पहिलं नाणं 15 ऑगस्ट 1950 रोजी प्रसिद्ध करण्यात आलं. यामध्ये ब्रिटनच्या राजाचा शिक्का जाऊन त्याऐवजी अशोक स्तंभ आणि दोन कणिस यांचा वापर करण्यात आला.
सुरुवातीच्या काळात भारताची नाणी निकेल या धातूने बनवलेली असायची. कालांतराने त्यामध्ये विविध बदल होत गेले. गेल्या काही वर्षांत स्टेनलेस स्टील आणि कुप्रो-निकेल या धातूंची नाणी पाडली जातात.

फोटो स्रोत, Rbi.org.in
जून 2011 मध्ये 25 पैसे आणि खालील मूल्याची नाणी बंद करण्यात आली. सध्या केवळ 50 पैसे, 1 रुपये, 2 रुपये, 5 रुपये आणि 10 रुपये मूल्याची नाणी बाजारात उपलब्ध आहेत.
भारताच्या नोटा-नाणी कोण छापतं?
भारतात नोटा आणि नाणी यांच्याबाबतचे सर्व अधिकार रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि भारत सरकार यांच्याकडे आहेत.
रिझर्व्ह बँकेतील सेंट्रल बोर्ड हे चलनी नोटांसंदर्भातील सर्व कामकाज पाहतं. तर नाण्यांचं काम केंद्र सरकार स्वतः पाहतं.
जगभरातील इतर केंद्रीय बँकांप्रमाणेच नोटांची रचना किंवा डिझाईन बदलण्याचे अधिकारही रिझर्व्ह बँकेलाच देण्यात आले आहेत.
इंडियन एक्सप्रेसमधील बातमीनुसार, कोणत्याही नोटेच्या डिझाईनमध्ये काही बदल करावयाचे असल्यास RBI चं सेंट्रल बोर्ड आणि केंद्र सरकार या दोहोंकडून त्याला मंजुरी मिळणं आवश्यक असतं.
तर नाण्यातील डिझाईनमध्ये बदल करण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या अखत्यारित येतो.

फोटो स्रोत, Rbi.org.in
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा, 1934 मधील सेक्शन 22 मध्ये यासाठीची तरतूद करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँक सर्वप्रथम नोटेचं डिझाईन बनवतं. त्यानंतर ते RBI सेंट्रल बोर्डकडे पाठवलं जातं. पुढे हे डिझाईन अंतिम मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात येतं. अशी नोटेचं डिझाईन बनवण्याची प्रक्रिया आहे.
कॉईनेज कायदा, 2011 नुसार नाण्यांवर भारत सरकारचा संपूर्ण अधिकार आहे. भारत सरकार नाण्यांचं डिझाईन बनवून नाणी तयार करून घेतं. पुढे ते वितरणासाठी रिझर्व्ह बँकेकडेच पाठवण्यात येतात.
नोटा आणि नाणी यांचं व्यवस्थापन रिझर्व्ह बँकेतील डिपार्टमेंट ऑफ करन्सी मॅनेजमेंट (चलन व्यवस्थापन विभाग) हे विभाग करतं. रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी-गव्हर्नर यांच्या अखत्यारित हा विभाग आहे. सध्या टी. रबि शंकर यांच्याकडे या विभागाची जबाबदारी आहे.
RBI च्या वेबसाईटमधील माहितीनुसार, चलन व्यवस्थापन विभाग हा चलनी नोटा आणि नाण्यांच्या व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करतो. चलनी नोटांचं व्यवस्थापन, जसं की, डिझाईन, छपाई आणि चलनी नोटांचा वेळेवर पुरवठा आणि चलनी नोटा काढणं आणि नाण्यांचं वितरण आदी काम विभागामार्फत केलं जातं.
बनावट नोटांचं चलन नियंत्रणात ठेवणे, नोटा आणि नाण्यांची देवाणघेवाण सुलभ करून करन्सी चेस्ट आणि लोकांसाठी ग्राहक सेवेची उपलब्धता यावर लक्ष ठेवणे, हे चलन व्यवस्थापन विभागाचं काम असतं.

याशिवाय, नोटांच्या डिझाईनविषयक नियोजन, संशोधन करणे, नोटा आणि नाण्यांचा सुनियोजित पुरवठा करणे, रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार खराब झालेल्या नोटा परत घेऊन त्याची विल्हेवाट लावणे आदी कामंसुद्धा या विभागामार्फत केली जातात.
भारतात नोटांची छपाई नाशिक, देवास (मध्य प्रदेश), म्हैसूर (कर्नाटक) आणि सालबोनी (पश्चिम बंगाल) याठिकाणी होतं. तर नाण्यांच्या टांकसाळी मुंबई (महाराष्ट्र), अलीपूर (कोलकाता), सैफाबाद (हैदराबाद) आणि नोएडा (उत्तर प्रदेश) याठिकाणी आहेत.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








