'क्यूआर कोड स्कॅन केला आणि 50 हजार रुपये गेले', क्यूआर कोड वापरताना काय काळजी घ्याल?

क्यूआर कोड
    • Author, पूर्णिमा थम्मीरेड्डी
    • Role, बीबीसी तेलुगूसाठी

सतीश (बदललेलं नाव) यांनी आपला जुना सोफा सेट विकण्यासाठी एका वेबसाईटवर जाहिरात टाकली. त्यांनी फोटोसह इतर माहिती वेबसाईटवर टाकल्याच्या काही क्षणातच सतीश यांना एक मेसेज आला.

पलिकडच्या व्यक्तीने ते सोफा सेट विकत घेण्याची तयारी दर्शवली. तसंच खरेदीचे 25 हजार रुपये तत्काळ पाठवून देतो असं म्हणत त्याने सतीशचा व्हॉट्सअॅप नंबर विचारला.

पलिकडच्या व्यक्तीने सतीशला एक क्यूआर कोडचा फोटो पाठवला.

तुम्ही हे स्कॅन करा, तुम्हाला सोफ्याचे पैसे मिळतील, असं पलिकडच्या व्यक्तीने सांगितलं.

साधारणपणे, पैसे इतरांना पाठवण्यासाठी आपण क्यूआर कोड स्कॅनचा वापर करतो, हे सतीश यांना माहीत होतं.

पण पैसे स्वीकारण्यासाठीही क्यूआर कोड असतं का, या विचाराने सतीश संभ्रमात पडले.

त्यांनी आपली शंका पलिकडच्या व्यक्तीसमोर बोलूनही दाखवली. पण हो, हो, तुमचे पैसे स्वीकारण्यासाठीच तुम्हाला मी हे स्कॅन करायला सांगितलंय. पलिकडचा व्यक्ती अधाशीपणे बोलत होता.

अखेर संभ्रमावस्थेतच त्यांनी पलिकडच्या व्यक्तीने पाठवलेला क्यूआर कोड स्कॅन केला.

क्यूआर कोड

फोटो स्रोत, Getty Images

कोड स्कॅन करता क्षणी सतीश यांच्या मोबाईलवर एक मेसेज आला. "तुम्ही 25 हजार रुपये स्वीकारत आहात. त्यासाठी OTP सुद्धा मेसेजमध्ये आलेला होता."

सतीश यांच्या मनात पुन्हा शंकेची पाल चुकचुकली. पलिकडचा व्यक्ती मला पैसे पाठवतोय तर मला का OTP येईल, हा प्रश्न त्यांच्या मनात आला.

सतीश यांनी वेबसाईटवर आपल्या सोफा सेटची किंमत 25 हजार रुपये ठरवली होती. पलिकडचा व्यक्ती त्यात कोणतीही घासाघीस न करता आहे त्या किंमतीला जुना सोफा घेण्यास तयार झाला होता.

हे गिऱ्हाईक हातचं जाईल, या भीतीने सतीश यांनी अखेर तो OTP अॅपमध्ये टाकला.

घडायचं नव्हतं ते घडलं होतं. सतीश यांना 25 हजार रुपये मिळाले नाहीतच. पण त्यांच्या बँक अकाऊंटमधून 50 हजार रुपये ट्रान्सफर झाल्याचा मेसेजही यानंतर त्यांना आला. सतीश यांची फसवणूक झाली होती.

क्यूआर कोडच्या संदर्भात केल्या जाणाऱ्या फसवणुकींपैकी ही एक प्रकारची फसवणूक आहे. विशेषतः कोव्हिड लॉकडाऊनच्या काळात पैशांचे व्यवहार वेगाने ऑनलाईनच्या दिशेने जात होते. अनेकांना त्यावेळी ऑनलाईन व्यवहारांविषयी पुरेशी माहितीही नव्हती.

पण कोणताच मार्ग नसल्याने लोकांना ऑनलाईन व्यवहार करावे लागत. पुरेशी माहिती नसल्याच्या कारणामुळे अनेकांची या काळात मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचं दिसून आलं.

क्यूआर कोड काय आहे? ते का वापरात आलं?

क्यूआर चा अर्थ होतो क्विक रिस्पॉन्स (Quick Response).डेन्सो वेअर या जपानमधील ऑटोमोबाईल कंपनीने ते सर्वप्रथम 1994 साली बनवलं. सुरुवातीला हे मॅट्रिक्स बारकोडच्या स्वरुपात होतं. एका मशीनच्या माध्यमातून ते वाचता येत असे.

