चीनः शी जिनपिंग पुन्हा एकदा समाजवादाच्या दिशेने का निघाले आहेत?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, स्टिफन मॅक्डोनेल
- Role, बीबीसी न्यूज, बीजिंग
अनेक दशकांपासून चीनमधील जनजीवन हे त्यांनी स्वतः तयार केलेल्या भांडवशाही व्यवस्थेच्या भोवती फिरत असल्याचं पाहायला मिळालं.
मुळात साम्यवादी विचारसरणी असलेला देश असूनही याठिकाणच्या सरकारनं वेगळ्या पद्धतीच्या (श्रीमंतांना सवलती देणाऱ्या) अर्थव्यवस्थेवर विश्वास ठेवला. काही लोकांना प्रचंड श्रीमंत होण्याची मुभा दिल्यास ते समाजाला माओच्या सांस्कृतिक चळवळीमुळं निर्माण झालेल्या विनाशकारी दलदलीतून शक्य तेवढ्या लवकर बाहेर काढण्यास मदत करतील, असं चीनला वाटत होतं.
काही प्रमाणात यात यशही आलं. मोठ्या प्रमाणावर मध्यम वर्गाचा उदय झाला आणि समाजातील सर्वच स्तरातील घटकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावला.
आर्थिक विषमता
1970 च्या दशकात चीनमध्ये आर्थिक स्थिरता आली. त्यानंतर चीनला जागतिक स्तरावर आर्थिक वर्चस्व मिळवून शिखर गाठण्याची इच्छा आहे. त्यासाठी चीन सध्या अमेरिकेला आव्हान देत आहे.
पण या प्रयत्नात चीनमध्ये आर्थिक विषमतेचा मुद्दा उपस्थित झाला आहे.
त्यामुळं योग्य वेळी योग्य ठिकाणी असणाऱ्यांच्या मुलांमध्ये सध्या या सर्वाची झलक पाहायला मिळते.
1980 च्या दशकात ज्यांना कारखाने ताब्यात घेणं शक्य झालं, त्यांनी पुढं मोठ्या प्रमाणावर नफ्याची कमाई केली. त्यातून त्यांनी मुलांसाठी आलिशान स्पोर्टस कार खरेदी केल्या आणि सध्या त्या कार या चमचमत्या शहरांत वेगानं फिरतात. ज्या बांधकाम कामगारांना जीवनात कधीतरी घर कसं खरेदी करायचा? हा प्रश्न पडलेला असतो, त्यांच्यासमोर या श्रीमंतीचं प्रदर्शन केलं जात असतं.
समाजवादाच्या संकल्पनेमुळं (चिनी वैशिष्ट्यांसह) सरकारला तत्वज्ञानाच्या मार्गाने समाजाचा गाडा हाकण्याची एक प्रकारे परवानगी मिळाली. तीही अशा समाजाची जो अनेक अर्थांनी जराही समाजवादी नव्हता.
शी जिनपिंग यांनी हे फार काळ मान्य करायचं नाही असं ठरवलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
त्यांच्या नेतृत्वातील चीन सरकारनं डाव्यांना पुन्हा कम्युनिस्ट पार्टीमध्ये पाठवण्यास सुरुवात केली आहे. किमान काही प्रमाणात तरी तसं होत आहे.
आता नवीन घोषवाक्य किंवा योजना "सामूहिक समृद्धी(common prosperity)" आहे.
रस्त्याच्या कडेला लावण्यात येणाऱ्या पोस्टरच्या माध्यमातून अद्याप त्याचा प्रचार सुरू झालेला नाही, पण तेही लवकरच होईल.
चीनचे नेते आता काय करणार, याकडं सगळ्यांचीच नजर आहे.
दैनंदिन जीवनावरील परिणाम
या अंतर्गत कर चुकवणाऱ्या धनाढ्यांना लक्ष्य करणं हे अधिक अर्थपूर्ण ठरत आहे. त्याचबरोबर खासगी शिकवणी कंपन्यांवर बंदी घालून शिक्षणात समानता आणण्याचा प्रयत्नदेखील अत्यंत योग्य आहे. त्याचपद्धतीनं सध्या चीनमध्ये तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गजांवर होणारी कारवाई, हादेखील या योजनेचा भाग असू शकतो.
