हिंदू-मुसलमान जिथं अनेक वर्ष एकत्र राहिले त्या शहरात असं झालंच कसं?

    • Author, कविता पुरी
    • Role, बीबीसी न्यूज

एकमेकांशी जुळवून घेणारं, विविध समुदायांचं, एकत्र राहाणारं शहर म्हणून इंग्लंडमधल्या लेस्टर या शहराची ख्याती होती. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये इथं झालेल्या हिंदू आणि मुस्लीम गटांमधील तणावामुळे सर्वच जण आश्चर्यचकित झाले आहेत.

1951 च्या जनगणनेनुसार पाहायला गेलं तर तेव्हा इथं दक्षिण आशियाई वंशाचे फक्त 624 लोक राहात होते. परंतु 70 वर्षांत ही स्थिती अगदीच बदलून गेली आहे.

आता इंग्लंडमधील दक्षिण आशियाई वंशाचे सर्वाधिक लोक या शहरात राहातात.

दुसऱ्या महायुद्धानंतर भारतीय उपखंडातील लोक इथं येण्यास काही घटना कारणीभूत आहेत.

त्यातली पहिली म्हणजे 1947 साली ब्रिटिश इंडियाचं भारत आणि पाकिस्तान या दोन देशांत विभाजन झालं तेव्हाची आहे. या फाळणीत धार्मिक दंगल उसळली आणि त्यामुळे 10 ते 12 दशलक्ष लोक विस्थापित झाले.

त्यानंतर 1948 साली ब्रिटिश नागरिकत्व कायदा आला, त्यानुसार राष्ट्रकुल देशातील प्रत्येक नागरिकाला युनायटेड किंग्डममध्ये येण्याचा अधिकार देण्यात आला.

फाळणीत ज्या लोकांचं आयुष्य होरपळून निघालं होतं त्यापैकी काही लोकांनी युनायटेड किंग्डममध्ये आश्रय घेण्याचा मार्ग पत्करला.

1950 पासून या शहरात आधीच स्थायिक झालेल्या लोकांच्या नातलगांचं आणि संबंधित लोकांचं कथित साखळी स्थलांतर सुरू झालं.

लेस्टर राहाण्यासाठी आकर्षक शहर होतं. इथं भरभराट होणार होती आणि डनलॉप, इंपेरियल टाइपरायटर्स, मोठमोठ्या होजिअरी कंपन्यांत रोजगार मिळत होता.

सध्या लेस्टरच्या उत्तर आणि पूर्व भागात जिथं तणाव निर्माण झाला त्या स्पिनी हिल पार्क आणि बेलग्रेव्ह रस्त्याजवळ परवडतील अशा घरांमध्ये हे सुरुवातीचे स्थलांतरित राहू लागले होते.

यामध्ये बहुताश लोक पंजाब प्रांतातून आले होते. हा प्रांत सध्याच्या भारत आणि पाकिस्तानात पसरलेला आहे. त्यात शीख, हिंदू, मुस्लीम असे तिन्ही धर्मांचे लोक होते.

तिन्ही धर्मियांनी फाळणीच्या वेळेस धार्मिक द्वेषाचे परिणाम भोगले होते. हे लोक लेस्टरमध्ये बहुतांशवेळा शहरातील इंडियन वर्कर्स असोसिएशनद्वारे वंशभेदाशी संबंधित समस्या आणि समान वागणूक मिळावी यासाठी एकत्र काम करू लागले होते.

1960 च्या दशकाच्या सुरुवातीला इथं स्थायिक झालेल्या पुरुषांची बायकामुलंही इथं येऊ लागली. त्यानंतर या दशकाच्या मध्याला पूर्व अफ्रिकेतून विशेषतः गुजराती लोक येऊ लागले.

या लोकांवर पूर्व अफ्रिकेत वेगवेगळी बंधनं येऊ लागली होती. टांगानिका आणि झांजीबार एकत्र होऊन टांझानिया झालं तेव्हा आणि केनया स्वतंत्र झाला तेव्हा या पूर्वाश्रमीच्या ब्रिटिश वसाहतींमधील भारतीय लोकांवर बंधनं येऊ लागली होती.

यातील अनेक लोक लेस्टरमधल्या बेलग्रेव्ह, रशी मेड आणि मेल्टन रोड इथं स्थायिक झाले.

युगांडाचे पंतप्रधान इदी अमिन दादा यांनी 1972 साली आशियाई वंशाच्या लोकांना बाहेर काढलं तेव्हा लेस्टर नगरपरिषदेला नवे स्थलांतरित शहरात येतील याची कुणकुण लागली.

युनायटेड किंग्डममध्ये स्थायिक होण्याच्या हक्काचा वापर करुन हे लोक आपल्या शहरात येऊ शकतील याचा अंदाज घेऊन नगरपरिषदेने युगांडाच्या माध्यमांत या लोकांना हतोत्साहित करणऱ्या जाहिराती दिल्या.

मात्र तरिही पूर्व अफ्रिकेतील आशियाई वंशाचे लोक शहरात आलेच त्यांनी इथं रिटेल, होजिअरी आणि इतर उत्पादनांचे व्यवसाय सुरू केले.

1971 पर्यंत लेस्टरमध्ये 20,190 दक्षिण आशियाई वंशाचे लोक होते.

ब्रिटिश वसाहतींमधून येणाऱ्या लोकांविरोधात अतिउजव्या विचारांची नॅशनल फ्रंट तयार झाली.

