RBI Fake Currency Alert : बनावट नोटा कशा ओळखायच्या?

फोटो स्रोत, RBI
- Author, ऋजुता लुकतुके
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
रिझर्व्ह बँकेनं आर्थिक वर्ष 2021-22 साठीचा आपला अहवाल प्रसिद्ध केला. त्यात एक गोष्ट काळजी करण्यासारखी होती.
गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी बनावट नोटा जप्त होण्याचं प्रमाण जवळ जवळ 11 टक्क्यांनी वाढलं. आणि यात सर्वाधिक म्हणजे 87 टक्के बनावट नोटा या 500 आणि 2000 रुपये मूल्याच्या होत्या. रिझर्व्ह बँकेच्या या आर्थिक अहवालाविषयीची बातमी तुम्ही इथं वाचू शकता.
अनेकदा अजाणतेपणाने आपणही या बनावट नोटांमध्ये व्यवहार करत असतो. कारण, एकतर आपण वेळे अभावी नोट निरखून बघत नाही. आणि अनेकदा बनावट नोट ओळखायची कशी हे आपल्याला माहीत नसतं.
रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर बनावट नोट म्हणजे काय इथपासून ते ती कशी ओळखायची याविषयीची सर्व माहिती सविस्तर देण्यात आलेली आहे.
वेबसाईटवर 'अर्थविषयक जागृती' या सदरात गेलात तर 'तुमची नोट ओळखा', या मथळ्याखाली 10 रुपयांपासून ते 2000 रुपयांपर्यंत सर्व नोटांचे रंग, माहिती, आकार आणि सुरक्षा विषयक निकष दिलेले आहेत.
रुपये 10, 20 आणि 50 साठी सुरक्षाविषयक 14 निकष आहेत. त्यावरून या नोटा खऱ्या की खोट्या हे तुम्ही ओळखू शकाल. त्यानंतर रुपये 100 साठी असे 15 निकष आहेत. तर रुपये 200, 500 आणि 2000 साठी वरच्या पंधरा निकषांबरोबरच अतिरिक्त दोन निकष आहेत.
बनावट नोट म्हणजे काय?
बनावट नोटेसाठीचा शास्त्रीय, कायदेशीर शब्द आहे - फेक इंडियन करन्सी नोट म्हणजे एफआयसीएन.
आणि एफआयसीएन म्हणजे 'सरकारच्या कायदेशीर मान्यतेशिवाय निर्माण केलेली चलनी नोट.' भारतात नोटा छापण्याचा परवाना मध्यवर्ती बँक म्हणून फक्त रिझर्व्ह बँकेला आहे. त्यांच्या व्यतिरिक्त इतर कुणीही छापलेली नोट चलनात वापरली जाऊ शकत नाही. अशी नोट छापणं किंवा ती वापरणं हे दोन्ही गुन्हे आहेत.

फोटो स्रोत, RBI
केंद्रीय तपास संस्था अर्थात सीआयडीच्या अहवालानुसार, बनावट नोटांची रॅकेट्स दोन प्रकारे चालवली जातात. एक म्हणजे देशांतर्गत टोळ्यांमार्फत छापल्या जाणाऱ्या बनावट नोटा. आणि दुसरं महत्त्वाचं रॅकेट हे परदेशातून दहशतवादी गटांकडून चालवलं जातं.
पहिल्या प्रकारात नोटांचे बनावट साचे बनवून नोटा छापल्या जातात. आणि अशी रॅकेट्स पकडणं तपास यंत्रणांसाठी त्या मानाने सोपं काम आहे. बँकेतही या नोटा सहज पकडल्या जातात.
पण, दुसऱ्या रॅकेट्समध्ये आंतरराष्ट्रीय टोळ्या सहभागी आहेत आणि त्यांचा हेतू देशाची अर्थव्यवस्था पोखरण्याचा आणि एक प्रकारे आर्थिक दहशतवाद माजवण्याचा आहे.
या टोळ्या नोटांची नक्कलही हुबेहूब करतात. भारतात पाकिस्तान, नेपाळ आणि बांगलादेशमधून अशा बनावट नोटा मोठ्या प्रमाणावर येतात. त्यामुळे अशा टोळ्या आणि त्यांनी तयार केलेल्या बनावट नोटा ओळखणं कठीण आहे.
