ब्रिटनच्या लेस्टरमधील हिंदू-मुस्लीम दंगलीचं भारत कनेक्शन

    • Author, रेहा कंसारा आणि अब्दीरहीम सईद
    • Role, बीबीसी ट्रेन्डिंग आणि बीबीसी मॉनिटरिंग
  • काही लोक इथली तणावपूर्ण परिस्थिती आणि त्याला मिळणारा प्रतिसाद याला हिंदुत्ववादाशी जोडत आहेत. भारतीय हिंदुत्ववादी राजकारण लेस्टरमध्ये आणलं जात आहे, असं त्यांना वाटतं. पण बीबीबीला आतापर्यंत यासंदर्भात थेट संबंध जोडणारं काहीही मिळालेलं नाही.
  • अनेक व्हीडिओ आणि सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या गोष्टी पूर्णपणे खोट्या नाहीत. पण त्यामध्ये काटछाट करून शेअर करण्यात आलंय.
  • दोन लाख ट्वीटर अकाऊंट्सची शहानिशा बीबीसीने केली. यापैकी एक लाख अकाऊंट्सचं जिओ लोकेशन भारत होतं.
  • अनेक भारतीय अकाऊंट्सना कोणताही फोटो नव्हता. या महिन्याच्या सुरुवातीला ही अकाऊंट्स बनवण्यात आली.
  • या भारतीय अकाऊंट्सकडून #leicester #HindusUnderattack and #HindusUnderattackinUK अशा हॅशटॅगचा वापर करण्यात आला.

ब्रिटनमधल्या लेस्टर शहरात हिंदू आणि मुस्लीम धर्मीय लोकांदरम्यान झालेल्या हिंसाचारात 16 पोलीस कर्मचारी घायाळ झाले. भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅचदरम्यान हा तणाव उद्भवला.

हिंसाचारादरम्यान ऑनलाईन मिसइन्फॉर्मेशन म्हणजे चुकीच्या आणि खोटया माहितीची काय भूमिका होती? यामुळे दोन समाजांमध्ये तणाव वाढला का? हे समजून घेण्यासाठी बीबीसीने एक आठवडा लेस्टरसंदर्भात पसरवण्यात आलेल्या चुकीच्या बातम्या आणि दाव्यांची पडताळणी केली. हिंसाचार घडला त्यावेळी चुकीच्या माहितीने तेढ पसरवण्याचं काम केलं का, हे आम्ही पाहिलं.

टेंपररी चीफ कॉन्स्टेबल रॉब निक्सन यांनी बीबीसी टू वरील कार्यक्रम न्यूज नाईटमध्ये सांगितलं की लोकांनी जाणीवपूर्वक सोशल मीडियाचा वापर परिस्थिती चिघळवण्यासाठी केला.

मेयर सर पीटर सोल्सबी यांनीही हिंसाचार तसंच तणाव वाढण्यासाठी ऑनलाईन डिसइन्फॉर्मेशन कारणीभूत असल्याचं म्हटलं आहे. सोशल मीडियामुळे हे सगळं घडलं कारण स्थानिक पातळीवर असं काही घडण्याची शक्यता नाही.

आम्ही लेस्टरमधल्या लोकांशी तसंच अनेक नेत्यांशी बोललो. त्याकाळात खास पद्धतीच्या चुकीच्या माहितीचा उल्लेख केला. 17 आणि 18 सप्टेंबर रोजी हिंसाचारादरम्यान वातावरण आणखी खराब झालं.

चुकीची माहिती जी लोकांनी शेअर केली

'आज माझी 15 वर्षांची मुलगी किडनॅप होता होता वाचली. तीन लोकांनी तिला विचारलं की तू मुस्लीम आहेस का? तिने हो म्हटलं तर त्यापैकी एकाने तिला पकडण्याचा प्रयत्न केला.'

फेसबुकवर ही पोस्ट लिहिण्यात आली. पोस्ट लिहिणाऱ्याने त्या मुलीचे वडील असल्याचं म्हटलं होतं.

ही पोस्ट 13 सप्टेंबरला कम्युनिटी वर्कर माजिद फ्रीमेन यांनी ट्वीटरवर शेअर केली होती. त्याला शेकडो लाईक्स मिळाले. याप्रकरणात किडनॅपिंगचा कोणताही प्रयत्न झाला नव्हता, पण तसा दावा करण्यात आला होता.

