सलमान रश्दी : मुंबईत जन्मलेल्या रश्दींच्या सॅटेनिक व्हर्सेसमुळे संपूर्ण जग असं ढवळून निघालं

सलमान रश्दी यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये हल्ला झाला. पाच दशकांच्या त्यांच्या कारकिर्दीत त्यांना अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत.

रश्दी यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 'Midnight's children' या त्यांच्या पुस्तकाला 1981 मध्ये बुकर पुरस्कार मिळाला होता.

मात्र 1988 मध्ये प्रसिद्ध झालेलं त्यांचं 'सॅटनिक व्हर्सेस' हे पुस्तक सगळ्यात वादग्रस्त ठरलं. या पुस्तकामुळे जागतिक पातळीवर एक अनपेक्षित वादळ आलं.

या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर 75 वर्षीय रश्दींना भूमिगत व्हावं लागलं होतं. ब्रिटिश पोलिसांनी त्यांना संरक्षण दिलं होतं.

इराण आणि ब्रिटनचे संबंध या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर बिघडले. मुस्लिम समाजाची या पुस्तकावरची प्रतिक्रिया म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याला धोका आहे अशी भूमिका अनेक पाश्चिमात्य लेखकांनी घेतली.

अयातुल्हलाह खोमानी यांनी रश्दी यांच्या हत्येचा फतवा काढला होता. खोमानी या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी इराणमधील सर्वोच्च नेते होते.

भारताला स्वातंत्र्य मिळणाच्या दोन महिने आधी मुंबईत रश्दी यांचा जन्म झाला. ते 14 वर्षांचे असताना त्यांना इंग्लंडमधील रग्बी स्कुल येथे पाठवण्यात आलं. नंतर त्यांनी केंब्रिज विद्यापीठात इतिहास या विषयात पदवी मिळवली.

ते ब्रिटिश नागरिक झाले आणि त्यांनी त्यांच्या मुस्लिम श्रद्धेचा त्याग केला. त्यांनी अभिनेता, जाहिरात क्षेत्रात लेखक म्हणून काम केलं आणि मग कादंबऱ्या लिहायला सुरुवात केली.

'ग्रिमस' या त्यांच्या पहिल्या पुस्तकाला फारशी प्रसिद्धी मिळाली नाही. मात्र समीक्षकांच्या मते, या लेखकामध्ये बरीच प्रतिभा असल्याचं लक्षात आलं.

त्यांचं दुसरं पुस्तक 'मिडनाईटस् चिल्ड्रन' लिहायला त्यांना पाच वर्षं लागली. त्यांच्या या पुस्तकाला 1981 मध्ये बुकर पुरस्कार मिळाला. या पुस्तकाची सर्व स्तरातून स्तुती झाली. या पुस्तकाच्या आतापर्यंत पाच लाख प्रती विकल्या गेल्या आहेत.

'मिडनाईट्स चिल्ड्रन' ही कादंबरी भारताबद्दल होती. 1983 मध्ये प्रकाशित झालेली तिसरी कादंबरी 'शेम' ही पाकिस्तानच्या स्थितीबद्दल होती. चार वर्षानंतर त्यांनी निकारगुवा मधील परिस्थितीवर 'द जग्वार स्माईल' ही कादंबरी लिहिली.

1988 साली त्यांचा जीव धोक्यात घालणारं सॅटनिक व्हर्सेस हे पुस्तक प्रकाशित झालं. थोडं कल्पनारम्य, आधुनिक विचाऱ्यांच्या या कादंबरीमुळे काही मुस्लीम लोक प्रचंड संतापले. हे पुस्तक ईशनिंदा करणारं आहे, असं मुस्लिमांना वाटलं.

या कादंबरीवर बंदी घालणारा भारत हा पहिला देश होता. पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर एका महिन्यातच या पुस्तकावर भारतात बंदी घालण्यात आली. त्यावेळी भारतात राजीव गांधींचं सरकार होतं.

मग पाकिस्ताननेही भारताचा कित्ता गिरवला आणि मग विविध मुस्लीम देशांनीही तेच केलं. नंतर दक्षिण आफ्रिकेनेही या पुस्तकावर बंदी घातली.

