भारत-चीन सीमावाद : तिबेट चीनच्या ताब्यात कधी आणि कसा गेला?

फोटो स्रोत, Getty Images
लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये हिंसक झटापट झाली. तीन वर्षांपूर्वी डोकलाममध्येही दोन्ही देशांचे सैन्य एकमेकांसमोर उभे ठाकले होते. आज चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी नव्या आधुनिक समाजवादी तिबेटची निर्मिती करु असं विधान केलं आहे.
काही दिवसांपूर्वीच चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी तिबेट दौरा करुन भारत-चीन सीमेवरील बांधकामांची माहिती घेतली होती.
तिबेटविषयी बीजिंगमध्ये झालेल्या एका महत्त्वाच्या बैठकीत हे विधान केले आहे.
चीनची सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआने दिलेल्या माहितीनुसार, 'तिबेटमधील प्रत्येक तरुणाच्या मनात चीनबाबत प्रेमाचे बीज पेरण्यासाठी तिथल्या शाळांमध्ये राजकीय आणि वैचारिक शिक्षणावर अधिक भर देण्याची गरज आहे,' असे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी म्हटलंय.
शी जिनपिंग यांनी म्हटलं की, तिबेटमधील कम्युनिस्ट पक्षाची भूमिका मजबूत करण्याची आणि जातीय गटांना अधिक चांगल्या प्रकारे एकीकृत करण्याची गरज आहे.
"एकसंध, समृद्ध, सुसंस्कृत, समंजस आणि सुंदर, आधुनिक, समाजवादी तिबेट उभारण्याचा संकल्प केला पाहिजे," असंही त्यांनी म्हटलं.
"तिबेटी बौद्ध धर्माला समाजवाद आणि चिनी परिस्थितीशी जुळवून घेण्याचीही गरज होती." असं मत शी जिनपिंग यांनी बैठकीत मांडले.
"शी जिनपिंग यांनी बैठकीत दावा केल्याप्रमाणे तिबेटला चीनचा इतका फायदा झाला असता, तर चीनला फुटीरतावादाची भीती वाटली नसती आणि तिबेटच्या लोकांमध्ये शिक्षणाच्या माध्यमातून 'नवे राजकीय चैतन्य' भरण्याविषयीची भूमिका चीनने मांडली नसती," असं टीकाकारांचं म्हणणं आहे.

- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं टाळायची असतील तर मास्कचा असा होईल उपयोग
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?

भारत आणि चीन सीमावादाची व्याप्ती लडाख, डोकलाम, नथु ला पासून अरुणाचल प्रदेशच्या तवांग खोऱ्यापर्यंत आहे. अरुणाचल प्रदेशच्या तवांग प्रदेशावर चीनची नेहमी नजर असते. तवांगला ते तिबेटचा भाग मानतात. तिबेट आणि तवांगमध्ये सांस्कृतिक समानता आहे, असं चीन सांगत असतो.
तवांग बौद्ध धर्मियांचं प्रमुख धार्मिक क्षेत्रही आहे. तवांगमधील बौद्धमठाचा दौरा दलाई लामा यांनी केला होता, तेव्हा चीनने त्याला विरोध केला होता. इतकंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्यावर गेले होते, तेव्हाही चीनने औपचारिक विरोध केला होता.
तिबेटबरोबरच चीन अरुणाचल प्रदेशावरही दावा करतो. ते त्याला दक्षिण तिबेट म्हणतात. भारत आणि चीन यांच्यामध्ये 3488 किमी लांबीची सीमा आहे. तिबेटला चीनने 1951 साली आपल्या ताब्यात घेतले. 1938 साली मॅकमोहन सीमेचे रेखांकन झाले होते. त्यानुसार अरुणाचल प्रदेश हा भारताचा हिस्सा आहे.
तिबेटचा इतिहास
तिबेटमध्यै बौद्ध लोक मोठ्या संख्येने राहातात. याला 'पृथ्वीचं छप्पर' असंही म्हटलं जातं. तिबेटचा चीनमध्ये स्वायत्त प्रदेश असा दर्जा आहे. इथले लोक सध्या निर्वासित असणारे अध्यात्मिक नेते दलाई लामा यांच्याप्रति आपली निष्ठा ठेवतात.
मात्र चीनच्या मते या प्रदेशांवर गेली अनेक शतके त्यांचा ताबा आहे. दलाई लामा यांचे अनुयायी त्यांना ईश्वराचा जिवंत अवतार मानतात, तर चीन त्यांना फुटीरतावादी संकट मानतो.
तिबेटचा इतिहास सतत युद्ध आणि बदलता राहिला आहे. तिबेट कधी सार्वभौम राहिला आहे तर कधी त्यावर चीन आणि मंगोलियन राजवंशांची सत्ता राहिली आहे.