म्हणजे शी जिनपिंग यांना खरंच या साम्यवादी योजनेच्या संकल्पनेवर विश्वास आहे का? याबाबत 100% खात्री देणं कठीण आहे, मात्र काही निरीक्षकांना नक्कीच तसं वाटतं.

फोटो स्रोत, Getty Images
तर, भूतकाळाशी तुलना करून पाहता, पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांना तसं वाटत नही.
महत्त्वाची बाब म्हणजे, साम्यवादी मार्गाच्या संपत्तीच्या पुनर्वितरणाच्या दृष्टीकोनासह, शी जिनपिंग यांना जे काही करायचं आहे ते साध्य करण्यासाठी पक्षाला पुन्हा एकदा दैनंदिन जीवनाच्या बहुतांश पैलुंमध्ये पुन्हा उतरणं किंवा पुन्हा त्या दिशेला वळणं हाच वास्तववादी मार्ग वाटत आहेत.
मुलं आळशी बनत आहेत. व्हीडिओ गेम खेळून तरुण त्यांचं जीवन वाया घालवत आहेत. त्यामुळं उपाय म्हणून पक्षानं, गेम खेळण्यावर तीन तासांची मर्यादा घातली आहे.
टीव्हीच्या माध्यमातून मुलांच्या मनात विष पेरण्याचं काम केलं जात आहे. त्यावर उपाय म्हणून पक्षानं, टिव्हीच्या कार्यक्रमात मुलींसारख्या दिसणाऱ्या (sissy looking) मुलांवर बंदी घातली.
लोकसंख्येचा मुद्दा पुन्हा अडचणीचा वाटू लागला. त्यावरही पक्षानं तोडगा काढला. तो म्हणजे सर्वांसाठी तीन अपत्यांचं धोरण.
फुटबॉल, चित्रपट, संगीत, तत्वज्ञान, लहान मुलं, भाषा, विज्ञान प्रत्येक गोष्टीसाठी पक्षाकडं उपाययोजना तयार आहे.
वडिलांपेक्षा विरोधाभासी विचार
शी जिनपिंग हे ज्या प्रकारचे नेते आहे, तसे ते कशामुळं बनले हे जाणून घेण्यासाठी आपल्याच्या त्यांच्या भूतकाळावर एक नजर टाकावी लागेल.
त्यांचे वडील शी झाँगक्सन हे कम्युनिस्ट पार्टीच्या युद्धातील नायक होते. पुढं त्यांचं शुद्धीकरण करण्यात आलं. तसंच त्यांना माओच्या काळामध्ये तुरुंगवासही भोगावा लागला.
शी यांच्या आईवर त्यांच्या वडिलांवर आरोप करण्यासाठी दबाव आणण्यात आला. 1978 मध्ये शी यांच्या वडिलांच्या अधिकृत पुनर्वसनानंतर त्यांनी ग्वांगडाँग प्रांतात आर्थिक उदारीकरणासाठी दबाव टाकला आणि चीनमधील सर्वात पुरोगामी नेत्यांपैकी एक असलेल्या हु याओबँग यांचा बचाव केल्याचंही समोर आलं.

फोटो स्रोत, Getty Images
कम्युनिस्ट पक्षातील काही कट्टर लोकांनी शी यांच्या वडिलांचा प्रचंड छळ केला. त्यांच्या वडिलांचा कल सुधारणांच्या दिशेनं होतं. असं असतानाही शी जिनपिंग हे वडिलांच्या विचारसरणीच्या विरोधी दिशेनं पक्षाला का घेऊन जात आहेत? असा प्रश्न अनेकजण विचारत आहेत.
याबाबत विविध प्रकारचे स्पष्टीकरण दिले जात आहे.
कदाचित काही राजकीय मुद्द्यांवर त्यांची मते त्यांच्या वडिलांच्या मतांपेक्षा भिन्न असू शकतात.
कदाचित त्यांनी अशी काही योजना आखलेली असू शकते जी त्यांच्या वडिलांचा प्राधान्यक्रम किंवा विचारसरणीपेक्षा वेगळी असेल, पण तरीही ती माओ काळातील धोरणांसारखी नसेल. किमान त्यांचा हेतू तरी तसा नसेल.
तरीही, हे सर्व अत्यंत उल्लेखनीय असल्याचं दिसतं.