एसओएएस विद्यापीठातील शीख आणि पंजाब अध्यासनाचे निवृत्त प्राध्यापक गुरपाल सिंह हे 1964 साली पंजाबातून आल्यावर पुढचं आयुष्यभर लेस्टर शहरात राहिलेले आहेत.

त्यांचे वडील इथल्या वॉकर्स क्रिस्प फॅक्टरीमध्ये व्यवस्थापक होते.

त्यांना ही वंशभेदाची लाट व्यवस्थित आठवते. शाळा असो वा शेजाऱ्यांकडून होणारा त्रास किंवा रस्त्यांवरुन होणारं नॅशनल फ्रंटच्या संचलन पाहिल्यामुळे होणारी दहशत त्यांना आठवते.

1976 च्या स्थानिक निवडणुकांत ही अतिउजवी लाट सर्वोच्च पातळीवर होती.

शहरात त्यांना एकूण मतांपैकी 18 टक्के मतं मिळाली होती. ते दशकभर ब्रिटिश हिंदू, मुस्लीम, शीखांनी एकत्रितरित्या वंशभेदाला तोंड दिलं.

काहीवेळा वंशभेदविरोधी लोक आणि नॅशनल फ्रंट यांच्यात संघर्ष होतानाही दिसे.

1976 साली कायद्यात बदल करून विविध वंशांतील संबंधांची जबाबदारी स्थानिक नगरपरिषदांवर टाकली गेली. 1980 पर्यंत ब्रिटिश दक्षिण आशियाई लोकांचं नगरपरिषदेत प्रतिनिधित्व सुरू झालं.

स्थानिक संस्था धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रोत्साहन देऊ लागली. याच दशकात लेस्टरमध्ये बेलग्रेव्हच्या गोल्डन माईलमध्ये दिवाळी, ईद, वैशाखी सण साजरे होऊ लागले.

ब्रिस्टॉल विद्यापीठात वंश आणि नागरिकत्व अध्यासनाचे संस्थापक संचालक प्रा. तारिक मदूद, लेस्टर हे एक 'मोठं आदर्श शहर' बनलं होतं असं सांगतात.

परंतु कधीकधी भारतीय उपखंडातील राजकारणाचे पडसाद शहराच्या रस्त्यांवर उमटत.

प्रा. सिंह सांगतात, 1984 साली इंदिरा गांधी यांनी सुवर्णमंदिरात लष्करी कारवाई केल्यानंतर लेस्टरमध्ये शीख उग्रवाद्यांनी ;अचानक हल्ले करण्याच्या घटना घडल्या होत्या.

2002 साली गुजरातमध्ये झालेल्या दंगलींनंतर इथं पीडितांच्या बाजूने निदर्शनं झाली पण हिंसा झाली नव्हती असं ते सांगतात.

"भारतीय वंशाच्या समुदायामध्ये भाजपा हा राष्ट्रीयत्वाचा ब्रँड असल्याची भावना आहे, लेस्टरच्या गुजराती हिंदू समुदायात भाजपा लोकप्रिय असल्याचं" सिंह सांगतात.

दक्षिण अफ्रिका, मालावीतून आलेले तसेच भारतातून दक्षिण आशियाई वंशाचे काही लोक हिंदू राष्ट्रवादाचे कट्टर राजकारण पाहात मोठे झालेले आहेत, असं ते सांगतात.

नवे स्थलांतरित, सामाजिक प्रश्न, बेकारी अशा अनेक प्रश्नांमध्ये विविध समुदायांमध्ये वेगळेपणाची भावना तयार होणं असे अनेक प्रश्न शहरात असल्याचं सिंह सांगतात.

लेस्टरमध्ये काही प्रकारची खदखद जरूर होती पण नुकत्याच झालेल्या घटनेइतका तणाव कधीच दिसला नव्हता. सर्वात धक्कादायक त्या हिंसेची तीव्रता होती असं ते म्हणतात.

हिंदू मुसलमानांनी सोशल मीडियावर दोन्ही बाजूंनी तणाव, रागाचं प्रदर्शन करणारे व्हीडिओ टाकले होते.

एका व्हीडिओत मास्कधारी माणूस हिंदुबहुल भागात जाऊन धार्मिक सजावट तोडताना आणि लोकांच्या खिडक्यांवर आपटताना दिसत आहे. दुसऱ्या व्हीडिओत एक माणूस हिंदू मंदिरावर चढून धार्मिक झेंडा काढत आहे व दुसरा झेंडा जाळत असल्याचं दिसतं.

तर मुस्लीमबहुल प्रदेशात पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्याचा व्हीडिओ फिरत होता. तसेच भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यानंतर जय श्रीरामच्या घोषणा दिल्या गेल्याचं दिसतं.

समाजमाध्यमांत खोटी माहिती, चुकीची माहिती जाणिवपूर्वक दिशाभूल करण्यासाठी पसरवली गेली. शहराबाहेरील घटकांचा यावर परिणाम दिसून येत होता.

लेस्टरमध्ये स्थलांतरितांचया अनेक लाटा आल्या पण आता झालेला संघर्ष धोक्याची घंटा वाजवणारा आहे. युनायटेड किंग्डममध्ये विशेषतः हिंदू-मुसलमानांतील अशी घटना दुर्मिळ आहे.

पिढ्यानपिढ्या इथं राहाणाऱ्या काही कुटुंबांना याचा धक्का बसला आहे.

बहुसांस्कृतिकवादाची मुळं जिथं फोफावली अशा शहरात ही घटना होणं निराशाजनक आहे असं प्रा. तारिक मदूद सांगतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)