या पुस्तकाला 'व्हाईटब्रेड' पुरस्कार मिळाला. अनेकांनी पुस्तकाची स्तुतीही केली. मात्र पुस्तकाला विरोधही तितकाच वाढू लागला. दोन महिन्यानंतर लोक रस्त्यावर येऊन आंदोलन करू लागले.

काही मुस्लिमांना हे पुस्तक म्हणजे इस्लामचा अपमान वाटला. या पुस्तकातील वेश्यांना मोहम्मद पैगंबराच्या पत्नीचं नाव दिल्याने मुस्लिमांमध्ये संतापाची लाट उसळली.

जानेवारी 1989 मध्ये ब्रॅडफर्ड येथील मुस्लिमांनी या पुस्तकाच्या प्रती जाळल्या. WHSmith या दुकानाने हे पुस्तक ठेवणं बंद केलं. रश्दी यांनी मात्र ईशनिंदेच्या आरोपांचा इन्कार केला.

फेब्रुवारीमध्ये रश्दी यांच्या विरोधात झालेल्या दंगलीत अनेक लोक मारले गेले. तेहरानमधील ब्रिटिश राजदुतावर दगडफेक करण्यात आली आणि रश्दी यांची हत्या करणाऱ्या व्यक्तीला 3 बिलियन डॉलरचं बक्षीस जाहीर करण्यात आलं.

त्यावेळी युकेमध्ये काही मुस्लीम नेत्यांनी पुस्तकाचा पुनर्विचार करण्याची विनंती केली. काहींनी अयातुल्लाह यांना पाठिंबा दिला. तर अमेरिका, फ्रान्स, आणि इतर पाश्चिमात्य देशांनी या फतव्याचा निषेध केला.

रश्दींनी मुस्लीमांना झालेल्या त्रासाबद्दल त्यांची माफी मागितली. ते आणि त्यांची बायको पोलीस संरक्षणात राहू लागले. मात्र अयातुल्लाह यांच्यावर त्याचा काही परिणाम झाला नाही. त्यांनी पुन्हा एकदा फतवा काढला.

पेंग्विन प्रकाशनाच्या लंडनच्या ऑफिसमध्ये तोडफोड करण्यात आली, न्यूयॉर्क येथील कार्यालयाला धमकी देण्यात आली.

मात्र तरीही या कादंबरीची अफाट विक्री झाली. European Economic Community चा भाग असलेल्या देशांनी मुस्लिमांनी केलेल्या आंदोलनाचा निषेध केला. त्यांनी तेहरानमधून त्यांच्या राजदुताला परत बोलावलं.

मात्र फक्त रश्दी यांनाच धमकी दिली नाही तर या कादंबरीच्या जपानी भाषांतरकारांना सुद्धा धमक्या देण्यात आल्या. ही घटना 1991 मध्ये घडली.

हितोशी इग्राशी असं या भाषांतरकाराचं नाव होतं. ते सुकाबा विद्यापीठात प्राध्यापक होते. त्यांना विद्यापीठाच्या बाहेर भोसकण्यात आलं आणि त्यांच्या कार्यालयाबाहेर टाकून देण्यात आलं.

त्याच महिन्यात इटालियन भाषांतरकार इट्रोयि कॅप्रिओलो यांनाही त्यांच्या मिलान येथील अपार्टमेंटमध्ये भोसकण्यात आलं. ते या हल्ल्यातून बचावले.

इराणच्या सरकारने 1998 मध्ये रश्दी यांच्याविरुद्ध काढलेल्या फतव्याला पाठिंबा देणं बंद केलं.

नंतर रश्दींनी Haroun and Sea of stories (1990), Imaginary homelands (1991), East-West (1994), The Moor's last sigh (1995) आणि आणखी काही पुस्तकं लिहिली. Midnight's children या पुस्तकावर लंडनमध्ये एक नाटक रचण्यात आलं. त्यातही रश्दी यांनी सहभाग नोंदवला.

रश्दी यांची चार लग्नं झाली आहेत. त्यांना दोन मुलं आहेत. ते आता अमेरिकेत राहतात. त्यांना 2007 मध्ये नाईट पुरस्कार मिळाला.

2012 मध्ये त्यांनी सॅटनिक व्हर्सेस नंतर झालेल्या आंदोलनाच्या आठवणी पुस्तकरुपाने वाचकांसमोर आल्या.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)