क्यूआर कोड

फोटो स्रोत, Getty Images

प्रत्येक वस्तूला विशिष्ट असं बारकोड देण्यात येई. त्यावेळी ती वस्तू कुठे आहे ते शोधण्यासाठी तसंच त्याची संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी ते बारकोड वापरलं जात असे.

उदाहरणार्थ, कंपनीच्या कारचं बारकोड स्कॅन केल्यानंतर ती कार कधी बनली, कोणत्या प्रक्रियेतून ती बनवण्यात आली, अशी संपूर्ण माहिती मशीनवर दिसत असे.

हा क्यूआर कोड कंपनीच्या वेबसाईटवरही देण्यात आला. त्यानंतर मात्र हे तंत्रज्ञान सर्वच क्षेत्रात लोकप्रिय ठरलं.

ऑटोमोबाईल उद्योगानंतर इतर अनेक उद्योगांमध्ये त्याचा वापर केला जाऊ लागला.

अत्यंत छोट्या स्वरुपात एखाद्या वस्तूची माहिती साठवून ठेवणं, हे या माध्यमातून शक्य होई. जाड-बारीक अशा उभ्या रेषांमध्ये त्या वस्तूचा संपूर्ण इतिहासच साठवता येत असल्याने हे तंत्रज्ञान सर्वत्र प्रचंड लोकप्रिय ठरलं.

जपानमध्ये तर चक्क स्मशानभूमीतही याचा वापर करण्यात आला होता. हे कोड स्कॅन केल्यानंतर सांत्वनपर संदेश मोबाईलवर पाहता येत असत.

क्यूआर कोडच्या मदतीने आर्थिक व्यवहार

क्यूआर कोडच्या मदतीने आपण आर्थिक व्यवहार करत असताना कोड स्कॅन करताच त्याच्या खात्याची माहिती आपल्या मोबाईलवर झळकते.

ते खातं त्या क्यूआर कोडशी जोडलेलं असतं. किंवा असे आर्थिक व्यवहार करणाऱ्या कंपन्यांमार्फत हे पेसे पाठवून देण्यात येत असतात.

क्यूआर कोड

फोटो स्रोत, Getty Images

खरं पाहायचं तर आर्थिक व्यवहार करत असताना बँक खात्याचा क्रमांक, IFSC कोडसह इतर आवश्यक माहिती गरजेची असते. पण ती एकदा का या क्यूआर कोडशी जोडली की ते स्कॅन करताच आपली संपू्र्ण माहिती समोर येते.

हे सोयीस्कर असल्यामुळे ऑनलाईन आर्थिक व्यवहारांसाठी लागणारा वेळ खूप कमी झाला.

डिजिटल साक्षरता कमी असलेल्या देशांमध्ये तर हे तंत्रज्ञान खूपच लोकप्रिय झालं. क्यू आर कोड तंत्रज्ञानामुळेच विविध प्रकारच्या पेमेंट अॅप्सचा वापर गेल्या काही दिवसांत वाढल्याचं सांगितलं जातं.

इंडियन एक्स्प्रेस वृत्तपत्राने सप्टेंबर 2021 मध्ये प्रसिद्ध केलेल्या एका बातमीनुसार, क्यूआर कोडसह यूपीआय तंत्रज्ञानात 100 टक्के वाढ पाहायला मिळाली.

केवळ मोठ्या व्यावसायिकांमध्ये नव्हे तर विशेषतः छोटे व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी क्यूआर कोड हे वरदान ठरलं.

छोट्या व्यावसायिकांना पूर्वी ऑनलाईन पद्धतीने पैसे स्वीकारण्यासाठी POS मशीन खरेदी करावं लागत असे. त्यामध्ये फक्त कार्डच्या माध्यमातून पैसे स्वीकारता येत असत.

कार्डसाठीचं मोठं POS मशीन 12 हजार रुपयांना तर छोटं मोबाईल POS मशीन 5 हजार रुपयांना मिळायचं. त्यामुळे अनेक छोट्या व्यावसायिकांना ते परवडायचं नाही.

पण, क्यूआर कोड तंत्रज्ञानाने त्यांचं आयुष्य बदलून गेलं.

एकदा का आपल्या बँक खात्याचं क्यूआर कोड आलं, ते प्रिंट करून दुकानाच्या दारात ते चिकटवून द्यायचं.

गिऱ्हाईक ते स्कॅन करून तत्काळ पैसे पाठवून देतात.

भविष्यात क्यूआर कोड बिलवर प्रिंट केलेल्या स्वरुपातही येऊ शकतील. आपल्या बिलावरचं क्यूआर कोड स्कॅन करून त्याचं पेमेंट तत्काळ करणं, यामुळे शक्य होईल.