लेस्टर पोलिसांनी दावे आणि पोस्ट्सची पडताळणी केली. यानंतर त्यांनी निवेदन जारी करत अशा प्रकारची कोणतीही घटना घडली नसल्याचं स्पष्ट झालं.

यानंतर माजिदने जुनं ट्वीट डिलीट केलं. हे ट्वीट कुटुंबीयांशी झालेल्या चर्चेनंतर केल्याचं माजीदने सांगितलं होतं. माजिदने पोलिसांचं निवेदन ट्वीट केलं. पण तोवर या ट्वीटने जे नुकसान व्हायचं ते झालं. किडनॅपिंगची खोटी बातमी अनेक ठिकाणी शेअर करण्यात आली.

व्हॉट्स अॅपवर फॉरवर्डेड मेनी टाईम्स असं या मेसेजवर लिहून येत होतं. अनेकांना हा मेसेज खराच वाटू लागला. हजारो फॉलोअर्स असणाऱ्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून या पोस्टचे स्क्रीनशॉट शेअर करण्यात आले. पोस्ट शेअर करताना हिंदू मुलाने किडनॅपिंगचा प्रयत्न केला असा दावाही करण्यात आला होता.

व्हॉट्स अॅपसारख्या खाजगी चॅटिंग अॅपवर नेमका हा मेसेज किती लोकांपर्यंत पोहोचला आहे हे कळू शकलेलं नाही. पब्लिक पोस्टसाठी आम्ही क्राऊटँगलचा वापर केला. किडनॅपिंगच प्रयत्न अशी पोस्ट आम्हाला सापडली नाही. पण प्रायव्हेट मेसेज ग्रुपमध्ये हा मेसेज पसरवला जात आहे.

या तणावाची तसंच हिंसाचाराची मुळं खूप खोलवर दडल्याचं स्पष्ट झालं आहे. अनेक वर्तमानपत्रांमध्ये छापून आलेल्या एका बातमीचा उल्लेख देण्यात येतो. 28 ऑगस्टला दुबईत भारत आणि पाकिस्तान यांच्यात अटीतटीची अशी मॅच झाली. या मॅचनंतर चुकीची माहिती पसरवणारे अनेक मेसेज पसरवण्यात आले. यातल्या पोस्ट-मेसेज पूर्णत: चुकीचे किंवा खोटे होते, असं म्हणता येणार नाही पण संदर्भ तोडून जोडून अनेक मेसेज पसरवण्यात आले.

मॅचआधी 22 मे रोजी पसरलं तणावाचं बीज

काहीतरी नक्कीच घडलं होतं. हिंसाचार करण्यात आणि पोलीस घटनास्थळी दाखल होण्याआधीच्या रात्रीचा एक व्हीडिओ समोर आला आहे. भारताची जर्सी परिधान केलेली काही माणसं पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत होते. मेल्टन रोडवर घोषणा देताना हे लोक दिसले.

सोशल मीडियावर दुसराच एक व्हीडिओ व्हायरल होऊ लागला. ते पाहून असं वाटलं की एका गटाने मुसलमानांवर हल्ला केला. नंतर हे समजलं की तो माणूस शीख समाजाचा होता.

लेस्टरमधल्या लोकांच्या म्हणण्यानुसार या घटनेचं बीज खूप आधी पडलं होतं. 22 मे रोजी घडलेल्या घटनेचा उल्लेख ते करतात. एक गट 19 वर्षांच्या मुस्लीम मुलाचा पाठलाग करताना दिसतात. हा गट हिंदू कट्टरतावाद्यांचा आहे, असं सोशल मीडियावर म्हटलं जात होतं. काहींनी हे सगळं हिंदुत्वाशी संलग्न असल्याचं म्हटलं. भारतातील कट्टरतावादी हिंदू राष्ट्रवादी विचारसरणीशी हे जोडण्यात आलं.

या व्हीडिओत काहीच दिसत नाही. धुसर आणि ब्लॅक अँड व्हाईट व्हीडिओ आहे. यात काही लोक पळत असल्याचं दिसतं आहे. व्हीडिओत कोण व्यक्ती आहे, कोणाची पार्श्वभूमी काय आहे हे समजणं कठीण आहे.