म्हणूनच नागरिक म्हणून आपणही खासकरून मोठ्या मूल्याच्या नोटा हाताळताना सावध राहण्याची गरज आहे.
500 आणि 2000 ची बनावट नोट कशी ओळखाल?
सध्या भारतात रुपये 10, 20, 50, 100, 200, 500 आणि 2000 या मूल्यांच्या नोटा चलनात आहेत. यापैकी 2000 रुपयांच्या नोटांची नव्याने छपाई रिझर्व्ह बँकेनं काही वर्षांपूर्वी बंद केली आहे. आणि दहा रुपये मूल्याची नोट बंद करून नाणी सुरू करण्याचा विचार रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरनी वेळोवेळी बोलून दाखवला आहे.
आता चलनात असलेल्या सर्व नोटा या आधीच्या महात्मा गांधी मालिकेतीलच आहेत. म्हणजे या नोटांवर अशोकचक्राबरोबरच महात्मा गांधींचा दिसेल असा फोटो आहे. सर्वच नोटांची सुरक्षा विषयक वैशिष्ट्य रिझर्व्ह बँकेनं आपल्या वेबसाईटवर दिली आहेत. पण, आपण 500 आणि 2000 रुपयांच्या नोटेविषयी सविस्तर जाणून घेऊ. कारण, यात सर्वाधिक 17 निकष आहेत.

फोटो स्रोत, RBI
रिझर्व्ह बँकेनं नव्या पाचशेच्या नोटेची माहिती देताना म्हटलंय, "पाचशे रुपये मूल्याची नवीन चलनी नोट महात्मा गांधी (नव्या) मालिकेतील नोट असून ती जुन्या (चलनातून रद्द) SBN मालिकेतील पाचशेच्या नोटेपेक्षा रंग, आकार, संकल्पना, सुरक्षाविषयक वैशिष्ट्यांची जागा आणि डिझाईन यांच्या बाबतीत वेगळी आहे. तिचा आकार 66 मिमि ╳ 150 मिमि इतका आहे आणि रंग दगडी राखाडी आहे. तसंच नोटेवर पाठच्या बाजूला ठसठशीत आकारात भारतीय वारसा सांगणारी वास्तू लाल किल्ला छापलेला आहे."
तर दोन हजारच्या नोटेची माहिती देताना रिझर्व्ह बँकेनं म्हटलंय की, "रुपये दोन हजार मूल्याची नवी चलनी नोट ही महात्मा गांधी (नव्या) मालिकेतील नोट असून त्यावर रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची स्वाक्षरी आहे. नोटेच्या मागच्या बाजूला मंगळायन यानाचं चित्र आहे आणि नोटेचा मुख्य रंग मजेंडा आहे. या नोटेचा आकार 66 मिमि ╳ 166 मिमि इतका आहे."
ही माहितीही अनेकदा बनावट नोट ओळखण्यासाठी पुरे आहे. त्याव्यतिरिक्त सुरक्षाविषयक इतर 17 निकष कोणते आहेत ते आता पाहूया,
- नोटेवर पुढच्या बाजूला प्रकाश आरपार जाऊ शकेल असा छोटा भाग आहे. ज्या मूल्याची नोट आहे ते मूल्य आकड्यात लिहिल्यावर तयार होणाऱ्या आकाराचा हा पारदर्शी भाग आहे. उदा. 500च्या नोटेमध्ये 500च्या आकड्याच्या आकाराचा आणि 2000 च्या नोटेमध्ये आकड्यांमध्ये 2000 च्या आकाराचा आहे. नोटेवर कुठलाही प्रकाश पाडून तुम्ही हे पडताळून पाहू शकाल.
- डोळ्यासमोर 45 अंशांच्या कोनात नोट धरलीत तर त्यावर तुम्हाला त्या नोटेचं मूल्य दिसतं. हे वैशिष्ट्य नोटेच्या पुढच्या बाजूवर आहे.
- नोटेच्या पुढच्या बाजूवर देवनागरी भाषेत तिचं मूल्य लिहिलेलं आहे.