फोटो स्रोत, AFP
मात्र 1950 साली चीनने आपला पूर्ण ताबा तिबेटवर यावा यासाठी हजारो सैनिक तिथं पाठवले. तिबेटच्या काही भागांना स्वायत्त प्रदेश बनवले आणि बाकी प्रदेशांना इतर चिनी प्रदेशांना जोडून टाकले.
मात्र 1959मध्ये चीनविरोधातल्या एका बंडानंतर 14 वे दलाई लामा यांना तिबेट सोडून भारतात यावे लागले. इथं त्यांनी निर्वासित सरकाराची स्थापना केली. 60 आणि 70च्या दशकामध्ये चीनने सांस्कृतिक क्रांतीच्या नावाखाली तिबेटमधील बहुतांश बौद्ध विहारांना नष्ट केलं. या कालावधीत हजारो तिबेटींचे प्राण गेल्याचं सांगण्यात येतं.
चीन-तिबेट वाद कधीपासून सुरू झाला?
तिबेटच्या कायदेशीर हक्काबाबत तिबेट आणि चीन यांच्यामध्ये वाद आहे. चीनच्या मते तिबेट तेराव्या शतकाच्या मध्यापासून त्यांच्या देशाचा हिस्सा आहे, तर तिबेटी लोकांच्या मते ते एक स्वतंत्र राज्य होते. त्यावर चीनचा कधीच अधिकार नव्हता. मंगोल राजा कुबलाई खानाने युआन राजवंशाची स्थापना केली आणि तिबेटच नाही तर चीन, व्हिएतनाम आणि कोरियापर्यंत आपल्या राज्याचा विस्तार केला होता.

फोटो स्रोत, SEAN CHANG
17 व्या शतकात चीनच्या चिंग राजघराण्याशी तिबेटचे संबंध प्रस्थापित झाले. 260 वर्षांच्या संबंधांनंतर चिंग सैन्याने तिबेट ताब्यात घेतलं. परंतु तीन वर्षांच्या आतच तिबेटींनी त्यांना हाकलून लावलं. 1912मध्ये तेराव्या दलाई लामांनी तिबेटच्या स्वातंत्र्याची घोषणा केली. 1951 साली चिनी सैन्याने पुन्हा एकदा तिबेटवर ताबा मिळवला आणि तिबेटी शिष्टमंडळाबरोबर करार केला. यानुसार चीनला तिबेटचे अधिकार सोपवण्यात आले. त्यानंतर दलाई लामा भारतात आले आणि तेव्हापासून ते तिबेटच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष करत आहेत.
ल्हासा
जेव्हा 1949 साली चीनने तिबेटवर ताबा मिळवला तेव्हा त्यांनी तिबेटचा जगाशी संबंध पूर्णतः तोडून टाकला. तिबेटमध्ये चिनी सैन्य तैनात केलं गेलं. तिथल्या राजकीय व्यवस्थेत प्रवेश केला आणि त्यामुळेच दलाई लामांना भारतात यावं लागलं.
त्यानंतर तिबेटचं चिनीकरण सुरू करण्यात आलं. तिबेटची भाषा, संस्कृती, धर्म, परंपरांना लक्ष्य करण्यात आलं. कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीला तिबेट आणि तिबेटची राजधानी ल्हासाला जाण्याची परवानगी नव्हती. 1963मध्ये परदेशी नागरिकांना तिबेट प्रवेशाला मज्जाव करण्यात आला. 1971 साली तिबेटचे परदेशी नागरिकांसाठी दरवाजे उघडण्यात आले.
दलाई लामांची भूमिका
चीन आणि दलाई लामा यांचा इतिहास हाच चीन आणि तिबेटचा इतिहास आहे. 1409 साली सिखांपा यांनी जेलग विद्याशाखेची स्थापना केली. त्यामार्फत बौद्ध धर्माचा प्रचार केला जात असे.
ही जागा भारत आणि चीनच्यामध्ये होती. त्यालाच तिबेट म्हटलं जातं. याच विद्याशाखेचे गेंदुन द्रुप हे विद्यार्थी होते. ते नंतर पहिले दलाई लामा झाले. बौद्ध धर्माचे अनुयायी दलाई लामांना करुणेचे प्रतीक मानतात. त्यांचे समर्थक त्यांना नेताही मानतात. योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा दलाई लामा देत असतात. तिबेटी बौद्ध धर्मीय नेते संपूर्ण जगातील तिबेटी बौद्धांना मार्गदर्शन करतात. 1603 पासून बौद्ध आणि तिबेटी नेतृत्वात मतभेद आहेत. मांचू, मंगोल आणि ओईरातच्या गटांमध्ये इथल्या सत्तेसाठी लढाया होत आल्या आहेत. शेवटी पाचव्या दलाई लामांना तिबेटचं एकीकरण करता आलं. त्यानंतर तिबेट एक सांस्कृतिक संपन्न रुपाने दिसू लागला. तिबेटच्या एकीकरणानंतर इथं बौद्ध धर्मालाही संपन्न रुप आलं.

