Share Market: चिनी शेअर बाजारात मंदीची शक्यता भारतासाठी आनंदाची बातमी आहे का?

चीनची अर्थव्यवस्था

फोटो स्रोत, EPA/JEROME FAVRE

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक चित्र
    • Author, आलोक जोशी
    • Role, ज्येष्ठ आर्थिक पत्रकार, बीबीसी हिंदीसाठी

चीन सरकार,बड्या चिनी कंपन्या, शेअर बाजार आणि जगभरातील गुंतवणूकदार यांच्यात बुद्धीबळाचा खेळ सुरू आहे की काय असं चित्र आहे. तुम्ही चायनिज चेकर्स खेळला असाल तर समजा की तसंच काहीसं सुरू आहे.

कोण कधी कोणाच्या बाजूने चाल खेळेल आणि कोणाविरोधात फासे टाकेल याची कल्पनाही नाही. राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी गेल्या आठवड्यात सांगितलं की, सरकारने कंपन्यांना कम्युनिस्ट पक्षाच्या सूचनांचे पालन करण्याचा मार्ग दाखवावा.

त्यामुळे एकीकडे चीन सरकार आपल्या कंपन्याबाबत कठोर पावलं उचलत आहे. दुसरीकडे, तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये परस्पर स्पर्धेसाठी सरकारने कठोर नियम लागू केले आहेत.

एका मोठ्या प्रॉपर्टी कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलावून कंपनीचे प्रचंड कर्ज कमी करण्याचा इशारा दिला आहे.

ही वेळ लवकरच मद्यविक्रेता कंपन्यांवरही ही वेळ येणार असल्याचं समजतं. यापूर्वी स्टील, ई-कॉमर्स,शिक्षण किंवा ऑनलाइन शिक्षण यात गुंतवणूक असलेल्या कंपन्यांनाही फटकारण्यात आलं आहे.

गुंतवणूकदारांना चिंता

चिनी सरकारने आता मुलांसाठी विशेष सूचना जारी केल्या आहेत. मुलांना आठवड्यातून शुक्रवार, शनिवार आणि रविवार अशा तीन दिवशी केवळ एक तास व्हिडिओ गेम खेळण्याची परवानगी असेल. यावरुन तुम्हाला अंदाज आलाच असेल की तंत्रज्ञान कंपन्यांना नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकार कशापद्धतीने पावलं उचलत आहे.

चीनची अर्थव्यवस्था

फोटो स्रोत, EPA/ALEX PLAVEVSKI

यामुळे गुंतवणूकदारांची चिंता दिवसेंदिवस वाढत चालली आहे आणि विशेषत: परदेशी गुंतवणुकदार चीनच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात विक्री करत आहेत.

3 सप्टेंबरला सरकाने नवीन शेअर बाजार सुरू करत असल्याचीही घोषणा केली आणि यामुळे ज्या 66 कंपन्यांचा यात व्यवसायासाठी समावेश करण्यात येणार आहे या कंपन्यांचा भाव 6 सप्टेंबरला वधारल्याचं दिसून आलं.

परंतु यामुळे मंदीची भीती दूर होईल असं नाही. कारण या लहान आणि मध्यम कंपन्या आहेत, तर ज्या कंपन्या यापूर्वी झपाट्याने घसरल्या आहेत त्या केवळ देशातीलच नव्हे तर जगातील आघाडीच्या कंपन्या आहेत आणि त्यांच्या शेअर्सने गेल्या अनेक वर्षांतील नीचांक गाठला आहे.

चीनसाठी मोठं संकट

चीनमधील आर्थिक विकासाचा वेग अनेक वर्षांपासून जगाला आश्चर्यचकित करत आहे. श्रीमंतांची गणना करणाऱ्या हुरुन अहवालानुसार, गेल्या वर्षी चीनमध्ये अब्जाधीशांची संख्या 1058 होती, तर अमेरिकेतील केवळ 696 होती.

तालिबान, अफगाणिस्तान, चीन, अमेरिका

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग

इथे अब्जाधीश म्हणजे किमान एक अब्ज डॉलर्सची मालमत्ता असलेले लोक.

जागतिक बँकेने सुद्धा हे मान्य केलं आहे की, 1978 पासून चीनने 80 कोटी लोकांना दारिद्र्याच्या कचाट्यातून बाहेर काढलं आहे आणि आता देशाची निम्मी लोकसंख्या मध्यमवर्गीय आहे.

त्याचवेळी देशातील 60 कोटीहून अधिक लोक आजही गरीब आहेत किंवा महिन्याला 150 डॉलरपेक्षा कमी खर्चात ते आपलं भागवतात हे वास्तव सुद्धा नाकरुन चालणार नाही.

गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी चीनसाठी एक मोठे संकट बनले आहे आणि त्याची व्याप्ती वाढत आहे. म्हणूनच आता सरकार जी पावलं उचलत आहे त्यातून गरीबांच्या मदतीसाठी श्रीमंतांच्या संपत्तीवर त्यांची नजर असल्याचं स्पष्ट दिसत आहे.

मोठ्या बदलांची योजना

तज्ज्ञांच्या मते, राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग देशात एक मोठा बदल घडवून आणण्यासाठी योजना आखत आहेत, ज्याचा उद्देश श्रीमंतांच्या संपत्तीच्या आधारे देशातील सर्व लोकांमध्ये त्याचे अधिक समान विभाजन करणे हा आहे.

चीन

फोटो स्रोत, Getty Images

हेतू चांगला आहे, पण यामुळे श्रीमंतांची झोप तर उडालीच आहे, शिवाय परदेशी गुंतवणूकदार चिंतेत आहेत.

दरम्यान, चीनच्या काही मोठ्या कंपन्यानी पुढाकार घेत सरकारच्या योजनांची अंमलबजावणी सुरू केली आहे. दारिद्र्य दूर करण्यासाठी आणि नफ्याचे समान विभाजन करण्याच्या सरकारच्या योजनेसाठी टेंसेंटने 15 अब्ज डॉलर्सचे योगदान जाहीर केलं आहे. त्यानंतर अलीबाबानेही एवढीच रक्कम देणार असल्याचं जाहीर केलं आहे.

चीनमध्ये व्यवसाय करणाऱ्यांसाठी आता हा एकमेव मार्ग आहे. तुम्ही स्वत:हून दिलं नाही, तर तसंही सरकार वसूल करणार.

परदेशी गुंतवणूकदारांसाठी मात्र बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा आहे. त्यासाठी सुद्धा कधीपर्यंत मुभा दिली जाईल याचीही काही शाश्वती नाही. या भीतीपोटी गुंतवणूकदार बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत.

चिनी बाजारपेठेचा अभ्यास असणाऱ्यांचे म्हणणे आहे की, बाजारपेठांमध्ये गोंधळ उडाला आहे.

शेअर बाजारात मोठी घसरण

काही मोठ्या शेअर्समध्ये 30 ते 40 टक्के घसरण दिसून येत आहे. प्रश्न असा आहे की, चीनच्या बाजारपेठांमधून मोठी रक्कम बाहेर पडणार असेल तर ती भारताकडे आणता येणं शक्य आहे का?

कारण भारत आणि चीनमधील बाजारपेठा सामान्यत: विरुद्ध दिशेने चालतात आणि आशियातील इतर बाजारपेठा चीनशी जोडल्या गेल्याने त्यांची वाटचाल एकाच दिशेने होते.

शी जिनपिंग आणि नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, GRIGORY SYSOYEV

आताही चिनी शेअर बाजारात मंदीची भीती व्यक्त केली जात असताना भारतातील बाजार मात्र गगनाला भिडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

आंतरराष्ट्रीय गुंतवणूक तज्ज्ञांच्या मते अशा परिस्थितीमुळे चीनमधून बाहेर पडणारे पैसे भरतासाठी एक चांगला पर्याय असू शकतो. कारण चिनी बाजारपेठ पडली तर त्याचा परिणाम भारतातही होईल असं फंड व्यवस्थापकांना वाटत नाही.

चीन बाजारातील शेअर्सची किंमत

एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जवळपास महिन्याभराच्या विक्रीनंतर चिनी बाजारातील शेअर्सची किंमत आता आकर्षक बनली आहे. कंपनीची कमाई आणि शेअरची किंमत असलेल्या पीईचे प्रमाण आता खूपच कमी झाले आहे, तर भारतात ते ऐतिहासिक उच्चांकावर आहे.

आजही अनेक विदेशी ब्रोकरेज चिनी बाजारात कमाई करण्यापासून मागे हटण्याच्या मनःस्थितीत नाही. चीनमध्ये गुंतवणूक करण्यासाठी जो युक्तीवाद करावा लागतो त्याउलट भारतासाठी करावा लागतो.

भारत आणि चीन दोघंही प्रतिकूल परिस्थितीत लाभ देण्याची संधी दाखवत आहेत. चीनच्या तोट्याचा थेट फायदा भारताला झाला नसला, तरी सध्या तरी भारतातील परदेशी गुंतवणूक कमी होण्याची शक्यता नाही.

खरं तर हे सलग तिसरं वर्ष आहे जेव्हा बाजारातून पैसे काढण्याऐवजी परदेशी गुंतवणूकदार अधिक पैसे गुंतवत आहेत आणि चीनमध्ये जाणारा पैसा भारताकडे वळवता आला तर ही किरकोळ गोष्ट नसेल.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)