- नवीन मालिकेत महात्मा गांधी यांच्या प्रतिमेची जागा आणि तिचा आकार बदलेला आहे. पण, सर्व नोटांमध्ये तो सारखा आहे.
- भारतीय नोटांमध्ये ती खरी आहे हे कळावं म्हणून आणि तिचं मूल्य राखलं जावं म्हणून मध्ये चांदीचा एक धागा असतो. नोट वाकवली तर त्याचा हिरवा रंग बदलून निळा होतो.
- नव्या मालिकेतील नोटांमध्ये गव्हर्नर यांचा संदेश, त्यांची सही आणि रिझर्व्ह बँकेचं मानचिन्ह यांची जागा उजवीकडे सरकवली आहे.
- नोटेच्या पुढच्या भागावर एरवी मोकळ्या दिसणाऱ्या जागेवर महात्मा गांधी यांच्या चित्राचा वॉटरमार्क आहे. आणि इलेक्ट्रोटाईप वॉटरमार्कही आहे.
- नोटेच्या उजवीकडे तळाशी नोटेचा विशिष्ट क्रमांक छापलेला आहे आणि यातील आकड्यांचा आकार वाढत जाणारा आहे.
- नोटेच्या उजव्या बाजूला तळाशी नोटेचं लिहिलेलं मूल्य लिहिलेलं आहे. त्याचा रंग बदलणारा आहे. नोट हलवलीत तर तो हिरवा आणि निळा अशा दोन वेगळ्या रंगात दिसतो.
- नोटेच्या अगदी उजवीकडे तळाशी अशोकचक्र आहे.
- अशोकस्तंभाच्या बरोबर वर मधोमध दृष्टिहीन लोकांना नोट ओळखता यावी यासाठी चिन्ह आहे.
- दृष्टिहिनांच्या मदतीसाठी नोटेच्या उजव्या आणि डाव्या बाजूला पाच छोट्या रेषा आहेत.
- आता नोटेच्या मागच्या बाजूला डावीकडे नोटेचं छपाई वर्षं दिलेलं आहे. तर डाव्या बाजूला तळाशी स्वच्छ भारत मोहिमेचा लोगो आणि संदेश छापलेला आहे.
- मागच्या बाजूला मध्यभागी विविध भारतीय भाषांमध्ये नोटेचं लिखित मूल्य दिलेलं आहे.
- प्रत्येक नोटेच्या मागच्या बाजूला वेगवेगळं भारताच्या इतिहासाशी संबंधित एखादं चित्र आहे. जसं वर सांगितल्याप्रमाणे पाचशेच्या नोटेवर लाल किल्ला आणि दोन हजारच्या नोटेवर मंगळयानाचं चित्र आहे.
- मागच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात देवनागरी भाषेत नोटेचं मूल्य लिहिलेलं आहे.
यातले 14 निकष सर्व प्रकारच्या नोटांसाठी सारखेच आहेत. तर इतर 3 निकष दोनशे आणि त्यावरील मूल्यांच्या नोटांसाठी अतिरिक्त सुरक्षा निकष म्हणून लागू करण्यात आले आहेत.
बनावट नोटांविषयीचा कायदा काय सांगतो?
भारतात बनावट नोट बरोबर ठेवणं आणि तिचा प्रसार करणं हा गुन्हा आहे. अर्थात, कायद्याने याला अपवाद आहे तो नकळतपणे अशी नोट बाळगली असेल तर. भारतीय दंडसंहितेच्या कलम 489A, 489C, D आणि E अंतर्गत अशा व्यक्ती आणि टोळ्या यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते. आणि होणारी शिक्षा दंड किंवा/आणि किमान दहा वर्षांचा कारावास ते आजीवन कारावासापर्यंत होऊ शकते. सरकार
त्याचबरोबर दहशतवादी गटांकडून बनावट नोटा पसरवण्याचा धोका लक्षात घेऊन आता केंद्र सरकार मोठ्या प्रमाणावर बनावट नोटांचं रॅकेट चालवलं जात असेल तर त्याला अनलॉफूल अॅक्टिव्हिटीज् प्रिव्हेन्शन अॅक्ट म्हणजे युएपीए अंतर्गत आणण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी संसदेची मंजुरी लागेल.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