क्यूआर कोड तंत्रज्ञानातील समस्या

नव्या तंत्रज्ञानांच्या माध्यमातून लोकांची सोय होत असली तरी त्यामध्ये सुरुवातीच्या काळात चुका आणि फसवणूक होण्याचाही धोका असतो.

क्यूआरकोडबाबतही असंच काहीसं घडलं.

अनेक सायबर गुन्ह्यांमध्ये क्यूआर कोडचा वापर करण्यात आल्याचं निदर्शनास आलं आहे.

सतीश यांच्या वरील उदारणाबाबत बोलायचं झालं तर अशा स्थितीत खालील दोन मुद्दे लक्षात घेणं आपल्याला महत्त्वाचं आहे.

सर्वात सोपा नियम म्हणजे, तुम्ही एखाद्या व्यक्तीला पैसे पाठवणार असता, त्यावेळीच फक्त OTP गरजेचा असतो.

  • तुमच्या खात्यात पैसे जमा होणार असतील, तर तुम्ही OTP क्रमांक देण्याची काहीएक गरज नसते.
  • तुम्हाला जर पैसे स्वीकारायचे असतील, त्यावेळी तुम्ही क्यूआरकोड स्कॅन करण्याची मुळीच गरज नाही.
  • तुम्हाला ज्यावेळी पैसे पाठवायचे आहेत, फक्त त्याचवेळी क्यूआर कोड स्कॅन करावा.

हे साधे मुद्दे लक्षात ठेवले तर ऑनलाईन व्यवहार करताना तुमची फसवणूक होण्याची शक्यता नाहीशी होते.

कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून क्यूआर कोडची लिंक घेताना ते कोड कधी आणि कुठे बनलं हेसुद्धा लक्षात घेणं महत्त्वाचं आहे.

लोकांची फसवणूक करण्यासाठी काही लोक आपल्या क्यूआर कोडची प्रिंटआऊट दुकानदाराच्या नकळत दुकानासमोर चिकटवतात, असंही निदर्शनास आलं आहे.

असे क्यूआर कोड स्कॅन करून पैसे पाठवलेल्या ग्राहकांचा पैसा दुकानदारापर्यंत पोहोचतच नाही. अशा प्रकारे या व्यवहारांमध्ये दोघांचीही फसवणूक होऊ शकते. त्यामुळे क्यूआर कोडच्या माध्यमातून पैसे पाठवताना किमान दोन वेळा माहितीची खात्री पटवणं आवश्यक ठरतं.

शिवाय आपल्या मोबाईलमध्ये मालवेअर सोडून क्यूआर कोडच्या माहितीमध्ये आदलाबदल केली जाऊ शकते. त्यामुळे अनोळखी लिंकवरून आलेले अॅप्स कधीही डाऊनलोड करू नयेत.

क्यूआर कोड वापरताना घ्यावयाची काळजी

क्यूआर कोड आता आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. पण त्याचा वापर करण्याचं योग्य तंत्र समजून घेतल्यास आपले ऑनलाईन व्यवहार आणखी सोयीस्कर होऊ शकतात. सायबर हल्लेखोर आपल्या निष्काळजीपणाचा वापर त्यांच्या फायद्यासाठी करून घेत असतात. यामुळे आपण काळजी घेतल्यास त्यांच्या फसवणुकीला आपण बळी पडणार नाही.

  • क्यूआर कोडवरून पैसे पाठवताना दुकानदारासोबत पुन्हा एकदा माहिती कन्फर्म करून घ्यावी.
  • पैसे पाठवल्यानंतर ते पैसे दुकानदाराशी बोलून त्याला ते पेसै मिळाल्याची खात्री करून घ्यावी.
  • अपेक्षित व्यक्तीपर्यंत हे पैसे पोहोचलेले नसल्यास बँक किंवा अॅपच्या कस्टमर केअरशी तत्काळ संपर्क साधावा.
  • कधी-कधी पैसे ट्रान्सफर होत असताना काही वेळ लागू शकतो. अशावेळी घाई न करता पैसे ट्रान्सफर होण्याची प्रतीक्षा करावी.
  • स्कॅन केल्यानंतर यामध्ये काही तरी विचित्र आहे, अशी शंका आली, तर व्यवहार तत्काळ थांबवावा.
  • साधारणपणे पेमेंट अॅप्समध्ये क्यूआर कोड स्कॅन करण्याची सोय असते. त्यामुळे शक्यतो तिथून स्कॅन करूनच तो संपूर्ण व्यवहार करावा.
  • क्यूआर कोड स्कॅनर अॅप डाऊनलोड करत असताना गुगल प्ले स्टोअरवर त्याची विश्वासार्हता आणि रेटिंग तपासूनच ते डाऊनलोड करावेत.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)