टाटा-एअरबस : महाराष्ट्रातून गुजरातला गेलेल्या या प्रकल्पातून किती नोकऱ्या मिळाल्या असत्या?

Airbus C-295MW

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, एअरबस C-295MW

'फॉक्सकॉन'नंतर 'टाटा-एअरबस'चा मोठा प्रोजेक्ट गुजरातला गेलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 ऑक्टोबरला वडोदरामध्ये या प्रकल्पाचा शिलान्यास करणार आहेत. भारतीय वायूदलासाठी मालवाहू विमान बवनण्याचा हा प्रकल्प 21,935 कोटी रूपयांचा आहे.

नागपूरमधील मिहान परिसरात हा प्रकल्प बनवण्यात येणार असल्याची चर्चा होती. "हा प्रकल्प नागपूर येथे होईल," असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केलं होतं. एबीपी माझाच्या एका कार्यक्रमात त्यांनी याची माहिती दिली होती. 22 हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी केंद्राकडे पाठपुरावा केल्याचंही ते म्हणाले होते. परंतु आता हा प्रकल्प गुजरातला होणार आहे.

'फॉक्सकॉन'नंतर हा प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केलीये.

टाटा एअरबसचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यानं नागपूरमध्ये काँग्रेसनं मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याबाहेर आंदोलन केलं. पोलिसांनी आंदोलनास्थळी जाऊन काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड केली.

आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

आदित्य ठाकरे म्हणाले, "खोके सरकारने अजून एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर घालवला. टाटा एअरबस प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाऊ नये यासाठी प्रयत्न करा अशी मागणी मी जुलै महिन्यापासून सातत्याने करत होतो. पण पुन्हा तेच झालं. गेल्या तीन महिन्यांपासून सातत्याने महाराष्ट्रातले प्रकल्प बाहेर का जात आहेत?"

टाटा

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, "चार प्रकल्प महाराष्टातून निसटल्यावर उद्योगमंत्री उदय सामंत राजीनामा देणार का?" असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.

आदित्य ठाकरे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन एकनाथ शिंदे सरकारवर टीका केली आहे.

"या खोके सरकारवर कोणत्याही उद्योजकाचा विश्वास नाही. त्यामुळे प्रकल्प बाहेर जात आहेत," असा आरोप त्यांनी केला आहे. निवडणुकीस तयार नसलेले गुंतवणूक काय आणणार, असंही त्यांनी म्हटलं आहे.

टाटा

केंद्रात आणि राज्याच यांचंच सरकार आहे. मग असं का होतंय? गद्दार सरकार आल्यानंतर एक इंजीन फेल का झालं, असे सवालही आदित्य यांनी उपस्थित केले आहेत.

"कोरानकाळात राज्यात 6.30 लाख कोटींची गुंतवणूक आम्ही आणली. आमचं केंद्रासोबत चांगलं सुरू होतं. त्यावेळी डबल इंजीन काम करत होतं," असा दावासुद्धा आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

टाटा-एअरबसचा हा प्रकल्प काय आहे?

संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, या प्रकल्पांतर्गत भारतीय वायूदलासाठी C-295 MW जातीची 56 विमानं खरेदी करण्यात येणार आहेत.

संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते डॉ. अजय कुमार म्हणाले, "या प्रकल्पांतर्गत पूर्णत: तयार झालेली 16 विमानं वायूदलास देण्यात येतील. तर 40 विमानांचं उत्पादन आणि जोडणी टाटामार्फत भारतात केली जाईल."

एअरबस

खासगी विमान उत्पादन करणाऱ्या कंपनीद्वारे भारतीय वायूदलासाठी भारतात विमानं उत्पादन करणारा हा पहिलाच प्रकल्प असणार आहे. या प्रकल्पाची एकूण किंमत 21,935 कोटी रूपये आहे.

संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, पूर्ण तयार झालेली 16 विमानं सप्टेंबर 2023 पासून ऑगस्ट 2025 पर्यंत देण्यात येतील. तर, भारतात तयार झालेलं पहिलं विमान सप्टेंबर 2026 पर्यंत मिळेल.

C-295 MW विमानं कशी आहेत?

C-295 MW हे मालवाहू विमान आहे. याची मालवाहतूक करण्याची क्षमता 5 ते 10 टन आहे.

टाटा-एअरबस

संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय वायूदलाच्या जुन्या झालेल्या AVRO विमानांची जागा ही C-295 MW जातीची विमानं घेतील. या विमानला मागील बाजूस एक दरवाजा आहे. ज्याचा फायदा पॅराट्रूपर्स (सैन्य) आणि माल जलगदतीने उतरवण्यासाठी होणार आहे.

ही विमानं भारतीय वायूदलात सामील झाल्यामुळे हवाई दलाला खूप मोठा फायदा होणार असल्याचा सरकारचा दावा आहे.

संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, टाटा-एअरबसच्या या प्रकल्पात 13,400 डिटेल पार्ट, 4600 सब-असेंब्लिज आणि सात मोठ्या असेंब्लिजचं उत्पादन भारतात केलं जाणार आहे.

या प्रकल्पामुळे नोकऱ्या निर्माण होणार?

या प्रकल्पामुळे मोठ्या संख्येने नोकऱ्या निर्माण होतील असा केंद्र सरकारचा दावा आहे.

एअरबस

संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पासाठी टाटाने सात राज्यांमधील 125 छोट्या कंपन्या शोधल्या आहेत. ज्यांच्याकडून विमानासाठी विविध सुटे भाग घेण्यात येतील.

या प्रकल्पामुळे 600 तज्ज्ञांसाठी थेट नोकरी निर्माण होईल. तर 3000 नोकऱ्या अप्रत्यक्षरित्या तयार होणार आहेत. यासाठी एअरबसच्या स्पेनमधील कारखान्यात 240 इंजिनिअर्सना ट्रेन करण्यात येईल.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)