चीन : शि जिनपिंग सलग तिसऱ्यांदा चीनच्या राष्ट्राध्यक्षपदी

फोटो स्रोत, Getty Images
चीनचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष शि जिनपिंग यांची पुन्हा एकदा पदावर निवड झाली आहे. यामुळे सलग तिसऱ्यांदा जिनपिंग हे चीनच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाले आहेत.
कम्युनिस्ट पक्षाच्या अधिवेशनात जिनपिंग यांना पुन्हा एकदा पक्षाच्या महासचिवपदी निवडण्यात आलं.
शि जिनपिंग हे गेल्या दहा वर्षांपासून चीनचे राष्ट्राध्यक्ष म्हणून काम पाहतात. त्यांनी सलग तिसऱ्यांदा सत्ता हस्तगत करून विक्रमाची नोंद केली आहे. या निमित्ताने जिनपिंग यांनी माओ त्से तुंग यांची बरोबरी केली.
चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक माओ त्से तुंग यांच्या निधनानंतर कोणत्याही नेत्याला सलग तिसऱ्यांदा विजय मिळवता आला नव्हता.
शि जिनपिंग यांनी राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा निवड होताच नव्या स्थायी समितीची घोषणा केली. त्यांच्या नव्या समितीत ली कियांग, वांग ह्यूकिंग, कोई की, डिंग शेशियांग आणि ली शी यांचा समावेश आहे.
यामध्ये ली कियांग यांची पंतप्रधानपदी निवड करण्यात आली. ली केकियांग यांच्या जागी त्यांच्या नावाला पसंती मिळाली आहे. पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर शि जिनपिंग म्हणाले, माझ्यावर विश्वास ठेवल्याबाबत सर्वांचे धन्यवाद.
आतापर्यंत आपण खूप काही मिळवलं आहे. आता आपण चीन प्रत्येक बाबतीत एक आधुनिक समाजवादी देश बनवण्यासाठी प्रयत्न करूया, असं जिनपिंग यांनी म्हटलं.
आयुष्यभर पदावर राहण्याचा मार्गही मोकळा
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग 20 व्या कम्युनिस्ट पार्टी काँग्रेसमध्ये तिसऱ्यांदा अभूतपूर्व पद्धतीने आपला कार्यकाळ सुरू करण्याची तयारी करत आहेत.
यामुळे जिनपिंग यांचा आयुष्यभर या पदावर राहण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. चीनच्या नेत्यांनी 2018 मध्ये केवळ दोनदा पदावर राहण्याची मर्यादा संपुष्टात आणण्यासाठी मतदान केलं होतं. हा नियम 1990 पासून लागू होता.
शी जिनपिंग यांनी 2012 मध्ये सत्ता हाती घेतली आणि त्यांच्या राजवटीत चीन हुकूमशाही शासनाकडे वाटचाल करत आहे. विरोधक, टीकाकार आणि प्रभावशाली अब्जाधीश, उद्योगपती यांच्यावर कडक कारवाई केली जात आहे.
काही जण जिनपिंग यांना चीनमधील कम्युनिस्ट क्रांतीचे नेते आणि माजी सत्ताधारी माओ यांच्यापेक्षा अधिक हुकूमी वृत्तीचे मानतात.
विरोधी आंदोलनाचे फोटो झाले होते व्हायरल
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या विरोधात दुर्मिळ निदर्शनं पाहायला मिळत आहेत.
आंदोलक बीजिंगच्या हैदियन भागात सिटोन्ग पुलावर चढले. चीनचं शून्य-कोविड धोरण संपुष्टात आणा आणि जिपनिंग यांना पदच्युत करा, असं आवाहन करणारे दोन मोठे बॅनर त्यांनी लावले होते.
देशातील माध्यमे शांत असली तरी गुरुवारच्या निदर्शनाचे फोटो आणि व्हीडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर प्रसारित झाले आहेत. त्यामुळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आणि बहुतेक चिनी नागरिक वापरत असलेल्या WeChat अॅपवर सेन्सॉरद्वारे कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
जिपनिंग यांच्याकडे गुरुवारी संध्याकाळी कम्युनिस्ट पार्टी काँग्रेसच्या प्रमुखपदाची जबाबदारी सोपवली जाणार होती, यावेळी ही निदर्शनं करण्यात आली.
यावेळी निदर्शकांनी कारचे टायर्स पेटवले आणि लाऊडस्पीकरमध्ये घोषणाबाजी करताना तो दिसून आले. या आंदोलनाप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आल्याचं वृत्त आहे. या घटनेच्या व्हायरल फोटोंमध्ये पिवळी टोपी आणि केशरी कपडे घातलेल्या एका व्यक्तीला पोलीस अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं आहे.

फोटो स्रोत, Twitter
बीबीसीनं स्थानिक पोलिसांची प्रतिक्रिया मिळवण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, अनेकांनी या एकट्या निदर्शकाच्या कृतीची प्रशंसा केली आहे. त्याला 'नायक' म्हणून संबोधलं आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