त्यांच्या वडिलांची तुरुंगात रवानगी करण्यात आली त्यावेळी, शी जिनपिंग हे 15 वर्षांचे होते. त्यांना अनेक वर्ष शेतात काम करायला जावं लागायचं, तसंच ते एका गुहेत तयार केलेल्या घरामध्ये राहत होते.
या संपूर्ण परिस्थितीनं त्यांना नक्कीच अधिक मजबूत बनवलं. पण त्यामुळं राजकारणाविषयी त्यांना द्वेष निर्माण होणं सहज शक्य होतं. विशेषतः कट्टरतावाद्यांविषयी.
चीनमधील काही निरीक्षकांच्या मते, देश पुन्हा एकदा 1960 आणि 70 च्या दशकातील अराजक माजलेल्या परिस्थितीच्या दिशेनं जाणार नाही, याची हमी केवळ एक मजबूत नेताच देऊ शकतो.
त्यात आता नियम बदलले आहेत. त्यामुळं त्यांना हवं तोपर्यंत ते सत्तेत राहू शकतात, हेही लक्षात घ्यायला हवं.
अशा प्रकारचे आडाखे बांधण्याचं कारण म्हणजे, त्यांच्या निर्णयाबद्दल स्पष्टीकरण देताना आजवर त्यांना कधीही पाहिलेलं किंवा ऐकलेलं नाही. माध्यमं सरकारच्या नियंत्रणाखाली असली तरी, चीनचे नेते कधीही मुलाखती देत नाहीत.
टिव्हीवर झळकण्यासाठी म्हणून शी जिनपिंग हे ग्रामीण भागात जातात. याठिकाणी मोठ्या उत्साहात त्यांचं स्वागत केलं जातं. येथील शेतकऱ्यांना ते मक्याची शेती किंवा इतर विषयांवर ज्ञान देतात आणि त्यानंतर निघून जातात.
त्यामुळं चीनमधील आर्थिक घडामोडींवर कोणते नवे नियम, निर्बंध किंवा दिशानिर्देश लावले जाऊ शकतात, किंवा हे किती काळ चालेल, याचा अंदाज लावणं कठीण आहे.
अलिकडच्या काळात अगदी प्रत्येक आठवड्यामध्ये सरकारचे नियम, नियंत्रणासंबंधीचे दिशानिर्देश किंवा चीनच्या धोरणात बदल झालेला पाहायला मिळत आहे.
खरं तर या सर्वांसह पुढं जाणं अत्यंत कठीण आहे. यापैकी अनेक बदल हे अचानक असे समोर आलेले पाहायला मिळाले आहेत.
सरकारच्या नियंत्रणात असलेल्या उत्पादनासंदर्भात अडचणी आहेत, असं काही नाही. मात्र अर्थतज्ज्ञांनी अधिक प्रभावी काय असू शकते, यावर चर्चा करणं गरेजं आहे. कारण अचानक निर्माण झालेली अनिश्चितता ही सर्वात मोठी अडचण आहे.
पुढच्या एका महिन्याच्या कालावधीत नवे नियम काय असतील? याची खात्री नसेल तर गुंतवणुकीसंदर्भात विश्वासानं निर्णय कसे घेता येतील.
याठिकाणी असेही काहीजण आहेत, ज्यांना ही संपूर्ण प्रक्रिया देशाच्या विकासाचा एक नैसर्गिक टप्पा वाटते. ज्या भागांमध्ये अद्याप नियम किंवा निर्बंध नाहीत तिथं ते असायला हवेत.
जर खरंच असं काही असेल, तर हा काळ संक्रमणाचा आणि तात्पुरता असू शकतो. नवीन नियम स्पष्ट झाल्यानंतर ही परिस्थिती निवळू शकते.
पण या सर्व घडामोडींचा काळ, वेळ, प्रमाण काहीही निश्चित नाही.
मात्र निश्चित असलेली एक गोष्ट म्हणजे, सध्या प्रत्येक बदलाकडं शी जिनपिंग यांच्या "सामुहिक समृद्धी"च्या दृष्टीनं पाहायला हवं. याची अंमलबजावणी करताना पक्ष जराही सत्ता सोडणार नाही. एकतर तुम्हाला या गाडीमध्ये स्वार व्हावं लागेल, अन्यथा ती गाडी तुम्हा चिरडून पुढं निघून जाईल.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