पोलीस म्हणाले पब्लिक ऑर्डर उल्लंघनाच्या अहवालाची ते चौकशी करत आहेत. याप्रकरणी 28 वर्षांच्या एका माणसाची चौकशी करण्यात येते आहे. व्हीडिओत पीडित व्यक्तीची धार्मिक ओळख स्पष्ट होऊ शकली नाही.

याप्रकरणाची चौकशी अजूनही सुरू आहे. सोशल मीडियावर याला धार्मिक रुप देऊन पोस्ट शेअर करण्यात येते आहे.

सोशल मीडियावर चुकीच्या पद्धतीने संदर्भ तोडून माहिती पसरवण्यात आली. याचा किती खोलवर परिणाम झाला आहे हे समजणं अवघड आहे.

लाखो भारतीय अकाऊंट्सने पसरवली खोटी माहिती

या तीन घटनांनी केवळ सोशल मीडियावरच्या नव्हे तर प्रत्यक्षातल्या घटनांनाही चालना मिळाली. 17 आणि 18 सप्टेंबरला लेस्टर शहरात तणाव पसरवण्यात या गोष्टी चर्चेत होत्या.

बीबीसी मॉनिटरिंगने कमर्शियल ट्वीटर अनॅलिसिस टूल ब्रँडवॉचचा उपयोग करून शहानिशा केली. लेस्टरसंदर्भात पाच लाख ट्वीट करण्यात आले. हे सगळे ट्वीट इंग्रजीत होते.

दोन लाख ट्वीट सँपल साईज बीबीसी मॉनिटरिंगने ग्राह्य धरला. यापैकी निम्म्याहून अधिक अकाऊंट म्हणजे सुमारे लाखभर अकाऊंटचं लोकेशन भारत असल्याचं स्पष्ट झालं.

भारतीय अकाऊंट्सनी #leicester #HindusUnderAttack #HindusUnderAttackinUK या हॅशटॅगचा वापर करण्यात आला.

अनेक अकाऊंट्सनी हॅशटॅग वापरताना संदर्भ सोडल्याचं लक्षात आलं आहे.

भारताचं लोकेशन दाखवणाऱ्या या प्रोफाईल्सना युझरचा फोटो नव्हता. यातली अनेक अकाऊंट्स महिनाभरापूर्वी उघडण्यात आली. ही अकाऊंट फेक आहेत याचा हा अगदीच ढळढळीत पुरावा आहे. एकच माणूस अनेक फेक अकाऊंटद्वारे नरेटिव्ह पसरवत आहे.

बीबीसीने हॅशटॅगच्या बरोबरीने शेअर करण्यात आलेल्या टॉप30 लिंकची शहानिशा केली. यापैकी 11 लेख न्यूज वेबसाईट ऑपइंडिया डॉट कॉमचे आहेत. ही वेबसाईट कशासाठी आहे हे लिहिण्यात आलंय- ब्रिंगिंग द राइट साइड ऑफ इंडिया टू यू.

खोट्या अकाऊंट्ससह ऑपइंडियाच्या बातम्यांच्या लिंक्स शेअर करण्यात आल्या. ज्यांचे हजारो फॉलोअर्स आहेत.

ऑपइंडियाचा एक लेख आहे ज्यामध्ये ब्रिटिनचा थिंकटॅंक 'हेन्री जॅक्सन सोसायटी'चे संशोधक शॉरलेट लिटिलवुडने जीबी न्यूजला दिलेल्या मुलाखतीचा संदर्भ आहे. अनेक हिंदू कुटुंब मुसलमानांच्या हिंसाचाराच्या भीतीमुळे लेस्टर सोडून जात आहेत. हा लेख 2500 रीट्वीट करण्यात आलं आहे.

लेस्टर पोलिसांच्या म्हणण्यानुसार अशा पद्धतीने हिंदू कुटुंबं लेस्टर सोडून जात असल्याची कोणताही माहिती मिळालेली नाही.

17 आणि 18 सप्टेंबर आधी मोठ्या प्रमाणात ट्वीट समोर येत नव्हते.

ब्रिटनमध्ये व्हायरल होत असलेल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला की बसेस भरून हिंदू कार्यकर्ते लेस्टरला पोहोचत आहेत. जेणेकरून वातावरण तणावपूर्ण होईल.