फोटो स्रोत, Getty Images
जेलग बौद्धांनी 14 व्या दलाई लामांनाही मान्यता दिली. दलाई लामांच्या निवड प्रक्रियेवरही वाद होतो. 13 व्या दलाई लामांनी 1912मध्ये तिबेटला स्वतंत्र घोषित केलं होतं. त्यानंतर जवळपास 40 वर्षांनी चीनने तिबेटवर आक्रमण केलं. तिबेटला या लढाईत पराभव पत्करावा लागला. काही वर्षांनी तिबेटी लोकांनी चिनी सरकारविरोधात विद्रोही भूमिका घेत स्वातंत्र्याची मागणी करायला सुरुवात केली.
मात्र या विद्रोहाला यश आलं नाही. दलाई लामांना आपण चीनच्या जाळ्यात फसू असं वाटलं म्हणून ते भारतात आले. दलाई लामांबरोबर अनेक तिबेटीही भारतात आले. ते 1959 साल होतं. दलाई लामांना भारतात आश्रय मिळणं चीनला आवडलं नाही. तेव्हा चीनमध्ये माओ त्से तुंग प्रमुख होते. दलाई लामा आणि चीनच्या कम्युनिस्ट सरकारमध्ये तणाव वाढत गेला. दलाई लामांना जगभरात सहानुभूती मिळाली पण त्यांना आजही निर्वासिताचं जिणं जगावं लागतंय.
तिबेट चीनचा भाग आहे का?
चीन आणि तिबेट संबंधांबाबत लोकांच्या मनात अनेकदा प्रश्न निर्माण होतात. तिबेट चीनचा भाग आहे का, चीनच्या नियंत्रणाखाली येण्यापूर्वी तिबेट कसा होता, त्यानंतर काय बदललं वगैरे. तिबेटच्या निर्वासित सरकारचं म्हणणं आहे, "तिबेटवर वेगवेगळ्या कालखंडात वेगळ्या परदेशी सत्तांचा प्रभाव होता यात शंका नाही.
मंगोल, नेपाळचे गुरखा, चीनचे मांचू घराणे, भारतावर राज्य करणारे ब्रिटीश या सर्वांनी तिबेटच्या इतिहासात थोडा काळ प्रवेश केला आहे. मात्र इतिहासात तिबेटने आपल्या शेजारी देशांना आपली ताकद दाखवून दिली होती. त्यात चीनचाही समावेश आहे.

फोटो स्रोत, PETE SOUZA / THE WHITE HOUSE
दुसऱ्या देशाचा प्रभाव नव्हता असा जगातला देश शोधणं कठीण आहे. तिबेटच्या बाबतीत बोलायचं झालं तर इतरांच्या तुलनेत परदेशी प्रभाव किंवा ढवळाढवळ अत्यंत मर्यादीत स्वरुपात होती."
तिबेट चीनचा भाग आहे हे भारतानं मान्य केलं तेव्हा…
जून 2003 मध्ये भारतानं तिबेट हा चीनचा अधिकृत हिस्सा असल्याचं मान्य केलं.
चीनचे राष्ट्राध्यक्ष जियांग जेमिन आणि भारताचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या भेटीनंतर भारतानं पहिल्यांदाच तिबेट हा चीनचा भाग असल्याचं मान्य केलं. दोन्ही देशांच्या संबंधांतील हे एक महत्त्वाचं पाऊल मानलं गेलं.
वाजपेयी आणि जियांग जेमिन भेटीनंतर चीनने भारताबरोबर सिक्कीम मार्गे व्यापार करण्याची अट मान्य केली. सिक्कीम भारताचा भाग आहे हे चीनने मान्य केले असा याचा अर्थ होतो.
तेव्हा भारतीय अधिकारी म्हणाले होते, की भारताने चीनचा हिस्सा असलेल्या पूर्ण तिबेटला मान्यता दिलेली नाही. तर ज्याला स्वायत्त तिबेट क्षेत्र म्हटलं जातं त्याला भारतानं मान्यता दिली आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








