You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ऋषी सुनक यांची संपत्ती नेमकी किती आहे?
- Author, चंदन कुमार जजवाडे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान झालेले ऋषी सुनक हे या पदावर पोहोचणारे पहिले आशियाई वंशाचे व्यक्ती आहेत. ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत त्यांचा समावेश होतो. ब्रिटनमधल्या नावांजलेल्या सेलिब्रिटींपेक्षाही त्यांची संपत्ती जास्त आहे हे विशेष.
सुनक यांच्या संपत्तीचा अंदाज लावायचा झाल्यास, ब्रिटनच्या सर्वात श्रीमंत फुटबॉल प्लेयरच्या दहापट संपत्ती ऋषी सुनक यांच्याकडे आहे
'द संडे टाइम्स'च्या 2022 च्या सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत फुटबॉलपटू पॉल पोग्बा पुढं होता. त्याच्याकडे सुमारे 77 मिलियन पाऊंड इतकी संपत्ती असल्याचं सांगितलं गेलंय.
सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती या सुद्धा ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत पुढं आहेत. त्या भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आणि इन्फोसिस कंपनीचे संस्थापक एन आर नारायण मूर्ती यांच्या कन्या आहेत. ऋषी सुनक आणि अक्षता मूर्ती 2009 साली विवाहबद्ध झाले.
सुनक यांनी कॅलिफोर्नियाच्या स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमधून एमबीएचं शिक्षण पूर्ण केलंय. इथंच ते अक्षता मूर्ती यांना भेटले. 'द संडे टाइम्स'च्या 2022 मधील ब्रिटनच्या 250 सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अक्षता मूर्ती आणि ऋषी सुनक यांचा समावेश करण्यात आलाय.
त्यांच्याकडे एकूण 730 मिलियन पाउंड एवढी संपत्ती असून ते या यादीत 222 व्या क्रमांकावर आहेत.
'द संडे टाइम्स'च्या या यादीत उद्योगपती गोपीचंद हिंदुजा यांचं कुटुंब ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत कुटुंब असल्याचं म्हटलंय. त्यांच्याकडे 28.47 अब्ज पाऊंड इतकी संपत्ती आहे. तर भारतीय वंशाचे स्टील उद्योजक लक्ष्मी मित्तल सहाव्या क्रमांकावर आहे. त्यांच्याकडे एकूण 17 अब्ज पाऊंड इतकी संपत्ती आहे.
शाळेला दिलेल्या देणगीची चर्चा
द टाईम्स या वृत्तपत्रानुसार, ऋषी सुनक आजवर कधीच त्यांच्या संपत्तीबद्दल जाहीरपणे बोलले नाहीत. सुनक यांनी हल्ली हल्लीच त्यांच्या एका जुन्या शाळेला 1 लाख पाऊंडची देणगी दिली होती. त्यांच्या या देणगीच्या चर्चेने ते एकदमच प्रसिद्धीच्या झोतात आले. त्यानंतर त्यांच्या कमाईवरूनही राजकीय वर्तुळात चर्चा होऊ लागल्या.
सुनक आणि त्यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांच्या संपत्तीत अक्षता यांचा मोठा हिस्सा आहे. अक्षता मूर्ती यांना त्यांच्या वडिलांच्या कंपनीतला 0.9% शेअर मिळालाय. ही रक्कम 690 मिलियन पाऊंडच्या जवळपास आहे.
सुनक आणि त्यांच्या पत्नीजवळ बरीच घरं आहेत. यात ब्रिटनमध्ये तीन घरं आणि फ्लॅट्स तर अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये पॅसिफिक समुद्राच्या किनाऱ्यावर एक पेंटहाऊस आहे.
राजकारणात येण्यापूर्वी सुनक 2001 ते 2004 दरम्यान इन्व्हेस्टमेंट बँक गोल्डमन सॅक्समध्ये काम करायचे. त्यानंतर सुनक दो हेज फंडमध्ये पार्टनर झाले. यात त्यांना बराच नफा मिळाला.
ऋषी सुनक हे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री होते. आता पंतप्रधान पदी आल्यावर आपण देशाची अर्थव्यवस्था आणखीन मजबूत करू असं आश्वासन त्यांनी ब्रिटनच्या जनतेला दिलंय.
ऋषी सुनक हे 2015 पासून रिचमंड, यॉर्कशायर या मतदारसंघातून कंझर्वेटिव्ह पक्षाच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून येत आहेत. ते सध्या नॉर्दलर्टन शहराबाहेर कर्बी सिगस्टनमध्ये राहतात. त्यांचे वडील डॉक्टर होते आणि आई फार्मासिस्ट होती. सुनक हे भारतीय वंशाचे असून त्यांचे कुटुंबीय पूर्व आफ्रिकेतून ब्रिटनमध्ये आलेत.
ऋषी सुनक यांच्याबद्दल
- ऋषी सुनक हे इन्फोसिसचे संस्थापक एनआर नारायण मूर्ती यांचे जावई आहेत.
- त्यांच्या पत्नी अक्षता मूर्ती या ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत पुढं आहेत.
- सुनक हे बोरिस जॉन्सन यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री होते.
- सुनक हे 2015 पासून रिचमंड, यॉर्कशायर या मतदारसंघातून कंझर्वेटिव्ह पक्षाच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून येतायत.
- त्यांचे वडील डॉक्टर तर आई फार्मासिस्ट आहेत.
- सुनक हे भारतीय वंशाचे असून त्यांचे कुटुंबीय पूर्व आफ्रिकेतून ब्रिटनमध्ये आलेत.
- ऋषी सुनक यांनी विंचेस्टर कॉलेज या खासगी शाळेत शिक्षण घेतलं.
- पुढे ते ऑक्सफर्ड मध्ये शिकायला गेले.
- त्यानंतर त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून एमबीए केलं.
- राजकारणात येण्यापूर्वी सुनक इन्व्हेस्टमेंट बँक गोल्डमन सॅक्समध्ये काम करायचे.
सुनक यांचा जन्म 1980 साली साउथहॅम्टन, हॅम्पशायर इथं झाला. त्यांनी आपलं प्राथमिक शिक्षण विंचेस्टर कॉलेजमधील खासगी शाळेत पूर्ण केलं. त्यानंतर ऑक्सफर्ड मध्ये त्यांनी तत्त्वज्ञान, राजकारण आणि अर्थशास्त्राचा अभ्यास केला. ब्रिटनचे बरेच राजकारणी अशाच पद्धतीने पुढं आलेत.
पंतप्रधानांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर सुनक यांनी पक्षाच्या नेत्यांसमोर पहिलं भाषण दिलं. त्यांनी आपल्या भाषणात सर्वप्रथम लिझ ट्रस यांचे आभार मानले.
सुनक म्हणाले की, खासदारांनी मला जो पाठिंबा दिलाय त्यासाठी मला अतिशय नम्र आणि सन्मानित झाल्यासारखं वाटतंय.
सध्या ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेची घोडदौड बघता नव्या पंतप्रधानांना बऱ्याच कठीण आव्हानांना आणि प्रश्नांना सामोरं जावं लागणार आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)