23 सप्टेंबरपर्यंत पोलिसांनी 47 लोकांना अटक केली आहे. यापैकी 8 जणांना आरोपी करण्यात आलं आहे. 47 पैकी 36जण लेस्टरचेच राहणारे आहेत. 8 बर्मिंघमचेच आहेत. दोनजण लंडनचे आहेत. आरोपी करण्यात आलेले आठहीजण लेस्टरचेच आहेत.

खोटी माहिती- बसमधून लंडनहून लेस्टरला गेले हिंदू

18 सप्टेंबर रोजी एक व्हीडिओ ट्विटरवर आला. त्यात लंडनमधील एका मंदिरासमोर एक बस उभी असलेली दिसत आहे.

या व्हीडिओत एक आवाजही ऐकू येत आहे ज्यात असं म्हटलं जातंय की ही बस लेस्टरला परत जात आहे.

दुसऱ्या दिवशी बसच्या मालकाने इंस्टाग्राम वर एक व्हीडिओ शेअर केला आहे त्यात त्यांनी म्हटलंय की अनेक जण मला फोन करत आहे आणि धमक्या देत आहे. कुठलेच कारण नसताना मला शिव्या देत आहेत.

त्यांनी सांगितलं की गेल्या दोन महिन्यांपासून त्यांची कुठलीही बस लेस्टरला गेली नाही. पुरावा म्हणून जीपीएस रेकॉर्ड सादर केले. ज्यात असं दिसत आहे की व्हीडिओत दिसणारी बस 17-18 सप्टेंबर रोजी इंग्लंडमधील दुसऱ्या भागात होती.

बर्मिंघममध्ये 19 सप्टेंबरला रोजी आग लागण्याच्या खोट्या कारणांचा प्रसार करण्यात आला. ट्विटरवर फॉरवर्ड करण्यात आलेल्या व्हीडिओला कुठल्याही पुराव्याविना असं सांगण्यात आलं की इस्लामिक कट्टरपंथियांमुळे ही आग पसरली आहे.

पण वेस्ट मिडलॅंड्स फायर सर्व्हिसने आग लागण्याचं कारण शोधलं असता समजलं की ही दुर्घटना कचऱ्याला आग लागल्यामुळे पसरली आहे.

अर्थात हा दावा केला जाऊ शकत नाही की लेस्टर घटनेनंतर सोशल मीडियावर पसरलेल्या सर्व पोस्ट या खोट्या आहेत.

मुस्लीम बहुल भागात जय श्रीरामच्या घोषणा

लेस्टर घटनेनंतर जे व्हीडिओ सर्वाधिक व्हायरल झाले आहेत त्यात काही चेहरा झाकलेले लोक जय श्रीरामच्या घोषणा देत ग्रीन लेन रोड वर निदर्शनं करत आहेत. हा भाग मुस्लीम बहुल म्हणून ओळखला जातो.

एक अजून व्हीडिओ पसरवण्यात आला ज्यात असं म्हटलं गेलंय की मुस्लीम व्यक्तीने मंदिरावरील भगवा झेंडा उतरवला.

शहरातील बेलग्रेव्ह रोडवरील एका मंदिरावरील झेंडा 17 सप्टेंबर रोजी उतरवण्यात आला होता, पोलीस अद्याप याबाबत चौकशी करत आहेत. पण झेंडा नेमका कुणी उतरवला हे माहीत नाही.

सोशल मीडियावरील खोट्या बातम्यांमुळे तणावात वाढ झाल्याचं म्हटलं जात आहे.

गेल्या अनेक दशकांपासून दक्षिण आशियाई लोक भारत आणि पूर्व आफ्रिकेतून येऊन ब्रिटनमध्ये स्थायिक झाले आहेत. त्यांनी आपल्या अधिकारांसाठी एकत्रितपणे संघर्ष केला आहे.

काही लोक या तणावाला आणि त्यावरील प्रतिक्रियेला हिंदुत्ववादी विचारधारेशी जोडत आहेत. त्यांचं म्हणणे आहे की भारतीय राजकारणाचा शिरकाव लेस्टरमध्ये झाला आहे. पण बीबीसीला अद्याप कुठल्याही समूहाबाबत अशी माहिती उपलब्ध झालेली नाही.

पण हे सांगणे कठीण आहे की या हिंसेमागचे कारण काय आहे. सोशल मीडियावर लोकांचे ध्रुवीकरण करण्यात आल्याचं मात्र स्पष्ट होत आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)